‘आम्हीच श्रेष्ठ… आमचीच भाषा शुद्ध… आम्हीच सर्वज्ञ… आम्ही सांगतो तेच खरं…’ असा वर्चस्ववाद्यांचा माज आज सत्ता आल्यावरच सुरू झालाय असं नाही माझ्या भावाबहिणींनो. साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या तुकोबारायाच्या काळातही तो असाच होता! तुकोबारायाच्या काळातही जातीच्या उतरंडी तयार करून हे लोक गोरगरीब जनतेला ‘अस्पृश्य’ म्हणून हलक्या नजरेनं पहायचे… हिणवायचे… त्यांच्याकडून अतिशय खालच्या दर्जाची कामं करून घेऊन पिळवणूक करायचे. त्यांचा शिक्षणाचा अधिकार नाकारायचे. ‘आम्हीच श्रेष्ठ, बाकीचे शूद्र’, ‘आम्हीच या भूतलावरचे देव बाकीचे खालच्या जातीचे चांडाळ’, ‘आम्ही बोलतो ते आणि तेच अंतिम सत्य’ अशा तुफानी गर्वात जगत होते हे वैदिक पंडित.
….परवा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा कोरटकर म्हणत होता ना, ‘तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात आहात…’ ही वर्चस्वाची मस्ती यांच्या धर्ममार्तंड पूर्वजांपासून यांच्या रक्तात भिनलेली आहे. शिवद्रोही राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांना ‘लाचखोर’ म्हणाला. कोरटकरही महाराजांना ‘पळपुटे’ म्हणाला. त्यानं तर थेट राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं चारित्र्यहनन करायचं धाडस केलं. हे सगळं पिढीजात का सुरू आहे माहितीय? कारण त्यांच्या लेखी शूद्र असलेल्या जातीत छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजांसारखे महान, महापराक्रमी, बुद्धिमान, संवेदनशील, विवेकी आणि तुफान लोकप्रिय राजे होऊन गेले, हेच त्यांना सहन होत नाही! ‘विद्वत्तेचा सगळा ठेका आपण घेतलाय’, हा भ्रमाचा भोपळा फोडणारा बहुजन समोर आला की ते बिथरतात. त्यांनी त्या काळातही राजांच्या विरोधात कारस्थानं केली. मुघलांना राजांच्या खबरी दिल्या. अफजलखान चालून आला तेव्हा खानाचा विजय व्हावा म्हणून या वैदिकांनी कोटचंडी यज्ञ केला होता. फक्त आणि फक्त खालच्या जातीचा एक शूद्र आपल्याला ‘राजा’ म्हणून नको, या द्वेषापोटी!
…अशा शातीर, कारस्थानी, मग्रूर धर्ममार्तंडांविरोधात आपला तुकोबाराया निधड्या छातीनं दंड थोपटून उभा रहायचा. सिनेमातल्या एखाद्या हिरोपेक्षा शंभरपट अॅटिट्यूडनं त्यांच्या नजरेला नजर भिडवायचा आणि अभंगाचा हंटर हातात घेऊन शब्दांच्या फटकार्यांनी सडकून काढायचा… म्हणायचा,
‘तुम्ही नका करु गर्व।
उंच याती मिळून सर्व।।
शुक्र शोणिताच्या खाणी।
तुम्हा आम्हा एकच योनी।
रक्त मांस चर्म हाडे।
सर्वां ठायी सम पाडे।।
तुका म्हणे हे चि खरे।
नाही देवासी दुसरे।।’
…तुम्ही उच्च जातीचे सगळे एकत्र येऊन गर्व करू नका.
…शुक्राणू आणि स्त्रीबीज यांच्या संयोगातूनच तुमचाही जन्म झाला आहे. तुमची आमची योनी एकच आहे.
…रक्त, मांस, त्वचा आणि हाडे सर्वांची समान आहेत.
