इथं पावलोपावली मृत्यू समोर दिसायला लागला. हा पोलीस तरी खरा की खोटा की पोलिसाच्या गणवेशातला आतंकवादी तर नसावा? संशयाची पाल चुकचुकली. कुणाला विचारावं तर इथं तो आणि मी आम्ही दोघेच रस्त्यावर एकमेकांना खुन्नस देतोय. इथेही मी माघार घेतली आणि खादी भांडाराच्या रस्त्याने बाहेर येऊन थेट सीएसटी गाठले. रेल्वे स्थानकातून कसेबसे लंगडत पळत माणसं बाहेर येत होती. कुणाच्या डोक्यावर बँडेज बांधलेले. कपड्यावर रक्ताचे डाग पडलेले. घाबरलेले रडके चेहरे येत होते. मी सीएसटीपर्यंत पोहचलो, पण पोलीस यापुढे जाऊ देत नव्हते.
—-
वृत्तपत्रसृष्टीमध्ये रिपोर्टर कम फोटोग्राफर या पदावर तीस वर्षे नोकरी करणारा मी एकमेव पत्रकार असावा. तोही चोवीस तास अव्याहतपणे अखंड सेवा देणारा.
माझी नियुक्ती जरी ‘नवशक्ती’ दैनिकासाठी झाली होती तरी मला प्रâी प्रेस जर्नल आणि बुलेटिनचे काम करावे लागे. रजत शर्मा त्यावेळी बुलेटिनचे संपादक होते. त्यांच्या कामासाठी सकाळी सात साडेसात वाजता मला ऑफिसमध्ये यावे लागे. इतर दोघांसाठी रात्रीचे बाराही वाजायचे. इतर पत्रकार तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करायचे आणि मी एकटाच तीन शिफ्टचे काम करायचो.
२६/११/२००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला, त्या दिवशी मी दिवसभर काम करून रात्री नऊ वाजता पार थकून घरी आलो होतो. सवयीप्रमाणे टीव्हीवर बातम्या लावून जेवायला बसलो. दोन-चार सुखाचे घास पोटात घालतो तोच ब्रेकिंग न्यूज झळकायला लागल्या. ऑबेरॉय हॉटेलमध्ये फायरिंग, नरिमन हाऊसमध्ये गोळीबार… लियोपोल्ड हॉटेलमध्ये तेच. थोड्या वेळाने हॉटेल ताजमध्येसुद्धा आणि आता सीएसटी स्थानकातही अंदाधुंद गोळीबार…
डोक्यावर हात मारून घेतला. डोकं सुन्न झालं होतं. दिवस मावळला आता रात्रीच्या जागरणाला चला, असं मनाशी म्हटलं.
ऑफिसमधून फोनवर फोन यायला सुरुवात; भडेकर कुठे आहेस! म्हटलं ताटावर! जेवतोय. अरे जेवतोय कसला मृत्यूने तांडव घातलंय बाहेर लोक मरताहेत आणि तू जेवत कसला बसलायस. नीघ लवकर. संपादकांनी फोटो आणि माहिती आणायला सांगितलीय. ११ वाजेपर्यंत सर्व घेऊन ये…
साडेनऊ वाजले होते. दीड तासात मला सर्व घटनांचे फोटो आणि बातमी आणायची होती. भुकेपायी थोडेफार जेवून घेतलं. कारण मला माहिती होतं की अशा प्रसंगाचे फोटो काढल्यानंतर जेवण जात नाही. अन्नाला चव लागत नाही. ती भयानक दृश्यं सारखी डोळेसमोर तरळत राहातात.
सतत फोन येत राहिल्यामुळे ताटावरून उठलो, हात धुतले आणि मोबाईल लावला. कोण फायरिंग कशासाठी करते आहे, हे पोलीस कंट्रोललाही माहित नव्हतं सुरुवातीला.
दाऊद, अरुण गवळी, अश्विन नाईक या तिघांच्या टोळ्या मुंबईत कार्यरत होत्या. त्यांच्या पंटर लोकांनाही विचारले. कोण आहे, कोण पॅरोलवर बाहेर आलाय? मी माहिती मिळवत होतो. पण माझी खात्री होती, हे ते नसणार. या गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांचे काही नियम असतात. ते सर्वसामान्य लोकांना अजिबात त्रास देत नाहीत. त्यांची गुन्हे करण्याची पद्धत मला माहीत होती. या तीनही टोळ्यांचे नामचीन शूटर आजही ओळखीचे आहेत. ते इतकं भीषण हत्याकांड करतील यावर माझा अजिबात विश्वास नव्हता.
