साधारण १९८२चा सुमार असावा. फिल्मसिटीत ‘सौतन’चे शूटिंग चालू होते. आपली लाडकी पत्नी रुकू (टीना मुनीम) हिच्यापासून दुरावला गेलेला श्याम (राजेश खन्ना) सैरभैर होऊन जातो. मनातले वादळ शांत करण्यासाठी गोपालकाकांच्या (श्रीराम लागू) घरी त्यांच्या स्टेनो मुलीला राधाला (पद्मिनी कोल्हापुरे) भेटायला येतो, असा सीन शूट होत होता. काही केल्या राजेशला तो सीन देता येत नव्हता. सलग तीन दिवस त्याने त्या सीनसाठी घालवले. दिग्दर्शक सावनकुमार टाक नाराज झाले.
चौथ्या दिवशी ते राजेशच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले, तर त्याने तिथेच हलका ‘डोस’ लावायला सुरुवात केली होती. सावनकुमारनी त्याला स्वतःला सावरायला सांगितलं. काही वेळ नि:शब्द शांततेत गेले. त्याचे डोळे गच्च भरून आले होते, चेहरा विमनस्क झाला होता, केस अस्ताव्यस्त झाले होते. तो हलकेच उठला आणि सावनकुमारना काही कळण्याआधी त्यांना घट्ट मिठी मारली. तो लहान मुलांसारखा ढसाढसा रडला. त्याला शांत व्हायला बराच वेळ लागला. त्यानंतर काही मिनिटांत तो बाहेर आला आणि एका फटक्यात त्याने शॉट ओके केला. कुणाशीही न बोलता सेटवरून तडकाफडकी निघून गेला.
या छोट्याशा सीननंतर स्क्रीनप्लेतले दृश्य असे होते की श्याम बाहेरून दार वाजवतो आणि राधा दाराआड असूनही दार उघडत नाही. श्याम खूप गयावया करतो, ‘आज माझ्या मनातले वादळ शांत झाले नाही, तर माझ्या आयुष्याची नौका कधी तरणार नाही’ असं रडवेल्या स्वरात आर्जव करतो पण रुकू आपल्यावर रागावेल आणि आपल्यामुळे श्यामचा संसार उद्ध्वस्त होईल, म्हणून राधा काळजावर दगड ठेवते. ओलेत्या डोळ्याने थिजून उभी राहते, पण काही केल्या दार उघडत नाही. पुढच्या तीन सीनमध्ये श्याम तिथेच घराभोवती फिरत राहतो, असे दृश्य होते. यानंतर दोन दिवसांनी सावनकुमारनी फक्त तीन दिवसांत या सीन सिक्वेन्सला जोडून असणारं ‘जिंदगी प्यार का गीत है…’ हे संपूर्ण गाणं कोणतेही रिटेक न होता शूट केलं.
या गाण्याचे शूटिंग सुरू असताना राजेश खूप अस्वस्थ होता, त्याला सीननंतर काही सुचत नसायचे. तो एकदम अबोल होऊन जायचा. स्वतःत मग्न होऊन राहायचा. त्याची ड्रेसिंग रूम शूटिंगच्या ब्रेक टाइममध्ये सिगार स्मोकच्या धुराड्यात कन्व्हर्ट होऊन जायची.
