हे पंचक्रोशीतील प्रसिद्ध गाव विघनगाव. पूर्वीचं सुधनवाडी. पूर्वीचं शांत-बुजरं गाव. आताशा कात टाकून नावागत बदललंय. त्याप्रमाणे गावचं वातावरण पण बदललंय. त्यात गावच्या सगळ्या भिंती हल्ली रंगवल्या गेल्यात, ‘हम खत्रे में हैं’ अथवा ‘खतरा कायम रहेगा!’ या मजकुराने! गावची एकमेकांना धरून राहणारी लोकं आजकाल एकमेकांकडे संशयाने, भयानक तिरस्काराने बघताय. तारस्वरात संवाद ही पद्धत गावाने रूढ करवून घेतलीय. लोकं समविचारींना भेटल्यास ‘खतरा खतरा जीने दो!’ गाण्यावर ताल धरतात आणि ठेक्यात हिंसेवर येत रक्तपिपासू झुंड होतात. त्याला आजकाल काही पाताळधुंडी लोकं प्रगती म्हणताय.
तसं गाव बदलायचं कारण एकच नारबा. नारबा बिडीच्या उरलेल्या थोटकासारखा यत्किंचित व्यक्ती. पण तो जन्मला आणि गावाचं नशीब ‘पालथलं!’
भलेभले अवतारी पुरुष लोककल्याणासाठी झटतात. नारबा लोककल्याणाच्या नावानं झटतो, पण कोटकल्याण मित्राचं होतं. हा योगायोग की आणखी काही? यावर गावात मतमतांतरं खूप आहेत.
नारबा लहान असतानाचीच गोष्ट. नारबा एकदा प्रसिद्ध झूमध्ये गेला असता त्याला नदीत भिजणार्या मगरींची दया आली. त्यानं कृष्णागत डव्हात झेप घेत मगरींना सुखरूप बाहेर काढलं. मगरींनी खुश होत त्याला पाठीवर घेत गावातून संचलन करत त्याला सॅल्युट ठोकला आणि गावालाही! पुन्हा कल्याणासाठी गावात मगरी शिल्लक राहिल्याच नाहीत.
त्यानंतर त्या नारबानं ‘वेळ नियंत्रकाच्या’ साह्याने एका स्टेशनात त्या स्टेशनाच्या निर्मितीच्या वीसतीस वर्षे आधी पोहोचून अमृततुल्यचा गाडा हाकलेला. त्या धंद्यानं गावच्या एक पिढीनं अमृततुल्यची नशेबाज पिढी जन्माला घातलेली. आणि त्यानं अमृततुल्यचं कल्याण जाहलेलं.
त्यादरम्यान कुठेतरी त्याची टोपीवाल्यांशी संगत आली म्हणतात. त्यातून एकाचवेळी आत्यंतिक प्रेम आणि कटुता जन्मली असावी. एकतर्फी प्रेमवीरासारखी. ‘माझी झाली तर स्वर्गात ठेवीन, नाहीतर नरकात घालीन!’ टाइप. त्यातून त्यानं हद्दीपलीकडच्या टोपीवाल्यांच्या कल्याणासाठी बिनानोंदीचा कारावास भोगलेला. पण त्यानंतर त्याचं टोपीवाल्यांशी काहीतरी बिनसलेलं. वा त्या घडलेल्या न घडलेल्या कारावासात त्याचे पातेले भाजले असावे. पण त्यानंतर त्यानं कायम त्यांच्याशी उभं वैर धरलेलं. त्यानंतर त्यानं एक वस्तीच्या कल्याणात गर्क असताना दिव्य होम करू घातलेला. त्यात काही टोपीवाल्यांना चटके बसलेले. पण तो ‘जाळ’ कल्याणासाठीच असावा. कारण नंतर अख्ख्या गावानं त्याच्या कलाने काम करायचं ठरवलेलं. आणि तिथून त्याचा आणि सुधनवाडीचा विघनगाव बनण्याचा प्रवास सुरू झालेला.
तसं प्रवासाच्या सुरुवातीला त्यानं हरेकाचे खिशे भरण्याचं आश्वासन दिलेलं. त्यातून त्यानं घराघरात दडवलेली दौलत शोधण्यासाठी खिशेच जाळायला घेतले नि त्यात अनेक जण नको तिथं भाजले. पण कल्याणाच्या मार्गात थोडं भाजणं साहजिक आहे म्हणत त्यांनी ते सहन केलं.
