१९८०-८१च्या काळात मी मुंबईत जे.जे.त शिकत असतानाची गोष्ट. माझा एक मित्र माटुंग्याच्या तेव्हाच्या व्हीजेटीआयमध्ये शिकत होता. मी अनेकदा त्याच्या होस्टेलवर जात असे. मनाला ताजेपणा आणणारी खूप हिरवळ होती तिथे. हल्ली मुंबईतील हिरवळीची जागा शेवाळाने तर मनाची जागा बुरशीने घेतली आहे. कधी कधी मुक्काम पण होत असे तिथे. असेच एकदा मुक्कामाच्या दुसर्या दिवशी सकाळीच मी माझ्या होस्टेलकडे निघालो. जवळच्या ‘फाइव्ह गार्डन’कडून जाताना पांढरा शुभ्र पायजमा सदरा घातलेली एक व्यक्ती माझ्या समोरून क्रॉस झाली. मला तो चेहरा खूपच ओळखीचा वाटला… जरा पुढे गेल्यावर ट्यूबलाइट पेटली. मी तसाच घाईघाईने माघारी वळलो, पण तोपर्यंत ती व्यक्ती अदृष्य झाली होती. पूर्ण दिवस मला चुटपुट लागली की मला यांना ओळखायला एवढा वेळ का लागला?
पण त्याचेही एक कारण होते.
हिंदी चित्रपटातील सर्व तारेतारका पाली हिल्स नावाच्या डोंगरावर राहतात, असे आमच्या सिनीअर लोकांनी डोक्यात पक्के बसवलेले होते. मग ही व्यक्ती इकडे माटुंग्याला कशी येईल? मी पुढे अनेक दिवस माटुंग्याला चकरा मारल्या, पण मला पुन्हा कधीही हा माणूस दिसला नाही.
चित्रपटाच्या पडद्यावर आपण जेव्हा अभिनेत्यांना बघत असतो तेव्हा त्यांच्या प्रतिमा लार्जर दॅन लाईफ असतात. प्रत्यक्षात ५-६ फुटाची व्यक्ती पडद्यावर ८-९ फुटापेक्षाही मोठी दिसू असते, पण आपल्या ते लक्षात येत नसते. त्यामुळे प्रत्यक्षात एखाद्या अशा व्यक्तीचे दर्शन काही मिनिटे घडले तर पटकन ट्यूब पेटायला वेळ लागतो. शिवाय पूर्वी ही मंडळी रस्त्यावर दिसणे महाकठीणच; त्यात पायी दिसणे तर अगदी दुर्मिळच. जिथे हे दिसू शकतील तिथे आपण पोहोचणे तर त्याहून दुर्मिळ… असो. तर मी ज्या व्यक्तीला बघितले होते त्यांचे खरे नाव कृष्ण निरंजन.
चंडी प्रसाद सिंग हे डेहरादूनचे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर. अपराधी लोकांच्या केसेस हाताळणारे फौजदारी वकील. नेहमीप्रमाणे पित्याचा व्यवसाय स्वीकारावा असे कृष्ण निरंजन या त्यांच्या सर्वात मोठ्या मुलालाही वाटत होते. त्याप्रमाणे अगोदर देहरादून आणि नंतर लखनौ येथे त्याचे शिक्षणही झाले. बॅरिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जाण्याचेही ठरले. पण एकदा कृष्ण निरंजनच्या लक्षात आले की ‘जी व्यक्ती खरोखरच गुन्हेगार आहे ती आपल्या वडिलांच्या हुशारीमुळे त्यातून निरपराध सुटतेय.’ तो व्यथित झाला. क्रिमिनलच नाही तर कोणताच वकील व्हायचे नाही, असे त्याने पक्के ठरवले.
पण काय योगायोग बघा, त्यांना चंदेरी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय केलं ते ‘क्रिमिनल’ याच बिरूदाने…
वकिलीचं शिक्षण सोडल्यावर कृष्ण निरंजनने अनेक प्रकारची कामे केली. लाहोरला जाऊन प्रिटिंग प्रेस उघडली, राजे महाराजांना वन्य प्राणी सप्लाय केले, लष्करासाठी कोयते पुरवले, चहाच्या मळ्यात काम करणार्यांना विशेष बूटही सप्लाय केले… सर्व करून बघितले पण मुळात स्वभाव व्यापारी नव्हता, त्याला ते तरी काय करणार? वडील हे सर्व बघत होत. शेवटी त्या काळातील पारंपारिक समजुतीप्रमाणे ‘अंगावर जबाबदारी आली की होईल सुरळीत’ म्हणत मेरठच्या फौलादा गावच्या आनंदीदेवीशी लग्न लावून दिले. ते वर्ष होते १९३०चे; म्हणजे भारत स्वतंत्र व्हायला १७ वर्षांचा अवधी होता आणि या दरम्यान कृष्ण निरंजनही स्वतंत्रपणे वेगळेच काही तरी करणार होता.
