कोरोना संकटामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे वळल्यानंतर पारंपरिक शिक्षणाने उभ्या केलेल्या भिंती नाहीशा करणे शक्य आहे का, हे शिक्षकांनी आणि शाळांनी बघायला हवे. प्रत्यक्ष आणि ऑनलाइन शिक्षण देताना कधी, कसे आणि काय शिकायचे याचे पर्याय निर्माण करता येतील. ऑनलाइन पाठांतून आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे, हे शिक्षकांनी ठरवायला हवे. नवनव्या कल्पनांतूनच शिक्षकांना यासंबंधीचे नवे उपक्रम राबवता येतील आणि त्यातूनच नवा बदल घडू शकतो.
– – –
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या शिक्षणातील तीन महत्त्वाच्या घटकांना अत्यंत भिन्न परिस्थितीचा सामना करावा लागला. सरकार, शिक्षणव्यवस्था आणि शाळा यांची फारशी तयारी नसताना आणि त्याविषयीचे नियोजन नसताना दूरस्थ अध्ययन आणि अध्यापन सुरू झाले. शाळा बंद असल्याने अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या दर्जाचे मोजमाप करणार्या पारंपरिक परीक्षांचे स्वरूप बदलले, सौम्य झाले. बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा अवकाश शाळा-महाविद्यालयांना देण्यात आला. अभ्यासक्रमाचा मूळ ढाचा कायम ठेवत, ऑनलाइन पद्धतीने शिकवताना कसे आणि काय शिकवावे, हे ठरविण्याची लवचिकता शाळांना देण्यात आली. त्यामुळे शाळांनी पारंपरिक शिक्षकांच्या मदतीनेच ऑनलाइन शिक्षणाचे प्रारूप राबवायला सुरुवात केली.
२०२०-२१ मध्ये देशभरातील बहुतांश शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि ऑनलाइन शिक्षणामुळे डिजिटल साधने उपलब्ध असलेल्या आणि नसलेल्या विद्यार्थ्यांमधील अध्ययन असमानता वाढली. ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेच्या २०२० सालच्या वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवालात (असर) देशाच्या ग्रामीण भागांत शालेय शिक्षण घेणार्या पाल्यांपैकी ६१.८ टक्के कुटुंबांपाशी स्मार्टफोन असल्याचे नमूद केले आहे. सरकारी शाळेत शिकणार्या ५६ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन होता. हेच प्रमाण खासगी शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे तीन चतुर्थांश इतके जास्त होते.
शाळेपासून आणि नियमित पाठांपासून बराच काळ दूर राहिल्याने मुलांच्या अध्ययनाची स्थिती गेल्या दोन वर्षांत अधिक गंभीर झाली आहे. २०१९ साली, ग्रामीण शाळांमधील इयत्ता पहिलीचे अवघे १६ टक्के विद्यार्थी पहिलीच्या स्तराचा मजकूर वाचू शकत होते आणि ७४ टक्के विद्यार्थ्यांना आकडे ओळखता येत होते. याखेरीज, मुलांमध्ये आता सामाजिक कौशल्ये कमी झाली आहेत आणि कोरोना काळात घराबाहेर पाय टाकता न आल्याने कुणाशी त्यांचे मैत्रही जुळलेले नाही, असे कुटुंबीय आणि शिक्षकवर्गाचे म्हणणे आहे. देशात शालेय शिक्षण घेणार्या २६४ दशलक्ष मुलांपैकी बहुसंख्य मुलांवर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
शाळा प्रवेशात घट
२०२० च्या ‘असर’ सर्वेक्षणात आढळून आले की, २०१८च्या तुलनेत २०२० साली मुलांची शाळेतील पटनोंदणी बरीच कमी झाली होती. कोरोना साथीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे कौटुंबिक उत्पन्नावर परिणाम झाल्याने गतवर्षीही खासगी शाळांच्या नोंदणीत घट आणि सरकारी शाळांच्या प्रवेश-जागांच्या मागणीत वाढ झाली होती.
देशातील सुमारे ३७ टक्के शालेय विद्यार्थी देशातील ३,३७,४९९ खासगी शाळांमध्ये शिकतात, असे २०१९-२०च्या सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होते. सरकारी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था (एनएसएसओ)च्या २०१८ सालच्या क्रयशक्ती अहवालानुसार, ग्रामीण भागातील विनाअनुदानित खासगी प्राथमिक शाळेत शिकणार्या पाल्यावर त्याचे कुटुंब वर्षाकाठी सरासरी १०,६२३ रुपये खर्च करतात. शहरी भागात हा खर्च १९,३१५ रुपये इतका येतो.