…शेवटी तुका म्हणे- हेच सत्य आहे. सृष्टीकर्त्यानं वेगळं काहीही निर्माण केलेलं नाही.
किती सोप्या शब्दांत ‘समते’चा विचार सांगितलाय मित्रांनो! आहे का उत्तर यावर? माणसामाणसांत का भेदभाव करायचा हो? का जातीपातीच्या उतरंडी मांडून ‘मी मोठा-तू छोटा’ असा जीवघेणा खेळ खेळायचा? तू कितीही गुणवान असलास तरी तुझा रंग काळा, भाषा अशुद्ध म्हणून तू फालतू… आणि मी सुमार बुद्धीचा असलो तरी माझा रंग गोरा, भाषा ‘सो कॉल्ड’ शुद्ध म्हणून मी लै भारी, असा भेद का करायचा?
आपल्याकडं या वर्चस्ववाद्यांनी अशिक्षित बहुजनांना फसवण्यासाठी अत्यंत दळभद्री नरेटिव्ह पसरवलं होतं, ‘ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले, बाहूंपासून क्षत्रिय निर्माण झाले, मांड्यांमधून वैश्य आणि पायांतून शूद्र आले’! असं कसं होईल भावांनो? शुद्ध वेडेपणा आहे हा. म्हणून तुकाराम महाराज त्या काळात वैज्ञानिक आणि तक शुद्ध मांडणी करायचे. वर्चस्ववाद्यांना ठणकावून सांगायचे की तुमचा आणि आमचा सगळ्यांचा जन्म शुक्रजंतू आणि स्त्री बीजांड यांच्या संयोगातूनच झालाय. योनीतूनच! तोंडातून आणि दंडातून कधी पोरं होतात का? त्यामुळे अडाणी जनतेला काहीही भाकडकथा सांगून स्वत:च्या वर्णाचा गर्व करू नका.
तुकाराम महाराज अज्ञानी बहुजनांसमोर ही गोष्ट आणखी स्पष्ट करून सांगायचे… पृथ्वीवर जेवढी माणसं आहेत, त्या सगळ्यांची चामडी, रक्त, मांस, हाडं सगळं-सगळं एकसारखंच आहे. नाही का? त्यात जर फरक नसेल तर माणसामाणसात उच्च-नीच हा भेद कसा? जन्म कुणाच्या पोटी घ्यायचा हे आपण नाही ठरवू शकत… कुणी उच्च जातीत जन्माला आला म्हणून त्यानं खूप मोठ्ठा पराक्रम केलेला नसतो… तसंच खालच्या जातीत जन्म घेणार्याचा काहीही गुन्हा नसतो. कशाला लाजायचं आन् घाबरायचं आपली जात सांगताना?… मस्तवाल कर्मठांना असा जाब विचारणारा तुकोबाराया बहुजनांचा
डॅशिंग महानायक होता.
त्या काळात आपल्या लेखी खालच्या जातीचा असलेल्या कुणाचा चुकून स्पर्श झाला की चिडून ‘दूर हो शिंच्या’ म्हणत त्याला दूषणं देणार्या कर्मठांना ‘वरच्या जातीचा कोण आणि खालच्या जातीचा कोण हे कसं ठरवायचं?’ याचा निकष सांगणारा आणखी एक जबरदस्त अभंग लिहिलाय तुकोबांनी… अशा भन्नाट पद्धतीनं समतेचा विचार क्वचितच कुणी मांडला असेल…
‘महाराशी शिवे।
कोपे ब्राह्मण तो नव्हे।।
तया प्रायश्चित्त काही।
देहत्याग करीता नाही।।
नातळे चांडाळ।
त्याचा अंतरी विटाळ।।
ज्याच्या संग चित्ती।
तुका म्हणे तो ते याती।।’
…महार माणसानं स्पर्श केल्यावर जो चिडतो, तो ब्राह्मणच नव्हे !