काही महिन्यांनी ‘सौतन’ पूर्ण झाला. ३ जून १९८३ ला रिलीज झाला. सिनेमा सुपरहिट झाला, पण राजेश खन्नाला याचा फारसा फरक पडला नव्हता. यामागचे कारणच तसे होते. तो या काळात प्रचंड तणावाखाली होता. त्याचे आणि डिम्पलचे नाते उसवले होते आणि त्याचे सिनेमे पडत होते. त्याला सुपरस्टारडमची फिकीर नव्हती, पण त्याला मायेचा आधार हवा होता. त्याला डोकं टेकवायला छाती हवी होती. हिट सिनेमे नसले तरी चालेल, पण हक्काचं माणूस जवळ हवं होतं. या काळातल्या तारखा सांगतात की १९८२मध्येच अनिता आडवाणी त्याच्या अत्यंत निकट आली. राजेश तिच्यासोबत ‘आशीर्वाद’मधे राहू लागला आणि डिम्पलने वेगळी चूल मांडली. पुढे १९८३मध्ये तिने इंडस्ट्रीत कमबॅक देखील केले. ‘सौतन’मध्ये जे सिनेमात दाखवले गेले होते, ते त्याच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने प्रत्यक्षात घडले होते. नेमके तेच त्याला सहन होत नव्हते आणि त्या विशिष्ट सीनला तो अडखळत होता, कारण त्यानंतरचे गाणे त्याच्या काळजावर वार करून गेले होते… किशोरदांनी गायिलेले ते अजरामर गीत होतं, ‘जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पडेगा…’
या गाण्यातील प्रत्येक शब्दातून त्याच्या अंत:करणाला हजारो दंश होत होते, त्यामुळे खचून गेलेल्या राजेशकडून साँग सिक्वेन्सच्या आधीचा हा सीन काही केल्या नीट होतच नव्हता. पण ज्या दिवशी त्याने सावनकुमारला मिठी मारली त्या दिवशी त्याच्या मनातले मळभ दूर झाले. त्याच्या मनातील ओझे थोडेफार का होईना, पण कमी झाले. मग तो उर्वरित शूटिंगला आत्मविश्वासाने सामोरा गेला.
एकटेपण वाईट असतं. आपल्या मनातील भावना बोलून दाखवण्यासाठी किमान एक तरी जवळचं माणूस प्रत्येकाजवळ अखेरपर्यंत असावं. राजेश खन्नाकडे हे भाग्य नव्हते. त्याचा एकांतवास हाच त्याचा सर्वात मोठा मित्र झाला होता. राजेशच्या अखेरच्या दिवसात डिम्पल त्याच्या जवळ आली खरी, पण मने इतकी दुभंगली होती की त्याने अनिताला आयुष्यातून बाहेर काढले नाही आणि डिम्पलला काळजाच्या उंबरठा पुन्हा ओलांडून आत येऊ दिले नाही.
१९६९ला ‘आराधना’ ब्लॉकबस्टर हिट झाला आणि त्यानंतर हा देखणा गुणी अभिनेता एकांताच्या जीवघेण्या सापशिडीतून कसा खाली येत गेला हे कोणाला कळलेच नाही.
‘जिंदगी प्यार का गीत है’खेरीज राजेश खन्नाची आयुष्यावर, प्रेमावर भाष्य करणारी आणखी बरीचशी गाणी गाजली त्यातल्या काही गाण्यांची नोंद घेणं अनिवार्य ठरतं. पैकी एक होतं, ‘हमें तुमसे प्यार कितना…’ हे गाणं! १९८२मध्ये राजेश, हेमाचा ‘कुदरत’ रिलीज झाला होता आणि त्याने तुफान गल्ला गोळा केला होता. ‘हमें तुमसे प्यार कितना…’ मेल आणि फिमेल व्हर्जनमध्ये होतं. किशोरदांनी राजेश खन्नासाठी गायलेलं व्हर्जन खूप लोकप्रिय झालं, मात्र अरुणा इराणीसाठी बेगम परवीन सुलताना यांनी गायलेलं गीत तुलनेने कमी ऐकलं गेलं. १९८३मध्ये बेस्ट फिमेल सिंगरचा पुरस्कार परवीन सुलताना यांना याच गाण्यासाठी मिळाला आणि बेस्ट मेल सिंगरसाठी याच गीतासाठी किशोरदा नॉमिनेट झाले होते, मात्र त्यांना पुरस्कार लाभला नाही. परवीन सुलताना यांनी गायलेल्या गीतामधले बोल आणि किशोरदांच्या गीतामधले बोल भिन्न होते. तरीही ही गाणी एकच समजली गेली, कारण मुखडा एकच होता. आजही प्रेमवीरांचं ते आवडीचं गीत आहे, गतपिढीचे तर ते फेवरिट आहेच आहे! या गीतातला गोडवा अवीट आहे. प्रेम करणार्या हरेकास ती आपलीच दास्तान वाटते हे याचे यश! ‘कुदरत’मध्ये राजेश, हेमाच्या जोडीला ते शोभूनही दिसलं होतं. विशेष म्हणजे हा सिनेमादेखील खन्नाच्या डाऊनफॉलच्या काळातलाच होता!