आर्थिक तरतुदींत वाढ
२०२१-२२ च्या तुलनेत यंदाच्या २०२२-२३ साली एकूण शालेय शिक्षणविषयक केंद्राने आर्थिक तरतुदींमध्ये १५.६ टक्क्यांनी वाढ केली आहे. कोविडमुळे शाळेपासून दूर राहावे लागल्याचा देशातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून काढण्यासाठी ‘समग्र शिक्षा’ योजनेअंतर्गत भाषा आणि गणित शिकण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच शिक्षक प्रशिक्षणासाठी केंद्राकडून वाढीव निधी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक होते.
देशात शालेय शिक्षणाकरता होणार्या सरकारी वित्तपुरवठ्यातील मोठा हिस्सा हा राज्य सरकारच्या बजेटमधून येतो. मात्र, यांतील बहुतांश निधी हा वेतन आणि प्रशासकीय बाबींवरच खर्च होतो. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्यानुसार, शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्यक्रम मिळण्यासाठी केंद्र सरकारचा निधी राज्यांकरता मोलाचा ठरतो. कोविडमुळे शालेय अध्ययनासंदर्भात निर्माण झालेली दरी आणि असमानता यांसारख्या आव्हानांचे स्वरूप पाहता, शिक्षण क्षेत्राला दीर्घकालीन नियोजनाची आणि शाश्वत वित्तपुरवठ्याची आवश्यकता भासते. यामुळे, केंद्र सरकारच्या ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या आर्थिक तरतुदींमधील वाढ, तसेच व्यापक शैक्षणिक बजेट हे आणखी काही वर्षे टिकून राहणे आवश्यक आहे.
कोरोनानंतर अपेक्षित बदल
कोरोनाच्या संकटाने आतापर्यंत सद्य शिक्षणव्यवस्थेत जे अडथळे निर्माण झाले आहेत, ते पाहूयात. या संकटामुळे अध्ययनाची गती बदलली. समूह अध्ययनाच्या ऐवजी व्यक्तिगत अध्ययन असा प्रवास सुरू झाला. वेळेचे परिमाण बदलले. शिक्षण देण्या-घेण्यात एक भौतिक अवकाश निर्माण झाला. शिक्षणात स्वायत्तता आली, विद्यार्थी आणि अध्यापकांना आवश्यक ठरणार्या कौशल्यांमध्ये बदल झाला. विद्यार्थीसंख्या, त्यांचा वयोगट, वर्गाचा सामाजिक स्तर या गोष्टी बिनमहत्त्वाच्या ठरल्या. हे सारे पाहिले तर लक्षात येते की, संकटकाळ नावीन्यपूर्णतेसाठी (इनोवेशन) सुपीक प्रदेश ठरला.
नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश करताना, शालेय शिक्षण ‘सामान्य’ स्थितीत परतण्याची जय्यत तयारीत असताना, विषाणूची अनिश्चितताही ध्यानात ठेवायला हवी आणि शिक्षकांची तंत्रज्ञानाशी झालेली ओळख मिटली जाता कामा नये, यावरही कटाक्ष असायला हवा.
कोरोना साथीच्या कालावधीत तंत्रज्ञानामुळे शाळांना ऑनलाइन शिक्षण देणे शक्य बनले आणि ऑनलाइन शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली, मात्र कोविड-१९चे आगमन होईपर्यंत आपल्याकडचे बहुतांश शालेय शिक्षण या पद्धतीद्वारे उपलब्ध नव्हते. ऑनलाइन अध्यापनाकडे शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे झालेले स्थलांतर लक्षणीय म्हणायला हवे.
कोरोना साथीच्या दिवसांत शिकताना व शिकवताना सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकाच ठिकाणी असणे आवश्यक आहे, हा महत्त्वाचा अलिखित नियम बदलला. विस्तारित ऑनलाइन चळवळीने हे शक्य झाले. यामुळे अनेक शिक्षकांना अध्यापनाच्या उद्देशाचा पुनर्विचार करण्याची संधी मिळाली.