पुढं गावची नदी स्वच्छ करण्याच्या ध्येयानं नारबा पछाडला. त्या गोष्टीसाठी त्यानं नदीला माता म्हणून बघितलं, पुढेमागे पार्थिवांचं खत देऊन बघितलं. पण हाय! ना माता पावली, ना खत! मग त्यात डुबकी मारून साठएक पवित्र झाल्याचं नारबानं नि त्याच्या चेल्यानं बोंबलून सांगितलं. लोकांनी त्यास भुलून अमृत समजून पाणी घराघरात ठेवलं.
त्याचं लक्ष हिरव्यागार माळाकडं गेलं, त्यानं तो माळ उकरून आणखी हिरवळ करण्याबाबत सांगितलं, सगळ्यांनी भरोसा ठेवला. त्यानं त्या खदानी मित्राला खणावयास दिल्या. बिचार्यानं मैत्रीखातर ते काम शिरावर घेतलं नि जमिनीखालचं काळं मट्रेल नजरेआड नेलं. त्यात त्याचे हात भयाण काळे झाले पण मैत्री म्हणजे मैत्री!
तसंच नारबानं स्टेशन, पोर्ट सत्तर सालात जे दुरवस्थेत गेलेत त्यांसाठी कल्याणाचा, विकासाचा आराखडा बनवला. कामासाठी चारदोन माणसं बोलावली. पण त्यातली सारी बकवास निघालेली. मग पुन्हा मित्रास याद करून ती कामं बळेबळे त्याच्या माथी मारलेली. बिचार्यानं झेपेल तशी करू बघितलेली.
त्यादरम्यान लोकांनी छान को-ऑपरेट केलेलं. पण एक केबलवाला लोकांत संभ्रम पसरवायचा. त्यांना भलते प्रश्न विचारायची सवय लावू बघायचा प्रयत्न करायचा. त्यातही मित्रानं मदत केली नि केबल स्वनियंत्रणात घेऊन कल्याण मंत्रात न्हाऊ घातलेली. लोककल्याणात मित्राची इतकी साथ मिळालेली की कुठं सिमेंट वा तेल वा इतर काहीही लागल्यास मित्र तोशीस घेऊन मदतीला धावे. पण लोककल्याणात खंड पडू देईना. ह्या त्याच्या कर्मठ कामसू वृत्तीपायी अर्धं विघनगाव मित्राच्या ताब्यात द्यावं लागलेलं. पण नारबाला त्याची चिंता नाही.
यादरम्यान गावच्या अलिकडल्या पलीकडल्या गावांत नारबाच्या भेटी घडलेल्या. त्यानं त्याही गावात लोककल्याणाची कामं हाताशी घेतलेली. तर अनेक ठिकाणी त्या विवक्षित लोककल्याणाच्या फॉर्म्युल्यानं गावची गाव पागल झालेली. त्यातून काही गावं पेटलेली. त्यात भर शेजारच्या टोपीवाल्याच्या गावची पडलेली. तिथल्या लोककल्याणात मग्न बाईंना घाईनं दवाबुटीसाठी आश्रयाला विघनगावात यावं लागलेलं. तेही ‘खतरा कायम रहेगा!’ नारा पुकारत.
अख्खं गाव लोककल्याणासाठी खणायला घेतलेलं असताना नारबाचे हात थडग्याला शिवशिवलेले. त्यात एक पंचानं ‘मदत’ केल्यानं तिथं त्यानं लोकवर्गणी जमवून मंदिर बांधायला घेतलेलं. पण हाय! लोकांना देवाला भेटण्याची अपार इच्छा! त्यातून कोटकल्याणाच्या सत्कार्यात विघन येऊ नये म्हणवून आहे तितकं उद्घाटन राबवून कामाची छाप दाखवलेली आणि लोकं भक्तीत रमवलेली. त्यात कल्याणाच्या ओव्हरडोसमुळं धणीपुर वस्ती जळू लागलेली, पण इकडच्या तिकडच्या अतीव कामांमुळे तिकडं पाण्याचे शिंतोडे उडवायला देखील नारबाला उसंत मिळेना! आता काही नतद्रष्ट त्यावरही आक्षेप घेऊ लागलेली. असो.
