• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मंगेशकर-ठाकरे ऋणानुबंध!

- योगेंद्र ठाकूर

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2022
in भाष्य
0

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या जरी शिवसेनेत सामिल झाल्या नसल्या तरी मंगेशकर कुटुंबियांना शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांविषयी प्रेम आणि आदर होता. शिवसेनेने लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने मुंबईत एक ऑडिटोरियम बांधले. हे सुरू होण्याआधी बाळासाहेबांनी लता मंगेशकर यांना ते ऑडिटोरियम कसे झाले आहे ते बघण्याचे आमंत्रण दिले होते.
– – –

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबर हा जन्मदिन. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे हे दोघही जागतिक कीर्तीचे मराठी दिग्गज कलावंत. बाळासाहेब राजकारणात होते तरी अखेरपर्यंत त्यांचे आणि लतादिदींशी चांगले संबंध होते. दोघ जेव्हा-जेव्हा भेटत तेव्हा कला-साहित्य-राजकारण या सर्व विषयांवर निखळ चर्चा होत असे. आज दोघही हयात नसली तरी मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबाचे ऋणानुबंध कायम आहेत.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे कला-साहित्य आणि क्रीडा यावर प्रेम सर्वश्रुत आहे. त्या कुठल्याही राजकीय पक्षात नव्हत्या, तरी देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. अगदी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध होते. महाराष्ट्रातील कै. यशवंतराव चव्हाण, कै. प्रमोद महाजन, कै. बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही एक मराठी राजकारणी म्हणून वेगळे नातेसंबंध होते. शिवसेनाप्रमुख हे एक कलावंत, त्यांच्याविषयी असलेला आदर आणि घनिष्ठ संबंध आणि शिवसेनेविषयी असलेल्या काहीशा सॉफ्ट कॉर्नरमुळे शिवसेनेच्या काही कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली आहे. लतादीदी आणि बाळासाहेब हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने भारावलेले सावरकर भक्त होते. स्वा. सावरकरांच्या हिंदुत्त्वाच्या चिवट धाग्याने दोघांमधील संबंध अधिकच घट्ट झाले. मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबियांचे सौहार्दपूर्ण संबंध आगळे-वेगळे होते.
दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या एका वितरण सोहळ्याला शिवसेनाप्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी लता मंगेशकर यांनी खास कृतज्ञता व्यक्त केली. कारण प्रकृती बरी नसल्याने बाळासाहेब कुठेही कार्यक्रमांना जात नव्हते. परंतु माझ्या विनंतीला मान देऊन, माझ्या वडिलांच्या, दीनानाथ मंगेशकरांच्या प्रेमाखातर ते आले. ही आम्हा मंगेशकर कुटुंबियासाठी भाग्याची गोष्ट आहे, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार काढले. लतादीदी, माधुरी दीक्षित आणि बाळासाहेब या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम रंगतदार, बहारदार न झाला तरच नवल!
