आम्ही नुकतेच पुण्याच्या आमच्या शांतिप्रसाद इमारतीमध्ये राहायला गेलो होतो. आधीच्या घरापेक्षा हे घर आणि परिसर पुष्कळ मोठा होता. सामान हलवताना शेवटच्या फेरीला फक्त बॅगा होत्या. त्यात आमचे रोज वापरायचे कपडे असल्याने टेम्पोबरोबर पाठवल्या नाहीत. पण बॅगा चांगल्याच जड होत्या. दोघात मिळून तीन बॅग्स उचलता येत नव्हत्या. कसेबसे उचलण्याचा प्रयत्न करतच होतो तितक्यात मागून आवाज आला, ‘ओ साहेब, थांबा थांबा. पडाल ना.’
मागून एक उंचे पुरे गृहस्थ येत होते. उंची कमीत कमी सव्वासहा फूट असावी. जितकी उंची जास्त तितकाच आडवा बांधा देखील होता. उंची पुष्कळ असल्याने हा आडवा बांधा तितका नजरेत भरत नव्हता. डाय केलेले काळे कुळकुळीत केस. सावळा रंग. भारदस्त शरीराला शोभणारा भारदस्त चेहरा. त्याहून भारदस्त आवाज. शरीर भारदस्त असलं तरीही पोट वगैरे सुटलेलं नव्हतं. रेघा रेघांचा फुल शर्ट, त्यावर करड्या रंगाची पॅन्ट. पायात चप्पल. असा वेश.
ते गृहस्थ भरभर चालत आमच्यापाशी आले आणि जोरात ओरडले, ‘काय हे साहेब? अहो, एवढं सामान एकदम कशाला आणायचं म्हणतो मी? थोडं थोडं न्यावं का नाही?’ चुकलंच आमचं असं मनात आलं.
‘अय मुकणे, इकडं ये. साहेबांच्या हातातील बॅग घे,’ असा वर त्यांनी वॉचमनला आदेशही दिला.
‘आणि ऐक, नुसती लिफ्टमध्ये ठेवून येऊ नको बॅग. घरापर्यंत सोडून ये,’ हे देखील पुढे जोडले.
‘पण पाटील साहेब, अहो ड्युटीवर आहे मी. दिसलो नाही आणि पकडला गेलो तर गहजब होईल,’ वॉचमन गयावया करत बोलला.
‘तुझ्या एजन्सीला इथं काम कोणी दिलंय रे? मला सांगतो. आणि एवढी भीती वाटत असेल तर रात्रपाळीला झोपा काढता तेव्हा शुटिंग करून दाखवू का सायेबाला तुझ्या. मला ड्युटीचं कारण देतोय,’ पाटील ओरडले.
बॅगा आमच्या वरती न्यायच्या होत्या आणि वाद मात्र या दोघांचा चालू होता. तरी मी थोडा स्वाभिमान दाखवायचा प्रयत्न केलाच, ‘राहू दे हो. लिफ्टने तर जायचे आहे. कशाला उगाच त्याला त्रास?’
पाटील जोरातच म्हणाले, ‘कशाचा त्रास? आणि तुम्हाला एवढं बॅग न्यायचं समजलं असतं तर एका खेपेला एवढं ओझं आणलंच नसतं. काय साहेब, मॅडम, साहेबाना एक वेळ समजत नसंल पण तुम्हाला समजतंय का नाही? एवढं सामान आणतात का एका दमात?’
ओळख ना पाळख. तरीही अहोंना आणि मला उगीचंच रागावणार्या माणसाचा राग यायचा सोडून मला जरा हसायलाच आलं. तर पाटील अजून कडाडले, ‘हसायला काय झालं? गंमत वाटली का ही?’
पुढे वॉचमनकडे बघत ओरडले, ‘तू का अजून उभा इथे? तू जा. बॅग सोडून ये. आणि तू येईपर्यंत मी इथंच उभा राहतो. चालतंय का?’
