सध्या माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या एका महान संशोधनकार्यात मग्न आहे. तो असंसदीय अपशब्द धुंडाळण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे, तर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, आदिवासी भागांपासून पुढारलेल्या शहरांपर्यंत भटकंती करत वणवण फिरत असल्याचा फोन आताच मला आला होता. त्याच्याकडे सर्वभाषिक प्रचलित शिव्यांचे महाकोश आहेतच, त्याशिवाय त्याने स्वत: महाराष्ट्रात संशोधन करून मिळवलेल्या अतिरिक्त शिव्यांचे आणि अपशब्दांचे भांडार आहे. मी त्याला केव्हापासून सांगतोय की या विषयावर तू पीएचडी कर आणि डॉक्टरेट मिळव. पण आळशी स्वभावामुळे तो त्याकडे दुर्लक्ष करत आला. अन्यथा एव्हाना डॉ. पोक्या वाकडे म्हणून प्रसिद्धीस आला असता. खरं तर हे काम वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी केसरकरांसारखाच शिक्षणतज्ज्ञ हवा. नुकतेच त्यांनी कणकवलीत ‘नालायक’ या शब्दाला असंसदीय अपशब्द ठरवत जाहीर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी मा. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे होते. केसरकरांनी ‘नालायक’ या शब्दाची सर्वांगीण फोड करत त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याचा कीस काढला. रामायण-महाभारत काळापासून पेशवाईपर्यंत आणि तिथून आजपर्यंत कोण कुणाला नालायक म्हणाले, याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. ‘हरामखोर’ या शब्दाचीसुद्धा त्यांनी चिरफाड केली. ‘साला’ या शब्दाचा अर्थ मेव्हणा असल्यामुळे त्याला असंसदीय अपशब्द म्हणावं की नाही हे ठरवण्यासाठी केंद्राने नेमलेली समिती लवकरच योग्य तो निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. ‘नालायक’ शब्दाचा अर्थ केवळ ‘लायक नाही’ एवढ्यापुरताच मर्यादित नसून त्यात अत्यंत गलिच्छ, असभ्य आणि उच्चारता येणार नाही असा गर्भितार्थ भरलेला आहे, असं प्रतिपादन तिथे आगंतुकपणे उपस्थित असलेले नार्वेकर यांनी केले. त्यांनी याबाबत अॅड. जेठमलानी यांचा दाखला दिला. ते म्हणाले. अॅड. जेठमलानी यांच्या मते महंमद घोरी जेव्हा हिंदुस्थानात आक्रमणासाठी आला तेव्हा त्याला कोणीतरी ‘नालायक’ असे म्हणून पळून गेले. त्या शब्दाचा अर्थ काय असावा हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यावेळचे भाषातज्ज्ञ मौलवी सरफुद्दीन यांच्याकडे धाव घेतली, पण त्यांनाही त्याचा नेमका अर्थ सांगता न आल्यामुळे महंमद घोरीने त्याचे डोके उडवले. त्यानंतर तिसर्या बाजीरावाच्या काळात त्याला आत्ताच्या डेक्कन जिमखान्यासमोर एका अन्यायग्रस्त भिक्षुकाने नालायक ही शिवी हासडली. तिसर्या बाजीरावाने बावनखणीत जाऊन या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुण्यातील एका विद्वानाने सांगितलं की, आपण एखाद्याला रागाच्या भरात दगड किंवा धोंडा म्हणालो, तर ती शिवी होत नाही. तसेच नालायक या शब्दाचे आहे. लायक नसलेला एवढाच त्याचा मृदू आणि सौम्य अर्थ आहे. त्यावर प्रतिपक्षातील एका विद्वानाने नालायक या शब्दाची साग्रसंगीत फोड करत सांगितले की, ‘ना’ म्हणजे नामर्द, ‘ला’ म्हणजे लांडीलबाडी करणारा, ‘य’ म्हणजे यडxx व ‘क’ म्हणजे कवडीमोल किमतीचा. त्यामुळे नालायक ही शिवीच आहे आणि त्या शिवीत अनेक वाईट अर्थ अंतर्भूत आहेत. हे ऐकल्यावर तिसर्या बाजीरावाने ती शिवी देणार्या भिक्षुकाला शिक्षा न देता माफ केलं व त्याला आपला अंगरक्षक म्हणून नोकरी दिली. तसंच या शिवीची फोड करून तिचा अर्थ सांगणार्या विद्वानाला मनसबदार म्हणून नेमलं.