त्यात ह्या धबडक्यात कुठलंही काम हात लागण्यापासून बाकी राहिलं नाही, हे बघून नारबा संतोष पावलेला. पण एवढ्यात त्याचा गडी येश्या कुठल्या तरी चोपड्या घेऊन आला. त्या होत्या कुठल्या? गावच्या निरनिराळ्या भागाच्या! गावातल्या टोपीवाल्यांच्या. आता रे करायचं काय? नारबाचं एवढ्यात टोपीवाल्यांशी विळ्याभोपळ्याचं नातं बनलेलं. मग ह्या चोपड्या घेऊन त्यांचं कल्याण करायचं कसं? त्यानं त्याचा प्रश्नं येश्याला केला. येश्याला होमाच्या वेळचा भाजणीचा अनुभव गाठीशी असल्यानं नारबानं हे टोपी कल्याणाचं काम येश्यालाच सोपवलं.
त्यानं काय करावं? चोपड्या धरधरून त्याचं व्हॅल्यूएशन काढू बघावं. कल्याणाचे निरनिराळे फंडे शोधू बघावे. असले प्रकार करवून टोपीवाल्यांना मनवू बघितलं. पण त्यांना त्यांच्या कल्याणाची कणभर चिंता नाही, हे बघून त्याला अतीव चीड आली, संताप झाला. येश्यानं गावकरी जमवून टोपीवाल्यांच्या भल्यासाठी तो आणि नारबा कसे प्रयत्नशील आहेत ते ऐकवलं. टोपीवाले कसे हेकेखोर आहेत हेही समजावलं. त्यानं टोपीवाल्यांचे खिसे कसे भरतील. नोकरीपाण्याचे, कामधंद्याचे विषय कसे मार्गी लागतील हे समजावलं. त्यांचं उत्थान कसं होईल हेही समजावलं, झुंडीतले गावकरी ते चटकन समजून घेऊ शकले. पण बाकीच्यांना ते पटेना.
म्हणून नारबाच्या सांगण्यावरून येश्यानं अख्खे गावकरी बोलावलेले. त्यांना त्या टोपीवाल्यांच्या कल्याणाचे मार्ग सांगू बघितले. त्यावर एकमतानं निर्णय घ्यायचा आग्रह धरलेला. ते बघून काही ज्येष्ठांत चुळबुळ चालू झालेली. काही आपसात चर्चा करू लागलेली. त्यातून काही ठरवून एक वृद्ध धीर करून उभा ठाकतो आणि सवाल करतो, ‘येश्या, नारबाचं टोपीवाल्यांशी वैर सगळ्यांना माहीत आहे. मग एकाएकी नारबाला त्यांचंच कल्याण करायचं का सुचलं रे बाबा?’
येश्याला अपेक्षित प्रश्नं विचारला गेला, पण तो भलत्याच टोकानं आल्यानं येश्या गोंधळतो. पण अंती ठाम उभा राहत बोलण्याचं धाडस करतो, ‘वक्फ वक्फ की..! सॉरी! वक्त वक्त की बात हैं। लोककल्याणाचं एकही क्षेत्र नारबानं आपल्या नजरेतून सुटू दिलं नाही. त्यांच्या मित्रवर्याच्या साथीनं अख्खं विघनगाव दारात उभं आहे. कल्याणाच्या! इथं तर कुरणच बाकी आहे. याला अजून हात नाही म्हणजे…’ त्याच्या डोळ्यात लालच तरळते. ‘आता अख्ख्या गावात हेच बाकी आहे की! एवढं संपलं म्हणजे विकास झालाच म्हणायचा.’ बोलता बोलता त्याचा खिश्याकडे हात जातो. आणि लक्ष नारबाच्या मित्राकडे धावतं.
तोच मागून एक ढंगी उठतो.
‘नाही हो! अजून अधिकराव क्रास यांच्या पण कल्याणाचं बघायचंय आपल्याला. आणि झालंच तर… ते पगडीवाले..? ते ढवळे… ते पलीकडले…’ तो बोलू लागतो. तशी पब्लिक घरातली बाचकी-बोचकी घ्यायला धावू जातात. जी आधी पोहोचतात, ती वेस ओलांडून धावू लागतात. अडखळत पडत. जमेल त्याप्रमाणे. काय सांगावं? मागून नारबा येऊन कल्याणाच्या नावानं कोटकल्याण करू बघायचा?