मग हे मारेकरी आहे तरी कोण? ते पोलिसांनाही जुमानत नाहीत… आणि यांचे फोटो घेण्यासाठी मी त्यांच्या पुढ्यात जायचे म्हणजे आ बैल मुझे मार!
नरीमन हाऊसचा पत्ता कुणी सांगेना. ते नरिमन पॉइंटला असावे असा तर्क केला, तो चुकीचा होता. नरीमन हे नाव पारशी जमातीमध्ये असते. तर दक्षिण मुंबईत पारशांची मोठी वसाहत कुठे विचारली तर ती कुलाबा बस डेपोजवळ आहे, समजलं. काही पारशांनी सांगितलं. `नो… नो… डिकरा, इथे नरीमन हाऊस नाही, कुलाबा फायर ब्रिगेडजवळ आहे. मी स्कुटर स्टार्ट केली आणि प्रथम सीएसटीच्या दिशेने निघालो. लोक धावत पळत येत होते. मोटारी उलट्या माघारी येत होत्या. माझ्याशिवाय कुणीही पुढे जायला तयार नव्हतं. रस्त्यात अनेकांनी मला अडवलं, पुढे जावू नका सांगितलं. क्या मरनेका है क्या? पागल हो क्या? क्यू डालता जान खतरे मे.
दुसरा म्हणाला, घर में बाल बच्चे हैं ना उनका खयाल करो!
असं ऐकल्यावर माझीही उतरली. हे लोक म्हणताहेत ते बरोबर आहे. मला मुलंबाळं आहेत आणि त्यांचा विचार केला पाहिजे हे खरे आहे. पण मग असाही विचार केला की या सर्वांपेक्षा मी वेगळा आहे. मी स्वतंत्र बाण्याचा निर्भीड पत्रकार आहे. अशावेळी शेपूट घातली तर आम्ही पत्रकार कसले? कर्तव्यात कसूर केल्यासारखे होईल.
मनाचा हिय्या केला नि निघालो. लढाईवर मेट्रो जंक्शनवर रस्त्याच्या मध्यभागी मोठा जमाव जमला होता. गाडीचा हॉर्न वाजवत मी गाडी पुढे घेत गेलो. मी कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. पण एक वयस्कर माणूस आडवा आला. त्याने हात जोडून मला विनंती केली.
मी इंजीन चालूच ठेवून समोरच्या रस्त्याकडे एकटक पाहात राहिलो. सेंट झेवियर कॉलेज ते कामा हॉस्पिटलचा रस्ता निर्मनुष्य होता किर्रर्र काळोख पसरला होता. भीषण शांतता होती पण अधून मधून फटाके फुटावे तसे आवाज येत होते. पुढे जाऊ की नको, जावे की न जावे, करा किंवा मरा… गांधीजींची आठवण आली. पण इथे गांधीगिरी करून उपय्ाोग नव्हता. त्या वयस्कर माणसाच्या विनंतीला मान देऊन मी माघारी फिरलो.
दुसर्या रस्त्याने म्हणजे सेंट झेवियर कॉलेजच्या रस्त्याने न जाता मी फॅशन स्ट्रीटने पुढे जाऊन बॉम्बे जिमखान्याला वळसा घालून सीएसटीच्या दिशेने निघालो. सुमारे शंभर दीडशे मीटर अंतरावर असलेल्या पोलिसाने लांबूनच मला रायफल दाखवली. मी स्कूटरची हेडलाईट बंद करून माझा कॅमेरा दाखवला, पण तो काही ऐकेना. मी हळूहळू पुढे निघालो तसे त्याने माझ्यावर नेम धरून फायरिंगचा पवित्रा घेतला. मी भ्यायलो नाही. म्हटलं हा कसला मारतोय, याला प्रत्येक गोळीचा हिशोब द्यावा लागतो. तो शंभर वेळा विचार करेल. मग मारेल. पण हवालदार खमक्या निघाला मी जवळ येतो आहे असं पहिल्यावर त्याने रायफल लोड केली आणि चाप ओढल्यासारखा आवाज करून दाखवला.
म्हटलं मेलो.
