• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शिवसैनिकांचे श्रद्धास्थान शिवसेना भवन

- योगेंद्र ठाकूर (गाथा शिवसेनेची)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 9, 2023
in गर्जा महाराष्ट्र
0

‘मार्मिक’च्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम १३ ऑगस्ट १९७४ रोजी माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये सकाळी संपन्न झाला. त्याच दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्कजवळ शिवसेना भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा थाटामाटात साजरा झाला आणि रविवार, १९ जून १९७७ रोजी सकाळी १० वाजता शिवसेना भवनाचे उद्घाटन मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनी गुरुवार, २७ जुलै २००६ रोजी नवीन शिवसेना भवनाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुखांच्याच हस्ते झाले.
शिवसेना भवन म्हणजे फक्त दगड-विटांची इमारत नाही तर ते शिवसैनिकांसाठी मंदिर आहे, तर रंजल्या-गांजल्यासाठी न्यायमंदिर आहे. शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या मालकीची आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यामुळे अशा शिवसेना भवनावर काही उपटसुंभ दावा सांगत आहेत. शिवसेना भवनाच्या मालकीवरून वाद-विवाद निर्माण करून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. कुणा योगेश देशपांडे नामक सामाजिक कार्यकर्त्याने शिवाई ट्रस्टच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. कुठल्याही ट्रस्टची जागा राजकीय पक्षाच्या कार्यालयाला देता येत नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. सरळ लढाई लढता येत नसल्याने विरोधक अशा आयात लोकांच्या आडून खेळी खेळत आहेत.
शिवसेना भवनावर दावा सांगणार्‍यांना या पवित्र वास्तूचा इतिहास माहित नाही. शिवसेना म्हणजे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख म्हणजे शिवसेना. त्यामुळे सुरूवातीची काही वर्षे बाळासाहेब ठाकरे यांचे घर म्हणजे एकतर ‘कदम मॅन्शन’ किंवा वांद्रे इथला ‘मातोश्री’ बंगला हेच शिवसेनेचे ऑफिस असायचे. मधली दोन-एक वर्षे दादरच्या ‘पर्ल सेंटर’मधील दोन रूम्स हे शिवसेनेचे कार्यालय होते. तिथे शिवसेनाप्रमुख सर्वांना भेटत असत. शिवसेनेच्या कारभाराचा व्याप वाढला, कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली, तेव्हा मोठ्या जागेची आवश्यकता भासू लागली. मग शिवाजी पार्कच्या नाक्यावर ऐन मोक्याच्या जागेवर १९ जून १९७७ रोजी संघटनेला हक्काचे घर मिळाले.
उमर या मुसलमान माणसाची ही मूळ जमीन होती. आधी तिथे काही दुकानांचे गाळे होते. त्या सर्वांना पुढे सेनाभवनात जागा मिळाली. गोरे या आर्किटेक्टच्या संकल्पनेतून किल्ल्याच्या शैलीतील मजबूत दगडी इमारत उभी राहिली. शिवसेना भवनाची उभारणी ही सामान्य शिवसैनिकांसाठी स्वप्नपूर्ती होती. कुणी तिकीट लावून सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. कुणी ऑफिस-ऑफिसात जाऊन पावत्या फाडल्या. कुणी देणगीदारांकडे खेटे घातले. त्यातून पैसा उभा राहिला. नंतरही कोणी फरशी लावण्याची जबाबदारी घेतली, तर कोणी फर्निचरची. या भवनासाठी जागा मिळविण्यापासून ते या भवनाच्या उभारणीच्या कामापर्यंत सर्व नेत्यांनी, शिवसैनिकांनी अथक मेहनत घेतली.
सेनाभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वतः शिवसेनाप्रमुखांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली श्री. सहस्त्रबुद्धे यांनी तयार केला. या सेनाभवनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या वास्तूत आई भवानी तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जावी अशी इच्छा माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे या मूर्तीची प्रतिष्ठापना येथे लगोलग करण्यात आली. तुळजाभवानीच्या साथीने येथे दरवर्षी नवरात्रौत्सव साजरा केला जातो.