लग्नानंतर केशराच्या पुरवठ्याचा व्यवसाय सुरू केला… काही काळानंतर पत्नी आजारी पडली आणि आजारपणातच दगावली. तिच्या आजारपणात व्यवसायाकडे लक्ष देता न आल्यामुळे भागीदाराने व्यवसाय बळकावला. नंतर कृष्ण निरंजनने या धक्क्यातून सावरत आधी एका मोठ्या हॉटेलात बासमती तांदूळ सप्लाय करून बघितला. तेही जमले नाही. नंतर रूडकी या ठिकाणी एका इंग्रज मुलीशी भागीदारी करून एक शाळा सुरू केली, जी एका वर्षात बंद पडली. कमाल आहे ना! हा माणूस काय काय करत होता. इतके करूनही तो हरला मात्र नाही. म्हणूनच आपल्याला कृष्ण निरंजन सिंग, म्हणजेच के. एन. सिंग अनुभवता आला.
वाक्यागणिक डोळ्यांच्या भुवयांची विशिष्ट हालचाल असो, खास कोनातून मान फिरवत ओठातल्या सिगारचा हलकेच धूर सोडणे असो, पायाच्या बुटापासून डोक्याच्या हॅटपर्यंत भारी पेहराव केलेला प्रतिष्ठित शेठ असो, की खर्ज ते मध्यम आवाजात फिरणारा बॅरिटोन
आवाज असो… के. एन. सिंग या अभिनेत्याचा हा वरकरणी प्रतिष्ठित व्हिलन ५० ते ७०च्या दशकातल्या रसिक प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला. मी या अभिनेत्याला एकाही चित्रपटात आरडाओरडा करताना बघितले नाही. उगीचच पल्लेदार आडवे तिडवे संवादही त्यांनी कधी म्हटले नाही, चित्रविचित्र गेटअप वा मेकअपचीही गरज कधी त्याला गरज पडली नाही. हा अभिनेता जेव्हा जेव्हा पडद्यावर एन्ट्री घेई तेव्हा तेव्हा प्रेक्षक नक्की समजून जात की हा पुरता पाताळयंत्री आहे. त्याच्या डोक्यात नेमके काय शिजत असेल ते चेहर्यावर अजिबात दिसणार नाही याची हमी घेतलेला खलनायक म्हणजे के. एन. सिंग…
४० ते ५०च्या दशकातील अनेकजण, ज्यांना अभिनेता वगैरे व्हायचे नव्हते, पण ते अपघाताने झाले, यापैकी एक म्हणजे के. एन. सिंग. त्यांना खेळाडू किंवा लष्करात जाऊन काहीतरी करायचे होते खरे, पण आयुष्य त्यांना वळणावळणाचा प्रवास घडवत हाेते. खरे तर कृष्ण निरंजन मुळात पक्का स्पोर्ट्समन. भालाफेक आणि गोळाफेक यात इतका निष्णात की १९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली, पण कौटुंबिक जबाबदारी आडवी आली. त्यांची एक बहीण तेव्हाच्या कलकत्त्यास होती. तिच्या डोळ्याचे ऑपरेशन याच काळात ठरले. पती घरापासून लांब तिकडे इंग्लंडमध्ये असल्यामुळे व के. एन. कुटुंबातले सर्वात मोठे सदस्य असल्यामुळे त्यांना ऑलिम्पिकचा बेत रद्द करावा लागला. बहिणीला सोबत म्हणून ते कलकत्त्याला पोहोचले. दिवसभर तर ते बहिणीजवळ बसून राहात. कधी कधी रात्री मग वेळ घालविण्यासाठी बार किंवा पबमध्ये जाऊन बसत. एकदा अशाच एका बारमध्ये त्यांची ओळख इजरा मीर या व्यक्तीशी झाली. हे मीर महाशय कलकत्त्याच्या इंद्रपुरी स्टुडियोचे संचालक होते. त्यांनी के. एन. सिंग यांना स्टुडिओत यायचे आमत्रंण दिले. एका सकाळी मग ते आपल्या या मित्राच्या स्टुडिओत पोहचले. त्या मित्राकडे प्रसन्न व्यक्तिमत्वाची, शुभ्र पांढरा सॅटीनचा पायजमा कुर्ता घालून बसलेली एक व्यक्ती दिसली. ते दुसरे तिसरे कुणी नव्हते, नाटक आणि चित्रपटसृष्टीतली मोठी असामी पृथ्वीराज कपूर होते. या भेटीने खर्या अर्थाने कृष्ण निरंजन सिंगचा के. एन. सिंग होण्याचा प्रवास सुरू झाला.