‘अगर तुम ना होते’मध्ये पेशाने छायाचित्रकार असलेला राज बेदी (राज बब्बर) आकर्षक राधाला (रेखा) भेटतो, दोघेही प्रेमात पडतात आणि लग्न करतात. लग्नानंतर काही काळातच राजचा अपघात होतो. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येते. तो बरा होतो, पण त्याच्या पायात संवेदना राहत नाहीत. तो व्हीलचेअरवर जखडून जातो. त्याच्या उपचाराचा खर्च वाढत जातो आणि अपघाताने त्याची नोकरीही गेल्यामुळे राधाला श्रीमंत उद्योगपती अशोक मेहरा (राजेश खन्ना) यांच्या एकुलत्या एक मुलीसाठी बेबीसिटरची नोकरी करावी लागते. राज या पर्यायी व्यवस्थेमुळे खूश असतो. त्याच्या पायांची स्थिती सुधारावी म्हणून आधी स्थानिक आणि नंतर विदेशी उपचारासाठी तो उत्सुक असतो. मात्र याच काळात आपल्या पत्नीच्या चारित्र्याविषयी त्याला संशय येऊ लागतो, पण तो तसे बोलून दाखवत नाही. सिनेमाच्या शेवटी योगायोगाने तो अशोक मेहरांच्या वॉलेटमध्ये राधाचा फोटो पाहतो, त्याला धक्का बसतो! पत्नीवरचा संशय खात्रीत बदलतो! अशोक त्याला रहस्य सांगतात, मग सार्या गोष्टींचा उलगडा होतो! अशोकची मृत पत्नी दिसायला राधासारखी असते आणि त्याची मुलगी मिनी हिला वाटायचे की तिची स्वर्गवासी आईच घरी परतली आहे! याच कारणापायी अशोक मेहरांनी राधाला कामावर ठेवलेलं असतं. आपण राधावर संशय घेतला याचा राजला पश्चात्ताप होतो. अशोकला काही काळासाठी मिळालेली पत्नीची छबी पुन्हा दुरावते!
१९९३मधल्या या सिनेमात देखील अप्रत्यक्षपणे राजेश खन्नाच्या व्यक्तिगत आयुष्यातले सीन्स चितारले गेले होते, हा विलक्षण दुर्दैवी योगायोगच होता! ‘हमें और जीने की चाहत न होती अगर तुम ना होते..’ हे प्रेमगीत एखाद्या प्रतिज्ञेसारखं वाटतं! आजही याची जादू टिकून आहे, मात्र ज्या राजेश खन्नावर हे चित्रित झालं त्याला प्रेमाचे सुख मिळाले नाही! तरीही त्याची तक्रार नव्हती, त्यानं ते बंद भिंतीआड सोसलं, रिचवलं!