आता साहेबच असे म्हणल्यावर त्या वॉचमनकडे काहीच इलाज राहिला नाही.
ही आमची आणि चमत्कारिक पाटलांची पहिली भेट होती.
अजिबात ओळख नसताना पुढे होऊन मदत करण्याचा, त्यासाठी कोणाला तरी ओरडण्याचा उपक्रम पाटलांनी केला होता. तरीही अगदी पहिल्याच भेटीत पाटील आपलेसे झाले असे काही घडले नाही. पण नंतर वेगवेगळ्या निमित्ताने ते भेटत राहिले आणि नंतर ते इतके जवळचे होत गेले की पाटलांशिवाय शांतिप्रसाद सोसायटीच्या बागेतील पानदेखील हलणार नाही याची खात्री पटली.
आमच्या बॅगा हलवायला मदत केल्याच्या दुसर्याच दिवशी पाटील आम्हाला बागेत भेटले. एका मुलीचे खेळणे बागेच्या छोट्या तळ्यात पडले होते. तळ्याला कुंपण असल्याने छोटीला किंवा तिच्या बरोबर असलेल्या मावशीला ते काढता येत नव्हते. पाटलांनी ते बघितले. लगेच बागेच्या राखणदाराला आवाज दिला. कमाल म्हणजे त्यांना सगळ्या राखणदारांची, सगळ्या इमारतींच्या वॉचमनची नावे शिफ्टनुसार ठाऊक असतात. त्यांची कोणालाही आवाज देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आवाज देण्याच्या आधी ते ‘अये’ करून ओरडतात. अये म्हटल्याशिवाय त्यांना आवाजाचा जोर पडला आहे असे वाटतच नाही. त्याप्रमाणे ते ओरडले,’अये संपत, इकडं ये. ते बघ ते खेळणं पडलंय त्या पोरीचं पाण्यात. काढ ते.’
संपत धावतच गेला आणि पाण्यात पडलेल्या वस्तू काढण्याची जाळी घेऊन आला. त्याला ठाऊक होते की त्याने जराशी जरी कुचराई केली असती तर पाटलांनी त्याला कपडे काढून पाण्यात खेळणे काढण्यासाठी उतरवले असते.
तान्हं बाळ असू दे किंवा म्हातारा माणूस- पाटील कुणाच्याही मदतीसाठी कायम तत्पर असतात. पण त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मैदानात उतरून स्वतः काम करण्यावर पाटलांचा अजिबात विश्वास नाही. ही सगळी कामं कोणाकडून करून घ्यायची हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, माणसांशी वागण्याची पद्धत हे सगळं अद्भुत आहे. पाटील म्हणजे एक लोहचुंबक आहेत. कोणीही त्यांच्याकडे आकर्षित व्हावं.
आमच्या पंचवीस इमारतींच्या जंजाळात पाटील आमच्याच इमारतीत राहतात हे आमचं सुदैव. आता सुदैव म्हणायचे की कसे ते कळत नाही. कारण सदा सर्वकाळ माणूस खाली बागेत असतो. काही झाले की तिथूनच ते आम्हाला आवाज देतात. फोन करून त्यावर गोष्टी सांगाव्यात यावर त्यांचा अजिबातच विश्वास नाही. प्रत्यक्ष सांगण्यावर सगळा भर.
एके दिवशी असाच त्यांनी आवाज दिला, ‘ओ कुलकर्णी आणि त्यांच्या मॅडम, खाली उतरा जरा. कामय.’
पाटलांना नाही म्हणणे कोणाच्या बापाला शक्य नाही. आम्ही दोघेही घरात होतो याची खात्री केल्यावरच त्यांनी आवाज दिला होता.
