व्यावसायिक रंगभूमीवर अनेक स्त्रियांच्या भूमिकेतून आजवर विविध प्रश्नांकडे प्रभावीपणे लक्ष वेधले आहे. अगदी संगीत नाटकातील शारदा, ‘एकच प्याला’तली सिंधू, `सखाराम बाईंडर’मधली चंपा, ‘शांतता कोर्ट चालू आहे’तली बेणारे, `कमला’तली कमला’, `ती फुलराणी’मधली मंजुळा, ‘चारचौघी’ची आई, `दुर्गा’तली दुर्गा, `बॅरिस्टर’ची मावशी, `पुरुष’मधली अंबिका, `हमीदाबाईची कोठी’तली हमीदाबाई’, `संध्याछाया’तल्या नानी, `वीज म्हणाली धरतीला’ मधल्या राणी लक्ष्मीबाई आणि त्यांची सहकारी जुलेखा, ‘रथचक्र’मधली `ती’… अशा कित्येक गाजलेल्या भूमिकांनी रसिकांच्या मनावर ताबा मिळवला. ठसा उमटविला. याच वाटेवरच्या वामन तावडे लिखित ‘छिन्न’ या नाटकातील आई सिंधू आणि तिची तरूण मुलगी शालू या दोन्ही भूमिका काही स्त्रियांच्या वासनामय भावभावनांवर विचार करायला लावणार्या आहेत.
`छिन्न’ नाटकाचा जन्म राज्य नाट्य स्पर्धेतून झालेला. त्याची नोंद घेणे जरुरीचे आहे. कारण गेली ६२ वर्षे सातत्याने स्पर्धा आयोजित करणारे जगभरातले महाराष्ट्र हे एकमेव सरकार आहे. १८व्या राज्य नाट्यस्पर्धेसाठी जयवंत दळवी, प्रा. सरोजिनी वैद्य आणि मनोहर काटघरे हे दिग्गज परीक्षक होते. त्यात दोन नाटकांत जबरदस्त स्पर्धा रंगलेली. एक- वामन तावडे यांचे ‘छिन्न’ आणि दुसरे रत्नाकर मतकरी यांचे `लोककथा-७८’. या क्षणाचा प्रेक्षक म्हणून मला साक्षीदार होता आलंय. निकालही त्यावेळी एकच चर्चेचा ठरला. मतकरी यांचे लोककथा पहिले तर दिग्दर्शनाचा पहिला पुरस्कारविजेते ठरले ‘छिन्न’! वामन तावडे यांना लेखनाचा दुसरा क्रमांक मिळाला. `छिन्न’ ही अहमदनगर जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची निर्मिती होती. ‘छिन्न’च्या दिग्दर्शिका वसुधा गंधे होत्या. त्यांनीच या नाटकात आई सिंधूची भूमिका केलेली. तर याच नाटकातील शालूच्या भूमिकेत मीना पाल होत्या. दोघींना अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले.
मुंबई शहराला चाळीतल्या गिरणगावाची एक परंपरा आहे. त्यातल्या एका कुटुंबात घडलेले हे नाट्य. त्यातील अस्तित्वाची ही लढाई. सिंधू आणि अप्पा हे प्रौढ दांपत्य. त्यांना दोन मुले एक अरूण आणि मुलगी शालू. सोबत या कुटुंबाने सांभाळलेला अनाथ श्रीकांत. एकीकडे कायम झोपलेले आणि दारूच्या नशेत धुंद असलेले अप्पा तर दुसरीकडे घर चालविण्याच्या चिंतेत असणारी सिंधू, या पात्रांभोवती नाट्य कथानक गुंफले आहे. घर चालवण्यास असमर्थता असल्याने आता सिंधूची नजर कमावता झालेल्या श्रीकांतकडे आहे. दारिद्र्य, गरीबी, मानसिक कोंडमारा यामुळे सिंधू शारीरिक सुखासाठीही श्रीकांतकडे ओढली गेलीय. आर्थिक आणि शारीरिक वासनापूर्तीसाठी हा एकमेव पर्याय या घरापाशी आहे. बाजार मांडला म्हणूनच हे घर सुरक्षित असल्याचे सिंधू सांगते. पुढे श्रीकांत आणि शालू यांचे लग्न लावण्यात येते. तरीही सिंधूची वासना संपत नाही. सासू आणि जावयाचे हे धक्कादायक नातं चक्रावून सोडणारे. एके दिवशी मॅच खेळायला घराबाहेर गेल्यावर अरूण अचानक घरात येतो, तेव्हा या दोघांना बघतो आणि तो आत्महत्या करतो. आपल्या मुलाचा बळी आपल्याच वासनापोटी झालाय, हे सिंधू मान्य करीत नाही. दुसरीकडे श्रीकांतचे आपल्याच आईशी संबंध असल्याचे मुलीला कळते आणि ती देखील त्याच वाटेने जाते. घराच्या अस्तित्वासाठी जो पर्याय सिंधूने स्वीकारला आहे, त्यामुळे उभं घर, त्यातली नाती उद्ध्वस्त होतात. नवरा-बायकोतलं नातं नष्ट होतं आणि वासनेची प्रवृत्ती वाढते. त्यापुढे समाजाचे भान उरत नाही. लेखकाने एकेका प्रसंगातून कथानकाची चांगली मांडणी केलीय. त्यामुळे नाट्य पकडून धरते. तसा हा `हॉट’ विषय, पण त्याला नाजुकतेने हाताळला आहे. त्यामागे असणारे कसब लक्षवेधी!
