प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी दोघाजणांनी नुकताच गोळीबार केल्यामुळे काही वर्षापूर्वी जोधपूरच्या बावडमधील मथानिया येथील जंगलात सलमान खानने दोन चिंकाराची शिकार केल्याचा मुद्दा फिरून एकवार ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातच्या भूज येथून विकी साहेब गुप्ता (२४) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (२१) यांना अटक करून मुंबई पोलिसांची मान तर उंचावलीच, शिवाय मुंबईबाहेरील गुन्हेगारांच्या बॉलिवुडमध्ये शिरण्याच्या प्रयत्नावरही प्रकाशझोत टाकला. बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मसिही इथे राहणार्या वरील दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या वर्षी ४ जानेवारी रोजी मुंबईतील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान न भेटल्याने पंजाबातील फाजीपूरमध्ये राहणारे त्याचे चाहते आजेशकुमार ओमप्रकाश गिला आणि गुरूसेवक सिंग तेजा सिंग सिद यांनी सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे दोघे केवळ चाहते असल्याचे समोर आले. आता त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई यांने समाजमाध्यमातील पोस्टवरून या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. अनमोल बिश्नोई सध्या फरार आहे. या वर्षी १४ एप्रिलचा गोळीबाराचा कट बिश्नोईच्या सांगण्यावरून त्याचा हस्तक रोहीत गोगाराने कॅनडात रचला होता अशी माहिती समोर आली आहे.
अनेक गुन्ह्यात अपराधी असलेला लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातूनच सर्व सूत्रे चालवितो. अंमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने त्याला गेल्या वर्षी अटक केली. तो आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि गुजरात पोलिसांच्या कारवायांना सामोरा गेला आहे. या राज्यातील त्याच्या काही मालमत्ता देखील गोठविण्यात आल्या आहेत. पंजाब विश्वविद्यालयात शिक्षण घेत असताना २०१० ते २०१२च्या सुमारास बिश्नोई गुन्हेगारी जगताकडे वळला. २०१३मध्ये मुक्तसरमधील सरकारी कॉलेजच्या निवडणुकीत एका उमेदवाराची गोळी मारून त्याने हत्या केली. नंतर अवैध शस्रास्त्राची तस्करी, खंडणी, खून अशा गुन्ह्यांत त्याचा सहभाग वाढत गेला.
पंजाबमधील फिरोजपूर इथे जन्मलेल्या ३१ वर्षे वयाच्या बिश्नोईविरुद्ध दोन डझनाहून अधिक गुन्हे दाखल असून २०१४मध्ये राजस्थान पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर त्याला भरतपूर (राजस्थान) तुरुंगात पाठविण्यात आले. त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांत २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसामध्ये गोल्डी ब्रारबरोबर केलेल्या पंजाबी गायक सिध्दू मुसावाला याची हत्या, २१ सप्टेंबर २०२३ रोजी खलिस्तानी अतिरेकी सुखदूल सिंह गिल उर्फ सुखा दुनेकेची हत्या आणि ५ डिसेंबर २०२३ रोजी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या यांचा समावेश आहे. २०२१मध्ये मोकाखाली गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर त्याला तिहार तुरुंगात पाठविण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एनआईए) रिपोर्टप्रमाणे बिश्नोई आणि गोल्डी ब्रारचा खलिस्तान्यांशी संबंध आहे.
बिश्नोई तुरुंगातील कर्मचार्यांशी संगनमताने आपले नेटवर्क तुरुंगातूनच चालवतो. ‘व्हॉइस ओव्हर आयपी कॉल’च्या माध्यमातून तो साथीदारांशी संवाद साधतो. बिश्नोईचे पाच राज्यांत ७००हून अधिक हस्तक आहेत. तो तुरुंगातूनच व्हिडिओ कॉल करतो. माध्यमांना मुलाखतीही देतो. यावरूनच तुरुंग प्रशासन अशा खतरनाक गुंडांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्याबाबत कितपत गंभीर आहे याची प्रचिती येते.
बिश्नोई समाजातील काही लोकांतर्फे सलमान खानविरुद्ध धमकी सत्र गेले काही वर्षे सुरूच आहे. २०१७मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या वेळी वांद्रे इथल्या घराबाहेर त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याशिवाय २०१८मध्ये बिश्नोईचा हस्तक संपत नेहराने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करून त्याच्या खुनाचा कट रचला होता. परंतु त्यापूर्वीच त्याला हरयाणा पोलिसांनी अटक केली.
सलमानला मिळणार्या धमक्यांत त्याच्या जवळील लोकांना पाठविलेल्या ईमेल्सचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सलमानचे निकटवर्ती प्रशांत गुंजाळकर यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये सलमानला राजस्थानमधील बिकानेर येथील बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागण्यास सांगण्यात आले होते. शिवाय हे प्रकरण मिटविण्यासाठी गोल्डी ब्रारशी बोलायला सांगण्यात आले होते. याचबरोबर गेल्या वर्षी बिश्नोईने तुरुंगातून पाठविलेल्या व्हिडिओद्वारे त्याला धमकी दिली होती की त्याने माफी मागितली नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील. नंतर गुंजाळकरांच्या तक्रारीवरून लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारविरुद्ध भारत दंडविधानाच्या कलम १२०(ब), ५०६(२) आणि ३४ अन्वये वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सलमानला धमकी देणार्यांनी त्याची दाऊद इब्राहीम आणि छोटा शकीलशी जवळीक असल्याचा आरोपही केला आहे.