शिवसेना भवनाने आजवर अनेक चांगल्या-वाईट घटनांचा अनुभव घेतला आणि जपला आहे. ज्या वर्षी या वास्तूची निर्मिती झाली, त्या सालात जनता पार्टीचे सरकार केंद्रात होते. त्यापूर्वी आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे जनता पार्टीवाल्यांच्या मनात शिवसेनेविषयी द्वेषाची भावना निर्माण झाली होती. याचवेळी मोरारजी देसाई आणि जगजीवनराम यांची एक सभा शिवतीर्थावर झाली. सभेनंतर शिवतीर्थावरून बाहेर पडलेल्या जनता पार्टीच्या समर्थकांनी शिवसेना भवनावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीचे वृत्त समजताच शिवसेनेचे कमांडर दत्ताजी साळवी यांनी दिवाकर रावते यांना चोख प्रत्युत्तराचा आदेश दिला. मग काय? शिवसैनिकांनी हल्लेखोरांशी जोरदारपणे मुकाबला केला.
या हल्ल्याप्रकरणी रावते, दत्ताजी नलावडे, गणेश महाले आदी आठ जणांना अटकही झाली. या वास्तूने हा प्रहारही झेलला. परंतु या वास्तूचे महत्त्व कमी झाले नाही. उलट दिवसेंदिवस या वास्तूचा दबदबा आणि दरारा वाढतच गेला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात या हल्ला प्रकरणी जोरदार चर्चाही झाली. शिवसेना भवनावर बोलावलंय असा साधा निरोप जरी आला तरी भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतो.
शिवसेना भवनाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनाप्रमुखांनी सांगितले की ‘शिवसेना भवन’ ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे. तिचे आम्ही केवळ राखणदार आहोत. या वास्तूचं पावित्र्य प्रत्येकाने राखलं पाहिजे. हे भवन महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलायला लावीलच. पण त्याचबरोबर हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलं पाहिजे, असा माझा आग्रह आहे. याच संदर्भात ‘मार्मिक’मध्ये १९ जून १९७७ च्या अंकात ‘तुमच्या निष्ठेची फुले इथे उधळा’ या शीर्षकाखाली अग्रलेख आला. या अग्रलेखात त्यांनी म्हटले, ‘शिवसेना भवन ही मराठी माणसाच्या जीवनातील पहाट आहे. जीवनातील अंधार दूर करणारे ते सामर्थ्य येथेच त्याला गवसणार. चला, उठा! तुमच्या या पवित्र वास्तूचे दर्शन रविवार, दिनांक १९ जून १९७७ रोजी सकाळी १० वाजता घ्या. इथे जातिभेद नाहीत, बडवे नाहीत. सर्वांना दारे उघडी आहेत. या! या!! तुमच्या निष्ठेची, श्रद्धेची फुले या इथे उधळा. ज्यांनी ज्यांनी ही पवित्र वास्तू उभारण्यास हातभार लावला त्या सर्वांना आई जगदंबा उदंड आयुष्य देवो.’
जुन्या शिवसेना भवनात पहिल्या मजल्यावर प्रशस्त हॉल होता. त्यात बैठका-मेळावे यांचे आयोजन होत होते. दुसर्‍या मजल्यावर भवानी बँक, बेस्ट कामगार सेना, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, भारतीय विद्यार्थी सेना यांची कार्यालये होती. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुखांचे दालन होते. तिसर्‍या मजल्यावर भारतीय कामगार सेनेचे कार्यालय आणि साप्ताहिक ‘मार्मिक’चे कार्यालय होते.
या वास्तूमधूनच शिवसेनेची यशस्वी घोडदौड महाराष्ट्रभर सुरू झाली. १९८५ साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी स्वतः बाळासाहेबांनी प्रत्येक उमेदवाराच्या मुलाखती येथे घेतल्या. बाळासाहेबांच्या चाणाक्ष नजरेने अचूक उमेदवारांची पारख केली आणि शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकविला. १९९० साली विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार बाळासाहेबांनीच निवडले. उमेदवार निवडताना या वास्तूला कधी जातीपातीचे ग्रहण लागले नाही. शिवसेनाप्रमुखांनी कुणाही उमेदवाराला त्याची जात विचारली नाही. याची साक्ष देखील ही वास्तू अभिमानाने देत राहिली आहे.
शिवसेनाप्रमुख बरीच वर्षे २३ जानेवारी या त्यांच्या वाढदिवशी सर्व शिवसैनिकांचे अभिवादन शिवसेना भवनात स्वीकारायचे, भेटायचे. दर गुरुवारी बाळासाहेब महाराष्ट्रातील शिवसैनिकांना, सामान्य मराठी माणसाला भेटायचे. त्यांच्या तक्रारी, गार्‍हाणी ऐकून त्यांचे निराकरण करायचे. शिवसेना भवनात सेना-भाजपा युतीच्या अनेक बैठका येथे पार पाडल्या. १९९५ साली शिवसेनाप्रमुखांनी या वास्तूच्या साक्षीनेच महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार स्थापन करून दाखविले. शिवसेना भवनात भारतीय कामगार सेनेचे कमांडर दत्ताजी साळवी, स्थानीय लोकाधिकार समितीचे सुधीर जोशी, ज्येष्ठ नेते वामनराव महाडिक व प्रमोद नवलकर, छगन भुजबळ, मधुकर सरपोतदार अ‍ॅड. लिलाधर डाके, सुभाष देसाई आदींनी स्वतःचा आगळा वेगळा ठसा उमटविला. शिवशाही सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवडण्यासाठी व मंत्रिमंडळ बनविण्यासाठी घेण्यात आलेल्या विधिमंडळ शिवसेना पक्षाच्या बैठकादेखील येथेच पहिल्यांदा पार पाडल्या.