अॅड. जेठमलानी यांच्या या ऐतिहासिक माहितीबद्दल नार्वेकर यांनी त्यांना बक्षिसी म्हणून बारा काळे कोट शिवून देण्याचं जाहीर केलं. त्यानंतर एकेक नेते भाषण करण्यासाठी उठत गेले. शंभूराजे भाषणात म्हणाले, ‘नालायक हा किती भयंकर अपशब्द आहे याची मला कल्पना होतीच. यावरून तो असंसदीय असलाच पाहिजे. नसला तर लोकसभा अध्यक्षांनी संसदेचं खास अधिवेशन बोलावून त्या शब्दाला असंसदीय शब्द म्हणून मंजुरी द्यावी, असं आवाहन मी करतो. आमच्या कोणत्याही पिढीजाद्यांनी हा अपमान सहन केला नसता. मी तर अजिबात सहन करणार नाही, असं मी शेलारमामांना व्हॉट्सअपवर कळवलं आहे.’
त्यानंतर भुसे उठले. ते म्हणाले, ‘आमच्यात एवढी सहनशक्ती आहे म्हणूनच आम्ही त्या वक्तव्याला सहन केलं. पण इतका जहाल, भीषण, सर्व शिव्यांचा बाप असलेला ‘नालायक’ हा शब्द वापरण्यावर कायद्याने बंदी आणण्याची नितांत गरज आहे. उद्या मलाही कोणी नालायक म्हणेल. असं कृत्य कोणी केलं तर तेव्हा मात्र मी तुटून पडेन, पण वाकणार आणि मोडणार नाही.’
त्यानंतर ५२कुळे उभे राहिले. त्यांनी ठणकावून सांगितलं, ‘हा मी त्यांचा नव्हे, तर माझा अपमान समजतो. कोणीही कुणाला नालायक म्हणणे हा त्यांच्या कुळांचा उद्धार करण्यासारखं आहे. त्यांच्या जागी मी असतो तर जशास तसं उत्तर दिलं असतं. पण विदेशात जाऊन आल्यापासून थोडा स्वत:वरच नाराज आहे. असे प्रसंग चिलटासारखे झटकून द्या. ते जरी आम्हाला आमचे साहेब म्हणून नको असले तरी ते अशा बिकट प्रसंगातून जात असताना आम्ही आणि आमचा पक्ष त्यांच्यापाठी पहाडासारखा उभा राहील आणि त्यांच्या चाळीस चुव्व्यांचेही रक्षण करील. जय भाजप.’
त्यांचे भाषण संपते न संपते, तोच अजितदादांनी आल्याआल्याच माईक हातात घेतला आणि गॉगल कपाळावर घेत म्हणाले, ‘खरं तर या सभेला येण्याचा विचार माझ्या मनात नव्हता, पण आपल्या आवडत्या विषयावर काही बौद्धिक खाद्य मिळेल या हेतूने मी आलो. माr माझ्या आयुष्यात इतक्या माणसांना इतक्या शिव्या दिल्या की त्यांची मोजदाद करणं अशक्य आहे. एक सांगतो, कुणाबद्दल काहीही वाईटसाईट मनात असलं तर ते मनात ठेवून कुढत बसू नये. त्याचा स्फोट करावा. तोही आपल्या अस्सल मायबोलीत. मी तसाच वागतो म्हणून मला फटकळ म्हणतात. पण त्याची मला मुळीच पर्वा नाही. मात्र आता मतलबीपणासाठी दुसर्याची आर्जवं करण्याची वेळ येते, तेव्हा मला कुणी नालायक म्हटलं तर मला वाईट वाटणार नाही. जेव्हा आतून माणसाची लाही लाही होते, तेव्हा नालायक शब्दाचा वापर करणे हे फार सौम्यपणाचं लक्षण आहे…’
अजितदादांनी हे उद्गार काढताच नारायणराव उसळून उठले आणि म्हणाले, ‘कसला सौम्यपणा, मी तर मागे एकदा असाच रागाच्या भरात म्हणालो होतो की, मी असतो तर कानाखाली वाजवली असती… त्याची शिक्षा म्हणून मला तुरुंगवासाची शिक्षा झाली. आणि तुम्ही सौम्य सौम्य म्हणता… बरखास्त करा ही सभा!