इथं पावलोपावली मृत्यू समोर दिसायला लागला. हा पोलीस तरी खरा की खोटा की पोलिसाच्या गणवेशातला आतंकवादी तर नसावा? संशयाची पाल चुकचुकली. कुणाला विचारावं तर इथं तो आणि मी आम्ही दोघेच रस्त्यावर एकमेकांना खुन्नस देतोय.
इथेही मी माघार घेतली आणि खादी भांडाराच्या रस्त्याने बाहेर येऊन थेट सीएसटी गाठले. रेल्वे स्थानकातून कसेबसे लंगडत पळत माणसं बाहेर येत होती. कुणाच्या डोक्यावर बँडेज बांधलेले. कपड्यावर रक्ताचे डाग पडलेले. घाबरलेले रडके चेहरे येत होते.
मी सीएसटीपर्यंत पोहचलो, पण पोलीस यापुढे जाऊ देत नव्हते. ते अगोदरच गेले होते ते दहशतवादी आणि पोलिसांच्या धुमश्चक्रीत अडकले. माझ्यामागे दोन धट्टेकट्टे इसम येऊन उभे राहिले. गुंडा ब्रँचमधले पोलीस दिसतात तसे वाटले. बहुधा ते साध्या वेषातील पोलीसच असावेत. ते पार्टी करून आले होते. तोंडाला वेलचीचा सुगंध येत होता. अशावेळी माणूस भयंकर डेरींगबाज असतो. ते आपसात ठरवत होते तू या बाजूने जा, मी त्या बाजूने जातो.
भिकारचो… कोण आहेत. त्यांच्या आयला… वगैरे म्हणत त्यांना पकडण्यासाठी ते पुढे चालले होते. मी म्हटलं साहेब, हे नेहमीचे गुंड दिसत नाहीत हे कोणीतरी वेगळे आहेत. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तुमच्याकडे काही शस्त्रही नाहीत आणि गोळीबार चालू असताना कशाला पुढे जाता?
या सर्व घटनेचे फोटो काढत असताना प्रथम मॅनेजरने फोन करून सर्व माहिती घेतली. त्यानंतर रात्रपाळीच्या वृत्तसंपादकाचा फोन. त्यानंतर मुख्य वार्ताहराचा फोन. त्यांना ऑफिसमध्ये बसून आँखो देखा हाल टाइप करायचा होता.
मी वैतागलो! यांना माहिती देत बसलो तर फोटो कोण काढणार? एव्हाना रात्रीचे अकरा वाजले. बारा वाजता पेपर प्रिंटिंगला जातो म्हणून जे मिळाले ते फोटो घेऊन ऑफिसला गेलो आणि सर्व फोटो आणि त्यामागची कहाणी लिहून दिली.
सकाळपासून बैलासारखा राबलो. आता पार दमून गेलो. घरी आलो आणि उगाच उरलेले जेवण जेवून रात्री साडेबारा वाजता ताणून दिली. लोक साखरझोपेत होते पण मला साखरही गोड लागेना अशी अवस्था. रात्री दोन अडीच वाजता मी झोपेतून दचकून उठलो. अस्वस्थ वाटत होते म्हणून टीव्ही लावला. आणि आश्चर्याचा धक्का बसला. डोळ्यावर विश्वास बसेना. मी घराबाहेर येवून गॅलरीत उभा राहिलो. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजत धावत होत्या. मी पुन्हा खाली उतरून उपयोग नव्हता कारण पेपर छापायला सुरुवात झाली होती.
टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज दाखवत होते.
हेमंत करकरे शहीद हुए
अशोक कामटे शहीद…
विजय साळसकर शहीद…
विश्वास बसत नव्हता म्हणून इतरही चॅनेलच्या बातम्या बघत होतो. सर्वत्र याच ओळी दाखवत होते. कमाल आहे. मी घरी येईपर्यंत हे सर्व आघाडीवर होते. आणि तासाभरात शहीद कसे झाले? हे तिघेही माझे मित्र होते. साळसकर तर शार्पशूटर आणि तोही गेला. करकरे, आमटे हे आयपीएस अधिकारी इतक्या सहज जातील कसे?
खूप वाईट वाटलं. घरच्यांना उठवून सांगावंस वाटलं, पण सर्व गाढ झोपलेले.
मी हतबल झालो.
त्या रात्री मला कशी झोप लागली देव जाणे.