पृथ्वीराज कपूर यांनी त्यांना चित्रपट व्यवसायात प्रयत्न करायला हरकत नाही असे सुचविले. कलकत्ता हे त्या काळचे चित्रपट व्यवसायाचे महत्वाचे केंद्र होते. पृथ्वीराजनी के. एन. सिंग यांना प्रसिद्ध दिग्दर्शक देवकी बोस यांची ओळख करून दिली. देवकीबाबू त्या वेळी ‘सुनहरा संसार’ हा चित्रपट तयार करत होते. गुल हमीद हे या चित्रपटाचे मुख्य नायक होते. कृष्ण निरंजन सिंग पहिल्यांदा कॅमेर्यासमोर उभे राहिले तो दिवस होता ९ सप्टेंबर १९३६ आणि पडद्यावर पहिल्यांदा नाव झळकले के. एन. सिंग. या चित्रपटात त्यांची डॉक्टरची छोटीशी भूमिका होती. त्यांचे हिंदी, उर्दू व इंग्रजी भाषेचे प्रभुत्व बघूनच त्यांना ही भूमिका देण्यात आली. या चित्रपटाचे मानधन होते फक्त ३०० रुपये. नंतर देवकी बोस यांनी त्यांची बी. एन. सरकार यांच्याकडे शिफारस केली. त्यांची स्वत:ची ‘न्यू थिएटर्स’ ही नामांकित चित्रपट संस्था होती, जी त्यांनी १९३१मध्ये स्थापन केली होती. या स्टुडिओत के. एन. सिंग यांना महिना १५० रुपये पगारावर रुजू करून घेण्यात आले. त्यावेळी स्टुडिओ मालक हाच सर्वेसर्वा असे. एखादा कलाकार स्टुडिओत पे रोलवर घेतला गेला की त्याला इतर चित्रपटांत काम करण्याची परवानगी नसे. या काळात के. एन. सिंग यांनी ‘हवाई डाकू’, ‘आनंद आश्रम’, ‘विद्यापति’ आणि ‘मिलाप’ हे चित्रपट केले. ‘हवाई डाकू’चे नायक गुल हमीद हेच होते, पण चित्रीकरणादरम्यान ते गंभीर आजारी पडले आणि नंतर ही भूमिका के. एन. सिंग यांना मिळाली. चित्रपट अयशस्वी झाला पण या चित्रपटात के. एन. सिंग नायक झाले. दुर्दैवाने या चित्रपटाची प्रिंट मात्र आज उपलब्ध नाही.
