`हां साहब…’ त्यानं सांगून टाकलं. मधुरिमानं सुरुवातीच्या काळात वर्माबरोबर एका सिनेमात काम केलं होतं, पण ती भूमिका अगदीच किरकोळ होती. आता तिला मोठं काम, मोठी भूमिका मिळवून देण्याचं वर्मानं आश्वासन दिलं होतं, पण ते काही अजून प्रत्यक्षात येत नव्हतं. ती दरवेळी येऊन त्यांच्या मागे टुमणं लावायची, भूमिका देण्यासाठी हट्टाला पेटायची, त्याचा नाही म्हटलं तरी त्रास होत होता, हेही वर्माने खुल्या दिलानं सांगून टाकलं. त्याच्याबद्दलही संशय घेण्यासारखं काही नव्हतं. आता प्रश्न हा होता, की मधुरिमाच्या वाईटावर टपलेली ही व्यक्ती होती तरी कोण?
—-
प्रसिद्ध अभिनेत्री मधुरिमा प्रकाश हिच्या मृत्यूच्या बातमीने खळबळ उडाली होती. पोलिसांची टीम तिच्या घरी पोहोचली, तोपर्यंत घराबाहेर भरपूर गर्दी जमली होती. रात्री कधीतरी तिच्या घरीच तिच्यावर हल्ला झाला, असं सांगण्यात येत होतं.
इन्स्पेक्टर बिराजकरांनी सगळ्यात आधी गर्दी हटवण्याच्या सूचना त्यांच्या टीमला केल्या आणि मृतदेह पुढच्या तपासणीसाठी पाठवून दिला.
`रात्री बिल्डिंगमध्ये कुणी आलं होतं का?’ बिराजकरांनी वॉचमनला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
`न्हाई साहेब, आमच्या रजिस्टरमध्ये नोंद केल्याबिगर कुणाला आत येऊच देत नाही आपण!’ वॉचमन जगदाळेंनी अगदी छाती पुढे काढून सांगितलं. बिराजकरांनी जरा दरडावल्यावर जगदाळे नरम आला.
`साहेब, मॅडम रात्री उशिरापर्यंत बाहेर होत्या. साडेबाराच्या दरम्यान त्या घरी आल्या. त्याच्यानंतर कुणालाच आत येताना बघितलं नाही!’ त्यानं सांगितलं.
`सीसीटीव्ही फुटेज बघू…!’
`साहेब, ते… म्हणजे, शीशीटीव्ही बंद आहेत गेल्या आठवड्यापासून!’ जगदाळेंनी उत्तर दिलं आणि बिराजकर वैतागले. त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरींनाच बोलावून घेतलं.
`सोसायटीचे सीसीटीव्ही बंद का आहेत?’ त्यांनी खडसावून विचारलं.
`साहेब, एकच कॅमेरा बंद पडलाय, पण मीटिंगमध्ये आम्ही विषय घेणार होतो!’ सेक्रेटरींनी सेक्रेटरी छापाचं उत्तर दिलं.
`तुमच्या या हलगर्जीमुळे एका खुनाचा तपास करणं अवघड होणार आहे, हे कळतंय का तुम्हाला?’ बिराजदार पुन्हा खवळले. अर्थात, इथे राग काढून काहीच साध्य होणार नाही, याची त्यांना कल्पना आली होती. सीसीटीव्हीचे एक नव्हे, दोन कॅमेरे बंद होते. त्यामुळे गेटमधून कोण आलं, कुठे गेलं, हे कळूच शकणार नव्हतं.
त्या दिवशी मधुरिमा मैत्रिणीकडे पार्टीला गेली होती. मधुरिमा प्रसिद्ध अभिनेत्री असली, तरी सध्या तिच्याकडे फार मोठं काही काम नव्हतं. ती डिप्रेशनमध्ये असल्याच्या, सोसायटीत, बाहेरही कुणाकुणाशी भांडण करत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असत. सोसायटीतल्या पार्किंगवरून, कॉमन जागेवरून, व्यवस्थेवरून तर ती सतत कुणाशी ना कुणाशी वाद घालत असल्याच्या तक्रारीही होत्या. अर्थात, त्यावरून परिस्थिती एवढी टोकाला जाण्याची काही शक्यता वाटत नव्हती.
`ही मधुरिमा एकटीच राहत होती काय?’ बिराजदारांनी सहकार्यांना विचारलं.
`हो, साहेब. तिचा घटस्फोट झालाय, दोन वर्षांपूर्वी. तेव्हापासून एकटीच होती. नवर्याबरोबर प्रॉपर्टीची एक केससुद्धा सुरू आहे. तो अधूनमधून तिला भेटायला यायचा, त्यावरून त्यांची भांडणंही व्हायची.’ तपास पथकातल्या एकानं माहिती सांगितली.
