जयपूर लिटफेस्ट, दिल्लीत भरणारे अ. भा. मराठी साहित्य संमेलन, प्रगती मैदान दिल्ली येथील आणि पुण्यातील ताजा पुस्तक मेळावा या चार वेगवेगळ्या उत्सवांबद्दल सार्या माध्यमांतून उलटसुलट चर्चा चालू झाली. पहिल्यांदाच जाणारे किंवा दरसाल हजेरी लावणारे जाणकार यांच्या प्रतिक्रिया आता गेल्या चार-पाच वर्षात माहित झाल्या आहेत. चुकूनसुद्धा सूटबूट न घालणारा एखादा भारतीय पहिल्यांदाच एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो तेव्हा तो भांबावतो आणि भारावतोही. याउलट कामानिमित्त तिथे वावर असलेल्यांना सराईतपणे तिथल्या कॉफी
शॉपमध्ये निवांत पडीक म्हणून तासन्तास बसता येते. पण तिथले वातावरण तिथेच राहते आणि दोघं बरोबरच बाहेर पडतात, तेव्हा नेहमीचे सामान्य जीवन समोर वाट पाहात असते. नेमके सांगायचे झाले तर लुटियन्स दिल्लीमध्ये डोळे विस्फारून पाहणारी कोणतीही भारतीय व्यक्ती शेवटी जुन्या दिल्लीत चांदणी चौकात आल्यावरच मानसिकदृष्ट्या शांतावते.
या चारातून मराठी माणसाला काय घेता येईल याचीही चर्चा माध्यमांत होते. मराठी माध्यमांचीही एक गंमत आहे, एकेकाला एकाचे अप्रूप असते, तर इतरांचे वावडे. म्हणजे इंग्रजी पुस्तकांचे व लेखकांचे कौतुक असणारी मराठी माध्यमे लिटफेस्ट या शब्दाकडे महागड्या पिझ्झासारखे पाहतात. पण पाचशे रुपयाचा पिझ्झा खाऊन आल्यावर आईला/बायकोला दहीभात किंवा वरण-भात मागणार्यासारखी अवस्था सामान्य मराठी माणसाची असते, याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. अस्सल मराठी भाषेमध्ये हौशे, गवशे आणि नवशे अशी वर्गवारी एखाद्या उत्सवाच्या संदर्भात नेहमीच केली जाते. तो नियम खर्या अर्थाने लावून या चारही प्रकारांकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे.
कोणत्याही भाषेतील पुस्तक, ते विकत घेणे, वाचणे किंवा त्यावर चर्चा करणे, त्याचे आलेले परीक्षण माध्यमात वाचणे किंवा ऐकणे आणि याकरता प्रवासखर्च करून एखाद्या ठिकाणी पोहोचणे यासाठी मराठी माणूस कितपत उत्सुकता दाखवतो? त्याच वेळेला वेळ पण काढतो का? हा मूळ प्रश्न समोर उभा ठाकतो. याच्या उत्तरातच या चार विविध उत्सवी मेळ्यांची आणि तिथे उपस्थित असलेल्यांच्या मराठी चेहर्याच्या संख्येची उत्तरे दडलेली आहेत.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी २५ जिल्ह्यांत पुस्तकविक्रीची, ललित पुस्तके विकणारी दुकाने वा साधने आज घटकेला उपलब्ध नाहीत. मग येथील उत्सुक वाचकांनी त्यांची वैचारिक भूक भागवण्याकरता काय करावे? हे कसे जमवावे? दरमहा किमान १०० मराठी पुस्तके जर प्रसिद्ध होत असतील तर त्यातील जेमतेम १५ पुस्तकांबद्दलची माहिती विविध वृत्तपत्रातून किंवा अन्य माध्यमातून वाचकांपर्यंत पोचते. यात संपादकीय गाळणी, प्रकाशकीय रेटा व लेखकांचे हितसंबंध बर्यापैकी गुंतलेले असतात. पुस्तकांच्या जाहिराती देणे जवळपास गेली दोन-तीन वर्षे बंद झाल्यात जमा आहे. या जाहिराती देऊ शकणार्या प्रकाशकांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच असल्यामुळे त्यांनी प्रकाशित केलेली सुचवलेली पुस्तके यात प्रामुख्याने जागा मिळवतात.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात नवीन लेखकाला प्रवेश असतो, पण त्याची किंमत जवळपास शून्य असते हे वास्तव लक्षात घेतले तर त्या लेखकाने कितीही उत्तम लेखन केले असले तरी ते दुर्लक्षितच राहते. अ. भा. साहित्य संमेलनाचे आयोजक आणि प्रायोजक यांच्या जुगलबंदीमध्ये कदाचित दोन-चार लेखकांची व कवींची वर्णी लागून एखाद्या परिसंवादात त्यांना व्यासपीठाची पायरी चढण्याचे भाग्य लाभते. मुळात मराठी लेखकाचे कौतुक करायचे असते, त्याचा चेहरा वाचकांना माहिती करून द्यायचा असतो, त्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो असे मनात आणणार्या प्रकाशकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही नाही.
याउलट परिस्थिती इंग्रजीतील सामान्य प्रकाशकांची सुद्धा असते. किंबहुना त्यांचे लेखकच सुचवतात की तुम्ही प्रकाशकांशी संपर्क साधा. ते माझे एजंट आहेत. याउलटही घडू शकते. एका मराठी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या लिटफेस्टचा अनुभव येथे मुद्दाम लिहावा वाटतो. दूरदर्शनमुळे खूप चर्चेत असलेले व मागणीत असलेले एक ऐतिहासिक व पौराणिक विषयांवर लेखन करणारे नामवंत लेखक लिटफेस्टला बोलवायचे होते. लेखकाशी संपर्क साधला असता त्यांनी सहा लाख रुपये मागितले. वृत्तपत्राने त्यांच्या प्रकाशकांशी संपर्क साधल्यानंतर तेच लेखक राहण्याची व्यवस्था व येण्याजाण्याचे विमानाचे भाडे एवढ्यावरच यायला तयार झाले.