मूळची ही संहिता तीन अंकी, पण या बदलात दोन अंकी नाट्य केलंय. वामन तावडे यांची संहिता आदर्श रचनेचा पुरावाच म्हणावा लागेल. गिरणगावातल्या चाळ संस्कृतीचे त्यात दर्शन आहे. तर दुसरीकडे एका कुटुंबाचा जगण्यासाठीचा संघर्ष प्रभावीपणे मांडलाय. मनोवैज्ञानिक आधार असलेली ही गोष्ट सुन्न करून सोडते. नाटककार वामन तावडे यांचा एकांकिकांपासून सुरू झालेला हा रंगप्रवास नाटकापर्यंत समर्थपणे पोहचला. अनेक `हटके’ विषय त्यांच्या नाट्यात कायम डोकावले. एक कालखंड त्यांच्या संहितेमुळे चर्चेत राहिला.
एक योगायोग असा की ४४ वर्षापूर्वी जेव्हा हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले तेव्हा अप्पाची भूमिका आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदार्या सदाशिव अमरापूरकर यांनी ताकदीने उचलल्या होत्या आणि नव्या प्रयोगात अप्पाची भूमिका आणि सोबत दिग्दर्शनही अभय पैर यांनी केलंय. प्रायोगिक रंगभूमी गाजविणार्या पैर यांनी प्रत्येक प्रसंग परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न केलेत. विशेषत: चाळीत घडलेलं नाट्य म्हणून खूप तपशीलवार विचार केल्याचे दिसते. नाट्य कुठेही रेंगाळत नाही किंवा त्याची पकडही सुटत नाही. स्पर्धेचा अनुभव दिग्दर्शकांच्या कामी आलाय.
मूळ नाटकात यापूर्वी अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मुलगी शालूची भूमिका केली होती. तिचे हे पहिले व एकमेव नाटक ठरले. त्यानंतर सिनेसृष्टीची दारे उघडली गेली आणि आई सिंधूची भूमिका आशालता यांनी केलेली. या दोन्ही अभिनेत्रींनी अभिनयाच्या जोरावर या नाट्यात रंगत वाढविली होती. या प्रयोगात पूजा नायक यांनी सिंधू आणि कांचन प्रकाश हिने शालू उभी केलीय. मनोरुग्णतेची नाजूक किनार असलेल्या या भूमिका समर्थपणे आकाराला येतात. दोघांची मानसिक, शारीरिक अस्वस्थता ही विलक्षणच. दारूच्या नशेत विचित्र मानसिक कोंडीत अडकलेला अप्पा अभय पैर यांनी झोकून उभा केलाय. श्रीकांत म्हणून विशाखा म्हामणकर शोभून दिसतो. त्याची अगतिकता नोंद घेण्याजोगी. अन्य भूमिकेत निकिता सावंत (भाजीवाली व शेजारीण), सृष्टी शेलार (मैत्रीण), चंद्रशेखर मिराशी (शेजारी), अनिकेत वंजारे (धारिया), प्रतिक ठोंबरे (पोस्टमन/ पोलीस), सुगत उधळे (मित्र), चैतन्य म्हात्रे (शांताराम), नवसाजी कुडव (अरूण) ही टीम पूर्ण तयारीची आहे. चाळकरी म्हणून सारे फिट्ट शोभून दिसतात. पात्रनिवड उत्तम. पूर्वी दिलीप कुलकर्णी (श्रीकांत), विराज चिटणीस (अरूण), सुशील गोलतकर (मित्र), योगेश चिपळूणकर (शांताराम) यांच्या भूमिका होत्या. स्मिता पाटीलच्या व्यावसायिक नाटकातल्या पदार्पणामुळे या नाटकाला एक वलय निर्माण झालं.
