बावला खून प्रकरणात महाराज तुकोजीराव होळकर यांच्यावर आलेलं बालंट दूर करण्याचा जोरदार प्रयत्न प्रयत्न प्रबोधनकारांनी आपल्या लेखांमधून केला. त्यामुळे बहुजन समाजाला या प्रकरणाची दुसरी बाजू कळली. या लेखाच्या पुस्तिकाही प्रसिद्ध झाल्या आणि गाजल्या.
– – –
प्रबोधनकारांनी १९२५ सालच्या एप्रिल महिन्यात पुण्यात नवी इनिंग्ज सुरू केली, तेव्हा हे बावला खून प्रकरण खूप गाजत होतं. मुंबई हायकोर्टात खटला सुरू होता. महिनाभरात म्हणजे २३ मे १९२५ला खटल्याचा निकाल लागून दोषींना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षाही झाली. त्या काळात प्रबोधनकारांसमोर हे प्रकरण कशा प्रकारे आलं होतं, हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर नोंदवून ठेवलेलं आहे. ते लिहितात, छापखाना सुरू झाला (१९२५) त्याच वेळी मुंबईत बावलाचा खून झाला. रोजच्या रोज त्या खटल्याच्या बारीकसारीक बातम्या वृत्तपत्रात येत असल्यामुळे लोकमत विलक्षण ताणले जात होते. त्यातल्या त्यात त्या खुनाच्या खटल्यात श्रीमंत तुकोजीराव होळकर यांचा संबंध दाखवून त्यांच्याविषयी भयंकर चिथावणीचे लेख मुंबई पुण्याच्या इंग्रजी मराठी पत्रांतून सारखे येऊ लागले. ज्यांनी खुनांचा कट केला नि खून पाडला, त्यांनी गुन्हा कबूल करून त्यांना फाशीच्या नि जन्मठेपीच्या शिक्षाही झाल्या. तरीही होळकरांविषयीच्या संशयदंशाची नांगी काही केल्या कमी होईना. गुन्हेगार शिक्षेला गेले तरी खरा गुन्हेगार मोकळाच आहे, या आरोळ्या वृत्तपत्रात रोजच्या रोज जोरजोराने चालूच राहिल्या.
प्रबोधनकार याला संस्थानिक द्वेषाची फॅशन म्हणतात. इंग्रजी मुलखात राहणार्यांचा संस्थानिकांविषयीचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असतो, कारण त्यांना तिथली वस्तुस्थिती माहीत नसते, असं त्यांचं म्हणणं दिसतं. स्वत: प्रबोधनकार किशोरावस्थेतील काही काळ मध्य प्रांतातल्या धार या संस्थानात राहिले होते. त्यांच्या वडिलांचे मामा राजाराम गडकरी हे दरबारी राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांना संस्थानांच्या कारभाराचा परिचय होता. तुकोजीराव होळकरांचे वडील शिवाजीराव होळकर यांच्या सत्ताच्युतीच्या प्रकरणात याच गडकरी मामांनी धनुर्धारी या टोपण नावाने प्रभाकर या वर्तमानपत्रात लेख लिहून होळकरांची बाजू मांडली होती. तेव्हा मामांचे लेखनिक म्हणून प्रबोधनकारांनी काम केलं होतं.
त्यामुळे प्रबोधनकारांनी होळकरांविरुद्ध लिहिणार्या ब्राह्मणी वर्तमानपत्रांवर टीका केली नसती तरच नवल, ब्रिटिशांविषयी फारसा आदर नसला, तरी देशी नि विशेषत: मराठा संस्थानिकांविषयी आत्यंतिक द्वेष वेळी अवेळी व्यक्त करण्याची एक फॅशनच रूढ होती. देशभक्तीचा तो एक ट्रेडमार्कच होऊन बसला होता. ब्रिटिश नोकरशाहीच्या नावाने दररोज दहा पायली खडे फोडले, तरी एखाद्या करवीरकर छत्रपतीच्या विरुद्ध अथवा गायकवाड, होळकरांविरुद्ध गुंजमासा खुसपट आढळले तर त्या काट्याचा नायटा करून, गोर्या नोकरशाहीच्या दरबारात ठणाणा करायला देशभगतांच्या टोळक्यांची उणीव पडत नसे. तशात बावला प्रकरणात तर होळकरांच्या रखेलीचा संबंध आलेला! मग हो काय? कसाबसा त्या खुनाशी त्या संबंधाचा संबंध जुळवून होळकराला नेस्तानाबूद करण्यासाठी महाराष्ट्रातील एकजात बामणी पत्रे पिसाळलेल्या कुत्र्यासारखी होळकरांवर तुटून पडली. ज्यांला जे वाटले ते तो बेगुमान भकत लिहीत सुटला.
