पंचांगांमध्ये विनोद असतो असे म्हणणार्या कुणीही वेड्यातच काढील. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्रे, सणवार, राशीभविष्य, तेजी-मंदी, पाऊसपाणी, विवाहमुहूर्त, उपनयन-मुहूर्त इ. दाखविणारे आणि पानोपानी उगळणींच्या पाढ्यांप्रमाणे रकानेच्या रकाने भरणारे एक रुक्ष पुस्तक, त्यात विनोद कसला असणार? वेड्याखेरीज कोण त्यास विनोदाचे पुस्तक समजणार? परंतु थांबा, सध्याच मला वेड्यात काढू नका. हा लेख पूर्ण वाचल्यानंतर ते ठरवा.
प्रथम पंचांगातील वृष्टियोग किंवा पर्जन्यविचार हे प्रकरण पहा. त्यात रोहिणीपासून तर स्वाती नक्षत्रांपर्यंत पावसाचे अंदाज दिले आहेत. ग्रहांच्या आणि राशींच्या युतींमुळे होणारे कमी-अधिक पावसाचे अंदाज पंचांगामध्ये असतात. त्यात खरे-खोटेपणा किती हा प्रश्न वेगळा. बहुधा ते अंदाज खोटेच ठरतात. म्हणून मागील काही वर्षांपासून पंचांगकर्त्यांनी `शेतकरी वर्गाने त्या त्या वेळचा आपले भागातील प्रत्यक्ष अनुभव व परिस्थिती पाहूनच पेरणीचे व इतर निर्णय घ्यावेत’, अशा सूचना आपापल्या पंचांगांत देणे सुरु केले आहे. `पंचांगामध्ये पावसाचे दिवस दिलेले असतात परंतु पंचांगाचे पुस्तक पिळल्यास एक थेंबही पाणी मिळत नाही,’ असे उद्गार लोकमान्य टिळकांनी कधीतरी काढल्याचे माझ्या वाचनात आहे. या उद्गारावरून पंचांगातील पावसाच्या अंदाजाची व्यर्थताच दिसते.
पंचांगकर्त्यांनी पावसाचेही तरणा पाऊस, म्हातारा पाऊस, सासूचा पाऊस, सुनेचा पाऊस, आंधळीचा पाऊस असे प्रकार केलेले पाहून खूप गंमत वाटते. पुनर्वसु नक्षत्राचा पाऊस म्हणजे तरणा पाऊस तर पुण्यनक्षत्राचा पाऊस हा म्हातारा पाऊस, मघा नक्षत्रामध्ये सासूंचा पाऊस तर पूर्वा नक्षत्रात सुनांचा पाऊस, हस्त नक्षत्रांत हत्तीचा पाऊस तर चित्रा नक्षत्रांत आंधळीचा पाऊस. अशा प्रकारे पावसातही तरुण म्हातारा सासू, सुना, आंधळी इत्यादिकांचा शोध म्हणजे प्रचंड विनोदच नव्हे काय?
नक्षत्रे ही डोळ्यांना दिसणारे स्थिर तारे आहेत, असे ज्योतिषशास्त्र सांगते. परंतु आपल्या पंचांगकर्त्यांनी त्या स्थिर नक्षत्रांना गाढव, मेंढा, म्हैस, कोल्हा, बेडूक, घोडा इ. वाहनांवर बसवून पळायला लावले. बरे, त्यांची ही वाहनेसुद्धा कायम नाहीत. दर वर्षी किंवा एकाच वर्षी अनेकदा ही वाहनेसुद्धा आपसात बदलवितात की नवीन विकत घेतात हे कळत नाही. परंतु त्यांचे वाहनांतर वेळोवेळी होतेच. आता चालू वर्षीची (शके १९४५ सन २०२३-२४) वाहने पहा. (संदर्भ : डॉ. राजंदेकरांचे वैदर्भ पंचांग, नागपूर) रोहिणी-उंदीर, मृग-हत्ती, आर्द्रा-मेंढा, पुनर्वसु-गाढव, पुष्प-बेडूक, आश्लेषा-महिष, मघा-घोडा, पूर्वा-मोर, उत्तरा-हत्ती, हस्त-बेडूक, चित्रा-उंदीर, स्वाती-घोडा. पाहा, यात रोहिणी आणि चित्रा नक्षत्रांचे वाहन उंदीर आहे, मृग आणि उत्तरा यांचे वाहन हत्ती आहे. पुष्य व हस्ती यांचे वाहन बेडूक आहे. या प्राण्यांचा प्रत्यक्ष पावसाशी काय व कसा संबंध आहे, हे कळत नाही.
याखेरीज मुंगूस हे देखील नक्षत्रांचे वाहन आहे. परंतु मागील तीन वर्षांत मुंगूसावर कुणीही स्वार झाले नाहीत म्हणजेच ह्या कालरुप आकाशस्थ नक्षत्रांनाही मानवाने तात्काळ आपल्यासारखे करून त्यांचे मानुषीकरण केले. त्या नक्षत्रांनाही माणूस बनविल्यानंतर मग त्यांना माणसांप्रमाणे घुमविण्यास मोरासारखे पक्षी, गाढव, घोडा, मेंढा, म्हैस, हत्ती यासारखे प्राणी किंवा उंदीर, मुंगूस, बेडूक यासारखे `बीळ’चर प्राणी मानवानेच दिले.
