ही गोष्ट २००८मधली… कोर करियर सॉफ्टवेअर कंपनीने पुण्यात कार्यालय सुरू केले होते. आयटीमध्ये सोल्युशन देणारी कंपनी म्हणून ती नावाजलेली होती. विशेष म्हणजे बँका, फायनान्स आणि अन्य कंपन्या त्यांच्या ग्राहक कंपन्या होत्या. नवीन सॉफ्टवेअर करून देण्यात या कंपनीचा हातखंडा होता. ओपन सोर्स किंवा मायक्रोसॉफ्टसारख्या मालकी हक्कांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनुकूल बदल करून ते वापरण्यासाठी देणे हे या कंपनीच्या कामाचे स्वरूप होते. आयटीच्या मार्केटमध्ये या कंपनीचे नाव चांगले होते.
हाँगकाँगमधील एका बँकेने मायक्रोसॉफ्टचे ऑफिस ऑटोमेशन आणि फाइल शेअरिंगबाबतचे एक सॉफ्टवेअर विकत घेऊन ते विकसित केले होते. बँकेसाठी त्याचा वापर देखील सुरू झाला होता. त्यांना आता त्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करायचे होते. त्यासाठी त्यांनी ‘कोर करियर सॉफ्टवेअर’ या कंपनीला हे काम देण्याचे निश्चित केले होते. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत राठी यांनी या प्रोजेक्टवर कंपनीचे वरिष्ठ सहसंचालक म्हणून सुधाकर बाबू यांची नियुक्ती केली होती. सुधाकर यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा होता, त्यामुळे त्या बँकेला अपेक्षित असणार्या कामापेक्षा उत्तम काम सुधाकर बाबू करून देतील, असा विश्वास राठी यांना होता, म्हणूनच त्यांनी त्यांच्याकडे या कामाची जबाबदारी सोपवली होती.
मायक्रोसॉफ्टने तयार केलेल्या आयटी सोल्युशनमध्ये हवा तो बदल करण्यासाठीचा सोर्स कोड हाँगकाँग बँकेला मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आला होता. बँकेने हे काम कोर करियर सॉफ्टवेअर कंपनीला दिल्यामुळे बँकेने तो सोर्स कोड कंपनीचे सहसंचालक म्हणून काम पाहणार्या सुधाकर बाबू यांना दिला होता. सुधाकर या प्रकल्पावर दोन वर्षांपासून काम करत होते, त्यामुळे त्या काळात त्यांनी अधूनमधून मायक्रोसॉफ्टशी ईमेलद्वारे संवाद साधून सोर्स कोडबाबत त्यांना हवे असणारे स्पष्टीकरण आणि काही फाईल्स मिळवल्या होत्या. हे काम चांगल्या पद्धतीने सुरू होते.
त्याच काळात कंपनीत नवीन कर्मचार्यांची भरती करण्याच्या संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचे अध्यक्ष हेमंत राठी होते. बैठकीला सुधाकर बाबू यांनाही बोलावण्यात आले होते. कंपनीत भरती कशी करायची यावर चर्चा सुरू असताना राठी आणि सुधाकर या दोघांमध्ये एका मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. सुधाकर बाबू बैठकीतून उठून तावातावाने ऑफिसमधून निघून गेले. बैठकीत मिठाचा खडा पडल्यामुळे बाबू नाराज झाले होते, त्यामुळे त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस ते सुटीवर होते, तिसर्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला आणि ते कंपनीमधून बाहेर पडले.