४० ते ६०च्या दशकापर्यंत अनेक खलनायक असे होते, ज्यांना चित्रपटातील नायक कधीही हरामखोर, कुत्ता, कमीना, खून पी जाऊँगा असे म्हणायला धजावत नसत. के. एन. यापैकी एक होते. विशेष म्हणजे त्यांच्याही तोंडी कधी असे संवाद नसत. ते खूपच चिडले की आपल्या पंटरला, ‘अपनी बकवास बंद करो। गधे कहीं के।’ हे वाक्य असे काही जोमदारपणे म्हणत की सर्वांच्या माना खाली जात. व्हिलनची ही जातकुळी वेगळी होती. सूटबूट, डोक्यावर फेल्ट हॅट अन् ओठात सिगार. सिगारच्या धुराची एकेक वलये जशी हळुवार वर जात असत, तसेच त्यांचे संवाद पण त्या धुराच्या वलयासारखे गोलगोल फिरत. फार वरची पट्टी नसे संवादाची, पण बोलण्यात एक खुनशीपणा डोकावत असे. समाजातील विविध स्तरांत विविध प्रकारच्या खल व्यक्ती असतात. उच्चभ्रू वर्गातील खलनायकाचे वर्तन एकदम खालच्या पातळीवर सहसा येत नाही. अशी मंडळी समाजात प्रतिष्ठितपणाचे मुखवटे लावून वावरताना स्वत:ची पत शक्यतो घसरू देत नाहीत. त्यामुळे यांचे ढोंग लवकर बाहेर येत नाही. अशा वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे मोजकेच खलनायक होते. यात मिर्झा एम. बेग उर्फ नेमो (‘श्री ४२०’मधील धनाढ्य शेठ), याकूब, रेहमान, सप्रू, अजित, जयंत, मोतीलाल (हे तर एकेकाळचे प्रसिद्ध नायकही होते) इत्यादी. या सर्वांत के. एन. यांचे व्यक्तिमत्व एकदम वेगळे होते. पाताळयंत्री प्रतिष्ठित माणूस म्हणजे के. एन. यांच्या हसण्यात पण एक छद्मीपणा होता. नायकाने कितीही आरडाओरडा केला, तरी ते गालात जीभ फिरवत तुच्छपणे हसत. बरं प्रत्येक वेळी ते डॉनच असतील असेही नाही. अनेकदा ते कुटुंबातील प्रमुख व्यक्ती पण असत किंवा एखादे प्रतिष्ठित डॉक्टर वा वकील देखील.
मुंबई चित्रपटीसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक अब्दुल रशीद कारदार अर्थात ए. आर. कारदार १९३०मध्ये मुंबई सोडून कलकत्त्यास स्थलातंरित झाले. येथे त्यांनी १९३७पर्यंत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यातल्या ‘मिलाप’मध्ये के. एन. सिंग होते. त्यांच्या अभिनयाने कारदार चांगलेच प्रभावित झाले. यात त्यांची पब्लिक प्रॉसिक्युटरची भूमिका होती. काय योगायोग बघा, जो पेशा त्यांना अजिबात आवडला नव्हता, तीच भूमिका वाट्याला आली. यात संवादही खूप लांबलचक होते आणि ते सगळे फक्त दोन दिवसांत पाठ करायचे होते. के. एन. सुरुवातीला चांगलेच टरकले. पण पृथ्वीराज कपूर यांनी खूप धीर दिला आणि चित्रिकरण सुरू होण्यापूर्वी म्हणाले, ‘तुम अच्छे नहीं बल्कि बहुत ही अच्छे हो।’ आणि खरोखर त्यांनी सर्वच टेक पहिल्या फटक्यात ओके केले. लवकरच पृथ्वीराज आणि के. एन. यांची चांगली मैत्री जुळली, जी शेवट पर्यंत अभेद्य राहिली. पृथ्वीराज त्यांच्यापेक्षा चार पाच वर्षांनी मोठे होते आणि अभिनयसंपन्न होते. त्यांच्याबरोबर एखादी भूमिका करायला मिळाली तर आपण किती पाण्यात आहोत हे समजेल, असे के. एन. सिंग यांना नेहमी वाटत असे. आणि लवकरच ‘आरजू’ नावाच्या चित्रपटात ही संधी त्यांना मिळाली खरी, पण यात ते पृथ्वीराज यांचे वडील बनणार होते. सुरुवातीला ते नाराज झाले, पण पुन्हा पृथ्वीराज यांनीच त्यांचा उत्साह वाढवला.
