हिंदू मिशनरी सोसायटीने वैदिक विवाहविधीची चळवळही चालवली होती. त्यात सहभागी होऊन प्रबोधनकारांनी आचार्य बनून महाराष्ट्रभर अनेक लग्नं लावली.
– – –
धर्मांतरितांना हिंदू धर्मात आणण्यासाठीचा प्रबोधनकारांचा प्रवास नागपूरपर्यंत पोचला होता. गजाननराव वैद्य यांच्याही चार पावलं पुढे जाऊन प्रबोधनकारांनी तिथे उपनयनाचा विधी आणखीच सोपा करून टाकला. त्यात हिंदू मिशनरी सोसायटीच्या विधीसारखी ना यज्ञाची गरज होती, ना वैदिक मंत्रांची. पाण्यात बुडी मारा आणि गायत्री मंत्र म्हणा, झालात हिंदू.
गजाननरावांनीही प्रबोधनकारांच्या या `जनस्मृती`चं कौतुक केलं. प्रबोधनकार दौर्यावरून मुंबईला परत पोचण्याआधीच चिंतामणराव मराठेंनी झाल्या प्रकाराची माहिती देणारं सविस्तर पत्र गजाननरावांना पाठवलं होतं. त्यामुळे प्रबोधनकारांची भेट होताच गजाननराव त्यांना म्हणाले, `वाहवा, तुम्ही तर काय भलतीच क्रांती केली नागपूरला. आपली व्याख्याच आहे ना, जो स्वतःला हिंदू म्हणवितो, तो हिंदू. विधी उपनीतांच्या नि लोकांच्या समाधानासाठी करायचा असतो.`
नागपूरहून प्रबोधनकार सासुरवाडीला म्हणजे परतवाड्याला गेले. त्यांचं लग्न जुळवणारे गोविंदराव काळे यांनी वकील मित्रांच्या मदतीने सभा आयोजित केली होती. त्या सभेलाही एक ख्रिश्चन धर्मगुरू आले होते. त्यांनी प्रबोधनकारांना दुसर्या दिवशी सकाळी चहापानाला बोलावलं. या धर्मगुरूने प्रबोधनकारांशी धर्मविषयक सविस्तर चर्चा केली. या धर्मगुरूने सोसायटीच्या कामाची स्तुती करताना सांगितलं, `आज तुम्ही प्रचारित असलेला व्यापक धर्मविचार हिंदू लोकांनी खरोखरच आचरणात आणावा. त्याचप्रमाणे इतर धर्मग्रंथांच्या समतोल अभ्यासाची ठिकाणेही सर्वत्र निघतील, तर फार छान होईल.` या धर्मगुरूने प्रबोधनकारांना काही पुस्तकं दिली आणि पुढे अनेक वर्षं पत्रव्यवहार केला. त्याचं वर्णन प्रबोधनकारांनी जंटलमन असं केलंय. या काळात प्रबोधनकारांना भेटलेले बरेचसे ख्रिस्ती धर्मगुरू हे जंटलमनच दिसतात.
प्रबोधनकारांच्या दौर्यामुळे नागपूरच्या हिंदू मिशनरी सोसायटीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला. त्यांनी नागपुरात हिंदू मिशनरी परिषद घेण्याचा बेत गजाननराव वैद्य यांना कळवला. त्यानुसार ते भेटायलाही आले. या परिषदेचं अध्यक्षपद गजाननरावांनी भूषवावं, अशी या कार्यकर्त्यांची इच्छा असणं सहाजिकच होतं. पण गजाननरावांनी तो प्रस्ताव नाकारला. एकाच नेत्यावर अवलंबून न राहता सामाजिक कामात अनेक नेते उभे करायला हवेत, असं सांगून त्यांनी परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रबोधनकारांचं नाव सुचवलं. सोसायटीच्या मुंबई आणि नागपूरच्या कार्यकारिणींनी तसा ठरावच एकमताने संमत केला. गजाननरावांचा आशीर्वाद घेऊन प्रबोधनकार पुन्हा नागपूरला गेले आणि तिथली हिंदू मिशनरी परिषद गाजवली.
दुसर्या धर्मात गेलेल्या हिंदूंना पुन्हा मूळ धर्मात आणण्याबरोबरच हिंदू मिशनरी सोसायटी आणखी एका गोष्टीसाठी गाजत होती. ती म्हणजे वैदिक पद्धतीने लग्न लावण्याच्या विधीसाठी. आजही या विधीने कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी गर्दीत कायदेशीर लग्न लावलं जातं. त्यामुळे हिंदू मिशनरी सोसायटी या विधीसाठीच पुढच्या काळात लक्षात राहिली, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. हा विधी तयार करण्याचं काम गजाननराव वैद्य यांनी केलं होतं.