बाळासाहेबांच्या निधनानंतर एका मुलाखतीत लता मंगेशकर यांनी मंगेशकर आणि ठाकरे कुटुंब यांच्या गहिर्‍या संबंधाच्या आठवणी सांगितल्या. नोव्हेंबर २०१२मध्ये बाळासाहेब खूप आजारी होते, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी बॉलिवूडमधील मंडळी, राजकारणी, उद्योगपती, नेतेमंडळी मातोश्री गाठत असत. परंतु सर्वांना भेटणे शक्य नव्हते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर या ४ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेल्या होत्या. तेव्हा बाळासाहेब लतादीदींना म्हणाले, ‘‘मी आयुष्यभर सर्वत्र हिंडलो, गाव-शहरात फिरलो, तेथील जनतेशी संवाद साधला, सभा घेतल्या. परंतु आता असं बिछान्यावर पडून राहणं मला असह्य वाटतं आहे.’’ त्या दरम्यान बाळासाहेबांचे खाणे-पिणेही खूपच कमी झाले होते. परंतु लतादीदींनी बाळासाहेबांना सूप पिण्याचा आग्रह केला आणि बाळासाहेब सूप प्यायले. लतादिदींनी त्या मुलाखतीत पुढे असेही सांगितले की, ‘‘मी एक कलाकार आहे. कलाकार म्हणून सर्व राजकीय पक्षांशी, पक्षनेतृत्त्वाशी माझे संबंध चांगले आहेत. परंतु मी कुठल्याही पक्षाशी जोडली गेली नाही, हे बाळासाहेबांना चांगले ठाऊक होते. आमच्या अनेक गाठी-भेठी झाल्या. त्यात कला, क्रीडा, साहित्य, राजकारण अशा अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या. पण बाळासाहेबांनी कधी मला शिवसेनेत सामील होण्याचा आग्रह केला नाही. जर बाळासाहेबांनी मला आग्रह केला असता तर, कदाचित मी त्यांना नाही म्हणू शकले नसते, त्यांचा आग्रह मोडू शकले नसते. परंतु बाळासाहेब स्वतः हे उत्तम प्रतीचे कलाकार असल्यामुळे, कलाकार किती संवेदनशील असतो हे जाणत होते. माझे मन ते जाणत होते.
लता मंगेशकर शिवसेनेत सामील झाल्या नसल्या तरी त्यांना शिवसेनेविषयी सॉफ्ट कॉर्नर होता. मंगेशकर कुटुंबियांना शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांविषयी प्रेम आणि आदर होता. लतादीदींचे बंधू ख्यातनाम गायक व संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शिवसेनेचे सभासदत्व स्वीकारले होते. तर त्यांचे चिरंजीव गायक आदिनाथ मंगेशकर हे काही वर्षे युवासेना कार्यकारिणी सदस्य होते. शिवसेना स्थापन झाली तेव्हा पक्षासाठी एका लाखाचे अर्थसहाय्य मंगेशकर कुटुंबाने केले होते, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिली होती.
ठाकरे कुटुंबियांशी सौहार्दाचे संबंध असल्यामुळे शिवसेनेच्या काही कार्यक्रमांना लता मंगेशकर यांनी उपस्थिती लावली होती, तर, शिवसेनेसाठी काही संगीताचे कार्यक्रमही केले होते. १९९८ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे तत्कालीन अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना व भा. वि. सेनेतर्फे अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये लता मंगेशकर संगीत रजनीचे आयोजन केले होते. त्यावेळी संपूर्ण मंगेशकर कुटुंबाने इतर गायकांसह उपस्थित राहून ती मंत्रमुग्ध, कर्णमधुर, संगीतमय संध्याकाळ साजरी केली होती. तर १ मे २०१० रोजी महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने शिवसेनेतर्फे एक भव्य कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात उपस्थित राहून महाराष्ट्र गीतासह इतर गाणी गायली होती.
शिवसेनेने लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने मुंबईत एक ऑडिटोरियम बांधले. हे सुरू होण्याआधी बाळासाहेबांनी लता मंगेशकर यांना ते ऑडिटोरियम कसे झाले आहे ते बघण्याचे आमंत्रण दिले होते. ते बघितल्यानंतर लतादीदींनी त्या ऑडिटोरियमसाठी दीनानाथांचे एक तैलचित्र दिले. ते हॉलच्या दर्शनी भागात लावले आहे.