आम्ही खाली गेलो. तिथे टाय, सूट, बूट असे घातलेला कोणीतरी माणूस होता. त्याला आमची ओळख करून देत म्हणाले, ‘हे आमचे कुलकर्णी सर आणि या मॅडम. तुझं जे काय हे, ते यांना समजून सांगायचं. आमच्या अख्ख्या सोसायटीत हे सगळ्यात हुशार माणसं हैती. जर काई बंडलबाजी केलीस तर लगेच पकडतील. त्यामुळे जरा डोकं चालवून बोल. कळलं का?’
मग आमच्याकडे वळून म्हणाले, ‘हा कुठला तरी बँकवाला आहे. आपल्या सोसायटीच्या पोरासोरांसाठी काहीतरी स्कीम काढलीय म्हणे. त्याचं जे काही आहे ते नीट समजावून घ्या आणि नंतर आपल्या कमिटीला समजावून सांगा.’
आम्ही ते काम करणार हे पाटलांनी गृहीत धरलेले होते. तरीही मी म्हणालेच, ‘अहो पाटील, पण आम्ही काही कमिटीचे सभासद नाहीत. उगीच पुन्हा त्यावरून वाद नको.’
पाटील गर्जले, ‘त्याला काय होतंय? एकतर कमिटी निवडून कोणी दिली? आपणच दिली का नाही. मग त्यांचं थोडं काम आपण वाटून घेतलं तर बिघडतंय कुठं? आणि मला एक सांगा कुलकर्णी मॅडम, हे सगळं त्यांनी सांगितलेलं समजंल असं एकतरी डोकं आहे का कमिटीत? सगळे आपले हौशेचे घोडे. रेस कोर्समध्ये पळायची वेळ आली की फेफरं येतंय त्यांना. कुठं बँकवाल्या लोकांसमोर इज्जत काढता त्यांची?’
हे सगळं त्या बँकवाल्यासमोर म्हणतच ते वर इज्जत कुठे काढता असा प्रश्न विचारत होते.
समोरच्याला एखाद्या कामासाठी तयार करण्याची एक अजब हातोटी पाटलांकडे आहे. माणूस नाही म्हणूच शकत नाही.
‘शांतिप्रसाद गृहनिर्माण सोसायटी’ मध्ये चालणारा एकूण एक उपक्रम पाटलांनी सुरू केलेला आहे. आणि एकदा उपक्रम सुरू करायचा असे म्हटले की तो हातावेगळा करूनच ते मोकळे होतात.
सोसायटीमध्ये जेव्हा नवरात्रोत्सव चालू करायचा होता तेव्हा फार मजा झाली होती. रात्री जेवण झाल्यावर बागेत फिरत असताना पाटील कोणाशी तरी तावातावाने बोलत होते, ‘अरे होईल की, कशाला काळजी करतोस? करूया आपण. गणपती नको म्हणालो ना तुला. लोकांच्या घरी गणपती असतात रे. खाली आरतीला उतरणार कोण? आरतीच्या तयारीला बायका लागतात. मलाही शंभर घरी गणपतीला आमंत्रण असतंय. मग त्या गुरुजीला आयतं फावतंय. तासभर माईक घेऊन आरती म्हणत बसतोय.’
मला तर काही संदर्भच कळेना. मी शेवटी जाऊन विचारले, ‘काय हो पाटील साहेब. काय झाले? का उगीच ओरडताय?’
‘मी ओरडतोय होय? काय मॅडम तुम्ही? आपल्याला काय तुमच्यासारखं गुळूमुळू बोलणं जमत नाही बघा. आपलं हे असंच. तडकफडक.’
‘अहो पण झालं तरी काय?’
‘हे बघा, मी पाच वर्षं झालं इथं राहतोय. तवापासून म्हणतोय की नवरात्र करूया. पण हे सगळे म्हणतात गणपतीच बसवू. आता गणपतीत हे सगळे घरचं सोडून इथं आरतीला येणार होय? म्हणून आपण नवरात्र करू. रोज मस्त डीजे लावू, खेळू दे पोरांना काय दांडिया खेळायचा तो. उगा बाहेर कुठेतरी जातात पोरं. काहीतरी लफडी करतात. त्यापेक्षा इथं आपल्या नजरेसमोर राहतील. दहा तिथं बारापर्यंत खेळवू. शिवाय रोजची सकाळ संध्याकाळची आरती असंलच.’
