धुमधडाक्यानं जाहिरात झळकली. एक देखणी मॉडेल, तिनं उंच उचलून धरलेला एक शू, स्पोर्ट शू.
खर्चपूर्वक, मेहनतपूर्वक, कौशल्यपूर्वक जाहिरात. शूची किमत ५०० डॉलर. भारताच्या हिशोबात सुमारे ४० हजार रुपये.
हा शू एका कंपनीनं मॅरेथॉन धावकासाठी तयार केलाय. हा शू वापरला तर धावकाची धावण्याची कार्यक्षमता तीन चार टक्क्यांनी वाढते. हा शू फक्त एक शर्यत टिकतो. म्हणजे एक शर्यत पळून झाली की शूचा उपयोग नाही.
आपल्याकडं आपला एखादा कपडा जुना झाला, विरला, काही ठिकाणी फाटला तर त्या कापडाचे विविध उपयोग करण्याची प्रथा आहे. पिशव्या होतात, पायपुसणी होतात, जमीन पुसणी होतात.
आप्रिâकेत एक कल्पक कंपनी आहे. ती लोकांकडून जुनेपाने कपडे गोळा करते. त्यांची फाडाफाड करून कापडाचे तुकडे एकत्र जोडून नवं कापड तयार करते आणि त्या नव्या कापडाचे शर्ट, पँट्स, टीशर्ट, पिशव्या आदी तयार होतात. गोधडीसारखा प्रकार. विलक्षण दिसणारे कपडे. ते फार भारी किमतीला विकले जातात.
आमच्याकडं घरी डालडाचं वनस्पती तूप वापरलं जात असे. डालडाचा डबा रिकामा झाला की त्यात तुळस लावून ती तुळस बाहेर गॅलरीच्या आढ्याला टांगली जात असे. डबा पार सत्यानाश होईपर्यंत वापरला जात असे. टाकायचा नाही. वस्तू वाया घालवायची नाही ही कल्पना.
अर्थात हे सुमारे १० वर्षांपूर्वीचं झालं. आता वस्तू जुनी झाली की फेकून दिली जाते. माणसंही. या पादत्राणात असं काय आहे की त्याची किंमत ५०० डॉलर व्हावी.
हां. त्याच्या तळव्यात एक विशिष्ट अद्ययावत थर टाकण्यात आला आहे. हा थर सॉलिड लवचीक आहे. पळणार्याचं पाऊल जमिनीवर आदळलं की ते चार पाच टक्के जास्त वेगानं वर उचललं जातं. धावणार्याची गती वाढते, कमी श्रमात गती वाढते. एका मॅरॅथॉन स्पर्धकानं असेच पण काहीसे याआधीच्या सुधारित पिढीचे शूज वापरले तर त्याचा पळण्याचा वेग दोन सेकंदांनी सुधारला.
तुमचे आमचे दोन सेकंद महत्वाचे नसतात. तुम्ही आपण पळण्याच्या शर्यतीत भाग घेतो तेव्हा त्यात आनंद, हुरहूर याचा भाग जास्त असतो. मेहनत करायची आणि इतरांच्या तुलनेत आधी फिनिश लाईनपर्यंत पोचायचं. वीस पंचवीसजण स्पर्धेत असतात, तिघंच पहिले येतात. कधी आपला नंबर लागतो, कधी लागत नाही. नाही लागला तर क्षणभर मन खट्टू होतं. इतर मित्र येऊन पाठीवर हात फिरवतात आणि म्हणतात, ‘छोड दो यार. पुढल्या वेळी. चल बर्फाचा गोळा खायला जाऊ.’
टीव्हीवर गाजणार्या मॅरॅथॉनमध्ये तसं नसतं. ब्राँझ, सिल्व्हर नाही तर गोल्ड मेडल मिळवलंच पाहिजे. त्यासाठी दहा बारा वर्षं मेहनत केलेली असते. प्रशिक्षक, मैदान, खाण्यापिण्याची काळजी घेणारा, मानसिक तोल सांभाळणारा इत्यादींवर लाखो रुपये खर्च केलेले असतात. मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्याला शर्ट, शूज, टॉवेल, मनगट बँड, केसांचा बँड इत्यादी देऊन अडकवून ठेवलं असतं. जिंकलात की फक्त आम्ही सांगू तिथंच जाहिराती करायच्या. कुठंही सार्वजनिक ठिकाणी जायचं असेल तर आमची परवानगी घ्यायची. तुमच्या जगण्यातलं प्रत्येक मिनिट कोणीतरी विकत घेतलेलं असतं.