लोकमान्य टिळक हे गजाननरावांना वडिलांच्या ठिकाणी होते. हिंदू मिशनरी सोसायटीचं काम सुरू करण्याच्या अनेक वर्षं आधीच लोकमान्यांनी गजाननरावांवर वैदिक विवाहविधींचं संशोधन करण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रबोधनकारांनी हे लोकमान्यांच्या शब्दांत असं मांडलंय, `आपली विवाहपद्धती दिवसेंदिवस भलतीकडेच वहावत चालली आहे. धार्मिक विधीत सामाजिक रूढींचा संकर झालेला आहे. माझ्यामागे हजार भानगडी. तू पटाईत संस्कृतज्ञ. तेव्हा तूच या विधीचे संशोधन करण्याचे कार्य हाती घ्यावे.`
लोकमान्यांच्या सूचनेप्रमाणे गजाननराव अनेक वर्षं हे काम करत होते. चिरोल खटल्यासाठी लंडनला जाण्यासाठी लोकमान्य मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी आवर्जून वेळ काढून गिरगावच्या भाई जीवनजी लेनमधल्या गजाननरावांच्या घरी म्हणजे वैद्य भुवनाला भेट दिली. लोकमान्यांशी झालेल्या चर्चेत गजाननरावांनी संशोधनाविषयी सांगितलेली माहिती अशी होती, `हा विधी मी पुरा जुन्या संप्रदायांतून घेतला. तो तपासून पाहताना छापलेली पुस्तकं पाहीली व तोंडी माहितीही मिळवली. सावधान चित्ताने विधीचा एकेक भाग संशोधून पाहिला. संशोधनकर्म पूर्ण झाले व ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु हे अन्त्यवचन लिहिले गेले. त्यावेळी गुरुवार तारीख १९ डिसेंबर १९१८ रात्री दीड वाजला होता. अनेक दिवसांची चिंता अंत पावली व माझे चित्त स्वस्थ झाले.`
लोकमान्य जवळपास दोन तास गजाननरावांनी तयार केलेल्या विधीचं परीक्षण करत होते. त्यावर दोन संस्कृतच्या तज्ञांची चर्चा सुरू होती. हे सारं सोसायटीचे कार्यकर्ते जवळून पहात होते. त्यात अर्थातच तरूण प्रबोधनकारही होते. वैदिक विवाहविधीचे एकूण ११ भाग होते. अग्न्यावाहन, अनुमत्ति, मधुपर्क, कन्यादान, कन्याप्रतिग्रह, पाणिग्रहण प्रतिज्ञा, विवाह होम, लाजा होम, सप्तपदी, गृहप्रवेश विधी आणि शांतिसूक्ते या विधीच्या प्रत्येक भागाची सविस्तर चर्चा झाली. सगळा विधी तपासून झाल्यानंतर लोकमान्यांनी त्याविषयी समाधान व्यक्त केलं. पण चर्चेच्या शेवटी त्यांनी अनपेक्षित विनोद केला. तो असा,
टिळक : हे बघ गजाननराव, या तुझ्या संशोधित विधीने लग्न करून घ्यायला कोण तयार होणार? मी तरी खास नव्हे (सगळे हसतात). अरे, तब्बल दोन तास अग्निकुंडातल्या धगीजवळ बसतो कोण?
वैद्य : विधी हवा तर बसले पाहिजे.
टिळक : माझा साफ नकार आहे. मी बसणार नाही. हे पहा गजानना, अग्नीचे आवाहन करताना तुझ्या रसिकतेने १०-१०, १५-१५ सुंदर ऋचा निवडल्या. त्या एवढ्या कशाला? देवाची प्रार्थना एकदोन ऋचांनीही साजरी होते. तेव्हा हा ऋचांचा भरमसाट संसार काटछाट करून सगळा विधी एक तासात आटोपता येईल, अशी व्यवस्था करावी.
लोकमान्यांनी आयुष्यभर वेदवाङ्मयाचा अभ्यास केला. ते त्या विषयातले तज्ञच होते. त्यांच्या सोबत वेदाध्ययनाचे पिढ्यानपिढ्यांचा अधिकार असलेले अनेक ब्राह्मण विद्वान होतेच. टिळकांनी दिलेले आदेश झेलण्यासाठी ते तयारच होते. तरीही लोकमान्यांनी गजाननराव वैद्य यांच्यासारख्या एका ब्राह्मणेतरावर ही जबाबदारी सोपवली, ही गोष्ट दोघांचंही मोठेपण दाखवून देणारी होती. विशेषतः मंडालेनंतरच्या काळात लोकमान्य अधिक सर्वसमावेशक होत गेले. त्याचं हे एक लक्षण होतं. फक्त जबाबदारी सोपवून शांत न बसता लोकमान्यांनी या विधीचं लोकोपयोगी असं संपादनही करून घेतलं. केलेल्या सूचनेनुसार वैद्यांनी विवाहविधी छोटा केला. त्यामुळेच हा वैद्य संशोधित वैदिक विवाहविधी सगळीकडे रूढ होऊ लागला.