१९३७मध्ये के. एन. सिंग मुंबईला आले. १९३८मध्ये ए. के. कारदार यांचा ‘बागबान’ रिलीज झाला आणि त्याने गोल्डन ज्युबिली साजरी केली. या चित्रपटातील के. एन. सिंग यांची भूमिका सर्वत्र प्रचंड गाजली. सिनेमासिकांतून त्यांच्या अभिनयाची भरपूर प्रशंसा झाली आणि त्यांचे नाव मुख्य प्रवाहात झळाळू लागले. यानंतर ‘आपकी मर्जी’, ‘तकदीर’, ‘हुमायून’ प्रदर्शित झाले. १९५१मध्ये प्रदर्शित झालेल्या आर.के.च्या ‘आवारा’ने ते घराघरात पोहचले. या चित्रपटात बशेश्वरनाथ कपूर (पृथ्वीराज कपूर यांचे वडील), पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि शशी कपूर अशा तीन पिढ्या एकत्रित होत्या. ‘आवारा’तील के. एन. सिंग यांचा जग्गा डाकू आणि जग्गा दादा चांगलाच गाजला. या चित्रपटात ते जरी डाकू वा दादा असले तरी त्यांच्या भूमिकेला एक सॉफ्ट किनार होती. मुळात यातला खरा खलनायक पृथ्वीराज कपूर अर्थात जज रघुनाथ हेच होते. जग्गाला फक्त हेच सिद्ध करायचे असते की उच्चकुलात जन्म घेतलेली व्यक्तीदेखील चोर, डाकू वा पाकीटमार होऊ शकते. त्यामुळे यातला जग्गा हा ग्रे शेडचा आहे, तो पूर्णपणे ब्लॅक नाही.
के. एन. सिंग यांनी सोहराब मोदी आणि नानूभाई देसाई यांच्या मिनर्व्हा मूव्हीटोनमध्ये ५०० रुपये महिना पगारावर काम केले. त्यांना कधी नायकाच्या भूमिका ऑफर झाल्या नाहीत, पण त्यांनीही कधी याची खंत केली नाही. भूमिका कुठलीही असो ते नेहमी सच्च्या कलावंताच्याच भूमिकेत असत. जी भूमिका असेल ती मन लावून करायची आणि त्यांच्या या गुणामुळेच ते नेहमी चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात राहिले. त्यांनी फोकस कधीच ढळू दिला नाही. ते मुंबईत आले तेव्हा याकूबसारखा अभिनेता खलनायक म्हणून चांगलाच चर्चेत होता. के. एन. सिंगच्या अभिनयाला याकूबनेही दाद दिली. याकूबच्या लक्षात आले की हा माझ्यापेक्षाही सरस खलनायक साकार करू शकतो. नंतर याकूब चरित्र भूमिकांकडे वळले.
‘बॉम्बे टॉकीज’ ही मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि नामवंत चित्रपटसंस्था. देविका राणी व हिमांशू रॉय हे पतीपत्नी या स्टुडिओचे मालक. त्यांनी के. एन. सिंग यांना आपल्या संस्थेत १६०० रुपये प्रतिमाह वेतनावर दाखल करून घेतले. शिवाय नेण्याआणण्यासाठी कारची सुविधाही दिली. यावरून के. एन. किती महत्वाचे अभिनेते होते, हे लक्षात येते. याच ठिकाणी त्यांना अमिया चक्रवर्ती आणि शक्ती सामंता यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
१९४० ते १९७० च्या दशकात सिकंदर (राजा अंभी), पृथ्वी वल्लभ् (भिल्लम), प्रार्थना (डॉक्टर), हुमायुन (राजा जयसिंग), परवाना (किशन- यात के. एल. सैगल व सुरय्या मुख्य भूमिकेत होते), बरसात (भोलू), सजा (मेजर दुर्जनसिंग), हलचल (नायिकेचा भाऊ- यात नर्गिस-दिलीप कुमार ही जोडी होती), आंधिया (कुबेरदास. यात देव आनंद-निम्मी ही जोडी होती), जाल (कार्लो फिशरमन- यात त्यांची आंधळ्या भावाची भूमिका आहे), बाज (जनरल बार्बोरोसा- गुरुदत्तचा चित्रपट), मिलाप (शेठ करमचंद- राज खोसला दिग्दर्शक), हावडा ब्रिज (प्यारेलाल- दिग्दर्शक शक्ती सामंता), सिंगापूर (शिवदास), बरसात की रात (पोलिस कमिशनर), शिकारी (डॉ. सायक्लोप्स), वह कौन थी (डॉ. सिंग), दुल्हा दुल्हन (ठाकूर धरमसिंग), मेरा साया (पब्लिक प्रॉसिक्युटर), स्पाय इन रोम (डॉ. चँग), जिगरी दोस्त (चेअरमन नीलकांत) इत्यादी भूमिकांची दखल रसिकांनी घेतली.