होळकरांवर टीका करण्यात कोणती वर्तमानपत्रं आघाडीवर होती, याचीही यादी त्यांनी दिलीय, या पुण्यकर्मात `बॉम्बे क्रॉनिकल’, अच्युतराव कोल्हटकरांचा ‘चाबूकस्वार’, तटणिसांचे ‘विविधवृत्त’ ही आघाडीला होती. अशा पर्वणीत स्वत:ला जाहिरात जर्नादन म्हणविणारे अनंतराव गद्रे थोडेच मागे रहाणार? होळकरांवरील टीकेने अखेर बीभत्स नि अश्लीलपणाची सीमा सफाचाट उल्लंघन केली. काही दिवस महाराष्ट्रात विवेक हद्दपार झाला. प्रबोधनकार या वर्तमानपत्रांना जुन्या काळातल्या `भूत’, ‘विक्षिप्त’, ‘गुराखी’ या उपटसुंभ वर्तमानपत्रांचे नवे अवतार म्हणत.
या प्रकरणातली ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांची भूमिका कशी होती, तेही त्यांनी सांगितलं आहे, सगळीकडून एकच हुचमल्ली झाल्यामुळे, एरवी वाघाच्या डरकाळ्या फोडणारे बामणेतरी ईर पीर भांबावून जाऊन मूग गिळून बसले. ते तरी काय करणार? बामणेतरी पत्रे ती किती? आणि जोमदार सरावाचे पत्रकार ते किती? बामणेतरी वादापुरती त्यांनी तोवर कितीही हंबीररावी दाखवली तरी ती सारी होती शाहू छत्रपतींच्या पाठिंब्यावर. तो पाठकणा यावेळी नव्हता. `विजयी मराठा, राष्ट्रवीर, दीनमित्रा`सारखी चार दोन पत्रे त्या प्रचाराला जाबसाल करायची. पण प्रतिस्पर्ध्याच्या झंजावातापुढे त्यांचा टिकाव लागेना. एरवी गावोगाव जाहीर सभा घेऊन धि:कारांचा दणदणाट उडविणारे बामणेतरी पुढारीसुद्धा घरोघर गाल खाजवीत बसले. `असं असलं तरी प्रबोधनकारांनी प्रबोधनमध्ये `हंटर आणि जागृती या ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांचे लेख प्रसिद्ध केले आहेत. तेही प्रबोधनइतकीच ठाम भूमिका घेणारे आहेत.
या काळात प्रबोधनकारांचे शेजारी असणार्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या प्राध्यापकांची बैठक दररोज संध्याकाळी प्रबोधन कचेरीवर होत असे. त्या बावला खून खटल्याच्या दैनिकांमध्ये छापून येणार्या बातम्यांवर चर्चा होत असे. आता प्रबोधन सुरू झाल्यामुळे या चुकीच्या वार्तांकनाला उत्तर द्यायला हवं, असा आग्रह या प्राध्यापक मित्रांनी चालव्ाला. त्याचा परिणाम म्हणून प्रबोधन सुरू झाल्यानंतर दुसर्याच म्हणजे मे १९२५च्या अंकात प्रबोधनकारांनी स्त्रियर्श्चरित्रं देवो न जानानि या मथळ्याचा जवळपास चौदा पानी लेख लिहिला. या लेखात प्रबोधनकारांच्या नेहमीच्या टोकदार शैलीत होळकरांची बाजू लावून धरली होती आणि विरोधकांची मांडणी सोलून काढली होती. अंकाला आलेली प्रचंड मागणी लक्षात आल्यावर प्रबोधनकारांनी या लेखाची एक पुस्तिका प्रकाशित केली. मूळ लेखातल्या एका पोटमथळ्याचा मथळा केला, महामायेचा थैमान. बत्तीस छोटी पानं, पाच हजार प्रतींची पहिली आवृत्ती आणि एक आणा किंमत अशी ही पुस्तिका हा हा म्हणता विकली गेली. त्याच्या तीन आवृत्त्या काढाव्या लागल्या.
