कोरोनाच्या संकटामुळे यंदा देखील आपल्याला हा उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. आताच्या घटकेला प्रत्येक माणसाचा जीव महत्वाचा आहे. कोरोनाचे संकट टळल्यावर आपण महाराष्ट्राचा हा महाउत्सव पुन्हा पूर्वीच्या जोमात, उत्साहात साजरा करूच. याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. यंदाचा उत्सव नियम पाळून, गर्दी न करता आणि मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून अगदी साधेपणाने साजरा करण्याची आवश्यकता आहे. चला, यंदाचा गणेशोत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा आपण निर्धार करू या… हेच त्या बुद्धिदात्याचे पूजन ठरेल.
—-
संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या आरंभी गजाननाला वंदन करताना म्हणतात, ओम नमोजी आद्या! सर्वांचा आदी म्हणजे प्रारंभबिंदू असलेला हा मोरया प्रथमपूज्य आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यात येणार्या या गणेशोत्सवाचे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक वेगळे स्थान आहे. कोकणातला गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा होतो, घाटावर त्याचं रूप बदलतं, मराठवाड्यात आणखी वेगळा, विदर्भात वेगळं रूप. पण, गणेशोत्सव हा महाराष्ट्राला जोडून ठेवणारा एक धागा आहे. महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहात असलेले अन्यप्रांतीयही गणपतीबाप्पांच्या जयघोषात सामील होतात, घरी गणपती बसवण्याची अस्सल मराठी परंपरा अगदी प्रेमाने पाळतात. मी तर गणेशभक्त. पुण्याच्या प्रख्यात गणेशोत्सव मंडळाचा एक धडपड्या कार्यकर्ता. माझ्या मनात गणेशाबद्दल नितांत भक्तीची भावना असते आणि दररोज त्याचे नित्य पूजन करत असताना या वर्षातून एकदा येणार्या बाप्पांच्या उत्सवाची अगदी आवर्जून वाट पाहत असतो. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून निर्माण झालेल्या कोरोनाच्या स्थितीमुळे माझे मन अस्वस्थ झाले आहे. उत्सवाच्या काळात बाप्पांचे दर्शन तर घडतेच, पण उत्सवाचा परिचित जल्लोष दिसत नाही, दबके, निस्तेज वातावरण दिसते.
श्री गणरायाच्या स्वागतासाठी आणि विसर्जनासाठी लोटलेल्या अपार भाविकसागराचं दर्शन दुर्लभ झालंय.
महाराष्ट्रातला गणेशोत्सव अगदी सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे, त्यामध्ये पुण्याच्या गणेशोत्सवाचा लौकिक तर फारच मोठा आहे. दहा दिवसांच्या उत्सवाच्या काळात निर्माण होणारे धार्मिक वातावरण, गणेशाची पूजा, मंत्रजागर, सकाळ-संध्याकाळ होणार्या आरत्या, मंडळांसमोर रंगणारी ढोल-ताश्याची जुगलबंदी, विसर्जन मिरवणुकीचा तो अविस्मरणीय माहोल… हे सगळं पाहण्यासाठी किती तरी ठिकाणांहून लोक खास पुण्यात येतात. दोन दिवस नातेवाईकांकडे राहून पुण्याच्या गणपतींची मजा लुटतात.
संकटग्रस्तांना मदत हीच आंतरिक गणेशपूजा
हे सगळे वातावरण गेल्या दीड वर्षांपासून या कोरोनामुळे हरवून गेले आहे. गेल्या वर्षी अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा झाला, दहा दिवसाच्या काळात गणपती कधी बसले आणि कधी गेले हे कळले नाही. कोरोना आणि टाळेबंदीमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचा हा सगळा झगमगाट आणि उत्सवी सोहळा मंदावला असला तरी माणुसकीचा प्रकाश मात्र उजळून निघाला आहे. टाळेबंदीमुळे आलेली भूकमारी, बेरोजगारी आणि विपन्नावस्था असो की पावसाच्या माराने दरडी कोसळून, पूर येऊन झालेली दुर्दशा असो- या सर्व संकटाच्या काळात गरजवंताना, पीडितांना वेगवेगळ्या प्रकारची मदत देण्यात सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते कुठेही कमी पडले नाहीत. हा उत्सव साधेपणाने साजरा करताना त्यांनी या परिस्थितीत केलेलं काम खूपच उल्लेखनीय राहिले आहे. उत्सव साधेपणाने साजरा करावा लागत असल्याची खंत माझ्या मनात असली तरी संकटात सापडलेल्यांच्या वेदना कमी करणे, त्यांना आधार देणे हीच माझ्यासाठी आंतरिक गणेशपूजा राहिली आहे.
