प्रबोधनकारांची शाहू महाराजांशी झालेली भेट महत्त्वाची होती. त्यात शाहू महाराज तासभर बोलले, ते प्रबोधनकारांनी थोडक्यात लिहून ठेवलंय. ते आज समजून घेणं गरजेचं आहे.
– – –
कोल्हापुरातली बोर्डिंग पाहून प्रबोधनकारांना छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची महती प्रकर्षाने समजली. त्याआधी सकाळी दिवाणांच्या बंगल्यात झालेली दोघांची भेट औपचारिक स्वरूपाची होती. मात्र शाहू महाराजांनी प्रबोधनकारांसाठी रात्रीचा निवांत वेळ काढून ठेवला होता. रात्रीच्या या बैठकीत महाराज जवळपास तासभर बोलत होते. त्याचं सार प्रबोधनकारांनी जवळपास एक पानभर दिलेलं आहे. शाहू महाराजांच्या एकूणच विचारांचंही सार त्यात आलेलं असल्यामुळे ते महत्त्वाचं आहे.
महाराजांच्या बोलण्यातला प्रबोधनकारांनी सांगितलेला पहिला मुद्दा असा, `अस्पृश्योद्धार नि शिक्षणप्रसार या दोन प्रयत्नांनी मागास जमातींचा उद्धार होईल. राजकारण आणि अस्पृश्यता यांचा काय संबंध आहे, असे काही लोक विचारतात. अस्पृश्य वर्गांना निदान माणसांप्रमाणे आम्ही जर वागविले नाही, तर आमचे राजकारण बरोबर रीतीने कसे चालेल? ज्यांना राजकारणात भाग घ्यायचा असेल, त्यांनी इतर देशांप्रमाणे याही देशात प्रत्येक मनुष्याला मनुष्यत्वाचे सर्व अधिकार दिले पाहिजेत. नाहीतर आमच्या हातून मुळीच देशसेवा होणार नाही.`
तो काळ राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा आधी, या वादाचा होता. त्यात लोकमान्य टिळकांच्या प्रभावामुळे राजकीय स्वातंत्र्यवादी जोरात होते. अशा वेळेस शाहू महाराज अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न राजकारणाशी जोडू पाहत होते. पुढे महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हा स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनवून दाखवला. पण शाहू महाराज सांगत होते तेव्हा, हे जहालांना मान्य होण्यासारखं नव्हतं आणि मवाळांचं सोवळंही यासाठी उत्साही नव्हतं. एक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचाच अपवाद होता. ते काँग्रेसच्या मंचावर अस्पृश्यतेची चर्चा करण्याचा आग्रह धरत होते. पण त्यांना काँग्रेस अधिवेशनांच्या मुख्य मंचावर जागा मिळत नव्हती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराज सांगत होते की आपण माणसाला माणसासारखं वागवू शकत नसू तर राजकारण नैतिक कसं राहील?
महाराजांचा हा विचार आजही महत्त्वाचा आहे. माणसातले भेदभाव संपवले नाहीत, तर कोणत्याही देशसेवेला अर्थ नाही, असं क्रांतिकारक गृहितक महाराज मांडत होते. हा देशभक्तीचा सत्ता आणि वर्चस्ववादाच्या तर्काने लावलेला अर्थ नव्हता. तर या देशसेवेत समता, बंधुता, माणुसकी आणि करुणा होती. राष्ट्र म्हणजे एकमय लोक, ही व्याख्या महात्मा फुलेंनी केली होती. त्याला अनुसरून हे राष्ट्रवादाचं समताधिष्ठित तत्त्वज्ञान होतं. महाराजांनी हे तत्त्वज्ञान फक्त तोंडी सांगितलं नाही, तर आधीच प्रत्यक्षात आणून दाखवलं होतं. महाराजांनी अस्पृश्यता निवारणाला त्यांच्या धोरणांमधे इतकं प्राधान्य दिलं होतं की अस्पृश्योद्धारक हे विशेषण त्यांच्या नावाचाच दीर्घकाळ भाग बनलं होतं. स्वतंत्र भारत देशाचे अस्पृश्यता संपवण्याचे कायदे होण्याच्या दोन ते तीन दशकं आधी त्यांनी ते करून दाखवले होते.
