१७व्या शतकात संत बहिणाबाईंनी, १८व्या शतकात त्रिपुटीच्या शामराजनानांनी, १९व्या शतकात सत्यशोधक तुकाराम तात्या पडवळ यांनी तर विसाव्या शतकात प्रबोधनकारांनी संस्कृत वज्रसूचीचा मराठी अनुवाद केलेला आढळून येतो. ब्राह्मण्यविध्वंसक म्हणून गणली जाणारी वज्रसूची इतकी का महत्त्वाची आहे?
– – –
जो धर्म आचरल्यामुळे हिंदूंचा राजकीय सामाजिक धार्मिक, नैतिक अध:पात एवढ्या अमानुष थराला गेला आहे की एकमेकांच्या माना कापताना देवाची भीती मरो, पण माणुसकीचीही चाड वाटेनाशी झाली आहे, ज्या धर्माने आजचा हिंदू शेळपट व नपुंसक सत्याग्रही बनविला आहे आणि ज्या धर्माच्या जोरावर आज वाटेल तो भट आपल्या जन्माच्या पुण्याईने अखिल भटेतरांवर वर्चस्वाचा टेंभा मिरवतो, तो धर्म अमूलाग्र उखडल्याशिवाय, खर्या सनातन धर्माची प्राणप्रतिष्ठा होणेच शक्य नाही. हिंदूंचे प्रचलित धर्मप्रेम म्हणजे प्राण निघून गेलेल्या मढ्याला मारलेल्या मिठ्या होत. ब्राम्हणांना या मढ्याचे मोठे प्रेम वाटत असेल तर ते त्यांच्या गळ्यांत वंशपरंपरागत अडकवून अखिल ब्राम्हणेतरांनी खर्या धर्माच्या जीर्णोद्धराचा सवता सुभा उभारवा हेच श्रेयस्कर आहे. हे प्रबोधनकारांचे उद्गार आहेत.
आता आचरला जाणारा हिंदू धर्म हा खरा धर्म नाहीच. जातिभेद, अस्पृश्यता, ब्राह्मणी वर्चस्व, महिलांवरील अन्याय, अंधश्रद्धा या गोष्टी धर्माच्या नावाने सुरू आहेत. त्याऐवजी खर्या धर्माचं पुनरुज्जीवन करण्याची गरज प्रबोधनकार सातत्याने करत होते. ब्राह्मण्याभिमान्यांनो, इस्लामी बडग्याचा विचार करा, या स्फुटलेखातला हा तुकडा आहे. खर्या धर्माच्या शोधात प्रबोधनकार पुन्हा एकदा प्राचीन भारतीय वाङ्मयाकडे ओढले जात होते. त्यात रूढ अर्थाने वैदिक वाङ्मय होतंच, पण वेद न मानणार्या बौद्ध विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होताच. पहिल्या वर्षाच्या सोळाव्या अंकात बुद्धदेवांची कामगिरी या लेखात प्रबोधनकार लिहितात, बुद्धदेव आमचेच आहेत. त्यांची धर्मतत्त्वे आमची आहेत. कालविपर्यासामुळे आम्ही आजवर बुद्धदेवाला विसरलो होतो. आज त्यांची आम्हांला आठवण झाली. हिन्दुस्थान बुद्धदेवांचा आहे. बुद्धदेव हिन्दुस्थानचे आहेत. ते हिन्दूराष्ट्राला कसे विसरतील? भगवान गौतम बुद्धांनी नवमतवादाची मांडणी करून प्राचीन भारतीय जनतेला भिक्षुकी जाचातून मोकळं केलं, असं प्रबोधनकारांना वाटतं. तत्कालीन ब्राह्मण–ब्राह्मणेतर वादाच्या पार्श्वभूमीवर भगवान बुद्ध हे क्षत्रिय असल्याचं आवर्जून अधोरेखित करायला ते विसरत नाहीत. खर्या धर्माच्या शोधात त्यांचा प्रवास याच भगवान बुद्धांच्या प्रेरणेतून लिहिल्या गेलेल्या ‘वज्रसूची’ या संस्कृत ग्रंथापर्यंत पोचला. या छोट्याशा ग्रंथाचा मराठी अनुवाद करून त्यांनी ‘प्रबोधन’मध्ये एकदा नाही, तर दोनदा छापला आहे.
