दिवाळी म्हटलं की दुसरा शब्द आपोआप आठवतो तो फराळ… निदान जुन्या किंवा मध्यमवयीन लोकांना. कोपर्या कोपर्यावर प्लास्टिकमधील चकल्या, चिवडा, लाडू मिळत नव्हते त्या सुमारास दिवाळी म्हणजे फराळ हेच समीकरण असायचे. नंतर शुद्ध मराठी मध्यमवर्गीय जनतेसाठी होता दिवाळी अंक. तर घरी केलेला फराळ ही खूप मोठी बाब असायची. खास करून नोकरदार स्त्रियांसाठी. रात्री जागून फराळ केला जायचा. काही घरात शेजारणी एकत्र येऊन मदत करत फराळ आटपायच्या. काही घरात बिल्डिंगमधील सर्व कुटुंबे एकत्र येवून हलवाई/महाराज बोलावून घाऊक प्रमाणात सहकारी तत्वावर फराळ करवून घ्यायचे.
ठिकाण कुठलेही असो, चार पदार्थ केले जायचेच.
मोठाले डबे बाहेर येवून घासून पुसून लख्ख होवून सुकवले जायचे. पोहे, खोबरे उन्हात शेकत पडायचे. तुपावर भाजल्या जाणार्या रव्याचा, बेसनाचा सुगंध, आसमंतात भरून जायचा. आज आमच्याकडे करंज्या झाल्या, आज आई लाडू करणारे, आम्ही यावेळी फक्त दोनच पदार्थ करणार असे संवाद व्हायचे. पूर्ण महाराष्ट्र घेतला तरी थोड्या फार फरकाने असेच. पदार्थ वेगवेगळे पण फराळ होणारच.
घरी असा फराळ करायची पद्धत महाराष्ट्रात, दक्षिण भारत आणि थोडाफार गुजरात इथे आढळेल. उत्तर भारत आणि अन्य भारतात बाहेरून मिठाई आणायचे प्रमाण जास्त. आणि मराठी मनात मात्र घरगुती फराळ कायम.
काळाच्या ओघात फरक पडत गेला, धावपळ वाढली, मदत मिळेनाशी झाली पण फराळ करायची उर्मी मात्र कायम आहे. करंज्याचे पीठ कुटायला, भरायला घरातील कोणी मुलगा किंवा पुरुष येतो, शंकरपाळ्या कापायला कोणी बारके पोर बसते, बाहेरून जरी काही पदार्थ मागवले तरी घरात काहीतरी केले जातेच जाते. या फराळ पद्धतीने अनेक स्त्रियांना अर्थार्जन मिळालेलं आहे. असंख्य बचत गट दिवाळीच्या सुमारास घाऊक ऑर्डर घेवून लाखभराची उलाढाल सहज करतात.
सध्या फराळाचे पारंपरिक रूप थोडे बदलत चालले आहे. नव्या आहारशैलीनुसार भाजलेल्या करंज्या, शंकरपाळी, चकल्या, बेक्ड चिवडा, शुगर फ्री मिठाई असे दिसते. गंमत म्हणजे इतकी जागरूक मंडळी नंतर मात्र बर्गर, पिझ्झा, नुडल यांच्यावर ताव मारताना आढळतात. त्यांना पारंपरिक फराळ मात्र नको असतो. वास्तविक वर्षातून एकदा येणार्या दिवाळीत तुपात तळलेल्या करंज्या, अनारसे, भाजका चिवडा, शुद्ध तुपतील लाडू, गुळाच्या शंकरपाळ्या खायला काहीही हरकत नाही. तिथे उगाच आरोग्य आणि कॅलरीज आणायची गरज नसते. तुपात किंवा तेलात तळलेले पदार्थ प्रमाणात खाल्ले तर हानीकारक काहीही नाही.आहारशास्त्र बाजूला ठेवून खमंग चकली लोण्यासोबत खाल्ली नाही, चिवड्याचा बोकाणा भरला नाही, करंजीचा तुकडा उडवला नाही तर दिवाळी संपन्न होत नाही. फराळ घरी करा अथवा बाहेरून मागवा, सणाची गोडी वाढायला तो आवश्यक असतोच.
सण कोणताही असो, कुठल्याही धर्माचा असो, जगातील कोणत्याही देशातील असो, त्याचे जे पारंपरिक रूप आहे त्यात त्या सुमारास केले जाणारे खाणे पिणे, पदार्थ यांचा अतूट संबंध आहे. काही वैद्यकीय निर्बंध असतील अथवा काही अडचणी तर फरक करावा, पण वर्षभर बाहेर टेक-अवे मागवून आणि मरणाची महाग कॉफी ढोसून राहणार्या लोकांनी फराळ किती कॅलरीवाला असतो, तेलकट असतो याचे डोस देवू नयेत.
ख्रिसमस आणि केक, ईद आणि शीर कुर्मा हे जसे जोडीने आठवतात तसेच दिवाळी म्हटले की फराळ. मग तो अगदी संपूर्ण असो अथवा दोन मोजके पदार्थ. पण अविभाज्य घटक असतात. असे खाणे वगळा की त्या सणाचा गोडवाच निघून जातो. चांगले खाणे हा एक सुरेख आनंद आहे, त्यातही आपल्या कुटुंबासोबत ते खाणे जास्त आनंददायी. उगाच नाही जगात सगळीकडे सणावारी सगळे कुटुंब एकत्र खाते.