खेळ, खेळातलं कसब महत्वाचं नाही. तुमचं दिसणं महत्वाचं. विक्रम करा. झळकू लागा. खेळात मिळाले त्यापेक्षा किती तरी जास्त पैसे चमकण्यासाठी. लग्नसमारंभात पाच मिनिट हजेरी लावा, नवरानवरी बरोबर दोन मिनिटं, नाचणं एक मिनिट, कॅमेर्याला हाय एक मिनिट. बस. पन्नास लाख.
तुम्ही तुमचे रहात नाही. तुम्ही दुकानात बाहेर ठेवलेल्या मॅनेक्विनसारखी शरीरं असता. तुमची किंमत कशासाठी तर तुमच्या पायातल्या बुटासाठी, तुमच्या पँटसाठी, तुमच्या शर्टासाठी, तुमच्या टोपीसाठी, तुमच्या हातातल्या बॅटसाठी. तुम्हाला करोडो रुपये किंवा डॉलर मिळतात ते तुमच्या अंगावर वस्तू टांगण्यासाठी. तुम्ही हरलात की मेलात. त्यानंतर तुम्हाला बर्फाचा गोळाही कोणी देत नाही, तोही तुमच्या तुम्हालाच घ्यावा लागतो.
तर असे तुम्ही होण्यासाठी वेगवान शूज लागतात. आज ५०० डॉलरचे शूज आलेत. त्यानं सात सेकंद वाचतील. संशोधन सुरू आहे. अनेक तंत्रज्ञ-वैज्ञानिक-इंजीनियर कामाला लागलेत. उद्या साडेसहा सेकंद वाचतील. परवा सव्वासहा सेकंद वाचतील.
नवा शू वापरल्यामुळं तुमचा पाय जमिनीवर कसा अलगद पडलाय आणि अलगद उचलला जातोय, हे जगाला कसं कळणार? त्यासाठी उत्तम कॅमेरे आणि उत्तम सॉफ्टवेअर आणि अॅप्स. ते दिसण्यासाठी चांगला टीव्ही. ते सारं करोडो लोकांनी पाहिलं तरच जाहिराती मिळणार. सगळा मामला जाहिरातींचा. टीव्हीवर दिसणार्या. स्टेडियममध्ये चहूबाजूंनी दिसणार्या. पाऊल उचललं की एक जाहिरात. थोडं खाली सरकलं की दुसरी. आणखी खाली. तिसरी.
करोडो लोक स्टेडियममधे किंवा टीव्हीवर जाहिराती पहाणार. पावलं पडण्याचा थरार आणि जाहिरात. थरार म्हटल्यावर सोबतीला खायला काही तरी हवं आणि हातात पेय हवं. दहा माणसं मैदानात धपापत पळणार, दहा करोड माणसं घरात बसून खाणं, पिणं करत थरार अनुभवणार.
सामान्यपणे आरोग्याला हानिकारक असलेले खाद्यपदार्थ वा औषधांच्या जाहिराती. बंडल गोष्टी गळ्याखाली उतरवायच्या म्हटल्यावर ढोल बडवणं, कर्णकर्कश्श संदेश देणं आलंच. मैदानात जाऊन खेळण्याला पर्याय म्हणून जिम आणि सेलफोनवर करायच्या खेळांच्या जाहिराती. टीव्ही पहात असताना शेजार्याला सांगायचं की मी जिमवर वीस लाख रुपये खर्च करतो आणि दररोज दहा हजार रुपये किमतीच्या पावडरी खातो. वगैरे. किती लाख आणि किती हजार हा मुद्दा महत्वाचा नाही. ते कमी जास्त होतात. लाख आणि हजार मात्र असतात.
असा हा मामला. चहूबाजूंनी अब्जावधी रुपयांचा मामला. तो जमवायचा असेल तर कोणी तरी धावायलाच हवं. कोणीतरी एका ओव्हरमध्ये पन्नास रन काढायला हव्यात. कोणीतरी चार बॉलमध्ये चार विकेट घ्यायला हव्यात. कोणीतरी एकापाठोपाठ एक अशा सहा सिक्सर मारायला हव्यात. कोणीतरी पाच वर्षात अगणित शतकं ठोकायला हवीत. कोणी तरी उंच उडी मारायला हवी, कोणीतरी माशाला मागं टाकून पोहायला हवं.
ते सारं जमवायचं तर बूट ५०० डॉलरचा हवा. त्याची बॅट सहा हजार डॉलरची हवी. त्याची रॅकेट आठ हजार डॉलरची हवी. हां. आणि त्याचा शर्टही हजार डॉलरचा हवा.
