हल्ली पेट्रोल पंपांवर बोर्ड लागले आहेत. जगातला सगळ्यात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे हे फलक आहेत.
मोदीजींची ही गोष्ट फारच आवडण्यासारखी आणि अभिमान वाटण्यासारखी आहे. ‘जगात सगळ्यात उत्तम, सगळ्यात मोठं, सगळ्यात चर्चित’ असं काहीतरी असल्याशिवाय ते कोणत्याही विषयाला लांब काठीनेही शिवत नाहीत. कोरोनाकाळाची ‘जगात सगळ्यात बेजबाबदार हाताळणी’ असं आंतरराष्ट्रीय लांच्छन लागेपर्यंत ते थांबले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी करण्याचा ‘जागतिक विक्रम’ही त्यांनी प्रस्थापित केला. जगात कुठेही तरंगली नाहीत, अशी नदीत कोरोनाबाधितांची प्रेतं तरंगली. त्यानंतर मोदीजींनी थेट हात घातला तो ‘जगात सगळ्यात मोठ्या’ लसीकरण मोहिमेला. छोटीमोठी गोष्ट ते करतच नाहीत.
अनेकांना आठवत असेल की देशात सगळीकडे लसीचा खडखडाट असताना, कुठेही लस उपलब्ध नसताना लस महोत्सव जाहीर करून तो आयोजित करण्याचा विक्रमही मोदीजींच्या नावावर आहे… आताही लस उपलब्ध आहे का, सगळ्यांपर्यंत पोहोचते आहे का, गावोगाव, खेडोपाडी, घरोघरी जाऊन लस टोचण्याची आपली अनेक वर्षांची यंत्रणा होती, ती कार्यरत झाली आहे का, हे प्रश्न कुणी विचारायचे नाहीत. ते मोदीजींना तर पडत नाहीतच. ‘जगात सगळ्यात भारी’ हा शब्दसमुच्चय कानावर पडला की ते लगेच फोटोला उभे राहतात आणि बोर्डावर हजर होतात. लसीकरणाचा कार्यक्रम जमिनीवर राबवणार राज्य सरकारे, केंद्र सरकार लस पुरवण्याचं निहित कर्तव्य- आधी बरेच घोटाळे करून आणि गोंधळ घालून झाल्यावर- रडत खडत कसंबसं पार पाडणार आणि तरीही बोर्ड लागणार मोदीजींच्या आभाराचे. हे अनेक लोकांना पटत नाही. काही जण म्हणतात, आभारच मानायचे तर सर्वोच्च न्यायालयाचे माना. त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर लसीकरणाची मोफत मोहीम सुरूच झाली नसती. खासगी रूग्णालयांमध्ये पैसे मोजून लस घ्यावी लागली असती, त्यातही खरोखरची लस मिळाली असती की नाही याची खात्री नाही. अनेक सोसायट्यांमध्ये बनावट लसीकरण करणार्या टोळ्यांचा ‘आत्मनिर्भर लसीकरणा’चा गोरखधंदा उघड झालेलाच आहे. सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली हे बरोबर, पण ते मोदीजींनी ऐकलं हे काय कमी आहे का? मुळात त्यांना कोणाचं काही ऐकून घेण्याची सवयच नाही. प्रश्न विचारलेले आवडत नाही. म्हणून ते पत्रकार परिषदही घेत नाहीत एकही. मुलाखती देतात त्या त्यांनीच काढलेले प्रश्न विचारणार्यांना. अशात सर्वोच्च न्यायालयाने काही सांगितलं, याचं कौतुक नाही, मोदीजींनी ते- जगात सगळ्यात मोठा लसीकरण कार्यक्रम असा बोर्ड स-फोटो झळकवण्याची संधी म्हणून का होईना, ऐकलं हे अधिक महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांचे आभार मानलेच पाहिजेत.
या आभाराच्या फलकाची काहीजणांनी टिंगल केली. एका व्यंगचित्रकाराने ‘यावेळी अमुक ठिकाणी पाऊस खूप पडला, म्हणून मोदीजींचे आभार’ असा उपरोधपूर्ण फलक तयार केला. मोदीजींच्या चाहत्यांचं प्रेम इतकं अलोट की त्यात त्यांना उपरोध वगैरे काही कळत नाही. मोदीजींच्या कौतुकाचा प्रत्येक शब्द ते खराच मानतात. त्यांनी खरोखरच पाऊस पडल्याबद्दल मोदीजींचे आभार मानणारे संदेश तयार केले आणि ते सोशल मीडियावर प्रसृत केले. ही इतकी निरागस बुद्धीची, सकारात्मक वृत्तीची माणसं आपल्या आसपास आहेत, असे हिरे आपल्यातच दडलेले आहेत, हे आज मोदीजींमुळेच आपल्याला कळलेलं आहे. त्याबद्दल मोदीजींना खरोखरच धन्यवाद दिले पाहिजेत.
जगातल्या सगळ्यात मोठ्या लसीकरणाबद्दल मोदीजींचे आभार मानणारे बोर्ड जगात बहुतेक सगळ्यात महाग दराने इंधन विकणार्या पंपांवर लागावेत, हाही एक काव्यात्म न्यायच आहे. (ही ‘जगात सगळ्यात महाग दराने इंधना’ची कल्पना मोदीजींना सांगू नका, ते आणखी एक बोर्ड लावतील आणि चाहते आणखी एक संदेश प्रसृत करतील.) १९७३ साली पेट्रोलचे दर सात पैशांनी वाढले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते, दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी बैलगाडीतून मोर्चा काढला होता त्या ‘प्रचंड महागाई’च्या निषेधार्थ. २०१४ सालापर्यंत पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढले की स्मृती इराणी, स्व. सुषमा स्वराज यांच्यापासून अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर वगैरे दारिद्र्यरेषेखालील नागरिकांपर्यंत सगळ्यांना कंठ फुटायचा. आज अशी वाढ दर दिवशी होते आहे. तरीही कुणी हूं की चूं करत नाही. कारण आता साक्षात मोदीजींचं सरकार आहे आणि बाजारात तेलाचे दर निपचीत पडलेले असतानाही मोदीजी पेट्रोलचे दर वाढवत असतील,
गॅस महाग करत असतील, तर ते काहीतरी विचार करूनच करत असतील, हे सर्वांना माहिती आहे, सर्वांना पटलेलं आहे. उद्या आपल्या कमरेला शिल्लक असलेला एकमेव कपडाही मोदीजींनी फेडला तरी तो कुठे ना कुठे भारतमातेचे अश्रू पुसायलाच फेडला असणार याचीही आपल्याला खात्री आहे. त्यामुळेच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर ग्राहक अभिमानाने सांगतो, पूर्वी माझ्या गाडीच्या टाकीत फक्त ५०० रुपयांचंच पेट्रोल बसायचं. आता मी त्याच टाकीत हजार रुपयांचं पेट्रोल भरतो. हे सगळं मोदीजींमुळेच शक्य झालं. त्यांच्याबद्दल मनात अतीव आभाराचीच भावना दाटून येते.
धन्यवाद मोदीजी, खरंच धन्यवाद.