आपल्या देशातले राजकीय पुढारी आपल्याच पैशांतून आपल्यालाच कसल्या कसल्या रेवड्या वाटत असतात. मग स्वत:च्या खिशातून किंवा पगारातून त्या देत असल्याप्रमाणे त्यावर स्वत:चे फोटो स्वत:चं नाव कसं देतात?
– विनायक रावकर, रोहा
विनायकराव, असे प्रश्न विचारण्यापेक्षा मिळतात त्या रेवड्या गप घ्या, तुम्ही रेवड्या वाटणार्यांच्या विरोधात प्रश्न विचारता हे रेवड्या वाटणार्यांच्या माणसांना कळलं तर विरोधकांना निधी न देणारे तुम्हाला रेवड्या देतील? आणि ह्या रेवड्या तुमच्या आमच्या खिशातून देता येत असताना ते कशाला स्वत:च्या खिशातून देतील? आपलेच पैसे आपल्याला परत देतात यात समाधान माना ना!
गॉगल लावून, नऊवारी नेसून, बुलेटवर बसून बायकांची मिरवणूक निघाल्याशिवाय आपली संस्कृती नव्या वर्षात प्रवेश करत नाही का?
– नयना पेणकर, ठाकुर्ली
मग सकाळी गुढी उभारल्यानंतर दिवसभर सुट्टीच्या दिवशी काय करणार बिचार्या? त्या गॉगल स्वत:च्या नयनावर लावतात नयना ताई, नऊवारी नेसण्याचा आणि सोडण्याचा त्रास स्वत: सोसतात, त्याचा तुम्हाला का त्रास व्हावा? वर्षभर ट्रेनच्या गर्दीत चेंगरून घेतात ना… मग एक दिवस फिरू दे की बुलेटवर. अत्याचार, महागाई, परीक्षांचा गोंधळ, नोकर्यांचा प्रॉब्लेम हे सगळं एक दिवस तरी त्या विसरतात… त्यासाठीच हे सगळं असतं. आणि बायकांचेचं काय, पुरुषांचेही प्रॉब्लेम्स सोडवता येत नसेल तर लोकांना असंच बांधून ठेवावं लागतं. उदा. शोभायात्रा, पदयात्रा, कावड यात्रा, तीर्थयात्रा… हेच तर हवं असतं ना अशा यात्रा स्पॉन्सर करणार्यांना (तुमच्या प्रश्नातला रोख मला कळला म्हणून त्याच रोखाने उत्तर दिलेय…).
आपल्या राज्यात एखाद्या गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं पवार साहेब?
– सूरज शितोळे, जामनेर
आता सध्या मी एका ‘स्टुडिओ’त रेकॉर्डिंग करतोय.. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मी ‘स्टुडिओ’तून देऊ शकत नाही. तुमच्या
ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरी येतो, तिथे बसून तुम्हाला उत्तर देईन… चालेल का तुम्हाला? नाही नाही. मी उत्तर टाळत नाहीये. पण उत्तर देण्यासाठी आपल्याला ‘तामिळनाडू’त जावं लागेल. तिथे कोणी आपल्याला ‘डिस्टर्ब’ करायला येणार नाही. आता यावर विचारू नका की ‘तामिळनाडू कैसे आयेगा भाय?…’
लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसली… आता भावोजींनी काय करायचं? तुमचा सल्ला काय?
– बाळकृष्ण पाटील, वाई
ज्यांनी बहिणीच्या तोंडाला पानं पुसली, त्यांचे पायपुसणं बनणं भाऊजींनी सोडायचं. एका वाक्यात उत्तर दिलंय. आता संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायला लावू नका. कारण बात निकलेगी तो बहुत दूर तलक जायेगी… त्यात भाऊजींचेचं वाभाडे निघायचे. कारण भावांना बोलून काही त्यांना काही फरक पडणार नाही. ते त्यांना हवं तेच करणार. एक भाऊ जेवायला बोलवतो… दुसरा पानं वाढायला घेतो… तिसरा भाऊ जेवणासहित पानच काढून घेतो. यात भावांची काय चूक आहे?.. भावाला बहिणी देवीसमान असतात… देवीला नैवेद्य फक्त दाखवला जातो, भरवला जात नाही. अशाच प्रकारे भाऊजींच्याही तोंडाला कित्येक वर्षं पानं पुसली जात आहेत. पण भावोजींना कळत नाहीये… तसंच बहिणींना सुद्धा कळणार नाही… तुम्ही काळजी करू नका.
संतोष सर, तुम्ही मार्मिकमधील तुमच्या सदराचे नाव ‘नाय नो नेव्हर’ असे नकारात्मक का ठेवले आहे?
– सतीश सराफ, मुंबई
तुम्ही हा असा प्रश्न विचारावा म्हणूनच या सदराचे नाव नाय नो नेव्हर असे ठेवले. प्रत्येक गोष्टीचं कारण विचारायचं नसतं सतीशराव. तसं असेल तर आम्ही विचारू शकतो तुमचं नाव अशोक का नाही ठेवलं?.. तुमचं नाव अशोक ठेवलं असतं, तर तुम्ही अशोक सराफ झाला असता.
महाराष्ट्रात परप्रांतीयांनी मराठी बोलावं यासाठी आंदोलनं केली जातात, मराठी कलावंतांनी मराठी पॉडकास्टमध्ये मराठी माणसांना मुलाखती देताना हिंदी किंवा इंग्लिशची भेसळ नसलेल्या मराठीतूनच बोलावं, यासाठी काय करायला हवं?
– सुचित्रा कारखानीस, बदलापूर
आधी पॉडकास्टला पॉडकास्ट म्हणणं सोडावं लागेल आणि परप्रांतीयांना मराठी बोलण्याचा आग्रह करताना आधी स्वतःचं हिंदी सुधारावं लागेल… नाहीतर यांना हिंदी बोलता येत नाही म्हणून हे मराठी बोलण्याचा आग्रह करतात असं त्या आंदोलनाचे व्हिडिओ बघणार्यांना वाटतं.