नव्या वर्षात कधी नव्हे तो माझा मानलेला परममित्र पोक्या मला मांजरांच्या गोष्टी सांगण्यासाठी सकाळी सकाळी घरी आला होता. राज्यात काही तरी मांजर प्रकरण गाजत असल्याचे त्याच्या कानावर आल्यावर त्याला राहवेना. त्याचा मांजरांचा प्रचंड अभ्यास आहे. त्याने त्याच्या आणि माझ्या बालपणापासून घरात इतकी मांजरे पाळली होती की त्याचे ते आडनाव नसूनसुद्धा लोक त्याला मांजरेकर म्हणून हाक मारायचे तर त्याच्या आईला मांजरवाली आई म्हणायचे. मांजरे तर त्याच्यावर इतकी प्रेम करायची की तो चक्क मांजरमय होऊन गेला होता. त्याला म्हणे मांजरांची भाषा तर समजायचीच पण त्यांची सुखदु:खे, शकुन-अपशकुन करण्याची पद्धत, त्यांच्या गटात राडेबाजी करण्याची स्टाइल, शत्रूपक्षातील मांजरांच्या अंगावर गुरगुरून जायची स्टाइल, मांजरांचे प्रकार, त्यांचे विव्हळणे, ओरडणे, त्यांची प्रेमप्रकरणे, त्यांच्या जाती, त्यांच्या आवाजाचे प्रकार हे सारे समजायचे. मिटक्या मारत चोरून दूध पिण्याची किंवा दुधाची खीर खाण्याची, मालवणी बांगडे किंवा बोंबील खाण्याची त्यांची आवड त्याला माहीत होती. बोक्याने म्हणजे मांजराच्या बापाने रागाने मिशा फेंदारल्या आणि मोठा गेंगाणा आवाज काढून दम दिला तर लगेच छोटे मांजर शेपटी हलवत पळून जायचे. मांजरांच्या अशा अनेक लकबी त्याला ठाऊक होत्या. मात्र त्या एकाच गुंडप्रवृत्तीच्या मांजराचा त्याला उपद्रव झाला होता.
ज्यांच्या घरात उंदीर झाले होते ते लोक पोक्याकडे रात्री मांजर भाड्याने मागायचे. पण पोक्या पैसे न घेता ते फुकट द्यायचा. मांजर रात्री गेम करून आले की मांजरांचा बाप म्हणजे बोका त्याचे कौतुक करायचा. त्याला प्रेमाने कुरवाळायचा. आपली जागा हे मांजर चालवेल याची त्याला खात्री वाटायची. बाकीचीही अनेक मांजरे आणि त्यांचे पिताश्री बोकेही पोक्याकडे होते, पण या मांजरांकडे पोक्याचे विशेष लक्ष असायचे. कारण ते अतिशय डँबीस होते. स्वत:ला इतर मांजरांचा दादा समजून त्यांना बोचकरायचे, चावायचे आणि कधी कधी मोठ्या माशांचा काटा पंजात धरून ओरबडायचे. बालपणापासून बोक्याने भयंकर लाड केल्याने ते शेफारले होते. तोंडात मांजरांच्या भाषेतल्या अतिशय घाणेरडया शिव्या असायच्या. बाकीची मांजरे एकत्र जमून सुरेख आवाजात गायची. हा मात्र तेव्हा कुत्र्याच्या विव्हळण्याचा किंवा गाढवाचा आवाज काढून रसभंग करायचा.