शिवसेना कशी आहे याचे वर्णन लतादीदींनी २००७ साली एका लेखात केले आहे. त्या म्हणतात, ‘कृषिवरांची, वीरवरांची, देवांची जननी, पतिव्रतांची सद्धर्माची महती पुण्यभूमी’ या अशा पुण्यभूमीत शिवसेनेचा जन्म झाला. म्हणून तिचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ देदीप्यमान असेल यात मला शंका वाटत नाही. स्वातंत्र्यपूर्व लढाईत हिरीरीने भाग घेणारा, लढणारा महाराष्ट्र, स्वातंत्र्यानंतर सुस्तावला होता. मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी बाणा, संस्कृती हरवून बसला होता. ही मुंबई मराठी माणसाची की गुजराती, मारवाडी, पारश्याची, अशा संभ्रमात तो होता. हे मालक आणि आपण नोकर या संभ्रमात तो होता. चाकरमान्याला आवाज नसतो. महाराष्ट्र हा खड्गहस्त आहे या घोषवाक्याला महाराष्ट्र विसरला. तो लाचार दिसला. या लाचारीविरुद्ध पहिली गर्जना शिवसेनेने केली. शिवसेनेच्या नावातच प्रलयकारी शंकर, शिवरायाचे दर्शन होते. संग्रामाचे तांडव प्रतीत होते. जगदंबेचे वाहन ‘व्याघ्रमुख’ शिवसेनेचे बोधचिन्ह आहे. या आवाज हरवून बसलेल्या, झोपी गेलेल्या मराठी माणसाला शिवसेनेने अपार परिश्रम घेऊन जागृत केले. बहिर्‍यांना ऐकू जावा म्हणून स्फोटकांचा स्फोटच करावा लागतो. या निद्रित मराठी मनाला जागृत करण्यासाठी असे वैचारिक प्रस्फोट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आले अन् गमावलेला मराठी बाणा परत मिळाला. मग लोक बॉम्बेला ‘मुंबई’ म्हणू लागले; तर औरंगाबादला ‘संभाजीनगर’ म्हणू लागले. कालची शिवसेना ही एक लहान संघटना महाराष्ट्राची संरक्षक भिंत होती. आजच्या शिवसेनेचे उद्दिष्ट आहे मराठी माणसाने परप्रांतीयांच्या आणि पाश्चात्य संस्कृतीचे विकृत अनुकरण करू नये. छत्रपतींचा भगवा ध्वज पुन्हा एकदा देशावर फडकवावा आणि तोही अक्षय. हे महायुद्ध आहे. जय, पराजयाचा खेळ चालूच राहणार. त्याला आजची शिवसेना निर्धारपूर्वक पुढील वाटचाल करीत आहे.
आजची शिवसेना मराठी मनाचे, मानाचे, आश्वासनाचे संरक्षक असे स्थान आहे. उद्याची शिवसेना कशी असेल? तर ती महाराष्ट्रात असेलच, दिल्लीतही असेल. अटकेपार ध्वज रोवलेली मराठी माणसे आहोत आपण. महाराष्ट्रातून उमटलेली गर्जना सह्याद्रीचे नव्हे हिमालयाचे कडे-कपारे दुमदुमवून टाकणारी असेल. तेव्हा दिल्ली भगवी व्हायला फार वेळ लागणार नाही. माझे हे स्वप्न आहे. शिवसेनाप्रमुखांचेही हे स्वप्न असावे. आम्ही दोघेही कलाकार आहोत. कलाकारांची स्वप्ने जागृतीनंतर कधीच विस्मरणात जात नाही. कारण ती स्वप्नांचा पाठपुरावा करीत असतात. म्हणून ती स्वप्ने कधी ना कधीतरी साकार होतात. उद्याच्या शिवसेनेला हे कार्य आवर्जून करावे लागणार आहे. बघू, नियतीच्या उदरात काय लपले आहे!”
लता दीदी आणि शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंशतः पूर्ण केले. २०१९ साली उद्धवजींच्या रुपाने एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला. ठाकरे कुटुंबाची एक व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली. या घटनेने लता मंगेशकर यांना आनंदच झाला. मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. गानसम्राज्ञींचे स्वर आणि हिंदुहृदयसम्राटांचे हिंदुत्वाचे विचार त्रिकालाबाधित रहातील. मंगेशकर व ठाकरे कुटुंबाचे ऋणानुबंध महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहतील.

Previous Post

टोळधाड हटवा! महाराष्ट्र वाचवा!!

Next Post

बदनाम सही, नाम तो हुआ

Next Post

बदनाम सही, नाम तो हुआ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.