कोविड-१९च्या अनुभवानंतर, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने आणि प्रत्यक्ष वर्गात शिकवणे अशा संमिश्र प्रारूपाद्वारे शिकवण्यावर शाळांनी आता भर द्यायला हवा. यामुळे शिक्षकांची तंत्रज्ञानावरची पकड कायम राहील आणि प्रत्यक्ष शिकवतानाही तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन अधिक प्रभावी बनवेल. प्रामुख्याने भविष्यातील मोठ्या बदलांना सामोरे जाण्याची क्षमता शिक्षकांमध्ये बाणली जाईल. कोरोनानंतरच्या शिक्षणात अभ्यासक्रमापासून अध्यापनशास्त्रापर्यंत, अध्यापकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, शिकण्यापासून मूल्यमापनापर्यंत आणि ठिकाणापासून वेळेपर्यंत आमूलाग्र बदल होऊ शकतो आणि व्हायला हवा.
येत्या दशकात शिक्षणात निःसंशयपणे मोठे बदल होतील, यात शंका नाही. यात अभ्यासक्रमातील बदल, विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या अधिक पर्यायांची उपलब्धता, शिक्षण क्षमतेवर आधारित असणे, कौशल्य आणि क्षमता विकासावर भर, विद्यार्थ्यांची बलस्थाने आणि उत्कट आवड यांना महत्त्व असे मूलगामी बदल अपेक्षित आहेत. म्हणूनच शाळा आणि अध्यापन शैली यांत परिवर्तन घडण्यासाठी शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणाद्वारे जगाशी जोडले जाणे उपयुक्त ठरेल. शाळांना त्यांचे वेळापत्रक आणि अध्यापनाचे ठिकाण यांची काही अंशी पुनर्रचना करणे शक्य आहे, जेणे करून वेगवेगळ्या प्रकारच्या आणि अधिक आव्हानात्मक शिक्षण संधींचा उपयोग शाळांना करता येऊ शकेल.
अशा प्रकारे ऑनलाइन शिक्षणाचा परिघ वाढवता येणे शक्य आहे. अर्थातच, हे विसरता येणार नाही की, सर्वच विद्यार्थ्यांना डिजिटल साधने आणि क्षमता या दोन्ही बाबतीत तंत्रज्ञान समानरीत्या उपलब्ध नाही. या कारणास्तव केवळ आपल्याकडेच नव्हे, तर जगभरातच डिजिटल विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. म्हणूनच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तम शिक्षणाची पुनर्बांधणी करणे आणि डिजिटल विभाजन मिटवून शिक्षण अधिक न्याय्य करण्याकरता नावीन्यपूर्ण मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे.
शिक्षण क्षेत्रात इतर क्षेत्रांचे योगदान?
कोरोनाने इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही बरेच नवे बदल घडवून आणले. अनेक बदलांची प्रामुख्याने तंत्रज्ञानविषयक बदलांची आवश्यकता जी व्यक्त केली जात होती, ते बदल शिक्षण क्षेत्रात तातडीने करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. त्या परिस्थितीत ऑनलाइन अध्ययन हा एकच पर्याय उपलब्ध होता आणि त्यामुळे तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अध्यापकवर्गासाठी अत्यावश्यक ठरले. झूम, गूगल मीट यांसारख्या व्यासपीठांद्वारे मुलांना थेट शिकवणे, शेअर स्क्रीनद्वारे रेकॉर्डेड व्हिडियोज दाखवणे काहींनी पसंत केले. कोविड काळात मुलांच्या शिक्षणात घरच्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मोबाइल अथवा लॅपटॉप, इंटरनेट सेवा यांसारखे अध्ययनाची साधने उपलब्ध करून देणे, तसेच तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत करून मुलांना मदत करण्यापासून, अभ्यासक्रमातील न समजलेल्या संकल्पना मुलांना स्पष्ट करण्यापर्यंत पालकांची मुलांच्या शिक्षणातील भूमिका विस्तारली.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्यांचा सामना जेव्हा शिक्षण क्षेत्र करत होतं, तेव्हा समाज म्हणून आपण सार्यांनी काय योगदान दिले? पाश्चिमात्य देश, इस्रायल यांसारख्या देशांमध्ये शिक्षणसंस्थांच्या तसेच पालकांच्या मदतीसाठी तिथल्या विद्यापीठांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी ऑनलाइन शिक्षणविषयक शिक्षक व पालक-पाल्य प्रशिक्षणासाठी व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रशिक्षणाची छोटी मॉड्यूल्स बनवली. विषयवार पाठ बनविण्यास शिक्षकांना मदत केली. हे सारे अगदी अचूक होते, असे नाही. प्रत्येकालाच हे सारे पहिल्यांदा बनवताना आव्हानांचा सामना करावा लागत होता. जगभरातील अनेक तंत्रस्नेही देशांतही मुलांच्या संख्येच्या तुलनेत संगणकांची वानवा भेडसावत होती. ‘कनेक्टिव्हिटी’ची समस्या तिथेही होती, पण आहे त्या परिस्थितीत, शक्य तितके प्रयत्न करत त्यांनी शिक्षणाचे गाडे नावीन्यपूर्ण पद्धतीने पुढे रेटण्यात यश मिळवले.