तर आज आपण बघू चांगला फराळ कसा करावा याच्या छोट्या छोट्या क्लृप्त्या. आणि त्याच सोबत उरलेला फराळ, मिठाई, वाया जावून देता कशी संपवावी याच्या टिप्स.
करंजी
दिवाळी म्हणजे करंजी/कानवले. अनेकदा करंजीचा खुळखुळा होतो, वरील आवरण कच्चट राहते, वातड होते अथवा नरम पडते. त्यासाठी काही क्लृप्त्या…
१) करंजीचे पीठ अतिशय घट्ट भिजवून मग ते कुटून सैल करावे.कुटणे शक्य नसेल तर पिठाच्या बारीक गोळ्या करून मिक्सर/प्रोसेसरमधून फिरवून घ्यावे. सुरेख मऊ होते.
२) पीठ भिजवताना मोहन महत्त्वाचे असते. कधीही तूप मोहन गार असावे. तुपाचे मोहन व्यवस्थित पिठाला फासून मगच पीठ भिजवावे. पीठ शक्यतो दूध पाण्यात भिजवावे. निव्वळ मैदा न घेता १ वाटी रवा आणि २ वाट्या मैदा असे घ्यावे.
३) सारण खुळखुळा होवू नये यासाठी कडेपर्यंत भरावे.
४) करंजी काटनीने कापली की त्याच्या कडा उरतात, बरेचदा वाया जातात, त्यासाठी करंजी दुमडून घ्यावी, अथवा मुरड घालावी. मुरड जमत नसेल तर कडा चिकटवून काट्याने दाबून घ्याव्यात. करंजी फुटत नाही.
५) करंजी फार पातळ लाटू नये. कडकडीत होते.
६) तळणीसाठी शक्यतो तूप घ्यावे. शक्य नसल्यास चक्क तेल पण डालडा किंवा तत्सम टाळावे.
७) तळताना तूप कडकडीत करून गॅस अगदी मंद करून एकेक करंजी घालून तळावी. एका झार्याने दाबून दुसर्या झार्याने अलगद तूप उडवावे.
८) करंजी तळून झाली की सुईने अगदी दोनेक छिद्रे करून घ्यावीत. पोटातील वाफ जावून करंजी टपोरी राहते.
लाडू
१) बाजारातील बेसन लाडू रवाळ असतात. घरी तसे होत नाहीत अगदी खरखरीत पीठ असले तरी. त्यासाठी पीठ भाजून झाले की गार करताना त्यात थोडा डिंक तळून कुस्करून घालावा. अगदी रवाळ पोत येतो.
२) रवा अथवा बेसन लाडू करताना कडक पाक होतो आणि लाडू कडकडीत. तेव्हा चक्क लाडू मिक्सरमधून काढून घ्यावेत. अगदी बारीक भुकटी करावी. मग त्यात थोडे कोमट तूप व पिठीसाखर घालून परत वळावेत.
३) बेसन लाडू करताना बेसन अगदी खमंग भाजून घ्यावे. थोडे कोमट असतानाच, ५०० ग्रॅम बेसनाला १ वाटी दूध भुकटी घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे. आगीवर ठेवू नये.
नंतर मग साखर वेलची इत्यादी घालून लाडू वळून घ्यावेत.
सुरेख खमंग चव येते.
शंकरपाळी
१) शंकरपाळी करताना तांदळाच्या पिठाचा साटा करण्याऐवजी कॉर्नफ्लोअर घ्यावे. साटा उरू नये यासाठी पोळी लाटली की तूप फासून मग त्यावर कॉर्नफ्लोअर भुरभुरवून घ्यावे. घडीची पोळी करतो तसेच. साटा उरत नाही. आणि शंकरपाळी छान खुसखुशीत होतात.
चकली
चकलीमध्ये हळद न घालता खायचा पिवळा रंग घालावा. तळल्यावर काळपट होत नाहीत.
चिवडा
चिवड्यात तेल जास्त झाल्यास किंचित मेतकूट फासून ठेवावे.
अधिक तेल शोषले जाते.
आता उरलेला फराळ/मिठाई याचे काय करायचे?
१) उरलेल्या चिवड्याला थोडे पाणी लावून नरम करून वरून ओले खोबरे, शेव, लिंबू घालून दडप्या पोह्यासारखे करून संपवून टाकावे.
२) पेढे/ मावा बर्फी/काजू कतली उरली असल्यास दुधी हलव्यात वापरून संपवावे. साखर मग बेताने घालावी.
३) चकली चुरा, चिवड्याचे अवशेष, खारी शंकरपाळी यांचा भुगा करून त्यात कोणतेही पीठ, कांदा, मिरची, कोथिंबीर घालून त्याचे धपाटे/थालीपीठ करावेत. सुरेख खमंग लागतात.
सर्वात महत्त्वाचे…
कोणत्याही कारणाने पदार्थ फसला तरीही वाईट वाटून घेवू नये. ही काही आयुष्याची परीक्षा नाही. आणि समजा फराळ खूप उरलाय अथवा जास्त आहे, मिठाई आहे, चॉकलेट्स/फळे लोळत पडली आहेत, तर व्यवस्थित पिशवीत घालून, रस्त्यावरील विक्रेते, लहान मुले यांना द्यावे. उरलेले देण्यापेक्षा असे अधिकचे आधीच द्यावे. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची जावो ही सदिच्छा.