…अशा, अस्पृश्यता मानून चिडणार्या माणसाला प्रायश्चित्त काय? तर त्यानं देहत्याग केला तरी या पापातून मुक्तता नाही.
…खरं तर महाराला चांडाळ मानून त्याला अस्पर्श ठेवणार्याच्या मनात विटाळ असतो.
…आणि शेवटी तुका म्हणे- अशा विटाळलेल्या विचारांचा संग चित्ती असणार्याची जातही अशीच विटाळलेली-हलकी असते!!!
अर्थात, जात मानायचीच तर, ‘माणूस’ म्हणून समानतेचा विचार मनात असणारा उच्चजातीय… आणि मनात विषमता, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद असणारा माणूस नीच जातीचा.
किती भारी आहे हे माझ्या भावाबहिणींनो! अहो, असे विचार मांडले की आजच्या काळातही आपण ट्रोल होतो… तर त्या काळात हा अलौकिक विचार मांडणार्या माझ्या तुकोबा माऊलीला किती भयानक द्वेष, तिरस्कार आणि शारिरीक छळाचा सामना करावा लागला असेल, विचार करा! पण बाबा हटला नाही. पुरून उरला. वन मॅन आर्मीसारखा एकटा लढत राहिला… कुणासाठी? तुमच्या-माझ्यासाठी.. आपल्या हक्कासाठी.. समता आणि प्रेम याचा प्रसार करण्यासाठी.. संवेदनशील समाजाच्या निर्मितीसाठी!
आज आपण हा विचार विसरलोय. तुकाराम गाथा देव्हार्यात पुजतो, पण त्यातला अनमोल विचार दुर्लक्षित करून गाडून टाकलाय. कुणी स्वकर्तृत्वावर एखादं देदीप्यमान यश मिळवलं, तर त्याची ‘जात’ कुठली आहे हे गुगलवर ‘सर्च’ केलं जातं. आपल्या भवतालच्या कुणाच्याही अभिनयाचा, खेळाचा, अभ्यासाचा, यशाचा मनसोक्त आनंद घेणं हरवलंय. आडनावावरून जात शोधायची घाणेरडी सवय या वर्चस्ववादी व्यवस्थेनं सगळीकडं मुरवली आहे. बहुजनांमध्येही जातीचा माज करणार्यांना कळत नाही की या उतरंडीत तुमच्याहून जे उच्च आहेत ते तुम्हाला शूद्रच समजतात! तुम्ही ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ असे उभे ठाकता, तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला आपापसात लढवणारी ‘अनाजीपंती’ वृत्ती घेते, हे तुम्हाला कळत नाही. मग अचानक कोरटकरसारख्या नीच व्यक्तीचा माजोरडा फोन येतो, ‘तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात आहात.’ ही धोक्याची घंटा आहे. आता तरी जागे व्हा. अहो, तुकोबारायांच्या विचारांमधनं प्रेरणा घेऊन शिव-फुले-शाहू-आंबेडकर घडले… त्यांनी त्यांच्या जातीधर्मापलिकडे पाहून समस्त समाजाचा उद्धार केला. आज आपण हेच महामानव जातीजातींत वाटून टाकले.
‘आत’ काय आहे ते बघा माझ्या भावांनो. वरवर लावलेली जातीची लेबलं फेकून द्या! माणसाचं टॅलेन्ट बघा.. प्रतिभावान, कर्तबगार आणि मानवतावादी माणसाच्या पाठीशी उभे राहा. जो स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांसाठी जिवाची बाजी लावून खुंखार सत्तेशी पंगा घेतो, त्याची जात कुठली का असेना… तुम्ही त्याला साथ द्या. माणसाची किंमत त्याची जात आणि धर्म पाहून ठरवू नका. एका सुंदर अभंगात तुकोबाराया म्हणतात,
आपणालागी काम
वाण्या घरी गूळ।
त्याचे याती कूळ
काय कीजे।।
उकिरड्यावरी
वाढली तुळस।
टाकावी ते कैसे
ठाया गुणे।।
गायीचा जो भक्ष
अमंगळ खाय।
तिचे दूध काय
सेवू नये।।
तुका म्हणे काय
सालपटासी काज।
फणसातील बीज
काढून घ्यावे।।’
…आपल्याला जर गूळ पाहिजे आणि वाण्याकडं गूळ आहे, तर गुमान घ्यायचा. त्याच्या जातीशी-कुळाशी आपल्याला काय घेणंदेणं?
