मी एक अत्यंत सामान्यातला सामान्य मनुष्य आहे. अगदी साधेपणाने राहणारा, सरळमार्गी, भोळा-सांब असा मी लहाणपणापासूनच आहे. कुठलं छोटंसंही व्यसन नसलेला एक अगदीच निरूपद्रवी प्राणी आहे. रस्त्यावरून चालताना अगदी पायाखाली पाहात, मुंगीसुद्धा आपल्या पायाखाली चिरडू नये याची काळजी घेत मी चालत असतो. त्यामुळे समोरून येणार्या माझ्या मार्गातील सजीव-निर्जीव वस्तूंना माझी कित्येकदा टक्कर होत असते. समोरची वस्तू निर्जीव असेल तर काही तक्रार करत नाही. पण सजीव असली तर मात्र माझ्या अंगावर खेकसणे, धमकावणे, माझ्या डोळ्यांच्या उपस्थितीबद्दल शंका घेणे, शिव्या घालणे, वाईट शब्दांतून अपमान करणे किंवा अपमान दर्शवणारी वस्तू दाखवणे (उदा. चप्पल, बूट, पायताण इ.) अशी एक वा अनेक क्रिया दर्शविते. प्रत्येक वेळी मी केविलवाणा चेहरा करून गयावया करत ‘स्वारी’ (सॉरी) म्हणणे ही एकच प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. (फक्त एकदाच एका तृतीयपंथीयाशी टक्कर झाली असता त्याने मला अनपेक्षितपणे मिठीच मारल्यावर पार भांबावून गेल्यामुळे मी वरील प्रतिक्रिया त्यावेळी देऊ शकलो नव्हतो!)
असा मी एक सामान्यातला सामान्य माणूस आहे. माझ्यामधे ‘असामान्य’ असे काहीच नाही! ना मी दिसायला देखणा, ना अगदी कुरूप. उंची बेताची. शरीरयष्टी मध्यम. रंग गव्हाळ. एकदम चारचौघांसारखा. लोकांच्या नजरेत भरावं, कुणी वळून पहावं असं तर मुळीच काही विशेष माझ्याजवळ नाही. लोक रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिकार्याचीही थोडीफार दखल घेत असतील. बाया-बापड्या दयार्द्र दृष्टीने त्याच्या केविलवाण्या चेहर्याकडे पाहून हळहळत पुढे जात असतील. काही स्वत:ला दयावान समजणारे त्याच्या थाळीत पैसे टाकत असतील. एकूण, दखल घेण्याजोगे त्या भिकार्यामधे काहीतरी असेल, पण तेवढेही काही विशेष माझ्याजवळ नाही. माझ्याजवळ आहे ते सर्व काही ‘सरासरी’मधे मोडणारे! भारतीय पुरुषांची सरासरी उंची म्हणे पाच फूट दहा इंच आहे. असे कुठल्यातरी मासिकात मी वाचले होते. माझी उंची तेवढीच आहे. हातापायांच्या सरासरी लांबीचा काही त्या मासिकात उल्लेख नव्हता… पण बहुतेक हाता-पायांची तसेच इतर अवयवांची लांबी-रूंदीसुद्धा सरासरीच असावी!
शिवाय नजरेत भरतील असे काही गुणसुद्धा नाहीत. मी ‘हाड्’ म्हटल्यावर काळं कुत्रंसुद्धा माझ्याकडे पहात राहतं, पण जागेवरून ढिम्म हलत नाही. जगात चौसष्ठ कला आहेत म्हणतात. मला त्यातली एकही कला अवगत नाही. एवढी-एवढीशी पोरे टीव्हीवर मस्त नाच करतात. काही गाणी गातात. मागे तर एका रिअॅलिटी शोमधे दहा-बारा वर्षांची मुले स्वयंपाकही करताना दाखवली होती. माझ्या अंगी असा एखादाही गुण काही चिकटला नाही. मुळात अंगातच गुण नाही तर प्रयत्न करून तरी कितपत येणार? शिवाय प्रयत्न करणे हासुद्धा एक गुणच आहे ना? तो तरी असावा… पण नाही! आमच्या नशिबी ना कधी लॉटरी लागण्याचा योग येत, ना काही बक्षीस लागण्याचा. आमच्या आजुबाजूचे शेजारी कधी कधी शंभर रुपये कधी पाचशे रुपये लॉटरीत लागल्याचे सांगत येत. त्यांचा हेवा वाटे. कधी-कधी मीसुद्धा लॉटरीचे तिकीट काढून निकालाची वाट पाहात बसे. पण कधी आपण त्या निकालातल्या भाग्यवंतात नंबर लावला नाही. टायपिंगची परीक्षा दिली, त्यातही सरासरीएवढेच मार्क मिळाले.
पाकीटमार लोकांचं तर मी अगदी ‘लाडकं’ सावजं आहे. माझी पाकिटे इतक्या वेळेस मारलीत की मी आता त्याची मोजदाद करणंच सोडून दिलंय. शेवटी एका मित्राने पाकीटच न वापरण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी आजकाल पैशांचे पाकीट वापरत नाही. पण नुसते पैसेसुद्धा माझ्या खिशातले चोरलेले आहेत. कधीकधी पाकीटमार माझे पैसे मारून थोडे स्वत:कडे ठेवून उरलेले माझ्या खिशात परत ठेवत असतील अशी शंका येते! त्यातले कमी झालेले सुद्धा माझ्या लक्षात येत नाहीत. कधी कधी कपाटातल्या कोपर्यात पडलेल्या पॅण्टच्या खिशात शंभर रुपयांची नोट दिसते. कधीतरी नजरचुकीने ती तशीच राहिलेली असते. वॉशिंग मशीनमधे जाऊन ती चुरगळलेली असते, पण स्वच्छ झालेली असते. मला कधी कधी माझे जीवन त्या नोटेसारखे झालेले आहे असे वाटते. माझ्या पगारातून सरकारने लादलेले सर्व प्रकारचे टॅक्स कापून माझे जीवन ह्या चुरगळलेल्या नोटेसारखेच झालेले आहे, असे वाटते. त्या नोटेवर इस्त्री फिरवून मी ती बाजारात नव्याकोर्या नोटेसारखी करून खपवतो.
मला प्रश्न तरी असामान्य पडावेत? तेही नाही. मला छळणारे प्रश्न असे… रेडिओवर एफएम चॅनलवरची माणसे इतक्या भरभर का बोलतात? मेडिकल स्टोअरवाले नॅपकीनची पाकिटे अगदी समोरच्या काचेवरच का लावतात? केक अंड्यापासून बनवतात तर एगलेस केकमधे अंड्याच्या जागी काय टाकतात? रंग जाणार्या कपड्यांचा रंग दुसर्या कपड्यास लागल्यानंतर एकदम पक्का कसा होतो? पायाचे मोजे डावा-उजवा कोणता आहे हे कसे ओळखायचे? पॅन्ट घालताना पहिली डाव्या पायात घालावी की उजव्या पायात?
माझे बालपण ना गरीबीत गेले ना श्रीमंतीत. अभ्यासात ना हुशार होतो ना ढ. मार्कही सरासरी मिळाले व सरासरी पगार असलेल्या नोकरीत चिकटलो. जीवनातही काही असामान्य प्रसंग आले नाहीत जे प्रसंग वापरून आत्मचरित्र तरी लिहिलं असतं. पण नाही! आता ही सामान्य माणसाची सामान्य गोष्ट (सरासरी गोष्टीच्या लांबीची झाल्यामुळे) येथेच संपवतो.