‘चांगली आहे की कल्पना.’
‘तेच तर म्हणतोय. तर ठरलं तर मग, कुलकर्णी मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे आपण नवरात्र करूया.’
नवरात्र साजरे करण्याची कल्पना आणि प्रस्ताव सगळं माझ्या खांद्यावर टाकून पाटील मोकळे झाले होते. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे पाटलांनी ठरवलेला कुठलाच कार्यक्रम खाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सगळ्याच कार्यक्रमांत पाटलांना लोकांना खायला घालण्यात भयंकर स्वारस्य आहे.
त्याप्रमाणे नवरात्रात कुठल्या दिवशी काय मेनू ठेवायचा याची पाटलांची यादी तयार होऊ लागली. ही यादी, सजावट, मांडववाल्याला बोलावणे, केटरर बोलवणे हे सगळं पाटील एकहाती करतात.
नवरात्रीच्या तयारीसाठी सभा सुरू झाल्यावर पाटलांना विचारले, ‘अहो पाटील, पण कुठल्या दिवशी काय कार्यक्रम घ्यायचा?’
‘ते तुम्ही ठरवा की. आपल्याला त्यातलं काही कळत नसतंय. हे बघा, एक दिवस भोंडला ठेवा. एक दिवस होम ठेवा, एक दिवस कुमारिका पूजन ठेवा, एक दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ, सगळ्या पोरासोरांना बायांना काय नाचायचं ते नाचून घेऊ देत. हौस नाहीच भागली तर रात्रीचा दांडिया आहेच. अन राहिलंच तर एक दिवस ते कसले तरी पाठ करून घेवूत गुरुजींकडून. आणि आधीच सांगून ठेवतो, त्या गुरुजींवर लक्ष ठेवा. शंकराची आरती झाली की माईक काढून घ्या त्यांच्याकडून. वर्षात एवढाच काळ त्यांना महत्त्व मिळतंय. घेतंय गुरुजी हात धुवून. किती वेळ आरती म्हणतात. पब्लिक कंटाळती ना. गुरुजीला म्हणा, चार आरत्या म्हटल्या तरी दक्षिणा तेवढीच मिळणार आहे आणि दहा म्हटल्या तरी तेवढीच असणार आहे. उगी राग आळवू नको. तुम्हाला सांगणं जमत नसेल तर मी बोलतो.’
तुम्ही ठरवा असे म्हणत पाटलांनी स्वतःच सगळं ठरवून टाकलेलं होतं.
आम्हाला प्रश्न पडलेला होता की कुठल्या दिवशी काय मेनू ठेवायचा? आणि खायला आलेली माणसं आपल्याच सोसायटीतील आहेत की नाही हे कसं बघायचं?
त्यावर पाटलांचं उत्तर ठरलेलं होतं, ‘काय कोणाला यायचं ते येऊ दे खायला. त्यासाठी कोणाला नाही म्हणू नये हो. जे काय पैसे जमा होतील, त्याच्या वर जर खर्च झाला तर तो मी देईन.’
आता असे म्हणाल्यावर आम्हाला बोलायला काही जागाच नव्हती. संध्याकाळी खायला नाश्त्याचा प्रकार ठेवावा असे ठरले, म्हणजे पाटलांनीच ठरवले. रोज काय नाश्ता ठेवणार?
‘अहो आहे काय त्यात? बायका असून तुम्हा सगळ्यांना एवढा विचार करावा लागतोय होय? एक दिवस लाइव्ह बटाटेवडे ठेवू, एक दिवस लाइव्ह इडली ठेवू. शेवटच्या दिवशी पोटभर म्हणून लाइव्ह पाव भाजी ठेवू.’
