भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशकाळात खर्या अर्थाने वसलेले मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी बनले आणि या शहरात गर्दीचा भस्मासुर माजला. काळ लोटला तसा हा लोंढा वाढतच गेला. या लोंढ्याला जागा देण्यासाठी मुंबईशेजारी ‘निममुंबई’ म्हणावीत अशी अनेक शहरं उदयाला आली. त्यातलंच एक निमशहर म्हणजे डोंबिवली. विकासाची न संपणारी भूक असणार्या गर्दीसाठी डोंबिवलीसारख्या नवशहरांचा अनियंत्रित विकास वेगाने सुरू झाला आणि त्यातूनच या शहरांपुढे नवीन प्रश्न उभे राहिले. या सगळ्या प्रश्नांना हात घालत झाँबीपट हा प्रकार मराठीत आणण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणजे आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’!
डोंबिवलीच्या जनतानगर या ‘झोपडपट्टी’ म्हणून हिणवल्या जाणार्या भागात अज्ञात रोगाची साथ झपाट्याने पसरत जाते. एक असा रोग ज्यात माणसाचा झाँबी (इंग्लिश सिनेमांमधले जिवंत प्रेतासारखे दिसणारे, वावरणारे पिशाच्च) होतो, त्यातूनच डोंबिवलीचे रुपांतर ‘झोंबिवली’त होते. काही तरुण या आजारापासून डोंबिवलीला वाचवायचा प्रयत्न करतात. म्हटलं तर ही एवढीच कथा, पण कथालेखक महेश आयर यांनी ही कथा अतिशय समर्थपणे फुलवली आहे.
संपूर्ण जगातील मनोरंजन विश्वाचं दार एका क्लिकवर उघडलं जाण्याच्या आजच्या काळात या मराठी झाँबीपटाची तुलना इतर भाषेतील झाँबीपटांशी होणे क्रमप्राप्त आहे आणि ट्रेलरमधून ती होणारच. तरीही इतर झाँबीपटांप्रमाणेच याही चित्रपटात भांडवलवाद, दोन समाजघटकांमधली आर्थिक आणि सामाजिक दरी अशा प्रश्नांना हात घालत कथेचा पाया बांधण्यात आला आहे. इतरही अनेक विषयांचा कथा फुलवताना आधार घेण्यात आला आहे आणि ते विषय भवतालातील ज्वलंत प्रश्न आहेत. झोंबिवली हे खरं तर हॉरर कॉमेडी या मराठीसाठी तुलनेने ‘नेव्हर सीन बिफोर’ प्रकारात मोडणार्या चित्रपट प्रकारातून या विषयांवर करण्यात आलेले भाष्य आहे. तरीही आपण या विषयांवर बोलतोय असा कुठलाही अभिनिवेश न बाळगता निवडलेल्या जॉनरपासून जराही न ढळता, त्या विषयांना गरजेपुरता स्पर्श करत संहिता बांधण्याचे कौतुकास्पद काम संहितालेखक साईनाथ गणूवाड आणि सिद्धेश पुरकर यांनी केले आहे. स्पूनफीडिंग टाळून अनेक गोष्टी सबटेक्स्टमधून सहज आणि सुलभ पद्धतीने मांडल्या आहेत ही काही बाबतीत जमेची बाजू असली तरीही तीच काही बाबतीत मात्र घातक ठरते. तरीदेखील कधी भय तर कधी हास्य या मानवी भावनांना आवश्यक तिथेच आणि गरजेएवढीच साद घालत हा झाँबीजचा खेळ रंगत जातो.