५०च्या दशकात प्राण आणि जीवन या दोन खलनायकांनी चांगलीच खळबळ उडवून दिली. पण सिंग साहेब जराही विचलित झाले नाहीत. किंबहुना यांना समांतर अशी त्यांचीही कारकीर्द सुरूच होती. ‘ज्वारभाटा’ हा दिलीप कुमारचा नायक म्हणून पहिला चित्रपट. सिंग साहेब तोपर्यंत खलनायक म्हणून प्रस्थापित झालेले. त्यामुळे दिलीप कुमारच्या समोर के. एन. सिंग जेव्हा आले तेव्हा दिलीप कुमार पण नर्व्हस झाले. पण के. एन. माणूस म्हणूनही खूप चांगले होते. त्यांनाही कधी काळी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. त्यांनी दिलीप कुमार यांचे धैर्य वाढविले आणि तो चित्रपटही यशस्वी झाला.
गंमत म्हणजे पौराणिक चित्रपटांच्या काळात के. एन. सर्वांचे आवडते दुर्योधन झाले. त्यांची ही छबी मात्र मी आजपर्यंत कधी बघितली नाही. पडद्यावरील बलात्काराच्या प्रसंगातही ते कधी दिसले नाहीत. कामुक खलनायक नव्हतेच कधी ते. संपत्तीची प्रचंड हाव असणारा, त्यासाठी कुटील कारस्थानं करणारा माणूस अशी एक वेगळीच इमेज होती त्यांची. शक्ती सामंतांचे तर ते आवडते खलनायक होते. ‘हावडा ब्रिज’, ‘इन्स्पेक्टर’ आणि ‘अॅन इव्हनिंग इन पॅरिस’मधला त्यांचा अभिनय दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे.
प्रेम चोपडा, अजित, रणजित, डॅनी, अमजद, मदन पुरी यांच्या काळात देखील के. एन. यांना डिमांड होतीच. ७०च्या दशकात मात्र खलनायकांची आणखी एक पिढी तर आलीच, पण चित्रपटाचे व्यावसायिक समीकरणही बदलत गेलं. सुरुवातीच्या काळात स्टुडिओचे मालक सर्वेसर्वा असत नंतर दिग्दर्शकाच्या नावाचा दबदबा वाढला. हळुहळू मुख्य अभिनेते वरचढ ठरत गेले आणि नंतर सुपरस्टारडमने सर्वांवर मात केली. चित्रपटनिर्माते सुपरस्टारच्या दारात रांगा लावू लागले. चित्रपटाचा हा सर्व प्रवास के. एन. देखील बघत होते. त्यांच्यासमोर चित्रपटाच्या अनेक पिढ्या मोठ्या होताना त्यांनी बघितल्या. पृथ्वीराज, राज ते ऋषी कपूर या सर्वांच्या सोबत त्यांनी काम केले. कुंदनलाल सहगल, मोतीलाल ते दिलीप, राज कपूर, देव आनंद या त्रयीसहित गुरुदत्त, सुनील दत्त, मनोज कुमार, धर्मेंद्र, राजेश खन्ना ते अमिताभ बच्चनपर्यंत प्रत्येक पिढीच्या नायकासमोर ते उभे राहिले.
तबस्सुम यांनी अनेक कलावंताच्या मुलाखती घेतल्या आहेत. विशेषत: कलावंत त्यांच्या शेवटच्या काळात कसे जगत होते, हे त्यांनी अनेकदा दाखवलं. त्यांनी एकदा के. एन. सिंग यांना विचारले की ‘सध्याच्या अभिनेत्यांबद्दल तुम्ही काय सांगाल?’ यावर ते म्हणाले, ‘आमच्या काळात जे माझ्याबरोबर होते त्यातील अनेक अभिनेत्यांनी उद्याचा विचार कधीच केला नाही, त्यामुळे अनेकांना स्वत:चे घर देखील बनवता आले नाही. मात्र ७०च्या नंतरची पिढी या बाबतीत अत्यंत हुशार निघाली. त्यांनी भविष्यातील दोन पिढ्यांची बेगमी करून ठेवली. आता डिक्टेक्शन निर्मात्याच्या हातात नाही तर अभिनेत्याच्या हातात आहे. पॉवरफुल तर निर्माता असायला पाहिजे होता, कारण कमिटमेंट तो देत असतो, त्याला सिनेमा वितरकाला विकायचा असतो; पण आज नेमका निर्माता कुठे आहे? सर्व ताकद नेमकी कोणाकडे आहे?’… त्यांचे हे बोल अत्यंत परखड व स्पष्ट आहेत. चित्रपटव्यवसायचे पण पूर्णपणे ध्रुवीकरण होत आहे आणि त्यांनी अचूकपणे ते टिपले.