‘शिवसेना भवन’ची नवीन वास्तू

सन १९९२-९३मध्ये मुंबईत १३ बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमध्ये २५१ माणसे मरण पावली आणि ७५० हून अधिक माणसे जखमी झाली. शिवसेना भवनाजवळच्या पेट्रोल पंपावर असलेल्या गाडीमध्येही बॉम्बस्फोट झाला होता. शिवसेना भवनच उद्ध्वस्त करण्याचा अतिरेक्यांचा तो प्रयत्न होता. ही वास्तू नेहमीच इस्लामी दहशतवादाच्या हिटलिस्टवर राहिली होती. दुसर्‍या दिवशी स्वतः शिवसेनाप्रमुख शिवसेना भवनाची स्थिती पाहण्यासाठी आले. शिवसेना भवनाला आणि शिवसेनाप्रमुखांच्या चेंबरमध्ये मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. स्फोट झाले त्यावेळी शिवसेनाप्रमुख तेथे नव्हते हे नशीबच! शिवसेना भवन आता दुरुस्त करावे लागेल किंवा नव्याने बांधावे लागेल, हे त्यांच्या लक्षात आले. काही वर्षे तशीच गेली आणि शिवसेना भवन पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वर्षानंतर म्हणजे गुरुवार, २७ जुलै २००६ रोजी नवीन शिवसेना भवनाचे उद्घाटन झाले. अत्यंत आधुनिक शिवसेना भवन! भाजप नेते गोपीनाथ मुंडे मुद्दाम या कार्यक्रमासाठी आले होते. ते म्हणाले, ‘मुंबईत बॉम्बस्फोट होतायत, १९९३सारखी परिस्थिती उद्भवू पाहते आहे. पण शिवसेनाप्रमुखच मुंबईकरांचे दहशतवादापासूनच रक्षण करू शकतात, असा विश्वास देशभरातील हिंदूंच्या मनात असून शिवसेना भवन हे त्या विश्वासाचं केंद्र आहे. मग शिवसेनाप्रमुखांचे भाषण झालं. मा. बाळासाहेबांचे शब्द ऐकण्यासाठी जणू काळच थांबला!’ मा. बाळासाहेब म्हणाले, ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, आज उद्धवचा वाढदिवस. आणखी किती जणांचे वाढदिवस आहेत मला माहित नाही. त्या सार्‍यांना माझ्या शुभेच्छा! एवढं काही भव्यदिव्य उभं राहील असं वाटलं नव्हतं. पण हे सारं शिवसैनिकांच्या अथक मेहनतीमुळे घडलं आहे. नवीन शिवसेना भवनाची ही वास्तू छान आहे. येथून महाराष्ट्राची सेवा घडो.’
नवीन शिवसेना भवनात पहिल्या मजल्यावर मीडिया सेल आणि समिती लोकाधिकार महासंघाचे नवीन प्रशस्त कार्यालय आहे. तर दुसर्‍या मजल्यावर कॉपोरेट लेव्हलचे सभागृह आहे. तिसर्‍या मजल्यावर शिवसेना सचिव, शिवसेना समन्वय आणि महिला आघाडीचे कार्यालय आहे. चौथ्या मजल्यावर युवासेनेचे आधुनिक तंत्रज्ञानासह भव्य कार्यालय आहे. तर पाचव्या मजल्यावर पदाधिकार्‍यांच्या बैठका, पत्रकार परिषदेसाठी सभागृह असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी भव्य दालन आहे.
२०२१मध्ये शिवसेना भवनाची आम्ही तोडफोड करू अशी गर्जना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. पण शिवसैनिकांचा आणि मराठी माणसांचा रोष पाहून त्यांनी माफी मागत माघार घेतली, हा इतिहास ताजा आहे. सेनाभवन अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्याला हेवा वाटावा, असे सेनाभवन आहे. या भवनाने महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व दिले आहे. ते मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासाचे आशास्थान आहे. लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे, ऊर्जास्थान आहे. शिवसैनिकच नव्हे, तर मराठी माणूस शिवसेना भवनाला जिवापाड जपतो. त्यामुळे शिवसेना भवनाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये!

Previous Post

कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

Next Post

फाटाफूट टाळा, एकजूट राखा! (प्रादेशिक पक्षांना संदेश)

Next Post
फाटाफूट टाळा, एकजूट राखा! (प्रादेशिक पक्षांना संदेश)

फाटाफूट टाळा, एकजूट राखा! (प्रादेशिक पक्षांना संदेश)

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.