यातही आपली (म्हणजेच मानवाची) हुशारी पहा. प्रागैतिहासिक काळांपासून मानव सतत सुधारणा व प्रगती करीत आहे. रानटी अवस्थेतून पशुपाल, कृषी व वाणिज्य अवस्थांमधून पुढे पुढे जात जात, विज्ञान युग, यंत्रयुग, अंतराळयुग अशी युगांतरे करीत करीत तो आता संगणक युगातून इंटरनेट युगात, डिजिटल युगात आला आहे. आणखीही पुढे जाण्याचा प्रयास चालूच आहे. परंतु आमचे हे काळपुरुष (म्हणजेच ग्रह, नक्षत्रे, राशी इ.) अजूनही रानटी युगामध्येच संचार करीत आहेत, असे वाहनांवरून तरी दिसते. अजून त्यांना मानवाची मोटार कार, बस, रेल्वे, जहाज, आगबोटी, मोटरसायकल, विमाने, हेलिकॉप्टर, अंतराळयाने ही अत्याधुनिक, मानवनिर्मित व स्वयंचलित वाहने माहितच नसावीत असे वाटते. केवढी ही त्यांची परागती! आता तरी त्यांनी मानवांची ही यांत्रिक व अत्याधुनिक वाहने स्वीकारून रानटी युगातून बाहेर यावे, असे वाटते. अर्थात आमचे ज्योतिषी आणि पंचांगकर्तेच त्यांना सुधारू शकतील, यांत शंका नाही.
काळपुरुषांप्रमाणेच आमच्या पंचांगवाल्यांनी एक `काळ स्त्री’सुद्धा निर्माण केली आहे. ती सुद्धा एक विनोदी कथा आहे. प्रत्येक पंचांगात `मकर संक्रांती’ची एक मनोरंजक व सचित्र कहाणी असते. मकर-संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. या प्रवेशाची म्हणजेच संक्रमणाची वेळ (किंवा काळ) ही केवळ `वेळ’ न राहता ती एक असूरमार्दिनी देवता बनविली. कोणत्याही पंचांगातील चित्रांत पहा. दोन देवता एका राक्षसास मारतांना दिसतात. सूर्याच्या मकर संक्रमणाची ही वेळ. परंतु त्या वेळेलाच पंचांगवाल्यांनी देवता बनविले आणि मग त्या देवतेचे प्रतिवर्षी नवनवीन वाहन (अर्थात् प्राणीच), आयुध, वस्त्र, खाद्य, इत्यादींनी अलंकृत दर्शन आपल्यास घडवितात.
फार कशाला, चालू वर्षीच्या (शके १९४५, सन २०२३-२४) संक्रांतीचे पंचांगातील वर्णनच पहा. या संक्रांतीचे वाहन अश्व व उपवाहन सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले आहे. हळदीचा तिलक लावला. हातात भाला घेतला. चित्रान्नभक्षण करते. सुवासार्थ दुर्वांकुर धारण केले. सोन्याचे अलंकार धारण केलेत. जातीने विप्र असून वयाने वृद्ध आहे. ती बसलेली आहे. तिचे वार नाव घोरा तर नक्षत्रनाव महोदरी आहे. तिच्या आगमनाचे सामुदाय मुहूर्त १५ आहेत. (म्हणजे काय कोण जाणे?) ही संक्रांती उत्तरेकडून येते व दक्षिणेकडे जाते. नैऋत्येकडे पाहते. ती ज्या दिशेकडून येते तिकडील लोकांना सुख मिळते. पीडा होते. संक्रांती पर्वकाळात स्नान, दानधर्म आदी पुण्यकृत्ये केल्यास त्याचे फळ शतगुणित होते.
या पर्वकाळांत जी दाने दिली जातात, ती भगवान सूर्यनारायण आपल्यास जन्मोजन्मी नित्य देतो (संदर्भ : डॉ. राजेंदेकरकृत वैदर्भ पंचांग : शके १९४५). आहे की नाही गंमत? अर्थात या संक्रांतीफलांवर कुणीही विश्वास ठेवीत नाहीत. संक्रांतीकाळात कुणीही दान देत नसून परस्परप्रेमवृद्ध्यर्थ भेट म्हणून उपयोगी वस्तू देतात. पंचांगातील हे संक्रांतीफल कुणीही वाचत नाही, परंतु पंचांगवाले अत्यंत निष्ठेने हे संकरांती फल प्रतिवर्षी पंचांगांत देतातच.
मानवी स्वभाव हा मूलत:च विनोदप्रिय तर आहेच, पण तो विनोदीही आहे. तो सगळ्यांनाच आपल्यासारखे बनवितो. (आपणांसारखे करितो तात्काळ) निर्गुण-निराकार परमेश्वराससुद्धा त्याने सगुण साकार व मानवी बनविण्याचे सोडले नाही. तिथे ग्रह, नक्षत्रे, संक्रांतीची काय कथा? हिमालयादी पर्वतांना आणि गंगा-यमुनादि नद्यांनासुद्धा मानवाने मानवाप्रमाणे चालते-बोलते केले. सर्वच पुराणांमध्ये चालत्याबोलत्या पर्वत व नद्यांच्या भरपूर अद्भुत कथा आहेत. मग आमचे पंचांगवालेच कसे मागे राहतील? तेही ग्रह नक्षत्रे राशी सगळ्यांना प्राण्यांवर बसवून वाटते की- घुमवितात म्हणून म्हणावेसे वाटते की – पंचांगांमध्येसुद्धा असा अक्षरश: प्रचंड विनोद.