आता हे लाइव्ह बटाटेवडे, इडली आणि पाव भाजी काय प्रकार आहे? हा प्रश्न पडला, तो आमच्या चेहर्यावर पाटलांना दिसला असणार.
‘काय मॅडम, अहो म्हणजे गरमगरम. इकडे तेलातून काढायचं की पानात. आपल्या समोर कउंटर लावणार. तो तळताना, पाव भाजताना दिसेल आपल्याला. आपल्याला हवा तेवढेच बटर लावून तो पाव भाजणार.’
लाइव्ह टेलिकास्ट, गाण्यांचा कार्यक्रम, क्रिकेट असे सगळे ऐकले बघितले होते. लाइव्ह बटाटेवडे आणि पाव भाजी देणारा हा पहिलाच इसम बघितला होता.
‘अहो पाटील साहेब, एवढ्या लोकांत हे कसे जमावे? गोंधळ होईल,’ असे मी म्हणाल्या क्षणी ते उत्तरले, ‘काळजीच सोडा. ते माझ्याकडे लागलं. मी बघतो की सगळं. पाच तिथं दहा काउंटर लावू. पब्लिक खुश झालं पाहिजे. शांतिप्रसाद सोसायटीचं नाव झालं पाहिजे.’
लाइव्ह बटाटेवडे आणि पाव भाजी याने शांतिप्रसाद सोसायटीचे नाव होईल असे पाटलांना का वाटले असावे? पण पाटलांनी आपला शब्द पाळला होता. कुठलाही गोंधळ न होता चारशे माणसांचे गरमागरम खाणे त्यांनी व्यवस्थित जमवले होते आणि हळूहळू आता तो आकडा आठशेकडे झुकला आहे तरीही अजून जमवतच आहेत.
मागची पंधरा वर्षे पाटील वेगवेगळ्या निमित्ताने झालेल्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होतात. केवळ पाहुणे म्हणूनच नव्हे तर आयोजक तेच असतात. प्रायोजक तेच असतात. कार्यक्रमाला लागणार्या माईक, खुर्च्यांपासून प्रमुख पाहुण्यांपर्यंत सगळं तेच बघतात. लाइव्ह बटाटेवड्यांपासून ते बिर्याणीपर्यंत सगळे पदार्थ खायला घालून त्यांनी आमच्या जिव्हा तृप्त केलेल्या आहेत. एवढे करून पाटील साहेब स्वतः कधीही कुठल्याही कार्यक्रमात काहीही खात नाहीत. प्रेमाने सगळ्यांना खाऊ घालणे हाच त्यांचा छंद आहे. कार्यक्रम संपला की वाढप्यांपासून ते कचरा गोळा करणार्या मुलांपर्यंत सगळ्यांना बसवून ते खायला घालतात. अन्न शिल्लक नसेल तर पदरचे पैसे देतात आणि त्यांना बाहेर जाऊन खायला सांगतात. माणूस त्यांच्याशी आपोआप जोडला जातो.
त्यांना सगळं मोठ्या प्रमाणावरच करायचं असतं. पाच पन्नास लोकांच्या कार्यक्रमाकडे ते फिरकत देखील नाहीत. असे कार्यक्रम त्यांना चिल्लर वाटत असावेत. पाटील आमच्या गृहनिर्माण संस्थेच्या सगळ्या कार्यक्रमांचे आजीव अध्यक्ष आहेत. पाहुणे म्हणून कोणीही येवो, अध्यक्ष मात्र एकच. ते म्हणजे पाटील साहेब. बरे पाहुणे म्हणून हे कोणालाही बोलावतात आणि मग त्यांचे कौतुक करण्यासाठी भाषणात काहीही बोलतात.