१९७० मध्ये प्रदर्शित झालेला ‘सफर’ नेहमीच हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक म्हणून लक्षात राहील. यात सुपरस्टार राजेश खन्नासोबत शर्मिला टागोर आणि फिरोज खान होते. ‘आनंद’नंतर राजेश खन्ना पुन्हा एकदा कॅन्सर पेशंटच्या भूमिकेत होता. आय. एस. जोहर यांची विनोदी भूमिका उत्तम रंगली होती आणि शर्मिलाने तिची भूमिका अगदी कणखर साकारली होती. नेटकेपणाने निभावली होती. हा अशा काही मोजक्या चित्रपटांपैकी एक होता, ज्यामध्ये फिरोज खानला अभिनय करण्याची संधी होती आणि त्याने कामही नीटनेटके केले होते. कल्याणजी आनंदजी यांची या चित्रपटातील गाणी अद्वितीय अशी होती. हृदयाला भिडणारी पटकथा, सशक्त अभिनय आणि अर्थपूर्ण सुरेल गाणी यामुळे सिनेमा अफाट गाजला. यात राजेश खन्ना कमालीचा देखणा दिसलेला आणि त्याचा अभिनय हार्ट वॉर्मिंग होता. यातलं ‘जिंदगी का सफर है ये कैसा सफर… ‘ आजही आवडीने ऐकलं जातं. खरं तर ते कमालीचे सॅड साँग आहे, काहीसे डिप्रेसिव आहे तरीही त्यातली लय ओढ लावते, शब्दरचना घायाळ करते!
ऐसे जीवन भी हैं जो जिये ही नहीं
जिनको जीने से पहले ही मौत आ गयी
फूल ऐसे भी हैं जो खिले ही नहीं
जिनको खिलने से पहले फिजा खा गई
या पंक्ती ऐकताना नकळत डोळे पाणावतात आणि मन:चक्षूसमोर राजेशची बोलकी छबी तरळते!
१९७१ सालच्या ‘अंदाज’मध्ये राज (राजेश खन्ना) आणि शीतल (हेमा मालिनी) एकमेकांच्या प्रेमात असतात. पण राजचे वडील (अजित) या नात्याला विरोध करतात. नाईलाजास्तव त्यांचे लग्न साध्या मंदिरात होते. राजच्या वडिलांचा या लग्नाला कडाडून विरोध असतो. परिणामी ते शीतलला स्वीकारण्यास नकार देतात. त्यानंतर राजचा एका अपघातात मृत्यू होतो. गर्भवती असलेली शीतल अपघाताने पुरती उद्ध्वस्त होते. ती दिपूला (अलंकार जोशी) जन्म देते, पोटाची खळगी भरण्यासाठी शीतल नोकरी शोधू लागते. तिला शिक्षिका म्हणून नोकरी मिळते. तिच्या विद्यार्थ्यांमध्ये मुन्नी नावाची एक मुलगी असते, तिचे वडील रवी हे (शम्मी कपूर) विधुर असतात. त्यांची नि शीतलची मानसिक परिस्थिती सारखीच असल्यामुळे ते खूप जवळ येतात आणि शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण रवीची आई (अचला सचदेव) या लग्नाला विरोध करते आणि शीतलचे चारित्र्य संशयास्पद असल्याचा आरोप करते. दरम्यान गावातली एक तरुणी महुवा (अरुणा इराणी) आत्महत्या करते. गावकरी रवीला या घटनेसाठी जबाबदार धरतात! कारण महुवाचे त्याच्यावर एकतर्फी प्रेम असते! हा सिनेमाही गाजला, ट्रॅजेडी स्टोरी असूनही लोकांनी भरभरून प्रेम दिलं! सिनेमाच्या सुरुवातीलाच ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना….’ हे उडत्या चालीचं गाणं होतं. यातले बोल शब्दशः खरे ठरले. राजेश खन्नाच्या जीवनाचा प्रवास चढउताराचा राहिला. सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरत झुलत राहिला. त्यात अनेक टोकदार घटना घडल्या, तो अक्षरशः एकाकी पडला! त्याच्या आयुष्याचा सफर सरळसाधा राहिलाच नाही, नित्य वळणे येतच गेली. त्याला झुंजवत राहिली!
पतीपत्नीच्या नात्यातील संशय कल्लोळावर बेतलेल्या ‘आप की कसम’मधल्या ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम वो फिर नहीं आते…’ या गीतात जीवनाचं मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे, जे आजही अनेकांच्या काळजाचा ठाव घेतं. ‘आनंद’मधल्या ‘जिंदगी कैसी ये पहेली..’ हे गाणं राजेश खन्नाच्या आयुष्याला लागू पडतं. एखाद्या कोड्यासारखं त्याचं आयुष्य होतं!
