अगदी वाजत गाजत गवगवा करीत ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट गद्दारीच्या पूर्वसंध्येला काढला. आपण गद्दारी करणारच आहोत, त्यापूर्वी स्वत:ला प्रोजेक्ट करून प्रतिमेपेक्षा चित्र मोठे करण्याच्या हेतूने धर्मवीर आनंद दिघे या नावाची पुण्याई कॅश करून स्वत:ला दिघे साहेबांचे स्वयंघोषित पट्टशिष्य म्हणून सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे हा चित्रपट. दिघेसाहेबांच्या पडद्याआड स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्याचा पब्लिसिटी स्टंट म्हणजे हा चित्रपट! कारण एकनाथ शिंदे यांच्या नावाचा चरित्रपट अजिबात चालला नसता, हे निर्माते, व पडद्यामागील फायनान्सर यांना चांगलेच ठाऊक होते. दिघेसाहेबांनी दोन पिढ्यांवर गारूड केले होते. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे लाखो शिवसैनिक होते व आहेत. त्यांच्या भावनांना हात घालून प्रेक्षक खेचून आणायचा व मग आपले तुणतुणे वाजवून स्वत:ची आरती ओवाळून घ्यायची व बंडखोरीपूर्व वातावरणनिर्मिती करण्याचा तो केविलवाणा प्रयत्न होता.
ज्यांना दिघे साहेबांचा सहवास लाभला होता ते साहेबांच्या आठवणींना उजळा देण्यासाठी मोठ्या संख्येने आले. नवीन पिढी, ज्यांनी दिघे साहेबांची महती ऐकली आहे, परंतु त्यांना प्रत्यक्ष योग आला नाही, ते दिघेसाहेबांना अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने आले. शिवसेनेचे आमदार, खासदार नगरसेवक व चाहत्यांनी शोचे शो बुक केले. मोफत चित्रपट पहायला मिळतो, म्हणून झुंडीच्या झुंडी तुटून पडत होत्या. चित्रपट हाऊसफुल्ल करण्याचे टार्गेटच पडद्यामागच्या सूत्रधाराने दिले होते. मी दिघेसाहेबांच्या प्रेमापोटी दोनवेळा पन्नास-पन्नास लोकांना स्वखर्चाने चित्रपट दाखवला होता. एकनाथ शिंदे यांच्या १५ वर्षे आधीपासून मी दिघेसाहेबांच्या सहवासात होतो. या चित्रपटात धोबी आळीतील चाळीतील डगमगणार्या जिन्याचे घर निर्मात्याने दाखवले असते, त्यांच्या मातोश्रींचे ओझरते का होईना दर्शन घडवले असते तर त्या कर्त्या-नाकर्त्याला दिघेसाहेब कळले, असे मी मानले असते.
हा चित्रपट पाहून मला तर मन:स्तापच झाला होता. स्वत:चे उदात्तीकरण करण्याच्या नादात त्यांनी दिघेसाहेबांचे किती अवमूल्यन केले सांगू? पवित्र आनंद आश्रम ज्यात दिवसरात्र जनता दरबार भरायचा, तिथे तलवारी, लाठ्या काठ्यांचा साठा दाखवून तो दहशतवाद्यांचा अड्डा असे विचित्र चित्र रेखाटले. आनंद आश्रम हा टॉर्चर रूम वाटावा, असे चित्रिकरण केले गेले. लाचखोर नगरसेवकाचा गळा आवळून विहिरीच्या काठावर दाबून मारणारे दिघेसाहेब दाखवून निर्मात्याने काय मिळवले? शेवटच्या प्रसंगात तर ‘दिघे साहेबांनी अशा प्रकारे कित्येक लोकांना गाडले’ असे दर्शवून आनंद आश्रम म्हणजे कब्रस्थान असल्याचा संदेश पसरवला. दिघेसाहेबांच्या नजरेतच इतकी धमक होती की भल्याभल्या भाईंची चड्डी ओली व्हायची. एक इरसाल शिवी हासडली तरी थरकाप व्हायचा, ते दिघेसाहेब मारामारी करणार का?
‘कुठे गेला तो एकनाथ!!’ हे वाक्य ऐकूनच कसे तरी वाटते. म्हणजे एकनाथशिवाय दुसरा कोणीच नव्हता की काय? की दिघेसाहेबांचे त्याच्यामुळे काम अडावे? दुसरा प्रसंग दिघेसाहेब हॉस्पिटलमध्ये असतानाचा. कोणीतरी बाळासाहेबांना ‘दिघेसाहेब डॉक्टरांचा सल्ला झुगारून रूग्णालयातून बाहेर पडत आहेत’ असे कळवताच बाळासाहेबांचा फोन डॉक्टरांना येतो व ते तो दिघेसाहेबांना देतात. त्यामुळे दिघेसाहेबांचा नाईलाज होतो. ते माघारी फिरत असताना, बाळासाहेबांना हे कोणी कळवले म्हणून चरफडत सर्वांना विचारतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या सबबी सांगून वेळ मारून नेतात. मात्र एकनाथ शिंदे नावाचे पात्र काय म्हणतं? साहेब मी तर बिल भरायला गेलो होतो? दिघे साहेबांना डिस्चार्ज मिळण्यापूर्वी ठाण्यातील कोणता डॉक्टर बिल मागेल? डॉ. तांबे तरी तसे करणे शक्य नव्हते. मग ‘मी तर बिल भरायला गेलो होतो’ हे त्या पात्राच्या तोंडून बोलणारे एकनाथ शिंदे दर्शवतात की मीच दिघेसाहेबांचा फायनान्सर होतो. त्यावेळी शिंदे तर साधे नगरसेवक होते. तरी स्वत:कडे मोठेपणा घेण्यासाठी हे वाक्य त्या पात्राच्या तोंडी कोंबले आहे. हा किती थिल्लरपणा!
मी यापूर्वीच्या लेखांत वारंवार आव्हान दिले आहे की, दिघेसाहेबांचे सिंघानियात निधन झाले त्याक्षणी एकनाथ शिंदे तिथे नव्हतेच. ते नंतर आले. त्यामुळे दिघेसाहेबांचे निधन झाल्यानंतर जी जाळपोळ झाली त्या पेटत्या रुग्णालयातून सिनेमातील एकनाथ शिंदेंच्या पात्राने तो मृतदेह खांद्यावर घेऊन रूग्णालयाखाली आणला? किती हा खोटारडेपणा? साहेबांचा मृतदेह रूग्णालयाच्या कर्मचार्यांनी व पोलिसांनी खाली आणला होता, हे सत्य जाणणारे प्रत्यक्षदर्शी अजून जिवंत आहेत.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी नदीकिनारी साजरा केलेली शिष्यपौर्णिमा हीदेखील अशीच तद्दन खोटी व नाटकी. या चित्रपटाच्या अखेरीस दिघेसाहेबांच्या निधनाबाबत संशय निर्माण करणारे वक्तव्य म्हणजे यांच्या मनातील मातोश्रीबाबत खदखदणारे विषच ओकले आहे. इतकी तोडफोड करून बनवलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट कमी म्हणूनच की काय आता गद्दारीचे समर्थन करण्यासाठी भाग दोन निघणार आहे. या भाग दोनकडे लोक ढुंकूनही फिरकणार नाहीत.