आवाजाच्या नकला करण्यात त्याचा हातखंडा होता. एकदा त्याने रात्री वस्तीत वाघाचा बछडा शिरला असता डरकाळी फोडण्याची नक्कल केली. त्या बछड्याने त्याला पाहिले आणि त्याच्या अंगावर झेप घेणार तोच आपला म्याव म्याव म्याव म्याव हा मूळ आवाज काढून ते मांजर घाबरून पळून गेले. पण त्याचीही एक टोळी होती. त्यातील काही रावडेबाज म्हणाले, आता तू तेथे थांबू नकोस कुठेतरी दूर पळून जा, नाहीतर सगळे वाघ इथे येऊन राडा करतील. आम्ही तुझ्या पाठीशी असलो तरी काहीच करू शकणार नाही. तू माद्रिद बेटावर पळून जा. तिथे तुला भरपूर मासे खायला मिळतील. त्याला ते पटले आणि त्याने पोबारा केला. तो माद्रिद बेटावर गेला आणि तिथल्या मांजरांना आपला मोठेपणा सांगू लागला. मी वाघाच्या बछड्याला कसे डिवचले. त्याच्या डरकाळीची कशी नक्कल केली, नंतर त्याला म्याव म्याव करून कसे चिडवले. ते ऐकल्याबरोबर ती मांजरे भडकली. म्हणाली, ते वाघाचे साथीदार तुला शोधत आले तर तुझ्याबरोबर आमचेही काही खरे नाही. तू आपला तुझ्या राज्यात परत जा. नाहीतर आमच्या न्यायसभेपुढे तुला गुन्हा कबूल करावा लागेल. आमच्या न्यायसभेची न्याय देण्याची वेगळी पद्धत आहे. समुद्रात घागर उलटी ठेवतात. त्यावर गुन्हेगाराला बसवतात. त्याने स्वत:च्या तोंडाने गुन्हा केल्याचे कबूल करायचे. तो जर खोटे बोलला तर घागर त्याच्यासकट समुद्रात बुडते. आता ही बातमी बेटावर पसरली आहे. त्यामुळे तुला आमच्या कायद्याला सामोरे जावेच लागेल.
ते ऐकल्यावर ते रावडेबाज मांजर म्याव म्याव करत त्यांच्या अंगावर धावून गेले. त्याबरोबर त्यांनी सर्वांनी त्याला पकडून न्यायसभेपुढे नेले. न्यायसभा सुरू होण्याआधी समुद्राकाठी मांजरांचे कॅटवॉक होते. ते झाल्यावर समुद्राच्या पाण्यात उपडी म्हणजे पालथी घागर ठेवली जाते. तशी ती ठेवली गेली. त्यावर त्य मुंबईच्या लबाड मांजराला बसवून घागर पाण्यात लोटून त्याला गुन्ह्याची कबुली देण्यास फर्मावण्यात आले. त्या मांजराचे हातपाय लटपटू लागले. घागरही हलू लागली. न्यायाधीश मांजराने गुन्हाची कबुली देण्याची ऑर्डर आपल्या भाषेत फर्मावली. घागरीवर उभे राहून अपराधी मांजर म्हणाले-
च्याव म्याव करी वरचे डोंगरी
मी म्याव केले तर बुड घागरी
एवढे म्हटल्याबरोबर घागर मांजरासकट पाण्यात बुडाली. घाबरलेले मांजर जिवाच्या आकांताने म्याव म्याव ओरडू लागले आणि गटांगळ्या खात दूर दूर जाऊ लागले. न्यायसभेने मांजर अपराधी असल्याचे सिद्ध झाल्याचा निकाल दिला. सर्व मांजरांनी कॅटवॉक करीत सुस्वरात गाणे म्हटले. तेवढ्यात मांजराचा जन्मदाता बोका माद्रीद बेटावर हजर झाला. मांजराला शोधू लागला. त्याचे तोंड काळवंडले होते. तो समुद्रकिनार्या वर आला. तिथे ते मांजर म्याव म्याव ओरडत होते. बोक्याने पाण्यात डुबकी घेऊन त्याला बाहेर काढले. दोघांनी एकमेकांचे डोळे पुसले. बोक्या म्हणाला, आपल्याला तातडीने राज्यात आपल्या वस्तीत जायचे आहे. तुला आणि मला न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. तुझ्यावर तर भयंकर आरोप आहे. पुरावेही सापडल्याचे म्हणतात. त्याबरोबर ते आधीच गर्भगळीत झालेले मांजर आपल्या पिताश्री बोक्याला म्हणाले, तुम्ही काहीतरी वशिला लावा. अशी कितीतरी प्रकरणे आपण दाबून टाकलीयत. हे तर काहीच नाही.
बोकोबा म्हणाले, सर्व शक्ती पणाला लावून माझ्या बाळासाठी मी प्रयत्न करीन. वाटल्यास आपण उच्च मांजर कोर्टात अपील करू, तिथेही न्याय मिळाला नाही तर सर्वोच्च मांजर कोर्टात दाद मागू. नाहीतर दिल्लीची बिल्ली आपलीच आहे. आता आपण त्यांच्या टोळीत आहोत. फक्त यापुढे नकला जपून कर…
…अशा तऱ्हेने पोक्याची गोष्ट ऐकता ऐकता माझा दिवसा ढवळ्या डोळा कधी लागला ते कळले नाही.