२०११मध्ये त्याने हेवेल्स पंख्याची जाहिरात खास त्या अॅयड एजन्सीतील लोकांच्या जुन्या ऋणापोटी केली आणि त्याचा खंगलेला देह जगापुढे आला. सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्याच्या आजारपणाच्या आणि एकटेपणाच्या बातम्या सगळीकडे येऊ लागल्या. दरम्यान डिम्पल त्याच्याकडे परतली. पण तोवर सगळे संपले होते. त्याचे मन मरून गेले होते. उरला होता तो त्याचा जराजर्जर देह, जो दारू सिगारेटच्या आधीन झाला होता. शेवटच्या काही वर्षात तर तो महिनोनमहिने अनिताशिवाय कुणाशीही बोलत नव्हता, कुणाला भेटत नव्हता. एक सुपरस्टार भिंतींशी बोलायचा आणि अलिशान बेडवर सताड उघड्या डोळ्यांनी सुन्न होऊन छताकडे बघत पडून राहायचा…
…राजेशची ही दास्तान आठवली तरी ‘सौतन’मधले त्याचेच गाणे आठवते जिथे तो अडखळला होता. एकटेपणाच्या भयाण भीतीने कोलमडला होता आणि त्याची ती भीती दुर्दैवाने खरी ठरली होती. ‘जिंदगी प्यार का गीत है..’ हे तर खरेच आहे पण ‘जिंदगी एक बनवास है काट कर सबको जाना पडेगा…’ हे जास्ती खरे आहे.
‘सौतन’ सगळीकडे प्राइम थिएटर्समध्ये रिलीज झाला होता. अलिशान बादशाही थियेटर असं त्यांचं वर्णन केले जाई. राजेशचे रुबाबदार श्रीमंती थाटातल्या भूमिकांमधले सिनेमे पाहताना इथे वेगळेच फील येत. त्याच्या खासमखास स्पेशल चाहत्यांचे इथे हमखास दर्शन होई. तरुणींसह पोक्त महिला वर्गाची उपस्थिती नजरेत भरेल अशी असे. त्या मानाने टुकार पोरे कमी असत. कॉलेजकुमारांचा भरणा बर्यापैकी असे. बाल्कनीचे पब्लिक वेगळ्या क्लासचे असे. ड्रेस सर्कल बारमाही फुल्ल असे. हेच सिनेमे मॅटिनीला लागल्यावर मग तर कहर होई. अख्ख्या शहरातले चाहते ग्रूप करून होर्डिंगला मोठाले हार घालत आणि एन्ट्रीला भरघोस चिल्लर उधळत. सुपरहिरो होता तो, त्याच्यावर सर्व वर्गातले लोक जीव टाकत. खन्नाचा रोमँटिसिझम देसी पब्लिकसाठी ड्रीम डेस्टिनेशन होता. असाध्य स्वप्ने त्यात पाझरली होती. राजेश खन्नाचं उतरत्या वळणाचं आयुष्य भारतीय माणसाला अधिक हळवं वाटत असावं, कारण इथे प्रगती आणि समृद्धीच्या शिड्या खूप कमी लोकांच्या वाट्याला आल्यात. ‘सौतन’चे दुःख मात्र अनेकींच्या वाट्यास आलेले. कारण इथली गरिबी, बेरोजगारी, बकालपणा आणि नाती फुलवण्यासाठी हव्या असलेल्या बहराची गैरहजेरी! त्यामुळेच ‘सौतन’ने जागोजागी सिल्व्हर ज्युबिली साजरी केली होती!! आजही जिंदगी प्यार का गीत ऐकताना मन भरुन येतं! जगणं समृद्ध करण्यात या गाण्यांचा वाटा मोठा आहे. म्हणूनच ‘फील प्राऊड टु से लव्ह बॉलिवुड!’