महाराजांच्या राज्यात अस्पृश्यता हा गुन्हा ठरला होता. पाणवठ्यांवर अस्पृश्यांना कायद्याने खुला प्रवेश होता. त्यांनी महार वतनं आणि वेठबिगारी संपवली. शाळा बंद पडल्या तरी चालतील, पण अस्पृश्य विद्यार्थ्यांना शाळेत इतर मुलांसारखीच वागणूक मिळावी यासाठी ते आग्रही होते. अस्पृश्यांना सरकारी नोकरीत मानाची संधी मिळत होती. महाराजांनी कुलदेवता भवानीमातेचं मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं केलं. स्वतःच्या गाडीत अस्पृश्यांना बसवून कोल्हापूरच्या फेर्या मारल्या. त्यांच्यासोबत एका पंगतीत जेवण केलं. त्यांच्या पत्रावळ्या उचलण्यासाठी नोकर तयार नसल्याचं बघून स्वतःच खराटा घेऊन तयार झाले. कोल्हापूरच्या राजरस्त्यावर गंगाराम कांबळेंना हॉटेल सुरू करून दिलं आणि भर रस्त्यात गाडी उभी करून त्यांच्या हातचा चहा पिण्याचा शिरस्ता चालवला. अस्पृश्याघरची भाजीभाकरी अनेकदा सर्वांसमक्ष खाल्ली. `धेडों के राजा` ही टीका अभिमानाने मिरवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला. अस्पृश्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा पाया तयार केला.
शाहू महाराजांनी सांगितलेला दुसरा मुद्दा असा, `आज खेडोपाडी भिक्षुक उपाध्ये, ब्राह्मण नि मारवाडी सावकार खेडुतांना छळतात, पिळतात, म्हणून आपण मोठा आरडाओरडा करतो. पण याला कारण त्या लोकांचे अज्ञान. ते घालविण्याचा कोण किती खटाटोप करतो? तो जोरात व्हायला पाहिजे. अहो, सत्यशोधक मताप्रमाणे लग्न लावताच गावोगावच्या भिक्षुकांनी लोकांवर खटले भरले आहेत. तुम्हा खालसातल्या लोकांना त्याचे काय? वर्तमानपत्रांत बातम्या येतात. तुम्ही त्या वाचता नि गप्प बसता. खटल्याच्या भरताडीवर वकिलांची धण मात्र होत असते.`
हा मुद्दा पुढे महाराजांनी असा समजावलाय, `धर्माच्या नावावर शेकडो रूढी चालू आहेत. खेडूतच कशाला, शहरातले शहाणेसुरते लोकही त्या रूढींच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. एक हकीकत सांगतो ऐका. कोल्हापुरात एक वकील आहेत. एरवी पक्के सुधारक. पण त्यांची आई वारली नुकतीच. तेव्हा चंडणमुंडण करून स्वारी आईची हाडकं घेऊन नाशकाला धावली. असे का हो, मी विचारले. तेव्हा शहाणे म्हणतात, काय करावं? जातिरिवाज न पाळून कसं चालेल? बोला, शहरी लोकांचा हा भ्याडपणा, तर बिचार्या खेडुतांची दशा काय असणार?`
भिक्षुकशाहीच्या पिळकवणुकीतून बहुजन समाजाची सुटका व्हावी म्हणून शिक्षण हाच तरणोपाय असल्याचं निदान महाराजांनी केलं होतं. त्यामुळे कोल्हापूर संस्थानात १९१२ साली प्रत्येक गावात शाळा पोचली. तर १९१६ साली सार्वत्रिक आणि मोफत शिक्षणाची योजना सुरू झाली. महाराष्ट्राच्या इतर भागात मोफत सार्वत्रिक शिक्षण पोचायला १९६० साल उलटून गेलं. ही महाराजांची थोरवी होती. पण त्यांना पुस्तकी शिक्षणाच्या मर्यादाही माहीत होत्या. सुशिक्षित मंडळीही जुन्या बिनडोक रूढी परंपरांचे बळी बनतातच, हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी आपल्या लोकांच्या खर्या प्रबोधनाला सुरुवात केली.