‘जुळून येती रेशीमगाठी’पासूनच चॉकलेटबॉय ही प्रतिमा निर्माण झालेला अभिनेता ललित प्रभाकर याने या चित्रपटात पुन्हा एकदा चाकोरीतून बाहेर पडत जनतानगर भागातील होतकरू पुढारी विश्वास लीलया साकारला आहे. अमेय वाघने टेलरमेड भूमिकेत जान ओतत हाडाचा पुणेकर सुधीर जोशी समर्थपणे पेलला आहे. वैदेही परशुरामी हिने सुधीर जोशीच्या गर्भार पत्नीची भूमिका अतिशय गोड केली आहे, पण झाँबीजसोबतचा संघर्ष सुरू झाल्यानंतर ती ‘दुर्गा’ बनते, तेव्हाचे तिचे रूपदेखील लोभस वाटते. भाडिपावाल्या तृप्ती खामकर हिने साकारलेली मोलकरीण लक्षात राहण्याजोगी आहे. ‘व्हॅनिला’ फेम जानकी पाठक हिने साकारलेली रिपोर्टरची भूमिका तिच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा ठरेल हे निश्चित. या पाच जणांव्यतिरिक्त या चित्रपटात विजय निकम, राजेंद्र शिसातकर, शरत सोनू, विघ्नेश जोशी अशा अनेक कसलेल्या कलाकारांनी साहाय्यक भूमिकेत चोख काम बजावले आहे. तुषार खैरसारखे काही कलाकार फिके वाटतात, कदाचित इतर साथीदारांचे जमून आलेले काम हे देखील याचे कारण असू शकेल. या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे झाँबीज म्हणून वावरणारे कलाकार. भूत किंवा तत्सम एखादा प्रकार मांडताना भडक वेशभूषा आणि मेकप ही भारतीय भयपटांतील नित्याची गोष्ट, पण इतर भाषांतील झाँबीपटांसारखेच इथंही समोर दिसणारे झाँबीज कुठेही भडक न वाटता त्यांच्या अभिनयातून ते भय ही भावना प्रेक्षकांच्या मनात रुजवण्यात यशस्वी ठरले आहेत.
या चित्रपटातील बर्याच घटना रात्रीच्या वेळी घडतात. त्या घडत असताना लाईट्सच्या माध्यमातून पडद्यावर दिसणारे रंग हे गिमिक प्रकारातील आहेत आणि तरीही ते अतिभडक किंवा अतिरंजित वाटत नाहीत ही जमून आलेली तांत्रिक बाब आहे. मराठी चित्रपटांमध्ये देखील आता अशा प्रकारची तंत्रपद्धती वापरण्याचे प्रयोग होत आहेत हे महत्त्वाचे!
इलेक्ट्रॉनिक पार्श्वसंगीत हा प्रकार देखील मराठी चित्रपटांसाठी नवीन आहे. रोहन-रोहन यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून दिलेली गाणी ही देखील संस्मरणीय आहेत. संत एकनाथ महाराजांचे ‘विंचू चावला’ हे भारूड अतिशय वेगळ्या रूपात समोर येते आणि त्यात मांडलेली भय ही भावना गडद करते. त्यासोबतच चित्रपटाच्या शेवटी पॉपस्टार मायकेल जॅक्सनच्या धाटणीशी मिळतीजुळती शैली आणत (अनेक भारतीयांना झाँबींचा पहिला परिचय मायकेलच्या सुपरहिट थ्रिलर या गाण्याच्या क्लासिक व्हिडिओनेच करून दिला होता) त्यांना श्रद्धांजली वाहणारे ‘अंगात आलंया’ हे गीत देखील विशेष आहे. तांत्रिक बाजूंचा विचार करता हा चित्रपट म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी जमून आलेला यशस्वी प्रयोग आहे असेच म्हणावे लागेल.
‘उलाढाल’, ‘नारबाची वाडी’, ‘फास्टर फेणे’ अशा चित्रपटांतून नेहमीच काहीतरी वेगळं पाहण्याची अभिरुची असलेल्या मराठी प्रेक्षकांना आदित्य सरपोतदार यांनी नेहमीच नवीन काहीतरी दिले आहे आणि याच मालिकेत आता यापुढे ‘झोंबिवली’ची गणना होईल यात शंका नाही. कोरोनाच्या संकटकाळानंतर प्रायोगिक म्हणावे असे काहीतरी पहिल्यांदाच मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आले आहे. आता या चित्रपटाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.