`पोस्ट मार्टेममध्ये म्हटल्याप्रमाणे, रात्री एक ते तीनच्या दरम्यान तिचा मृत्यू झालाय. म्हणजे त्याचवेळी कुणीतरी तिच्या घरी आलं होतं. सीसीटीव्हीमध्ये तर काहीच सापडण्याची शक्यता नाही. तिचे कॉल रेकॉर्डस बघायला पाहिजेत.’ बिराजरांनी तिचे रेकॉर्ड्स मागवण्याची सूचना केली आणि टीम कामाला लागली.
मधुरिमा दहा वर्षांपूर्वी अभिनयाच्या ओढीने मुंबईत आली होती. छोटी कामं करत करत बर्यापैकी प्रसिद्ध झाली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत तिचं करिअर पुन्हा डळमळीत झालं होतं. एक दोन महत्त्वाच्या फिल्म्स तिच्या हातून गेल्या होत्या. त्यासाठी तिचं विचित्र वागणं, कुणाशी जुळवून न घेण्याचा स्वभाव, हेच दोष आड आल्याचंही बोललं जात होतं. मुंबईला आल्यापासून घरच्यांनीही तिच्याशी फारसे संबंध ठेवलेले नव्हते, ही माहिती तपासात मिळाली. तिला अडचणीच्या काळात काही मानसिक ताण जाणवत असेल, तर तो शेअर करण्यासाठी, तिला समजून घेण्यासाठी घरातलं जवळचं असं कुणी नव्हतं. शिवाय ती तशी पटकन कुणाला आपल्याजवळ येऊ देणारी व्यक्ती नव्हती. त्यामुळेही लोक तिच्यापासून दोन हात दूरच राहणं पसंत करत होते.
`माने, रेकॉर्ड्स मिळाले?’ दुसर्या दिवशी बिराजदारांनी सहकार्याला विचारलं. त्यानं लगेच रिपोर्ट आणून सादर केले. काही नंबर्सवर त्यानं आधीच खुणा करून ठेवल्या होत्या. त्यातला एक नंबर दिग्दर्शक अविनाश वर्मांचा दिसत होता. वर्मा बॉलिवुडमधले प्रसिद्ध दिग्दर्शक होते. नुकतीच त्यांची एक वेबसीरिजही गाजत होती. त्याच्या सीजन-२मध्ये मधुरिमाला मुख्य भूमिकेत घेण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याच्या चर्चाही गाजल्या होत्या. प्रत्यक्षात सीजन-२मध्ये कुणीतरी वेगळीच अभिनेत्री येऊन शूटिंगही सुरू झालं होतं.
`या वर्मांना एकदा भेटायला हवं. त्या निमित्तानं मधुरिमा किती जणांच्या संपर्कात होती, कुणाचं तिच्याबद्दल काय मत आहे, तेही समजून घेता येईल. चला माने!’ असं म्हणून बिराजदारांनी गाडी काढायच्या सूचना केल्या.
वर्मा जसं ऐकलं तसंच बडं प्रस्थ होतं. त्याच्याकडे संशय घेण्यासारखं काहीच नव्हतं, त्यामुळे सहज चौकशी करत असल्याच्या थाटात बिराजदारांनी सुरुवात केली.
`मधुरिमाला कधी भेटला होतात?’ त्यांनी पहिला आणि थेट प्रश्न विचारला. बिराजदारांना विषय घोळवत बसण्यात अजिबात रस नसायचा. थेट मुद्द्यावर येऊन लवकरात लवकर निष्कर्षाचा रस्ता सोपा करणे, हे त्यांचं तंत्र होतं. त्यानुसारच पहिला प्रश्न थेट आणि नेमका होता.
`एक महिने पहिले मुलाकात हुई थी मधू से.’ वर्मा म्हणाले.
`मधू? अच्छा… काफी गहरी जानपहचान लगती है!’ बिराजदारांच्या या प्रश्नावर त्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली.
`मग तुमची महिन्यापूर्वी नाही, आठवड्यापूर्वी भेट झाली होती, हेही तुमच्या लक्षात असेलच!’ बिराजदार जरा जरबेनं म्हणाले आणि वर्मा थोडा चमकला.
`हां साहब…’ त्यानं सांगून टाकलं. मधुरिमानं सुरुवातीच्या काळात वर्माबरोबर एका सिनेमात काम केलं होतं, पण ती भूमिका अगदीच किरकोळ होती. आता तिला मोठं काम, मोठी भूमिका मिळवून देण्याचं वर्मानं आश्वासन दिलं होतं, पण ते काही अजून प्रत्यक्षात येत नव्हतं. ती दरवेळी येऊन त्यांच्या मागे टुमणं लावायची, भूमिका देण्यासाठी हट्टाला पेटायची, त्याचा नाही म्हटलं तरी त्रास होत होता, हेही वर्माने खुल्या दिलानं सांगून टाकलं. त्याच्याबद्दलही संशय घेण्यासारखं काही नव्हतं. आता प्रश्न हा होता, की मधुरिमाच्या वाईटावर टपलेली ही व्यक्ती होती तरी कोण?