दीड वर्षात बदललं उत्सवाचे स्वरूप
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतर मंदिरे बंद झाले, त्यामुळे देवाचे दर्शन बंद झाले. गणपती उत्सवापर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल, असे वाटले होते, पण तसे झाले नाही. उलट गणेशोत्सवात वातावरण काहीसं सैलावल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. कोकणातल्या सुरक्षित गावागावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे त्या वर्षीही गणेश मंडळांना अगदी साधेपणाने उत्सव साजरा करावा लागला. कोरोनाने कार्यकर्त्याचा उत्सव काळातला आनंद हिरावून घेतला. गणपतीच्या मंडपात जाऊन याची देही याची डोळा होणार्या दर्शनापासून भक्तांना दूर राहावे लागले आणि ऑनलाइन दर्शनावर भक्ती भागवावी लागली. पण, जान है तो जहान है, या उक्तीमुळे कार्यकर्त्यांमधली संवेदनशीलता जागी झाली. अनेकजणांनी जिवाची पर्वा न करता कोरोनच्या त्या भीतीदायक काळात मानवसेवेला सर्वाधिक महत्व दिले. महाराष्ट्रातल्या गणेश मंडळांनी केलेलं हे कार्य अत्यंत गौरवास्पद आणि उदाहरण घेण्यासारखे राहिले आहे.
तिसरी लाट आणि उत्सवाचे दिवस…
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाच्या तिसर्या लाटेच सावट आहेच. काहीही करून आम्हाला उत्सव साजरा करू द्या, अशी काही मंडळींची भूमिका आहे. मात्र, आपल्याला याआधी आलेला अनुभव डोळ्यांसमोर ठेवून सर्वसामान्य माणसाच्या, गणपतीच्या भाविकाच्या जीविताचे रक्षण हीच सर्वात प्रमुख भूमिका डोळ्यांसमोर ठेवून आपण पावले टाकायला हवीत. कोरोना हळुहळू तिसर्या लाटेत रूपांतरित होतो आहे. त्याची बाह्य चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत. मात्र, त्यामुळे निश्चिंत आणि बेजबाबदार न होता, गणेशभक्तांनी गर्दी टाळायलाच हवी. परिस्थतीचे भान ठेवून जमेल तेवढ्या साधेपणाने, स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता धार्मिक विधी करून हा उत्सव साजरा करायला हवा. कोरोनाला रोखायचे असेल तर आपल्याला नियमांचे काटेकोर पालन करण्याखेरीज गत्यंतर नाही. आपल्यामध्ये उत्साह कायम असतो, तो कधी कमी होत नाही, त्यामुळे परिस्थती निवळल्यानंतर आपण हा उत्सव पूर्वीइतक्याच दणक्यात साजरा करू शकू. पण आता ती वेळ नाही याचे भान ठेवून प्रत्येकाने हा उत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार करायला हवा, तेच आपल्यासाठी आज गणेशपूजन ठरणार आहे.
