नाकावरच्या रागाला औषध काय, हे गाणं आपण ऐकलंच असेल. पण प्रत्येक वेळी येणारा राग नाकावरचा छोटा मोठा राग असेल असं नाही. कधी कधी माणसं खूप रागावतात. रागाच्या भरात त्यांचा तोल जाऊ शकतो. ते अविचारी, अविवेकी वागू शकतात.
‘वेलकम’ या हिंदी सिनेमामध्ये उदय (नाना पाटेकर) हा एक गुन्हेगारी जगतातील मोठा माणूस आहे. तो त्याच्या लाडक्या बहिणीसाठी चांगल्या चारित्र्याचा साधा सरळ मुलगा शोधत असतो. बहिणीसाठी चांगला मुलगा मिळावा यासाठी ‘आपण मोठे गुंड आहोत, गुन्हेगारी जगतातील नामचीन आहोत’ हे तो लपवत असतो. पण मुलाकडच्यांना ते शेवटी कळतं आणि नकार मिळतो असं अनेकदा झालेलं असतं. उदय मात्र थांबत नाही. पुन्हा पुन्हा बहिणीसाठी चांगलं स्थळ मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो. अशीच एकदा तो मुलाकडच्यांशी बोलणी करत असतो. ही बोलणी त्याच्या खाजगी बोटीवर भर समुद्रात होत असते. समुद्रात ही लग्नाची बोलणी चालू असताना एकजण (उदयचा गुन्हेगारी कारवायामधला माणूस) मध्ये टपकतो आणि त्याने दिलेलं गुन्हेगारी काम यशस्वी केल्याचं रिपोर्टिंग करतो. या माणसाच्या या उद्योगामुळे उदय हा गुन्हेगारी जगातला बडा माणूस आहे हे मुलाकडच्यांना कळतं आणि ते चटकन (आल्या बोटीने) निघून जातात.
उदय भयंकर चिडतो. रागाच्या भरात स्वत:च्या एका दुसर्या माणसाला समुद्रात फेकून देतो. आपण काय घोळ घातला आहे हे कामाचं रिपोर्टिंग करणार्या माणसाच्या लक्षात येतं. तो उदयला सांगतो की एक्साईटमेंटमध्ये मी त्यांच्यासमोर बोलून गेलो. मला माफ करा.
यावर उदय (नाना) संतप्त होऊन म्हणतो. ‘एक्साईटमेंट मतलब क्या? कहां बैठा हूं, किसके साथ बैठा हूं, किस से बात कर रहा हूं, क्या बात कर रहा हूं, समझ में नहीं आता? चिडलेला उदय स्वत:ला बजावतो, कंट्रोल… उदय कंट्रोल… (पण त्याने त्या आधी कंट्रोल न झाल्याने स्वत:च्या एका माणसाला समुद्रात फेकले आहे). चिडलेला उदय बल्लू नावाच्या त्याच्या माणसाला म्हणतो, ‘बल्लू इसे बता. मुझे गुस्सा आता है तो क्या होता है?’ अन् बल्लू त्याची रेकॉर्ड सुरू करतो. बल्लू सांगतो, ‘मेरी एक टांग नकली है। मैं हॉकी का बहुत बडा खिलाडी था। एक बार उदय भाई को मेरी किसी बात में गुस्सा आया, तो मेरी ही हॉकी स्टिक से मेरी टांग के चार तुकडे कर दिये। लेकिन दिल के बहुत अच्छे हैं। फॉरन हॉस्पिटल लेके गये। ऑपरेशन करवाया। नई टांग लगवाई…’
तर… उदय भाई ‘कंट्रोल, कंट्रोल’ असं स्वत:ला बजावतो, पण ते बजावताना त्याला स्वत:च्या रागावर कंट्रोल होत नाही. तो लोकांच्या तंगड्या तोडतो. तो लोकांना समुद्रात फेकून देतो. लोकांचे जीव घेतो.
‘वेलकम’ हा एक छान विनोदी सिनेमा आहे. त्यात छान गमतीजमती आहेत. पण उदयभाईने जी गोष्ट केली आहे ती महत्वाची आहे. ती उपयोगी ठरू शकणारी आहे. रागाच्या भरात आपल्या हातून काही अघटित होता कामा नये म्हणून आपण स्वत:ला ‘कंट्रोल… कंट्रोल…’ असे बजावणे नक्कीच उपयोगी ठरू शकते. रागाचा उदय होतो, तेव्हा नाना पाटेकराचा ‘कंट्रोल… उदय कंट्रोल’ हा डायलॉग आपल्याला आठवायला हवा आणि आपण रागावर कंट्रोल मिळवायला हवा.
मंडळी, राग कुणाला येत नाही? मला येतो, तुम्हाला येतो, आपल्या सर्वांनाच येतो. अन् हा राग काही आजचा नाही. अगदी लहानपणापासूनचा आहे. आपण आईबाबांशी, आपल्या भावंडांशी, मित्रमैत्रिणीशी भांडायचो. रागावायचो. अगदी फुरंगटून बसायचो. पुढे मग वयात आलो, प्रेमात पडलो, तेव्हा त्याच्याशी/ तिच्याशी लटके रागावू लागलो.
आपल्या मनाविरुद्ध काही घडलं की राग येतो. राग येणं अगदी साहजिक गोष्ट आहे. पण तो किती यावा, किती वेळ टिकावा आणि तो आपण कसा व्यक्त करतो हे खूप महत्त्वाचं असतं. शिवाय आपल्याला आलेल्या रागाचे कारण काय? इतका राग यावा असं ते कारण होतं का याचाही आपण विचार करायला हवा.