तिच्या घरातून दागिने, रोख पैसे वगैरे गायब झालेले नव्हते. तिच्या खुनामागे चोरीचा उद्देश असल्याचा कुठलाही पुरावा नव्हता. घरात ओळखीचंच कुणीतरी आलं असणार, हे स्पष्ट होत होतं. झटापटीच्या काही खुणा तिच्या अंगावर होत्या, पण त्या शेवटच्या धडपडीच्या वेळी झालेल्या असाव्यात, असा अंदाज बांधता येत होता.
मधुरिमा त्या रात्री पार्टीसाठी ज्या मैत्रिणीच्या घरी गेली होती, तिला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं.
`मधुरिमा मुंबईत आली, तेव्हापासून मी तिला ओळखतेय सर. ती स्वभावानं चांगली होती. सगळ्यांशी चांगले संबंध होते तिचे.’ मैत्रीण अक्षया सांगत होती.
`आणि तिच्याविषयी जे बोललं जायचं ते? ती भांडखोर आहे, भडक डोक्याची आहे, कुणावर कधी रागावेल सांगता येत नाही… त्याचं काय?’ बिराजदार थेट मुद्द्यावर आले.
`नाही सर, ती कारणाशिवाय कुणाशी भांडायची नाही. तिच्याविषयी अनेकदा अफवा पसरवल्या जायच्या किंवा लोकांचे गैरसमज व्हायचे.’
`अच्छा? तुमच्या घरी झालेल्या पार्टीतही तिनं कुणाचातरी अपमान केला होता. कुणीतरी पार्टी सोडून गेलं होतं. ते गैरसमजामुळेच का?’ बिराजदारांनी असा प्रश्न केल्यावर मात्र अक्षयाचा चेहरा खर्रकन उतरला.
`नाही सर, पार्टी सोडून कुणी गेलं नव्हतं…’ तिनं खुलासा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात जोर नाही, हे सहज ओळखता येत होतं.
`आम्ही कुणालाही चौकशीला बोलवायच्या आधी सगळी चौकशी केलेली असते, याची कल्पना आहे ना तुम्हाला?’ बिराजदार तिच्याकडे रोखून बघत म्हणाले. तिला काय बोलावं असा प्रश्न पडला.
`काय, भांडण झालं होतं ना?’ त्यांनी जरा चढ्या आवाजात प्रश्न विचारल्यावर अक्षयाला होकार देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
`कशावरून भांडण झालं होतं? काय कारण?’
`कारण काहीतरी छोटंच होतं, सर. पण मधूचे हल्ली अधूनमधून असे मूड ऑफ्स होत असत. चांगलं काम मिळत नसल्यामुळे, सतत नकार येत असल्यामुळे ती फ्रस्ट्रेट झालेली होती. एका मैत्रिणीनं तिच्या आधीच्या चांगल्या कामाचा विषय काढून तिला समजावण्याचा प्रयत्न केला, त्यावरून ती चिडली आणि भांडण केलं.’ अक्षयानं सगळी हकीकत सांगून टाकली.
`आणि तुमच्या पार्टीचाही मूड ऑफ झाला, म्हणून तुम्ही तिच्या घरी जाऊन सगळा राग तिच्यावर काढलात, बरोबर?’
`नाही सर, मी तिच्याबरोबर गेले नव्हते.’ अक्षया लगेच उसळून म्हणाली, पण बिराजदारांच्या तिच्यावरच रोखलेल्या नजरेने आपल्याच विधानातला फोलपणा तिच्या लक्षात आला.
“हो, मी गेले होते मधूबरोबर. पण मी तिच्या घरी गेले नव्हते सर, तिच्या खुनाशी माझा काही संबंध नाही. मी गेटवरूनच घरी परत आले होते. नंतर काय झालं, मला खरंच माहीत नाही.’ अक्षयानं सांगितलं. पोलिसांचा त्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं.
`गेटवरून का परत आलात? सहज? शतपावली करायची म्हणून?’ बिराजदारांच्या प्रश्नातला खोचकपणा तिला कळला.