‘प्रबोधन’च्या पहिल्या वर्षाच्या चौदाव्या अंकात हा अनुवाद ‘वज्रशुची’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे. पण तो अर्धाच आहे. या अनुवादाचा पुढचा भाग अनुवाद करायचा राहून गेला की छापणं राहून गेलं, हे आज कळायला मार्ग नाही. पण या अनुवादाच्या पहिल्या भागानंतर जवळपास साडेचार वर्षांनी डिसेंबर १९२५च्या ‘प्रबोधन’मध्ये वङ्कासूचीचा पूर्ण अनुवाद छापलेला आहे. या लेखात अनुवादकाचं नाव नाही. तो काळ संपादकाने संपूर्ण अंक एकटाकी लिहिण्याचा होता. त्यामुळे ज्या लेखावर लेखकाचं नाव नाही, तो लेख संपादकाने लिहिला आहे, असं मानण्याचा शिरस्ता होता. त्यानुसार हा अनुवाद प्रबोधनकारांनी केल्याचं मानायला हवं. फक्त याच एका आधारावर नाही, तर या अनुवादाची भाषाशैली बघता तो प्रबोधनकारांनी केलाय, याविषयी शंका उरत नाही.
प्रबोधनकारांनी हा अनुवाद कशाच्या आधारे केला हे काही सांगितलेलं नाही. पण ब्रायन हडसन या नेपाळमधल्या ब्रिटिश अधिकार्याने १८२९ साली वज्रसूची आणि त्याचा अनुवाद पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला होता. नंतर लक्षात आलं की पारंपरिक वज्रसूचिकोपनिषदाशी त्याचं साम्य आहे. त्यामुळे मूळ अश्वघोषांनी लिहिलेली वज्रसूची नंतर काही बदल करून उपनिषद म्हणून स्वीकारली गेली असेल, असं मत सर्वमान्य झालं. प्रसिद्ध १०८ उपनिषदांमध्ये वज्रसूचीचा ३६वा नंबर आहे. परंपरेने या उपनिषदाचं कर्तेपण आद्य शंकराचार्यांकडे दिलं जातं, पण अभ्यासक त्याला मान्यता देताना आढळत नाहीत. इंग्रजी अनुवादानंतर पुढच्या साधारण शंभर वर्षात जगभरातल्या अनेक भाषांमध्ये या वज्रसूचीचा अनुवाद होत राहिला. इंग्रजीत यावर अनेक विश्लेषणपर ग्रंथ लिहिले गेले.
विशेष म्हणजे यातला एक अनुवाद मराठीतही होता. महात्मा फुलेंचे सहकारी सत्यशोधक तुकाराम तात्या पडवळ यांच्या जातिभेदविवेकसार या प्रसिद्ध ग्रंथात हा अनुवाद समाविष्ट आहे. प्रबोधनकारांच्या जन्माच्या आधी म्हणजे १८६१ साली हा अनुवाद मराठीत आला होता. एकूणच सुधारकी वाङ्मयातला हा एक महत्त्वाचा ग्रंथ असल्यामुळे तो प्रबोधनकारांच्या वाचनात आला असणारच. कारण अगदी तरुणपणात प्रबोधनकार तुकाराम तात्यांनी स्थापन केलेल्या तत्त्वविवेचक छापखान्यात असिस्टंट शास्त्री म्हणजे असिस्टंट प्रुफरिडर म्हणून कामाला होते. पुढे याच छापखान्यात प्रबोधनकारांचा ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हा ग्रंथ छापला गेला होता. अर्थातच प्रबोधनकार नोकरीला असताना तुकाराम तात्या जिवंत नव्हते. पण त्यांच्या वङ्कासूचीच्या विचारांचा वारसा जिवंत होता. तुकाराम तात्यांकडेही हा वारसा संतसािहत्याच्या अभ्यासातून पोचला होता. त्यांनी संत तुकाराम महाराजांची समग्र गाथा प्रकाशित केली होती.