चेहरामोहरा बदलायला हवा
कोरोना काळात ऑनलाइन शिकवताना आपण पारंपरिक अभ्यासक्रम तसाच्या तसा फक्त ऑनलाइन शिकवला. खरे तर नेहमीचा अभ्यासक्रम ऑनलाइन शिक्षणात तसाच्या तसा राबवणे अप्रस्तुत आहे. अभ्यासक्रम सद्य संदर्भाला धरून शिकवणे संयुक्तिक ठरते. याकरता लवचिकता, स्वायत्तता आणि भूमिकांचा विस्तार या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणूनच ऑनलाइन शिक्षणातही पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण असे दोन विभाग करायला हवे.
ऑनलाइन शिकवताना बव्हंशी आपल्याकडे पारंपरिक शिक्षण फक्त झूम, गूगल मीटद्वारे तसेच्या तसे शिकवले, इतकाच काय तो फरक. खरे पाहता, नव्या रचनेत अध्यापनासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करायला हवा. अध्ययनाची प्रक्रिया नव्या प्रकारे सुरू करायला हवी. ऑनलाइन पद्धतीने शिकवताना मुलांच्या शंका, मते, सूचना यांकडे तातडीने लक्ष पुरवायला हवे. नव्या पद्धतीत इंटरनेटचा वापर करून आकर्षकरीत्या अभ्यासक्रमाची रचना करायला हवी.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या बदलत्या माहोलात शिक्षकांकडून तीन प्रकारच्या व्यावसायिक कृती होणे अपेक्षित आहे. त्या म्हणजे प्रयोगशील उपक्रमांचे व त्यातील प्रक्रियांचे दस्तावेजीकरण करणे, हे प्रयोगशील उपक्रम अभ्यासक्रमाच्या चौकटीत बसवणे, संकल्पना निर्मिती करणे आणि या संपूर्ण अनुभवाला सिद्धान्ताशी जोडणे. याचे काटेकोर पालन नवे उपक्रम राबवताना शालेय शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे.
खुल्या वातावरणात मुलांचा वावर हवा
नव्या शैक्षणिक वर्षात मुलांना वर्गाबाहेर, खुल्या वातावरणात पर्यावरण शिक्षणासाठी नेणे अत्यावश्यक आहे. यामुळे मुले गेली दोन वर्षे ज्या ताणातून गेले आहेत, तो कमी होऊन ती भावनिकरीत्या सक्षम होण्यास मदत होईल. खुला अवकाश आणि नैसर्गिक प्रकाश आरोग्यदायी असतो. वर्गातील सामाजिक अंतर पाळण्याच्या प्रश्नावरही हा चांगलाच उतारा आहे.
कोरोना संकटामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे वळल्यानंतर पारंपरिक शिक्षणाने उभ्या केलेल्या भिंती नाहीशा करणे शक्य आहे का, हे शिक्षकांनी आणि शाळांनी बघायला हवे. प्रत्यक्ष आणि ऑनलाइन शिक्षण देताना कधी, कसे आणि काय शिकायचे याचे पर्याय निर्माण करता येतील. ऑनलाइन पाठांतून आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे, हे शिक्षकांनी ठरवायला हवे. नवनव्या कल्पनांतूनच शिक्षकांना यासंबंधीचे नवे उपक्रम राबवता येतील आणि त्यातूनच नवा बदल घडू शकतो. नव्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा संमिश्र प्रकारे शिकवून विद्यार्थ्यांना दोन पावले पुढे नेणे शक्य आहे.