‘इंडियन सायन्स फेस्ट’ नावाचा एक मोठा दिमाखदार उपक्रम भारतीय महानगरातून गेल्या पाच-सहा वर्षात घेतला जात आहे. तो उपक्रम जयपूर लिटफेस्टसारखाच गाजतो. २०२४ साली पुण्यातील आयसरमध्ये हा उपक्रम झाला. यासाठी जपानपासून नॉर्वेपर्यंतचे विविध नामवंत शास्त्रज्ञ मुद्दाम बोलावले गेले होते व त्यांची व्याख्याने आयोजित केली गेली होती. मुंबई व पुणे एअरपोर्टपासून आयसरच्या गेस्ट हाऊसपर्यंत त्यांची वाहतूक करण्याकरता ६० इनोव्हांचा ताफा रात्रंदिवस दिमतीला होता. एकाच वेळी बारा विविध खोल्यात छोट्या गटात चर्चासत्रे आणि मुख्य सभागृहात दोन वेळात सर्वांसाठी एकत्रित व्याख्याने असे स्वरूप होते. सारे कार्यक्रम घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे पार पडला जात.
एका सेशन करता मला व्याख्याता म्हणून बोलण्याची संधी मिळाली. लंडनची रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या सेशनची प्रायोजक होती. भारतातील मोजक्या शाळात शास्त्रविषयक जागृती करणे हे त्यांचे काम अनेक वर्षे चिकाटीने चालू आहे. प्रत्येक सेशन एका नामवंत भारतीय औद्योगिक किंवा जागतिक संशोधन संस्थेतर्फे प्रायोजित करण्यात आले होते. स्वाभाविकपणे हा खर्च करणारे प्रायोजक मिळवण्याची ज्यांची ताकद आहे त्यांच्या जिवावरच हा खेळ सुरू होतो. आयसरच्या आवारात त्या तीन दिवसात फक्त नोंदणीकृत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनाच प्रवेश होता. जरी सुमारे २५ हजार विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घेतला असला तरी तिथे येणारे विद्यार्थी, पालक व शिक्षक एका विशिष्ट आर्थिक गटातील होते.
अशा या सायन्स फेस्टची तुलना दरवर्षी आयोजित केल्या गेलेल्या आणि थेट भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार्या एखाद्या विद्यापीठात आयोजित केल्या जाणार्या भारतीय विज्ञान परिषदेशी मी नकळत करून पहात होतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनापेक्षा फार वेगळे दृश्य या परिषदेत कधीच दिसले नाही. मुख्य मांडवातील दोन-तीन कार्यक्रम सोडले तर अन्य ठिकाणची हजेरी व तेथील उपस्थितांचा सहभाग यावर फारसे न बोलणे बरे.
तीसेक वर्षापूर्वी विक्रम सेठ यांची सूटेबल बॉय ही कादंबरी गाजली किंवा गाजवली गेली. तेव्हापासून आपल्या दहा महानगरात अशा एखाद्या लेखकाला त्याच्या पुस्तक अभिवाचनाकरिता घेऊन जायचे व त्याच्याशी प्रश्नोत्तरे करायची संधी मोजक्या वाचकांना द्यायची हा पायंडा इंग्रजी पुस्तक प्रकाशन व्यवसायाने पाडला. हा खर्च मराठीमध्ये कोणालाही परवडणे शक्य नाही. ज्यांना परवडतो त्यांची पुस्तके फक्त वृत्तपत्रात गाजतात. खपतात वा वाचक मान्य होतात असे नाही. नुकतेच झालेले जागतिक विश्वसाहित्य संमेलन आणि त्याआधी नॅशनल बुक ट्रस्टने पुणे येथे भरवलेल्या पुस्तकांचा मेळा या दोनातील तुलनासुद्धा अशाच पद्धतीत विरोधाभास दाखवते.
शास्त्रीय संगीताला जमणारी गर्दी आणि त्यातले हौशे नवशे आणि गवशे यांचे केले जाणारे वर्णन हे कोणालाच नवीन नाही. पाश्चात्य बॅन्डचे रॉक, जाझ संगीताचे कार्यक्रम नसतात तर ते असतात कॉन्सर्ट. पाच पाच हजारांची तिकीटे घेऊन उभे रहाणारे श्रोते सहज मिळतात. गाजलेल्या इंग्रजी, हिंदी नाटकाला दोन हजारांचे तिकीट चालते. पण जसा मराठी सिनेमाला प्रेक्षक शोधावा लागतो, तीच गत मराठी वाचकांची व मराठी पुस्तक व्यवसायाची आहे. एक गोष्ट मराठी वाचकाला उभारी देणारी आहे. दर वर्षाला विषयांचे वैविध्य आणि नाविन्य असलेली निदान चांगली वीस पुस्तके निवडायचे आणि वाचायचे स्वातंत्र्य त्याला मिळत आहे. काही वाचक ती विकत घेतात किंवा चांगल्या वाचनालयातून आवर्जून मिळवतात. १४ कोटी मराठी डोक्यांपैकी १४ हजारांपर्यंत हा मेवा पोचतो हाच खरा आनंद.
– डॉ. श्रीराम गीत