शाळेतले मित्र शाळेतच सुटले ते बरं झालं, असं आता शाळकरी मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरच्या चर्चा वाचताना वाटतं. तुमचा अनुभव काय?
– मुकुंद शिरगावकर, रत्नागिरी
असं वाटत असेल तर त्यांनी तुम्हाला काढून टाकायच्या आधी तुम्हीच ग्रुप सोडलेला बरा. माझं म्हणाल तर, माझ्या वर्गमित्रांचे हजेरीपटाच्या नंबर्सपासून त्यांच्या घराचे पत्तेही इतक्या वर्षानंतर स्मरणातून अजून सुटले नाहीयेत.
चेंगीज खान आणि तुम्ही यांच्यात काही साम्य आहे का हो चेहरेपट्टीत?
– प्रशांत नाफडे, सोलापूर
चेंगीज खानचा चेहरा तुम्हाला जास्त परिचित वाटतोय, तेव्हा तुम्हीच हे जास्त चांगलं सांगू शकाल. अर्थात माझा चेहरा तुम्हाला माहिती असेल असं गृहीत धरून सांगतोय… आणि बाकी साम्य म्हणाल तर, तोही मानव जातीत जन्माला आला होता असं इतिहास सांगतो. तो जर खरा मानला, तर ते एक साम्य आहे बघा.
आपण काम करतो आहोत ती कलाकृती- तो सिनेमा, ते नाटक, ती मालिका- पुरती फसणार आहे, याची पूर्वकल्पना येऊनही काम करावंच लागतं, असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत?
– सुवर्णा देशमाने, कळवा
शक्यतो नाही. आणि कोणतीही जबाबदार गृहिणी, ‘चला आज जरा घाणेरडा बेचव स्वयंपाक करू’ म्हणून स्वयंपाक करत नाही. पण तरीही कधीतरी एखादी पोळी करपते, कधीतरी मीठ, मसाला किंवा साखर कमी पडते. काहीवेळा तिने मनापासून बनवलेलं खाणार्याला पथ्य असतं, नावडीचं असतं. तसंच इकडेही आहे. ‘चला यंदा एखादा अप्रतिम घाणेरडोत्तम सिनेमा बनवू’ म्हणून कोट्यवधी खर्च करायला कोणीही जात नसतात. ते टीम वर्क असतं. जन्माला येणारं मूल आणि सिनेमा किंवा नाटक आपापलं नशीब घेऊन येत असतं.
नुकत्याच झालेल्या फादर्स डे निमित्त प्रश्न! तुमचे वडील प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांचा तुमच्या घडणीत वाटा किती?
– प्रणाली मोहिते, अंमळनेर
माझ्या हार्डवेअरमध्ये, स्वत:च्या हिमतीवर पायावर उभं राहून डोळ्यासमोर उच्च ध्येय ठेऊन कष्टाने अखंड कार्यरत रहाण्याचं सॉफ्टवेअर त्यांनी बनवलंय. हार्डवेअरची बॅटरी डाऊन होतेय असं वाटलं की, सकारात्मकतेचा रिचार्ज मारून देतात ते.
कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या बेताला असतानाही ज्यांनी मास्क न वापरण्याचा निर्धार केला आहे, त्यांचा जाहीर सत्कार करण्याची इच्छा आहे. तुम्ही योग्य पद्धत सुचवू शकाल का सत्काराची?
– अनिकेत मुळ्ये, दादर
त्यांच्या हयातीतच त्यांच्या शोकसभेचा कायर्क्रम ठेऊन त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवायचं. आणि कार्यक्रमाची सुरुवात दोन मिनिट मौन पाळून सुरु करायची.
जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ आज पुन्हा तयार झाला तर तुम्हाला त्यातली कोणती भूमिका साकारायला आवडेल? आणि ‘सामना’मध्ये मास्तर की हिंदुराव?
– संग्राम देसाई, वसई
बघ्याची.
तुमच्यावर ईडीचा छापा पडला तर?
– महेंद्र मिसाळ, पुणे
कधीची मी ती वाट बघतोय अहो. माझ्या घरावर छापा टाकून त्यांना काटा आल्याशिवाय राहणार नाही.
जुन्या काळातलं कोणतं गाणं आपल्यावर चित्रित झालं असतं तर मजा आली असती, असं वाटतं तुम्हाला?
– विलास ढगे, इंदापूर
कोणतंही झालं असतं तरी तुम्हाला तेवढीच मजा वाटली असती.
माझे दोन प्रश्न आहेत…
१. सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वटसावित्रीचं व्रत हा पुरुषांवरचा घोर अन्याय नाही का? त्यांच्या इच्छेला काही किंमत आहे की नाही?
२. सतत कटकट न करणारी, भुणभुण न लावणारी बायको मिळण्यासाठी कोणतं व्रत करावं?
श्रीरंग नेने, खामगाव (ता. क. : बायकोही मार्मिक वाचते, त्यामुळे नाव आणि गाव खोटं लिहिलं आहे. आता खामगावात कोणी खरोखरचे श्रीरंग नेने असतील, तर त्यांनी मला उदार मनाने माफ करावं.)
तुमच्या प्रश्नांची उत्तरे अनुक्रमे
– हे एकदा आपल्या पत्नीसमोर म्हणायचं धाडस करून बघा. आणि ही कदाचित तुम्हाला सुनावलेली तुमची शिक्षा म्हणूनही व्रत असू शकतं…
– सोपं आहे. डॉक्टरकडे जाऊन कानाचे पडदे काढून घ्या.