आपल्याला या कामाचा चांगला अनुभव आहे, त्यामुळे आपणच स्वत:ची कंपनी सुरू करावी, असा विचार करून त्यांनी ‘ब्राईट करियर सॉफ्टवेअर’ कंपनी केली. मी तुम्हाला सध्या तुम्हाला मिळतोय त्यापेक्षा ४० टक्के अधिक पगार देतो, असे सांगून त्यांनी जुन्या कंपनीतील पाच ते सहा कर्मचार्यांना आपल्या कंपनीत रुजू करून घेतले. जुन्या कंपनीत आपण ज्या प्रोजेक्टवर काम करत होतो, त्या हाँगकाँगमधील बँकेबरोबर संपर्क साधून हे काम त्यांना स्वस्तात करून देऊ असा विचार सुधाकर बाबू यांच्या डोक्यात आला. त्यानुसार त्यांनी त्या बँकेबरोबर संपर्क साधून सीसीसी कंपनीला देण्यात आलेले काम आपल्याकडे घेण्यात बाजी मारली. ज्या प्रोजेक्टवर सुधाकर बाबू काम करत होते, त्या कामासाठी आवश्यक असणारा मायक्रोसॉफ्टचा सोर्स कोड सुधाकर बाबू यांच्याकडेच होता. त्यामुळे त्यांनी लगेचच हाँगकाँग बँकेला सेवा पुरवण्यास सुरुवात केली. खरे म्हणजे, हाँगकाँग बँकेने कोर करियर सॉफ्टवेअर कंपनीला मायक्रोसॉफ्टचा सोर्स कोड वापरण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे या प्रकरणात मायक्रोसॉफ्टचा सोर्स कोड मिळवणे, त्यामध्ये बदल करणे हा अधिकार कोर करियर सॉफ्टवेअर कंपनीलाच होता. पण सुधाकर बाबू यांच्या बीसीसी कंपनीने अनधिकृतपणे त्याचा वापर करण्याचा उद्योग सुरू केला.
सुधाकर बाबू तडकाफडकी जुन्या कंपनीतून बाहेर पडले होते आणि जोशात येऊन त्यांनी आपली नवी कंपनी सुरू केली होती. हे सगळे करत असताना आपण नियमांचे उल्लंघन करून हे पाऊल उचलत आहोत याचे त्यांना भान नव्हते. सोर्स कोडचा वापर करण्याच्या संदर्भात अनेक आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून सुधाकर बाबू यांनी कायद्याचे उल्लंघन केले. पण बँकेला स्वस्तात सेवा देण्याच्या नादात आणि आपली नवी कंपनी उभी करण्याच्या नादात त्यांना हे लक्षातच आलं नाही. या सगळ्यात कोर करियर कंपनीचे आतापर्यंत ५७ लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
या सगळ्या प्रकरणात कोर कंपनीने आपल्या अधिकार्यावर अतिविश्वास दाखवला. वैयक्तिक हितसंबंधावर या कामाची जबाबदारी सुधाकर बाबू यांच्याकडे देण्यात आली, अशा प्रकारचे काम सुरू करण्याआधी स्पष्टपणे कायदेशीर दस्तऐवज नोंदणी करणे आवश्यक असते, तिथे निव्वळ विश्वासावर हा व्यवहार झाल्याचे दिसत होते. विशिष्ट परदेशी कंपन्यांबरोबर व्यवहार करताना सोर्स कोडसंदर्भातील कायदेशीर बाबी, आंतरराष्ट्रीय कायदे यांचा अभ्यास करून कंपन्यांनी आपली धोरणे तयार करण्याची गरज असते; पण बर्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामधून असे प्रकार घडतात.
सोर्स कोडचा गैरवापर केल्याबद्दल सुधाकर बाबू आणि त्यांच्या नव्या कंपनीतील कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली, सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.
हे लक्षात ठेवा…
– कंपनी सोडताना त्यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेले अधिकार, डाटा, लॅपटॉप व अन्य काही वस्तू आणि माहिती या परत करण्यात याव्यात. त्याची नोंद कंपनीकडे करण्यात यावी.
– कंपनीत कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याच्याकडे कंपनीचा कोणता दस्तऐवज असल्यास तो परत घेऊन नंतरच त्याला आवश्यक ती कागदपत्रे देण्यात यावीत.
– प्रत्येक कंपनीने आपली डेटा सिक्युरिटी पॉलिसी कडकपणे राबवणे गरजेचे आहे.
– माहिती-तंत्रज्ञान कायदा २००० हा अशी प्रकरणे हाताळण्यास पुरेसा नाही. त्यासाठी स्वतंत्र डेटा प्रोटेक्शन अॅक्टची गरज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात भारतीय आयटी कंपन्या आणि त्यांची विश्वासार्हता अधिक प्रमाणात वाढू शकते.