बिश्नोई गँगतर्फे सलमानला दिल्या जाणार्या धमक्या पाहता, हळूहळू बॉलिवुडमध्ये शिरकाव करून खंडणी वसूल करण्याचा त्याचा प्रयत्न अधोरेखित होतो. बिश्नोईच्या धमकीनंतर सलमानला मुंबई पोलिसांनी वाय-प्लस सुरक्षा दिली होती. वाय-प्लस सुरक्षा व्यव्ास्थेत चार सशस्त्र सुरक्षा कर्मचारी असतात. आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
अक्षयकुमारला त्याच्या राष्ट्रीयत्वावरून सोशल मीडियावर धमक्या मिळाल्यानंतर एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. एक्स दर्जाच्या सुरक्षेत तीन सुरक्षा अधिकारी शिफ्ट्समध्ये काम करतात. याचप्रमाणे ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर धमक्या मिळाल्याने अनुपम खेर यांना सुरक्षा देण्यात आली होती. अशा सुरक्षेचा खर्च शक्यतो सेलिब्रिटीज स्वत:च करतात.
बिश्नोई समाज चिंकाराला (काळसिपी) आध्यात्मिक गुरू भगवान जंबेश्वर (जम्बाजी) यांचा अवतार मानतात. चिंकारा पिकाच्या शेतात प्रवेश करत नाहीत आणि सघन लागवड केलेले लागवड केलेले क्षेत्रही टाळतात. ते वालुकामय किंवा डोंगराळ भागात राहतात. भारताच्या वायव्य व मध्य भागातील मैदानी प्रदेश, टेकड्यांचा प्रदेश, महाराष्ट्राचा खुला प्रदेश, याचबरोबर बांगला देश, इराण व पाकिस्तान या देशांच्या गवताळ आणि वाळवंटी प्रदेशांतही ते आढळतात.
१९९८मध्ये ‘हम साथ साथ है’च्या राजस्थानमधील जोधपूर इथे चित्रीकरणाच्या वेळी सलमान, त्याचे साथीदार आणि स्थानिक दुष्यंत सिंग यांनी १-२ ऑक्टोबर रोजी दोन चिंकारांची शिकार केल्यानंतर १२ ऑक्टोबर १९९८ रोजी बिश्नोई समाजातील काहीजणांतर्फे दाखल केलेल्या याचिकेच्या आधारावर सलमानला अटक करण्यात आली. नंतर त्याला वेळोवेळी जामीन मिळत गेला.
प्रदीर्घ खटल्यानंतर १० एप्रिल २००६ रोजी जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून २५,००० रुपये दंड आणि पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली. २४ ऑगस्ट २००७ रोजी सलमानने शिक्षेविरुद्ध केलेले अपील सत्र न्यायालयाने फेटाळून लावले. मात्र राजस्थान उच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट २००७ रोजी शिक्षेला स्थगिती दिली. नंतर २५ जुलै २०१६ रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी सलमानची निर्दोष सुटका केली. निकालाच्या विरोधात १९ ऑक्टोबर २०१६ रोजी राजस्थान सरकारतर्फे सलमानविरुद्ध आर्म्स एक्टखाली दाखल केस आणि दोन अवैध शिकारीच्या केसेस प्रलंबित असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. नंतर ५ एप्रिल २०१८ रोजी मुख्य दंडाधिकारी, जोधपूर यांनी सलमानला ५ वर्षे कैद आणि १०,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. परंतु या प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाला. नंतर राजस्थान सत्र न्यायालयाने ११ फेब्रुवारी २०२१ रोजी आर्म्स एक्टखाली सलमानने खोटे अॅफिडेविट सादर केल्याचा राजस्थान सरकारचा दावाही खोडून काढला.
२१ मार्च २०२२ रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने, सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या दोन्ही केसेस आपल्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले. आरोपांना आव्हान देणारी एक याचिका सलमानने देखील केली होती. उच्च न्यायालयाने तिन्ही केसेस एकत्र सुनावल्या जातील असा निर्देश दिला. सलमानविरुद्ध इंडियन वाईल्डलाईफ प्रोटेक्शन एक्ट १९७२चे कलम ९/५१ आणि इंडियन आर्म्स एक्टच्या कलम ३/२५ आणि ३/२७ अन्वये गुन्हा दाखल आहे. शिवाय रद्द झालेला शस्त्र परवाना वापरल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांच्याविरुद्धही इंडियन वाईल्डलाईफ प्रोटेक्शन एक्ट १९७२चे कलम ५१ आणि भारतीय दंड विधानाच्या कलम १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांना या प्रकरणात निर्दोष सोडून देण्यात आले.