तू काहीही कर. तू ५०० डॉलरच्या बुटाच्या लायक हो म्हणजे झालं. जात, धर्म, गरीब की मध्यमवर्गीय यांचा संबंध नाही. तू काहीही कर. शिवाजी पार्कात खेळ, विक्रोळीच्या गल्लीत खेळ नाही तर एमसीएच्या अकॅडमीत खेळ. तुझं तू पाहून घे. तू सात सेकंद वाचवण्याच्या खटपटीतला मुख्य माणूस हो म्हणजे झालं.
अमेरिकेत सरासरी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न असतं ९४ हजार डॉलर. त्यातले ९३०० डॉलर खर्च होतात अन्नावर. प्रवास, कार इत्यादीवर खर्च होतात १२ हजार डॉलर आणि घरभाड्यावर खर्च होतात २४ हजार डॉलर. उरतात सुमारे २१ हजार डॉलर.
सरासरी चांगलं शिक्षण घ्यायचं असेल (नामांकित शाळा वगैरे सोडा) तर त्याचा खर्च दर मुलामागं ३६ हजार डॉलर आहे. ठीक नोकरीत असणार्या माणसाचा आरोग्याचा विमान कंपनीकडून उतरवला जातो, त्यासाठी कुटुंबाला २४ हजार डॉलर हप्ता भरावा लागतो. त्यात अगदीच बेसिक काळजी घेतली जाते, काही खर्चिक आजार झाला तर संपलंच समजा. जो तासाला १२ डॉलर मिळवणारा माणूस आहे त्याच्या विम्याचा प्रश्नच येत नाही. सरासरी माणसाची शिक्षण आणि आरोग्याच्या नावानं बोंब. ५०० डॉलरचे शूज?
माजिद मजिदीची एक फिल्म होती. चिल्ड्रन ऑफ हेवन. झारा ही एक तिसरी चौथीतली गोड मुलगी आहे. तिचे फाटलेले शूज तिचा भाऊ अली दुरुस्त करायला नेतो. शूज हरवतात. झारा हिरमुसली होते. तिच्या वडिलांची नवे शूज घ्यायची ऐपत नसते. जास्त कामं करून तो पैसे मिळवायची खटपट करतो. त्या खटपटीत तो सायकलवरून पडून पाय मोडून घेतो. अली ठरवतो की धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊन बक्षीस मिळवायचं. शर्यतीत तिसरा येणार्याला शूज मिळणार असतात. अली जाम मेहनत करतो. पण रेसमधे तो तिसरा न येता पहिला येतो. त्याचं बक्षीस म्हणजे कुठं तरी जाऊन सुट्टी व्यतीत करायची असते. म्हणजे शूज नाहीतच. झारा हिरमुसते. पण तेवढ्यात तिच्या वडिलांनी विकत आणलेले शूज तिला मिळतात. हुश्श. अगदी आजही मी खेड्यात फिरतो तेव्हां माणसं जोडे हातात घेऊन चालताना पहातो. पाय झिजलेले परवडतात, जोडे झिजलेले परवडत नाहीत, नवे जोडे घ्यायला पैसे नसतात.
जगात ८ अब्ज माणसं आहेत. २० अब्ज जोडे तयार होतात. पैकी एक अब्ज जोडे धावपटूंसाठी तयार केले जातात. त्यात हे ५०० डॉलरचे. ज्यांना पैशांच्या शर्यतीत जायचंय त्यांच्यासाठी ५०० डॉलरचे जोडे. शर्यतीत ज्यांना जायचं नाहीये आणि ज्यांचे महिन्यातल्या उत्पन्नाचे हिशोब डळमळीत असतात त्यांच्यासाठी हे जोडे नाहीत. ५०० डॉलरच्या जोड्यांची स्पर्धाच वेगळी. त्यात धावणारेही वेगळे. हां. मून स्टार शूज नावाचे शूज आहेत. अँटोनियो वियेत्री नावाचा इटालियन चांभार हे शूज तयार करतो. त्यात २४ कॅरटचं सोनं वापरलेलं असतं. त्या जोड्याची किमत असते दोन कोटी डॉलर. ते जोडे घेणारेही लोक आहेतच. ते जोडे वापरणार्यांचं किंवा प्रतिष्ठा दाखवण्यासाठी ते जोडे बाळगणार्यांचं एक जगणं असतं. माजीद मजिदीला वियेत्रीचे जोडे वापरणार्या स्त्रीवर फिल्म करायला सांगितलं पाहिजे. मजा येईल.