एकदा कचरा गाडी संघटनेचे अध्यक्ष त्यांनी बायकांच्या हळदी कुंकवाला पाहुणे म्हणून बोलावले होते. काय बोलणार? त्यांची ओळख देखील बायकांना करून देता येईना, तेव्हा पाटील पुढे सरसावले. त्यांनी माईक हातात घेतला आणि बोलू लागले, ‘आज चित्तरंजन साहेब कचरा जमा करण्यातून वेळात वेळ काढून इथे आले, त्याबद्दल त्यांचे आभार किती मानावेत? आमच्या सोसायटीच्या बायका लै कचरा करतात. त्यामुळे त्यांनी कचरा कमी करण्याच्या काही टिप्स आपल्या भाषणात द्याव्यात ही विनंती.’
इतक्या लोकांमध्ये वावर असूनही पाटलांना नावे ठेवताना मी आजवर कोणालाही ऐकले नाही. ते सर्वत्र असतात. बायकांच्या मिटिंग देखील त्यांच्याशिवाय होत नाहीत. बायकांच्या मीटिंगमध्ये येऊन बिनधास्त ताई, मॅडम, वहिनी असे म्हणत सगळ्यांकडून ते हवी तशी कामे करून घेतात. कुठल्याही कार्यक्रमाचे निवेदन कोणी करायचे, सोसायटीत कोण कुठे काम करतं, कोण कुठली कामे करत नाही असे सगळ्यांना त्यांना कसे कुणास ठाऊक पण नेमके माहिती असते. इतक्या बायकांमध्ये वावरून देखील कधीही त्यांनी कोणाकडे वाईट नजरेने बघितलेले नाही. आपल्या घरच्या माणसाच्या हक्काने बायका त्यांच्याशी बोलतात. ज्या इमारतीत राहतात त्या समितीचा ते भाग नसले तरीही वार्षिक सभेला ते असतात, महिन्याच्या सभेला ते असतात. शिवाय बाकीच्या इमारतींच्या सभांना देखील असतात. राजकीय पक्षात असतात. कुठल्याही एका पक्षाशी ते बांधील नाहीत. कुणाचाही प्रचार करायचा असला की ते राजकारणी येऊन पाटलांना गाठतात. पाटील कमिटीकडून परवानगी मिळवून देतात. या सगळ्यातून त्यांना काय मिळते हे कोणालाही ठाऊक नाही. पण आजवर त्यांच्याशी उद्धटपणे बोलताना कोणालाही ऐकलेले नाही.
कित्येक वर्षे आम्हाला वाटायचे की पाटील कधीतरी निवडणुकीला उभे राहतील, आमदार खासदार म्हणून आम्हाला दिसतील. पण तसेही झाले नाही. त्यामुळे एकंदरच त्यांच्या आकांक्षा काय आहेत आणि हा माणूस प्रत्येक कामात एवढे का झटतो, हे एक कोडेच राहिले आहे.
त्यांना कशाचेही भय नाही. दोन गोष्टींना सोडून. त्या गोष्टीदेखील आम्हाला आश्चर्यकारकरित्या समजल्या. एके दिवशी पाटील आमच्याकडे आले आणि म्हणाले, ‘कुलकर्णी सर, तुम्ही नेहमी विमानानं जाता किनई? तर अशात तुम्ही बेंगलोरला उडणार आहात का?’
हा काय प्रश्न झाला? उगीच आपण मध्ये पडू नये म्हणून मी शांत बसले. कुलकर्णीच बोलले, ‘का हो पाटील? काय झालं? एकदम माझ्या विमान प्रवासावर वâा आलात? आणि तेही बेंगलोरला उडवणार मला?’
काही क्षण पाटील शांत बसले. त्यांनी इकडे तिकडे बघितलं आणि थोडे पुढे झुकले. फक्त कुलकर्णींना ऐकायला जावं म्हणून एकदम हळू आवाजात म्हणाले, ‘अहो मला जायचं होतं बेंगलोरला.’ एरवी संपूर्ण सोसायटीला ऐकायला जाईल एवढ्या मोठ्या आवाजात बोलणारे पाटील एवढे हळू आवाज काढू शकतात यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
कुलकर्णी म्हणाले, ‘मग जा ना. तिकीट काढून द्यायचं आहे का?’