…तुळस उकिरड्यावर वाढली म्हणून ती काय टाकून द्यायची का? तिच्या गुणांनी श्रेष्ठ ठरते ती, कुठं का उगवेना.
…गाय तर काहीही कडबा, कचरा-घाण खाते म्हणून तिचं दूध प्यायचंच नाही का काय?? आहारावरनं भेदभाव कशाला? वृत्ती बघा की.
…शेवटी तुका म्हणे- काटेरी सालपटाशी काय काम आहे आपल्याला? फणसातले गरे तेवढे काढून घ्यावे, बास!
तुकाराम महाराज कुणबी होते. त्या काळातल्या जातीच्या उतरंडीनुसार खालच्या जातीचे! म्हणून उच्चवर्णीय वर्चस्ववाद्यांचा खूप राग होता त्यांच्यावर… त्यांनी कविता करू नये, अभंग रचू नयेत… समाजसुधारणा करण्याचा त्यांना हक्क नाही… कुणाचे गुरू होण्याचा अधिकार नाही… त्यांनी उच्चवर्णियांकडून पाया पडून घ्यायचं नाही… वेदांवर भाष्य किंवा टीका करण्याचा अधिकार नाही, असं म्हणणं होतं वैदिकांचं… खूप छळलं त्यांनी माऊलीला… म्हणून तुकोबाराया वरच्या अभंगातून म्हणतात, मी जो हिताचा विचार सांगतो तो घ्या.. माझी जात कुठलीय त्याच्याशी तुम्हाला काय देणंघेणं?
आज आपल्या अवतीभवती अनाजीपंती वृत्तीच्या सोलापूरकर-कोरटकरसारख्या विषारी पिलावळीनं उच्छाद मांडलाय. त्यांच्या तेवढ्याच जहरी बापजाद्यांशी तुकोबारायानं एकट्यानं झुंज दिलीय. विरोधात बोलतोय म्हणून तुकोबारायाच्या मागं त्या काळातली ‘ईडी’ लावली. खोट्या केसेस घातल्या. भयाण छळलं… तुकोबारायावर धर्मपीठात खटला भरला. पुढची हजारो वर्षे जनमानसाला विचारांचा अनमोल खजिना देत राहील, अशी ‘गाथा’ पाण्यात बुडवण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
धर्मप्रेमाची झूल पांघरलेल्या क्रूर, हिंस्त्र कोल्ह्याकुत्र्यांसमोर आपला तुकोबा नावाचा ढाण्या वाघ दणदणीत डरकाळी फोडायचा… आपल्या अभंगातून त्यांच्या पायाखाली सुरूंग लावायचा. त्यांचं टुकार जन्मजात श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व, धर्मावरून केला जाणारा द्वेष, आहारावरून पवित्र-अपवित्र ठरवणं… हे सगळं उडवून लावायचा.. आजच्या भवतालात आपण तेच केलं पाहिजे.
तुकोबारायानं चारशे वर्षांपूर्वी वर्चस्ववाद ठेचला होता… त्यावेळी त्या लोकांच्या हातात धर्मसत्ता असूनही, आपल्या हिरोनं त्यांची कॉलर पकडून जाब विचारायचा जिगरा दाखवला होता… आता तर आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा, कायद्याचा आधार आहे. का घाबरायचं मग? नडायचं आणि लढायचं बिनधास्त…
– किरण माने