गिरणगावातील चाळ आणि त्यातल्या कुटुंबाची खोली तपशीलांसह उभी केली आहे. खोलीतला पोटमाळा, गॅलरी, जिना, बिछाना, टेबल, खुर्ची, पसारा हे सारं काही वातावरणनिर्मिती करतात. प्रदीप पाटील यांनी नेपथ्यरचनेत नेमकेपणा आणला आहे. नेपथ्य हालचालींना पूरक आहे. बिपीन वर्तक व नंदलाल रेळे यांनी संगीतही चांगले दिलंय. त्यात कुठेही भडकपणा नाही. उदयराज तांगडी रंगभूषा, अनिकेत वंजारे (वेशभूषा) यांचीही कामगिरी उत्तम. तांत्रिक बाजू चांगल्या जुळल्या आहेत. काळाच्या ओघात चाळसंस्कृती आणि त्यातले विषय हे बाद ठरत असताना या नाट्यातून मुंबईचा भूतकाळ जिवंत होतो. त्यातील भेदकता तीव्रपणे जाणवते.
व्यावसायिक रंगभूमीवर विनोदी आणि सस्पेन्स नाटकांची गर्दी असताना अशा गंभीर विषयावरील नाटकाची निर्मिती करण्याचे धाडस निर्मात्या वैशाली नितीन गोसावी यांनी दाखविले, ते कौतुकास्पदच आहे. त्यांनी निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही. चाळीसएक वर्षे उलटल्यामुळे काही नाटके रसिकांच्या विस्मृतीत जातात. पण अशा दर्जेदार कलाकृती नव्या रसिकांपुढे आग्रहाने आणि जाणीवपूर्वक आणल्या जात आहेत, हे महत्त्वाचे.
रंगभूमीवर अनेक धाडसी व स्फोटक विषय आजवर आलेत. त्यात स्त्रीजन्माचा धांडोळा घेणारे खिळवून ठेवणारे विषयही प्रभावीपणे मांडले गेले आहेत. विजय तेंडुलकर यांच्या `सखाराम बाईंडर’मध्ये सखारामाकडे आलेली सातवी स्त्री लक्ष्मी होती. तो नाडलेल्या महिलांना भोगदासी बनवितो. तसेच ‘कमला’ नाटकातही स्त्रियांच्या चक्क खरेदीचा विषय होता. चि. त्र्यं. खानोलकरांच्या `कालाय तस्मै नमः’ नाटकात एकाच पुरुषामुळे झालेली दोघींची शोकांतिका झाली. जयवंत दळवी यांच्या `पुरुष’मध्ये तर बलात्काराचा विषय पुढे आला. सई परांजपे यांच्या `माझा खेळ मांडू दे’मध्ये अब्रू लुटणारा `मामा’ होता. प्रशांत दळवी यांच्या ‘चारचौघी’त पुढलं पाऊल टाकणारी आई! असे अनेक स्त्रीविषयक प्रश्न आजवर रंगभूमीवर बेधडक आलेत. त्याची नोंद घेणे एखाद्या महाप्रबंधाचाच विषय ठरेल. त्याच वाटेवर वामन तावडे यांचे `छिन्न’ नाटक मैलाचे निशाण ठरले आहे!
जयंत पवार यांचे `अधांतर, अनिल रसाळ यांचे `आख्यान तुकारामभाऊ’, मामा वरेरकर यांचे `सोन्याचा कळस’ किंवा स्वप्नील जाधव यांचे ‘अस्तित्व’ ही नाटके संपानंतर गिरणगावातील बदलत्या परिस्थितीवर प्रभावी भाष्य करणारी आहेत. गिरण्यांवर आज मॉल संस्कृतीने ताबा मिळविला आहे. याच वाटेवरलं हे `छिन्न’ नाटक. ज्यातलं कुटुंबचित्र भुरळ पाडतं. रसिकांना अस्वस्थ करतं. काळ बदलला तरीही यातला विषय आजही ताजा वाटतो. तो एखाद्या सत्यघटनेवर आधारित असल्याचे वाटते. यातच नाटककार आणि दिग्दर्शकाचे यश आहे.
समर्थ रामदास स्वामींनी ‘मनाचे श्लोक’ यात मांडलेले तत्वज्ञान जणू या नाट्यात एका कथानकातून मांडून समाजाला अंजन घातले आहे. `मना वासना दृष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे । मना धर्मता नीति सोडू नको हो। मनी अंतरी सारं विचार राहो!’ वासनेचे दृष्टचक्र आणि त्यात अडकलेले एक कुटुंब या ‘छिन्न’मधून कायम स्मरणात राहील. वासनेच्या अतिरेकेमुळे घडलेले वास्तवाचे दर्शन यात आहे, जे कमालीचे अस्वस्थ करणारे आहे.
नाटक : छिन्न
लेखक : वामन तावडे
दिग्दर्शक : अभय पैर
नेपथ्य : प्रदीप पाटील
संगीत : बिपीन वर्तक, नंदलाल रेळे
प्रकाश : श्याम चव्हाण
सूत्रधार : गोट्या सावंत
निर्मिती : वैशाली नितीन गोसावी
निर्मिती संस्था : व्यासपीठ, मुंबई