तो रूढ होण्यात प्रबोधनकारांचाही हातभार होता. कारण ते लिहितात तसं, `कै. गजानन भास्कर वैद्यांनी संशोधन केलेल्या विवाहविधीचा प्रचार वैद्यांचा एक अनुयायी म्हणून मुंबईत मी बराच केलेला होता.` इथे प्रबोधनकार स्वतःला गजाननरावांचा अनुयायी म्हणवून घेतात, हे महत्त्वाचं आहे. नेहमीप्रमाणे प्रबोधनकारांनी या कामाचीही सुरुवात घरापासूनच केली. या विधीचं महत्त्व किमान त्यांच्या समाजाला म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंना कळावं म्हणून दादरमध्येच त्यांच्या मेहुण्याचं लग्न या विधीनुसार लावलं. त्यात ते स्वतः विधीतले आचार्य आणि सुंदरराव वैद्य हे अग्निहोत्री बनले होते. या प्रयोगाचा अपेक्षित परिणाम झाला. त्या लग्नसराईत प्रबोधनकारांना ५० ते ७५ लग्नं आचार्य बनून लावावी लागली.
मुंबईनंतर प्रबोधनकारांनी पुण्यात या विवाहविधीचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला मिळालेल्या प्रतिसादाविषयी ते लिहितात, `पुण्याचे आमचे जातभाई फार मोठे चोखंदळ नि चिकित्सक. स्वत: काही नवीन प्रघात चालू करता आला नाही, तरी दुसरा कोणी तसे करीत असला तर त्यात रगड शंकाकुशंकांचे लोणचे घालतील. शेजारधर्माचा धसका असतो ना! नवीन पाऊल टाकलं तर बामनं काय म्हणत्याल?`
प्रबोधनकारांनी पुणेकरांच्या स्वभावाचं नेमकं वर्णन केलंय आणि त्याचं कारणही सांगितलंय. पुण्यातल्या सीकेपींनी या विवाहविधीची योग्यता तपासण्यासाठी त्यांच्याच समाजातल्या तज्ज्ञांची एक कमिटीही बनवली. हेही पुणेकरांच्या स्वभावाला धरूनच झालं. या कमिटीच्या बैठकांमध्ये कोणताही निर्णय झाला नाही. पण, कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब के. टी. गुप्ते यांनी आपल्या कृतीनेच आपला निर्णय दिला. केशव त्रिंबक गुप्ते हे संस्कृत आणि कायदा या दोन विषयाचे विद्वान होते. सरकारी वकील म्हणून ते त्या काळात गाजले होते. शिवाय पुढे `राजवाड्यांची गागाभट्टी` नावाचा ग्रंथ लिहून त्यांनी इतिहासाचार्य राजवाडे वादात प्रबोधनकारांना पाठिंबा दिला होता.
रावसाहेब गुप्ते एकदा सकाळीच पत्नीसह प्रबोधनकारांच्या घरी आले. त्यांची तयारी बघून ते लग्नाचं निमंत्रण द्यायला आल्याचं प्रबोधनकारांनी ताडलं. पण गुप्तेंचा मानस त्यापुढचा होता. त्यांनी अक्षता सुपारी प्रबोधनकारांच्या हातावर ठेवत आचार्य म्हणून त्यांच्या घरचं लग्न वैदिक विधीने लावण्यासाठी निमंत्रण दिलं. रावसाहेबांच्या घरचं कार्य म्हणजे थाटमाट आणि गर्दी होताच. त्यात आचार्य म्हणून प्रबोधनकार तर अग्निहोत्री म्हणून दिनकरराव समर्थ यांनी विधी केला. पुण्यातले सगळे सीकेपी झाडून हजर होते. त्यांनी हा वैदिक विवाहविधी जवळून पाहिला. जेवणानंतर महान इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी रावसाहेब गुप्तेंना मुद्दामून विचारलं, `वैदिक विधीबद्दल कमिटी कधी बोलवायची?` बेंद्रे कमिटीचे सेक्रेटरी होते. त्यावर गुप्ते म्हणाले, `कमिटीचा निर्णय आज जाहीरच झाला. खुद्द अध्यक्ष या नात्याने मीच दिला आहे. आता भरल्या पोटी कमिटीला रजा.`
त्यानंतर गुप्तेंच्या प्रोत्साहनामुळे पुण्यात प्रबोधनकारांनी अनेक वैदिक विवाह लावले. ते प्रामुख्याने सीकेपींमध्येच होते. पण पुढे अनेक जातींमध्ये वैदिक विधी करणारे पुरोहित तयार झाले. प्रबोधनकार याविषयी म्हणतात, `रुळावरच्या डब्याला धक्का देऊन गतिमान करण्याचे काम कठीण तर खरेच, पण ते कोणीतरी केल्यावर पुढे डबा कोणीही सरळ ढकलीत नेतो.` प्रबोधनकारांनी वैदिक विवाहविधीच्या डब्ब्याला धक्का देण्याचं काम केलं होतं.