राग येणारच. पण तो आपल्याला नियंत्रित करायला यायला हवा. राग नियंत्रित करणे म्हणजे रागावायचं नाही, राग दाबून टाकायचा असं नाही. आपण जर असं केलं तर आपल्याला त्याचा मानसिक, शारीरिक त्रास होईल. म्हणून राग येतो तेव्हा संयमाने सबुरीने वागायला हवं.
आपल्याला खूप राग येऊ शकतो. पण आपल्याला खूप राग येतो, तेव्हा आपण रागाच्या कितव्या मजल्यावर आहोत हे पाहात त्या मजल्यावरून आपण स्वत:ला खाली खाली आणत गेले पाहिजे. समजा, आपण रागाच्या दहाव्या मजल्यावर आहोत. आता धाडकन् आपल्याला तळमजल्यावर येता येणार नाही. पण आठव्या, सहाव्या, चौथ्या मजल्यावर असं करत करत आपण आपला राग खाली आणू शकतो.
कधी कधी आपला राग क्षुल्लक कारणामुळेही असू शकतो. फारसं मोठं काही झालेलं नसतं. एखादा गैरसमज. छोटा मोठा अपमान, असं काहीतरी असतं. हे जे काही झालं आहे ते अगदी शांतपणे बोलून तो विषय संपवून टाकता यायला हवा. पण रागाच्या भरात आपण शांतच होत नाही. आपण बोलत नाही. आपण धुसफुसत राहतो. किंवा मग जे बोलायला नको ते बोलू लागतो. सारे नातेसंबंध बिघडवून घेतो.
रागावर ताबा मिळवण्यासाठी एक पारंपारिक उपाय आपण ऐकला असेल. एक ते शंभर अंक मोजायचे. आता हे एक ते शंभर अंक मोजले तर काय होईल? मुळात आपण अंक मोजण्याच्या एका वेगळ्याच कामाला लागलो. आपलं मन दुसरीकडे वळलं. आता यात जो थोडा वेळ जातो त्यात रागाचा जोर ओसरू शकतो आणि मग आपला राग कितपत योग्य होता, हे तपासायला आपण सज्ज होऊ शकतो.
आपल्याला इतरांचा राग येतो असं आपलं म्हणणं आहे. पण इतरांनाही आपला राग येत असेलच की. तेही आपल्याला समजून घेतात ना? मग आपण इतरांना समजून घ्यायला काय हरकत आहे? सतत अनावश्यक आणि अवाजवी रागवणे योग्य नाही. उगीच अनाठायी रागवायचं नाही पण आपल्याशी किंवा इतर कोणाशी कुणी चुकीचं वागतोय, अन्याय करतोय, तिथे आपल्याला रागच येऊ नये, असं मात्र होऊ नये. कारण लोकांवर अन्याय करणार्यांचा राग येण्यातूनच तर अनेक महापुरुष, महात्मे, समाजसेवक निर्माण झाले. अनेक लढे उभे राहिले. आपला राग विघातक नव्हे, विधायक असला पाहिजे.
आपण विघातक रागाची शिकार होतो, तेव्हा आपण काय बोलतोय, काय वागतोय, काय कृती करतोय, त्याचं आपल्याला भान राहत नाही. ‘माझा राग खूप वाईट आहे’ असं वाक्य काहीजण म्हणतात. मंडळी, आपली एखादी गोष्ट वाईट आहे ही काय अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे का?
आपण दुसर्यावर संतापतो, तेव्हा बरेचदा त्याच्यावर आपल्या संतापाचा फारसा परिणाम होत नसतो. कधी कधी आपला संताप त्यांच्या गावीही नसतो. आपल्या संतापाची त्यांनी फार दखल घेतलेलीच नसते आणि मग या गोष्टीनेही आपण अधिक संतापतो.
लोक आपल्या मनासारखे वागत नाहीत, तेव्हा आपल्याला राग येतो. पण लोक आपल्या मनासारखे वागणं कठीण असतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आपल्याला राग का आला? ज्या व्यक्तीचा राग आला ती व्यक्ती मुद्दाम तशी वागली आहे का? तिचं वागणं समजून घेण्यात आपली काही गल्लत झाली आहे का?
आपण त्या व्यक्तीबद्दल जो विचार करतो आहोत, तो योग्य आहे का? त्या व्यक्तीने कसे वागायचे हे आपल्या हातात आहे काय? पण तिच्या वागण्याला कसा प्रतिसाद द्यायचा, घडलेल्या घटनेचा कसा विचार करायचा हे तर आपल्या हाती आहे ना? आपण कसा विचार करतो त्यावर आपल्या भावनांची तीव्रता आणि प्रतिसाद, प्रतिक्रिया अवलंबून असतात.
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अनावश्यक राग आपलं काय काय नुकसान करू शकतो?
१) अनावश्यक राग आपली प्रतिमा मलिन करू शकतो.
२) नातेसंबंध बिघडवू शकतो.
३) आपलं आणि इतरांचं जीवित धोक्यात आणू शकतो.
४) आपल्या हातून एखादं गुन्हेगारी कृत्य घडवू शकतो.
मंडळी, या रागावर नेमकं औषध काय? रागावर औषध म्हणजे राग व्यक्त करण्याआधी स्वत:ला शांत करणं. घटनेचा शांतपणे विचार करणं. राग आला तरी संयम, सबुरी बाळगणं. ज्या विचारातून राग आला आहे ते विचार योग्य आहेत का, ते तपासणं. आपल्या विचारांची परखड चिकित्सा करणं आणि विचारी आणि विवेकी प्रतिसाद देणं हेच रागावरचे औषध आहे.