प्रबोधनकार प्रबोधनमध्ये या विषयावर सतत लिहित राहिले. जूनच्या अंकाची सुरुवातच सेल्फ एक्स्पनेटरी या याच विषयावरच्या इंग्रजी लेखाने आहे. या अंकातलं संपादकीय कै. धनुर्धारीचे उद्गार हेदेखील याच विषयावर आहे. शिवाय ‘लोकमत की लोकमताचा उकिरडा’ हा जागृतिमधला स्फुटलेख, मुंबई समाचार या गुजराती दैनिकातल्या लेखाचा अनुवाद, संपादकीय स्फुटलेख म्हणून याच प्रकरणातले विविध मुद्दे मांडणारा जोरकस मजकूर यांनी हा अंक सजला आहे. यातला बराचसा मजकूर बजरंगी सोटा या नावाच्या पुस्तिकेच्या रूपानेही नंतर छापला गेला. जुलै महिन्याच्या अंकात जागृतिमधला या प्रकरणावरचा आणखी एक लेख प्रकाशित केला आहे आणि प्रबोधनकारांनी मात्र इंग्रजीतून आपली मांडणी केली आहे. पुढच्या अंकांमधूनही बावलाचे लोकमान्य भूत, देशी संस्थाने आणि आंग्रेजी नोकरशाही, इंदौर की आवाज, हिंदी राजे आणि त्यांच्या अंमलाखालची देशी राज्यव्यवस्था, देशी संस्थाने आणि ब्राह्मणी पत्रे असे या विषयावरचे लेख जवळपास वर्षभर येतच राहिले.
प्रबोधनकार या प्रकरणात काय मांडणी करत होते, हे महामायेचा थैमान या पुस्तिकेतल्या पुढच्या परिच्छेदांवरून दिसून येईल. मुमताजसारख्या छिनाल तरुणीच्या पायी बावलासारखी एक अप्रसिद्ध व्यक्ति काही क्षुद्र माथेफिरू मारेकर्यांच्या हातून ठार मारली जातांच, ओढून ताणून लावलेल्या संबंधांवर जर इंदौर संस्थान चेचण्याची अप्रत्यक्ष सूचना करण्याइतकी ही आंग्रेजी पत्रे बेगुमान बनतात, तर पंजाबांत निष्कारण कत्तली करणार्या डायर ओडवारच्या हिंदुस्थानातल्या आंग्लाईबद्दल परराष्ट्रीनी असलेच उद्गार काढले तर टेम्स प्रभृतींना ते कितपत मानवतील?… सेशन कोर्टात प्रत्येक मुद्द्याचा भूस न् भूस निघाला, पण त्यात मुमताज ही होळकरांची रखेली होती, यापेक्षा अधिक कसलाही मुद्दा सिद्ध झाला नाही. सेशनजज्जांनी म्हटल्याप्रमाणे या सर्व कटाचे मूळ इंदोरातच आहे, हे खरे धरले तरी त्या मुळाची पाळे खुद्द होळकर सरकारच्या बुटाच्या टाचेपर्यंत नेऊन भिडवण्याइतका कसलाही पुरावा पुढे आलेला नाही. खुद्द महामायेच्या जबानीतही तिने याविषयी एक अवाक्षर काढलेले नाही.
प्रबोधनकारांच्या या लिखाणामुळे होळकरांची बाजू ठाशीवपणे समोर आली. त्याचा परिणाम कसा झाला, हे प्रबोधनकारांनी लिहिलं आहे. ते असं, होळकर प्रकरणातले सत्य काय, याचा महाराष्ट्रातल्या बहुजन समाजांना साक्षात्कार होऊ लागला, तसतसे गावोगावचे लोकमत विरोधी पत्रांवर बहिष्कार घालण्याइतके धीट बनत गेले. आधीच माझ्याविषयी नारो-सदाशिव-शनिवार्यांचा दात पाजळलेला. तशात होळकरांची बाजू घेऊन मी सरसावलेला आढळताच मला कच्चा चावावा का भाजून खावा यावर ते आपली भणाणलेली डोकी खाजवू लागली.
प्रबोधनकार लिहितात की त्यांनी बावला खून प्रकरणावर पाच सहा पुस्तिका प्रकाशित केल्या. राज्यभरातल्या विक्रेत्यांनी त्यांच्या शेकडो प्रतींची मागणी केली. यापैकी आज फक्त तीनच पुस्तिका उपलब्ध आहेत, महामायेचा थैमान (जून १९२५), बजरंगी सोटा (जुलै १९२५) आणि टेम्प्ट्रेस (सप्टेंबर १९२५) ही इंग्रजी पुस्तिका. या तिन्ही पुस्तिका नेहमीच्या पुस्तकाच्याही अर्ध्या आकाराच्या आहेत. साधारण तीस ते साठ पानं आहेत. यात प्रबोधनमध्ये प्रकाशित झालेले लेखच प्रामुख्याने आहेत. एखादा विषय हातात घेतला की तो तडीस कसा लावायचा, याचा वस्तुपाठ या लिखाणातून घेता येतो.