गावच्या गणपतींमध्ये सावधगिरी हवी
नोकरी, उद्योगानिमित्त मूळ ग्रामीण भागातून बाहेरगावी शहरी भागात स्थायिक झालेली मंडळी गणेशोत्सवाच्या काळात हमखास आपल्या गावी जात असतात. त्यात खासकरून कोकणातल्या मंडळींबरोबरच अन्य भागातील मंडळींचा समावेश असतो. बाहेरून गावी जाणार्या ग्रामस्थांमुळे गावांमध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो, हे मागच्या उत्सवात, लग्नांत आणि अंत्यसंस्कारांनंतरच्या कार्यांत स्पष्ट झालेलं आहे. ग्रामीण भागांत असणार्या उपचारांच्या सोयींवरच्या मर्यादा लक्षात घेता गावात बेजबाबदार वर्तन करून कोरोना वाढवणे महागात पडू शकते. त्यामुळे गावात गणेशोत्सवाच्या एकत्र येणे टाळायला हवे. आपल्या मनात कितीही असले की आपण एकत्र येऊन आनंदात उत्सव साजरा करावा, गावात सगळं मोकळं वातावरण आहे, तर ती स्वत:ची फसवणूक ठरेल. आताची वेळ एकत्र येण्याची नाही याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. आपल्या उत्साहावर निर्बंध घालायला हवे. परिस्थती गंभीर होऊ शकते, हे ध्यानात ठेवून थोडे संयमाने, धीराने घेतले तर बाप्पा निश्चितच आपल्या पाठिशी उभा राहील आणि आपल्या या निर्धाराच्या बळावरच विघ्नहर्ता बाप्पा हे विघ्नही परतवून लावेल, याचा विचार आपण करायला हवा.
अर्थकारणाचं गणित बिघडलं
गणेशोत्सव काळात अर्थकारणाला चांगली चालना मिळत असते. खास करून मूर्तिकार, सजावटकार, घरगुती मोदक तयार करून देणारी मंडळी, फुलेवाले, रोषणाई, बॅण्डपथके यांच्यापासून ते अगदी छोट्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांना चांगले पैसे मिळत असतात. गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात होणारी आर्थिक उलाढाल ही सुमारे ५०० ते ७०० कोटी रुपयांपर्यंत असेल. गेल्या दीड वर्षात ती जवळपास बंद पडलेली आहे. म्हणजे किती लोकांना त्याचा फटका बसला असेल, याचा विचार आपण करू शकतो. यातले अनेक व्यवसाय हे फक्त गणेशोत्सवापुरतेच असतात. ते तर बंदच पडले आहेत. त्यामुळे ही मंडळी आर्थिक विवंचनेत सापडली आहेत. खासकरून मंदिरांवर अवलंबून असणार्या घटकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. या मंडळींना हात देऊन त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी कोरोनाकाळात त्यांना अन्नधान्याची किट देणे, वैद्यकीय सेवा पुरवणे, असे अनेक उपक्रम गणेश मंडळांनी राबवले आहेत. हे अर्थकारणाचे गणित सावरायला वेळ लागेल. पन्नास गेले तिथे पाचही जातील, हा विचार करून जबाबदारीचे भान ठेवून आताच्या घटकेला वागायला हवे. आपली थोडीशी हलगर्जी खूप महागात पडू शकते.
श्रीगणेशाचं आगमन होणार आहे, ते मंगलमय आणि कल्याणकारीच असणार आहे; मात्र, जे आरोग्यभान पाळतील त्यांच्यासाठीच. कोरोनाचा राक्षस दबा धरून बसलेला आहे, तो तिसरा दणका देण्यासाठी निमित्त शोधतो आहे. ते निमित्त पुरवायचं की उत्सव साधेपणाने साजरा करून बाप्पांनीच दिलेली सद्बुद्धी वापरून सगळे नियम पाळून कोरोनावर मात करायची, याचा निर्णय आपल्या हातात आहे. अवघा महाराष्ट्र योग्य निर्णय करून श्री गणेशाची महापूजा खर्या अर्थाने संपन्न करू याबद्दल एक निस्सीम गणेशभक्त म्हणून मला मनोमन विनम्र खात्री आहे.
(लेखक हे स्थापत्य अभियंता असून गणेशभक्त आहेत. सध्या ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.)
शब्दांकन : सुधीर साबळे