`तिला समजावण्यासाठीच गेले होते सर. असं सतत लोकांशी भांडणं करून, राग काढून काही होणार नाही. तिनं स्वतःच्या स्वभावात बदल करायला हवेत, तर पुढे काही आशा आहे, हे मी तिला सांगत होते. पण तिला काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. मग मी तिच्या घरी न जाता, तिथूनच परत यायचा निर्णय घेतला. कॅब करून घरी आले आणि ती तिच्या घरी गेली.’ अक्षयानं सगळं सांगून टाकलं. आपल्यावर निष्कारण संशय नको म्हणून तिनं हे आधी पोलिसांपासून लपवलं होतं, हे उघड होतं. तिच्या मोबाईलचं लोकेशन पोलिसांनी आधीच तपासलं होतं. ते बिल्डिंगच्या बाहेरच दाखवत होतं, त्यामुळे ती खोटं बोलत नव्हती, हे स्पष्ट होतं.
मधूच्या बिल्डिंगमधला सकाळच्या ड्यूटीचा वॉचमन हेमंत गावकर हा तिचा फॅन होता. सतत तिच्या मागेपुढे राहण्याचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, हे पोलिसांना सोसायटीतल्या लोकांकडून समजलं होतं. त्याला चौकशीसाठी बोलावल्यावर तो थरथर कापायला लागला.
`साहेब, मधू मॅडम दिसायला चांगल्या होत्या, काम पण भारी करायच्या. मला आवडायच्या, पण मी काही चुकीचं काम केलेलं नाही साहेब!’ त्यानं पहिल्या फटक्यात सांगून टाकलं.
`हां साहेब, पण त्यांच्याकडे राजेश्वर नावाचा माणूस यायचा. त्यांचा भाऊ आहे, असं सांगायचा. तो माणूस मला आवडायचा नाही साहेब. एकदोनदा त्याच्याशी भांडणही झालं होतं.’ हेमंतने ही माहिती दिल्यावर पोलिसांची चक्रं पुन्हा वेगळ्या दिशेनं फिरली. मधुरिमाच्या फोन रेकॉर्डमधले काही नंबर तपासायचे बाकी होते. त्यातला एक नंबर ह्या राजेश्वरचा निघाला. नंबरचं लोकेशन ट्रेस केल्यावर त्या रात्री तो मधुरिमाच्या फ्लॅटपाशीच होता, हे स्पष्ट झालं. पोलिसांना आता उशीर करायचा नव्हता.
राजेश्वर काय करतो, कुठे जातो, याचा शोध घेतल्यावर तो मोठमोठ्या लोकांच्या संपर्कात असतो आणि त्यांच्या शारीरिक सुखासाठी स्त्रिया पुरवण्याचं दलालीचं काम करतो, हे उघड झालं. पोलिसांनी लगेच त्याच्या मुसक्या आवळल्या. मधुरिमाही याच चक्रात अडकली होती की काय? कळायला काही मार्ग नव्हता.
`साहेब, एका कार्यक्रमात तिची भेट झाली होती. तिला काम नसल्यामुळे याच्यातून पैसे मिळवता येतील, हे तिला सांगितलं होतं. पण साहेब, ती दाद देत नव्हती.’
`म्हणून तिला मारून टाकलंस?’
`नाही साहेब, मी नाही तिला मारलेलं…!’ राजेश्वरचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्याच्या कानाखाली एक सणसणीत थोबाडीत बसली आणि तो कोलमडला.
`तुझं लोकेशन, तुझे फोन कॉल्स, सगळे रेकॉर्ड आहेत आमच्याकडे. हातांचे ठसे, केस, नखं यावरून सगळं सिद्ध होईलच. आता खरं सांग, नाहीतर..’ बिराजदारांनी त्याच्यावर हातातला दंडुका अशा रीतीनं उगारला, की राजेश्वर जागीच खचला.
`एक बडा साहेब मधुरिमासाठी पागल झाला होता साहेब. वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार होता. मलाही चांगला माल मिळाला असता, म्हणून मी तिच्या मागे लागलो होतो. तिला प्रपोजल दिलं, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. माझं नाव उघड करेन म्हणून मागे लागली होती. मला बरबाद केल्याशिवाय ती गप्प बसली नसती. म्हणून त्या रात्री तिचा पाठलाग गेला आणि फ्लॅटमध्ये घुसून तिचा गळा दाबला साहेब!’ राजेश्वरनं कबुली देऊन टाकली.
वॉचमनचा डोळा चुकवून तो आत शिरला होता. मधुरिमाची वाट बघत बसला होता. ती घरी आली, त्याचवेळी घरात घुसून त्यानं तिला शेवटचं समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिनं ऐकलं नाही, तेव्हा तिला संपवून टाकलं. बिराजदारांनी त्याला कोठडीत टाकण्यासाठी फर्मावलं.
मधुरिमा भांडखोर, संतापी असली, तरी तिनं काही मर्यादा सोडल्या नव्हत्या. परिस्थितीच तिच्या विरोधात होती. तिनं संघर्ष केला, पण नशिबाची साथ तिला शेवटपर्यंत मिळालीच नाही!