त्यांच्या पत्नी प्रवीण पॉल या देखील यशस्वी चरित्र अभिनेत्री होत्या. त्यांना मूलबाळ झाले नाही. पाच भावंडात ते सर्वात मोठे. त्यांनी धाकटा भाऊ विक्रम सिंह यांच्या पुष्कर या मुलाला दत्तक घेतले. विक्रम सिंग काही वर्षे ‘फिल्मफेअर’ या सिनेमासिकाचे संपादकही होते. घरात सर्वचजण त्यांना बडे पापा म्हणत असत आणि ते सर्व कुटुंबांचे लाडकेही होते. कुंदनलाल सैगल यांचे ते बालपणीचे मित्र. कुंदनलाल सैगल खूप मोठे गायक झाले. सुरुवातीला तेव्हा के. एन. सिंग त्यांना भेटायला जायला घाबरत असत. एकदा अचानक भेट झाली तेव्हा कुंदनलाल मित्राच्या गळ्यात पडले. पृथ्वीराज, पहाडी संन्याल, मोतीलाल आणि कुंदनलाल हे त्यांचे जिवाभावाचे मित्र. त्यांच्या छोट्याशा रूममध्ये अनेकदा या मित्रांच्या गप्पांचा फड जमत असे.
एकदा असेच गप्पा मारत बसले होते. बाहेर पाऊस पडत होता. चौघेही सिगारेटचे शौकीन. ती छोटीशी रूम सिगारेटच्या धुराने भरून गेली. के. एन. सिंग उठले आणि त्यांनी खिडकीचे पट उघडले. समोर बघितले दीडशे माणसं पावसात छत्र्या घेऊन शांतपणे उभी. के.एल.चा आवाज कानी पडावा म्हणून ही माणसं बाहेर उभी होती… के. एन. सिंग यांनी एकदा प्रसंग मुलाखतीत सांगितला होता आणि म्हटले ‘काय प्रेम करत होती ही माणसं माझ्या या मित्रावर… मी तर हात जोडले या रसिकांसमोर…’
७० ते ९० या दशकात चित्रपट सर्वच बाबतीत पूर्ण बदलला. अगदी कथानकापासून ते संगीतापर्यंत, दिग्दर्शनापासून संवादापर्यंत. तंत्रज्ञानात तर आमूलाग्र बदल झाला. पण याही कालखंडात ते सक्रिय होते. ‘हाथी मेरे साथी’, ‘जाने अंजाने’, ‘रेशमा और शेरा’, ‘खोज’, ‘हम तुम और वह’, ‘दुश्मन’ (१९७१), ‘बन्सी बिरजू’, ‘मेरे जीवनसाथी’, ‘दो चोर’ (१९७२), ‘लोफर’, ‘कच्चे धागे’, ‘सबक’, ‘कीमत’, ‘हँसते जख्म’ (१९७३), ‘सगीना’, ‘मजबूर’, ‘जीवन रेखा’, ‘बढती का नाम दाढी’, ‘हमराही’ (१९७४), रफू चक्कर’, ‘कैद’, ‘काला सोना’, ‘प्रेम कहानी’ (१९७५), ‘ममता’, ‘जादू टोना’, ‘साहिब बहादूर’ (१९७७), ‘दो प्रेमी’, ‘दोस्ताना’ (१९८०), ‘कालिया’, ‘प्रोफेसर प्यारेलाल’, ‘श्रद्धांजली’ (१९८१). नंतर मात्र वर्षातून एखादाच चित्रपट त्यांनी केला. सन १९९४मधील ‘लैला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. म्हणजे वयाची ऐंशी पार केल्यावरही ते भूमिका करतच राहिले. त्यांच्या अभिनयाच्या आड वय कधी आले नाही.
मात्र या काळात त्यांच्या मनावर एक उदासीची छाया होती. कारण होतं जवळच्या मित्रांचं निधन आणि बदलणारी चित्रपटांची दुनिया. ते निराश नव्हते कधीच, पण सोबत जिवलग नसल्याची एक बोच सतत टोचत राही मनाला…
वास्तविक जगाचे बदलते रुपही त्यांनी बघितले. दोन जागतिक महायुद्धं, ब्रिटिश सत्ता, स्वातंत्र्याचा लढा आणि पूर्ण स्वातंत्र्याचा उदयकाल, मुंबईचा लढा, कलकत्ता ते मुंबई हा चित्रपटातील प्रवास… कितीतरी वळणं होती त्यांच्या आयुष्यात.