त्या दृष्टीने शाहू महाराजांनी मांडलेला तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, `कोट्यवधी मागासलेल्या खेडुतांच्या उद्धाराचा आज सवाल आहे. त्यांना सामाजिक, धार्मिक रूढींच्या विळख्यातून सोडवायचे आहे. त्यासाठी महात्मा जोतिराव फुलेंच्या सत्यशोधक तत्त्वांचा खूप प्रसार व्हायला पाहिजे. नुसते शहरी शिकलेले लोक सुधारले म्हणजे हिंदुस्थान सुधारला, असं कसं म्हणता येईल? या कामासाठी जिव्हाळ्याने काम करणारे शेकडो हजारो समाजसेवक पाहिजेत. हे पहा ठाकरे, आम्ही नि आमच्या संस्थानानं या कामाला हात घातला आहे.`
शिक्षणाच्या पुढे जाऊन बहुजन समाजाला सामाजिक आणि धार्मिक रूढींच्या जोखडातून बाहेर काढण्याची गरज त्यांना वाटत होती. त्याचा मार्ग महात्मा फुलेंच्या विचारातून जातो, असा त्यांना विश्वास होता. पण काही तांत्रिक गोष्टींचे अर्धवट संदर्भ देत छत्रपती शाहू हे सत्यशोधक विचारांचे नव्हते, तर त्यांनी फक्त आर्य समाजाला पाठिंबा दिला होता, अशी मांडणी भल्याभल्या अभ्यासकांनी केली आहे. त्यातून महात्मा फुले आणि शाहू महाराज यांच्यात वैचारिक द्वैत उभं करण्याचा प्रयत्न नेहमी होताना दिसतो. अर्थातच अनेक अभ्यासकांनी शाहू महाराज हे महात्मा फुलेंचाच विचार पुढे नेत असल्याचं वारंवार सिद्ध केलंय. त्यासाठीचा एक पुरावा प्रबोधनकारांनीच या उतार्यातून देऊन ठेवलाय. देव आणि माणूस यांच्यातला दलाल नाकारून पुरोहितांच्या दास्यातून स्त्रीशूद्रातिशूद्रांना मुक्ती देण्याचा विचार महात्मा फुलेंनी दिला होता. हा सांस्कृतिक बंड शाहू महाराजांसाठी प्रेरणादायकच होतं. त्यांचं वर्तन या विचारांच्या नुसारच असल्याचं सहज दाखवता येईल.
ही रात्रीची बैठक झाल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता दोघांची दुसरी बैठक झाली. त्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यातही सत्यशोधक विचारांचा प्रसार कसा करायचा हा मुद्दा होताच. त्यासाठी सत्यशोधक जलशांवर भर होता. मराठे शूद्र की क्षत्रिय यावर चालणार्या तंजावरच्या खटल्याचा मुद्दाही चर्चेत होताच. शिवाय संशोधक प्रा. महादेवराव डोंगरे यांनी सातार्यातून शोधून आणलेल्या `सिद्धांत विजय` ग्रंथाविषयीच्या जुन्या कागदपत्रांचं वाचन आणि त्यावर चर्चाही झाली. हा ग्रंथ सातारच्या गादीचे छत्रपती प्रतापसिंह यांनी तयार करून घेतला होता. या ग्रंथाविषयी प्रबोधनकारांनीच रंगो बापूजी चरित्रग्रंथात माहिती दिली आहे, `तत्कालीन संस्कृत, फारशीचे पंडित नि प्राध्यापक आबा पारसनीस यांच्याकडून (प्रतापसिंह) महाराजांनी सिद्धांत विजय नावाचा एक प्रचंड संस्कृत ग्रंथ लिहवून घेतला. त्यात जुन्या कर्मठ ब्राम्हणी धर्मावर शास्त्राधारे यशस्वी हल्ला चढविला असून क्षत्रियांचे अस्तित्व सिद्ध केले आहे. हा ग्रंथ कै. शाहू महाराज करवीरकर छत्रपती यांनी कै. प्रोफेसर महादेव गणेश डोंगरे, बीएस्सी, एल्सीई यांचेकडून मराठीत भाषांतर करवून कोल्हापूर मिशन प्रेसमध्ये छापवून सन १९०६ साली प्रसिद्ध करविला.`
प्रबोधनकारांनी सांगितलंय की या दौर्यामुळे त्यांचा श्रीमंत बापूसाहेब महाराज, भास्करराव जाधव, प्रा. महादेवराव डोंगरे, अण्णासाहेब लठ्ठे यांच्याशी ऋणानुबंध जुळला आणि या सगळ्यांच्या मृत्यूपर्यंत कायम टिकला. पण ही त्यांची पहिली कोल्हापूर भेट नव्हती. त्याच्या दहा वर्षांआधी नाटक कंपनीतून कंटाळून त्यांनी काही महिने कोल्हापुरात प्रिंटिंग प्रेस चालवला होता. तेव्हा त्यांच्यावर कुटुंबासारखं प्रेम करणारे काका तारदाळकर, बालनट किशा काशीकर यांचं घर, प्रेसच्या शेजारी राहणारे सुफी संत बादशाह, दासराम बुक डेपोचे मालक सत्यशोधक रामभाऊ जाधव, हंटरकार खंडेराव बागल आणि त्यांचे कुटुंबीय, सासने मास्तर या कोल्हापुरातल्या मित्रांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. या प्रेमळ संबंधाविषयी ते लिहितात, `कोल्हापूरभर माझे स्नेही सोबती आजही शेकड्यांनी मोजता येतील एवढे आहेत. कोल्हापुरात ज्या ज्या वेळी मी गेलो, त्या त्या वेळी कोल्हापूर माझे नि मी कोल्हापूरचा, याच एका जिव्हाळ्याच्या ऋणानुबंधाने करवीरकर माझ्याशी वागतात नि मी कोल्हापुराकडे पहात असतो.`