पाटील किंचाळलेच, ‘नाही हो, तिकिटाचं काय? माझा एजंटय ना. तो काढतोय की. बस म्हणू नका, ट्रेन म्हणू नका, विमान म्हणू नका. कुठं जायचं तेवढं बोलायचं. शंभर टक्के कन्फर्म तिकीट मिळणार म्हणजे मिळणार.’
तिकिटाचे काम नव्हते तर भानगड काय होती? पाटलांच्या बेंगलोरला जाण्याशी अहोंचा काय संबंध!
पुन्हा एकदा हळुवार स्वर कानावर पडला, ‘ते काये, मला जरा विमानाची भीती वाटतीय. म्हणजे तशी कुठेही उंचावर जायची वाटतीय. म्हणून आजवर कुठं विमानानं गेलो नाही. बायकोला घेऊन कुठं टेकड्यांवर गेलो नाही. बायको ही बोंबलतीय, सिमला नाही, मनाली नाही. कुठं नेत नाही म्हणून. अहो पण कसं न्यायचं. तिला म्हणलं की समुद्रावर चल. तर म्हणतीय की मी मुंबईची आहे. माहेरी असताना पुष्कळ बघितला समुद्र. तुम्हाला म्हणून सांगतो कुलकर्णी सर, अहो अजून तिला पर्वतीला पण नेलं नाही हो. कोण मला पुण्याचा म्हणल का? पण, तुम्हीच सांगा. वाटू शकते किनई भीती?’
अहो म्हणाले, ‘म्हणजे काय पाटील, वाटूच शकते भीती.’
पाटलांनी निश्वास सोडला, ‘बघा, सांगा आमच्या बायकोला. पैशांची काही कमी नाही हो. रोज फिरायला बाहेरच्या देशात जाऊ शकतो. पुष्कळ पेट्रोल पंपातून पैसा येतोय. एवढी बागायती जमीन आहे. पण विमानाने जायचं म्हणजे कठीणय.’
इतक्या वर्षांत आम्हाला पहिल्यांदा पाटलांच्या पैशांचा स्रोत समजला होता. पण पाटलांना विमानाची भीती वाटते या कल्पनेनेंच मला हसायला आलं. पण त्यांच्यासमोर हसले असते तर ते भडकलेच असते. एवढा मोठा सव्वासहा फुटी देह, तेवढाच आडवा बांधा आणि आमच्यासमोर मात्र भेदरलेल्या सशासारखे ते बसलेले होते.
अहो म्हणाले, ‘पण मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे?’
पाटील म्हणाले, ‘ते काये, माझा एकदम जुना दोस्त खूप आजारी आहे. बेंगलोरला असतो. त्याला भेटायचं आहे. ट्रेनने गेलो तर फार वेळ जाईल. कदाचित तेवढा वेळ नाही. त्याच्या बायकोचा फोन आला होता. खूपदा माझं नाव काढलं म्हणाली. मी एकट्याने विमानाने जाऊ शकत नाही. कोणी बरोबर असल तर जरा भीती कमी होईल. तुम्ही येता का, मी तुमचं तिकीट काढतो.’
आम्ही एकदम सर्द झालो. आयुष्यात कधीही विमानात न बसलेले पाटील मित्रासाठी ती हिंमत करायला तयार झाले होते. अहोंनी लगेच होकार भरला. पाटलांच्या डोळ्यात पाणी तरळले. पुढे आले आणि त्यांनी ह्यांना घट्ट मिठी मारली.
‘मी तिकिटाचं बघतो,’ असे म्हणून निघाले. दरवाजा उघडून बाहेर पडले आणि परत काहीतरी आठवून आत आले, ओरडले, ‘कुलकर्णी सर आणि त्यांच्या मॅडम, तेवढं ते मला उंचावर जायची भीती वाटती म्हणून कोणाला सांगू नका बरं. इज्जत जाईल आपली. इथं घर पहिल्या माळ्यावर तेवढ्यासाठी घेतलंय.’