१९६२ ते ६४ या काळात विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या गव्हर्नर होत्या. या काळात मुंबई शहराचा विकास आराखडा वेगात सुरू होता. एकदा वॉल्डॉर्फ अॅस्टेरिया या पंचतारांकित हॉटेलमध्ये के. एन. सिंग व त्यांची भेट झाली त्यावेळी त्या त्यांना म्हणाल्या होत्या, ‘किशन, आय अॅम नॉट जस्ट युअर गव्हर्नर. आय अॅम युअर गव्हर्नेस टू!’ सिंग साहेबांसाठी ही आठवण अत्यंत मोलाचा ठेवा होता.
के. एन. सिंग यांना दीर्घ आयुष्य लाभले. पण अनेकदा दीर्घायुषी लोकांची एक खंत असते. त्यात ते कलाप्रांतातील असतील तर ही खंत अधिक तीव्र होते. कारण अशी माणसं एकाच वेळी दोन प्रकारचं आयुष्य जगत असतात. कलाक्षेत्रातील त्यांचे एकेक सहकारी जसजसे हे जग सोडून गेले तसतसे सिंग साहेब एकाकी पडल्यासारखे झाले. शेवटच्या काळात त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले. ज्या डोळ्यांनी त्यांना आयुष्यभर साथ देऊन अभिनयाच्या वरच्या स्थानावर नेऊन बसविले होते, त्यांचीच दृष्टी गेली. आयुष्याची जवळपास ६० वर्षे ते चंदेरी झगमगत्या विश्वात राहिले पण शेवटची सहा वर्षे मात्र काळोखात बुडाली. पत्नीचे निधन झाले आणि ते आतल्या आत कोसळले.
ते खूप आजारी पडले असताना एकदा तबस्सुम त्यांना भेटायला गेल्या… त्यावेळी त्यांनी तबस्सुमजवळ मनोगत व्यक्त केले होते. गप्पांच्या ओघात अचानक थांबून समोरच्या एका खुर्चीकडे बोट करत ते म्हणाले, ती खुर्ची दिसतेय ना! त्यावर मोतीलाल बसत असे… आणि बाजूच्या खुर्चीवर बसायचा पृथ्वीराज आणि एक खुर्ची सोडून जी बाजूची खुर्ची दिसतेय ना… त्यावर बसायचा पहाडी संन्याल आणि ती जी शेवटची खिडकीजवळ खुर्ची आहे ना… त्यावर बसायचा माझा सर्वात प्रिय दोस्त सैगल… अशा कितीतरी सुंदर संध्याकाळी या खुर्च्यांनी अनुभवल्या आहेत. आमची मैफल जमत असे आणि कधी रात्र होई ते कळत नसे… पण अफसोस!! हे सर्वच माझे जिवलग मला एकाकी करून कायमचे निघून गेले. आता फक्त आहेत त्या या रिकाम्या खुर्च्या… बोलता बोलता ते एकदम दु:खीकष्टी होऊन जात. त्यांचे कान डोअर बेलकडे कायम लक्ष ठेवून असत… मनात येई, येईल कुणीतरी आणि वाजवेल बेल… अन् मी दार उघडून करेन स्वागत… मारेल तो गप्पा माझ्याशी मनमोकळ्या किंवा किमान टेलिफोनची घंटा तरी वाजेल आणि पलीकडून कोणीतरी माझी प्रेमाने विचारपूस तरी करेल… पण असे कधी घडले नाही आणि घडणारही नव्हते… चित्रपटसृष्टी म्हणजे दिवसा पडलेले भरजरी स्वप्न आणि शेवटी स्वप्नच… १९९९मध्ये ते घरातच पडले आणि हाडांना इजा झाली. ३१ जानेवारी २०००पर्यंत म्हणजे अखेरचा श्वास घेईपर्यंत ते बेडवरच होते…७०नंतरच्या पिढीला के. एन. सिंग माहिती असतीलच असे नाही… पण जी तरुणाई कलाक्षेत्रात आहे, त्यांनी मात्र या रुबाबदार अभिनेत्याचा विसर पडू देऊ नये, असे मनापासून वाटते.