तुकाराम तात्यांच्या साधारण दोनशे वर्ष आधी संत तुकारामांच्या प्रत्यक्ष शिष्य संत बहिणाबाई यांनीही या वङ्कासूचीचा अभंगरूपात अनुवाद केला होता. या तुकारामशिष्या बहिणाबाई म्हणजे खानदेशातल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी नाहीत. संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातल्या थोर संतकवयित्री होत्या. त्यांची मोठी अभंगरचना उपलब्ध आहे. त्यात हा अनुवादही आहे, जो तुकोबारायांच्या प्रेरणेनेच लिहिलेला होता. त्यानंतर जवळपास शंभर वर्षांनी सातारा शहराजवळ असणार्या त्रिपुटी येथील गोपाळनाथ परंपरेतल्या शामराजनाना यांनीही वज्रसूचीचा अनुवाद केला आहे. नाथ संप्रदायातल्या आदिनाथ गुरव यांनीही वज्रसूचीचा अनुवाद केल्याचा उल्लेख डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केला आहे. १७व्या शतकात संत बहिणाबाईंनी, १८व्या शतकात शामराजनानांनी, १९व्या शतकात तुकाराम तात्या पडवळ यांनी तर विसाव्या शतकात प्रबोधनकारांनी वज्रसूचीचा मराठी अनुवाद केलेला आढळून येतो. एकविसाव्या शतकात संस्कृत विदुषी रूपा कुलकर्णी बोधी यांनीही वज्रसूचीचा मराठी अनुवाद केला आहे. जवळपास पाच शतकं वङ्कासूची हा ग्रंथ महत्त्वाचा मानून त्याचा मराठी अनुवाद करावासा का वाटतो, हे समजून घ्यायला हवं.
आचार्य अश्वघोषांचं चरित्र आज आपल्याला माहीत आहे ते त्यांच्या भारतीय भाषांमधल्या नाही, तर चिनी भाषेतल्या चरित्रामुळे. कुमारजीव यांनी त्यांचं चरित्र चीनमध्ये नेलं होतं. त्यानुसार अश्वघोष पहिल्या शतकातले बौद्ध विद्वान होते. ते सम्राट कनिष्काच्या दरबारात मार्गदर्शक होते. कालिदासाच्या आधीचे महान संस्कृत साहित्यिक म्हणून त्यांची नोंद इतिहासाने घेतली आहे. त्यांच्या आधी बौद्ध साहित्य हे प्रामुख्याने पाली आणि अर्धमागधीतून लिहिलं जात होतं. पण अश्वघोषांनी त्यांची रचना ही संस्कृतमधून केली. त्यांच्या इतर अनेक रचना प्रसिद्ध आहेतच, पण त्यात भगवान बुद्धांच्या सर्वात जुन्या चरित्रांपैकी एक असणारं बुद्धचरित सर्वाधिक लोकप्रिय आहे. जगभरातल्या अनेक भाषांमध्ये शेकडो वर्षांपूर्वी त्याचं आणि अश्वघोषांच्या इतर रचनांचंही भाषांतर झालं आहे. त्यामुळे अश्वघोषांचा प्रभाव फक्त भारतावरच नाही, तर आजच्या पूर्व आशियावरही स्पष्टपणे जाणवतो.
या अश्वघोषांनी वज्रसूचीत असं जगावेगळं मांडलं तरी काय, असा प्रश्न उभा राहतो. वज्रसूची हा पहिला ग्रंथ असा होता की त्याने ब्राह्मण्याची अत्यंत कडक भाषेत चिकित्सा केली. हा ग्रंथ पहिल्यांदा छापणार्या ब्रायन हडसन याने वज्रसूचीचा परिचय करून देताना लिहिलं आहे की या ग्रंथात जातव्यवस्थेचा आणि त्याच्या गरजेचा अत्यंत चातुर्यपूर्ण आणि तर्काधिष्ठित प्रतिवाद केला आहे. ब्राह्मण्य हे जन्माच्या आधारे नाही, हा सर्वात महत्त्वाचा दावा करणारा हा ग्रंथ होता. त्यामुळे त्याला ब्राह्मण्यविध्वंसक म्हटलं गेलं. त्यामुळे आपल्या प्राचीन परंपरेचा हात धरून नवमतवाद मांडण्याची इच्छा असणार्या प्रबोधनकारांनी त्याचा अनुवाद केला नसता तरच नवल. हा अनुवाद तुलनेने खूपच त्रोटक असल्यामुळे तसंच दीर्घकाळ पुस्तकरूपाने प्रसिद्ध न झाल्याने दुर्लक्षित राहिला आहे. वज्रसूचीच्या अभ्यासकांनाही या अनुवादाविषयी माहिती असल्याचं दिसत नाही. तरीही तो इतर अनुवादांइतकाच महत्त्वाचा आहे.
हा अनुवाद प्रबोधनकारांच्या शब्दांतच वाचायला हवा. पुढच्या अंकात त्याचा संपादित अंश वाचता येईल.