पाटील म्हणजे एक चमत्कारिक प्रकरण आहेत. पाटलांना दुसरी भीती वाटते ती म्हणजे त्यांची मुलं काय करतात हे कोणी विचारण्याची. कोणी जर विचारले की त्यांची मिनू काय करते तर ते कुणाच्या तरी पोरीचं नाव घेतात आणि बिनधास्त फेकतात, ‘ती कुलकर्णीची छकुली जे करती ना तेच.’
पाटील कधीही मुलांच्या शाळेत गेले नाहीत, कॉलेजात गेलेले नाहीत. मुलं खूप शिकतात एवढंच त्यांना ठाऊक आहे. पण काय शिकतात असे विचारले की पाटील गडबडलेच म्हणून समजा. सगळ्यांना पाटलांची ही भीती मात्र चांगलीच ठाऊक झालेली आहे. त्यामुळे उगीचच पाटलांना गप्प करायचं असलं की कोणीही प्रश्न टाकतं, ‘तुमचा यश कसला कोर्स करतोय हो पाटील?’
पाटलांनी आतापर्यंत त्यांचा यश आणि मिनु बागकामाच्या कोर्सपासून ते शल्यचिकित्सेपर्यंत कुठल्याही कोर्सचे नाव घेऊन शिकतात म्हणून सांगितले आहे.
हा माणूस कुटुंबाला वेळ देतो की नाही कुणास ठाऊक. कायम ते बागेत, सभेत, कार्यक्रमात किंवा मीटिंगमध्येच दिसलेले आहेत. कदाचित त्यांच्या कुटुंबातील कुठल्या गोष्टीला ते उद्या हजर राहिले तर कोणी त्यांना ओळखणार देखील नाही.
कधी कुठे काय करतील नेम नाही. त्यांचा कामाचा वेग, आवाका असे काहीही आपल्याला गाठणे शक्यच नाही. इतक्या वर्षात या माणसाला मी तसूभर देखील बदललेले पाहिलेले नाही. जसे होते तसेच धिप्पाड आहेत. तितकेच उत्साही आहेत. केव्हाही कोणाला काही हवं असावं, त्याने पाटलांना आवाज द्यावा आणि पाटलांनी म्हणावे की करू की, त्यात काय?
बाहेरगावी सुद्धा काही मदत लागली तर पाटील ती करून देतात. तुम्हाला तुळजापूरला जायचे आहे, कोल्हापूरला जायचे आहे, अगदी दादरला सिद्धिविनायकाला जायचे आहे, चैत्यभूमीला जायचे आहे, गोव्याच्या चर्चला जायचे आहे तर तुम्ही पाटलांना सांगा. ते सगळी मदत करतील.
सोसायटीच्या पाडव्यापासून ते दिवाळी पहाटपर्यंत, चौदा एप्रिलच्या बाबासाहेबांच्या मानवंदनेपासून ते नाताळच्या पार्टीपर्यंत सगळं पाटील करतात आणि सोसायटीत सगळ्यांना त्यात सामील करून घेतात. आज आमच्या ‘शांतिप्रसाद सोसायटीत’ जर उत्साह आणि एकी असेल तर त्याचे मूळ कुठे आहे हे तुम्हाला लक्षात आले असेलच.
मी काय म्हणते, उद्या तुम्ही आमच्या शांतिप्रसाद सोसायटीत आलात आणि तुम्ही सोसायटीत राहता की नाही हे न बघता कोणी दोनशे मीटरवरून भरभक्कम आवाज दिला, ‘अये इकडे ये. हे कर बरं जरा.’ तर नक्की लक्षात घ्या की तुम्ही आमच्या पाटलांना भेटला आहात. आणि माझी खात्री आहे की एकदा पाटलांना भेटलात तर ते काम तुम्हाला नाकारता येणे शक्य नाही!