केतन पुरी या नवोदित संशोधकाने शिवाजी महाराजांची भाषा, वेशभूषा, विचार करण्याची पद्धत, दैनंदिन जीवनशैली, समकालीन वा काही कालावधीनंतर देशी-विदेशी चित्रकारांनी काढलेली त्यांची चित्रे आणि त्यांचा जागतिक स्तरावरील गौरव याबद्दल विस्तृत संशोधन करून अतिशय परिश्रमाने लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘मर्हाटा पातशहा’! हे पुस्तक म्हणजे अनेक ग्रंथांचे सार आहे, शिवाय शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे. संदर्भग्रंथांची यादी पाहून लेखकाच्या संशोधनाची खोली नि व्यापकता याबरोबरच मांडणीची उंची लक्षात येते.
– – –
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आजवर अनेक विविध पुस्तके लिहिली गेली आहेत. शिवचरित्रे लिहिली आहेत, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंगावरही लेखन झालेले आहे. नाटके, पोवाडे आणि कादंबर्याही आहेत. महाराजांची राज्य प्रशासनपद्धती, राजनीती, युद्धकौशल्य, शस्त्रनिर्मिती, चढाई, दुर्गबांधणी याबद्दलही माहिती देणारी अनेक पुस्तके आहेत. पण महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचे संशोधनकार्य अजून म्हणावे तितके झालेले नाही.
केतन पुरी या नवोदित संशोधकाने शिवाजी महाराजांची भाषा, वेशभूषा, विचार करण्याची पद्धत, दैनंदिन जीवनशैली, समकालीन वा काही कालावधीनंतर देशी-विदेशी चित्रकारांनी काढलेली त्यांची चित्रे आणि त्यांचा जागतिक स्तरावरील गौरव याबद्दल विस्तृत संशोधन करून अतिशय परिश्रमाने लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘मर्हाटा पातशहा’! डेक्कन कॉलेजात पुरातत्वशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या केतन पुरी या तरूण इतिहास संशोधकाचे कौतुक करावे तेवढे कमीच. अतिशय कमी वयात आणि अतिशय बारीक सारीक तपशीलासह त्यांनी मांडणी केली आहे, ती अप्रतिम आहे. हे पुस्तक म्हणजे शिवचरित्राची अपरिचित बाजू आहे. लेखकाने मनोगतात या पुस्तकाची जन्मकथा सांगितली आहे. उस्मानाबाद इथं भरलेल्या साहित्य संमेलनात शिवाजी महाराजांच्या चित्रांविषयी माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करावी असा लेखकाचा आणि मालोजीराव जगदाळे यांचा मानस होता. याच पुस्तिकेचे रूपांतर पुढे या पुस्तकात झाले. या पुस्तकाला ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांची प्रस्तावना लाभली असून या पुस्तकाच्या निमित्ताने ऐतिहासिक माहितीचा एक नवा खजिना वाचकांना लाभला आहे.
पुस्तकात एकून चार प्रकरणे असून शिवरायांची अनेक रंगीत चित्रे पाहणे म्हणजे पर्वणीच म्हणावी लागेल. ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या पहिल्याच प्रकरणात लेखकाने शिवरायांच्या अनेक चित्रांची निर्मिती, निर्मितीमागील प्रेरणा, कालखंड आणि चित्रकारांचाही आढावा घेतला आहे. शिवरायांची अनेक चित्रे शिवकाळाएवढीच जुनी असली तरी आजपासून शंभर वर्षांपर्यंत म्हणजे १९२०पर्यंत या चित्रांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलीच नव्हती. मराठ्यांच्या इतिहासाचे पितामह वा. सी. बेंद्रे यांनी सर्वप्रथम या चित्रावर संशोधन करून ते चित्र सर्वांसमोर आणले. डॉ. बाळकृष्ण यांच्या संशोधनातूनही शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या चित्राची माहिती मिळते. हर्बर्ट डी यागर हा डच वखारप्रमुख तेंगनापट्टम इथं कार्यरत होता. याने लिहिलेल्या डायरीत शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बहुमोल माहिती आहे. शिवरायांच्या चित्राची सत्यता तपासण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध विदेशी प्रवाशांनी केलेले वर्णन महत्वाचे ठरते. असे वर्णन हर्बर्ट डी यागर, एस्केलिऑट, थेव्हनॉट, फादर डी ऑर्किन्स, कॉस्मॉ गा गार्डा, जोनाथन स्कॉट, माँटगोमेरी मार्टिन आदी युरोपियन प्रवाशांनी केले आहे.
एस्केलिऑट हा ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीत सुरतेत नोकरीला होता. सुरतेवरील स्वारीबाबत त्याने १६६४ साली सर
थॉमस ब्राऊन यांस लिहीलेल्या पत्रात त्याने ‘प्रसन्न चेहर्याचा, बोलताना मंद स्मित करणारा व सर्व लोकांत गोरा दिसणारा, भेदक डोळ्यांचा, कठोर, शांत, विचारी, दयाळू आणि क्रूरही’ असे वर्णन केले आहे. माँटगोमेरींनी शिवरायांचे वर्णन ‘आपत्तीचा सामना करण्यास सदैव तत्पर नि धाडसी’ असे केले आहे. अनेक इतिहासकारांनी शिवरायांची तुलना सिकंदर, हनीबल, सिझर यांच्याशी केली असली तरी शिवराय म्हणजे ‘भेदक नजर, भरीव बांधा, उजळ कांती, स्मितहास्य प्रतिमा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, वेगाने निर्णय घेणे, साहसी वृत्ती’ असे आहे! रॉबर्ट आर्म, जनरल एडवर्ड सलव्हान, स्कॉट, जेम्स डग्लस आणि १६७४ साली महारांजांना भेटणारा ब्रिटिश प्रतिनिधी हेन्री ऑक्झेंडेन आदी विदेशी लेखकांबरोबरच परमानंद, जयराम पिंडे, सभासद आदींनी केलेले शिवरायांचे गुणवर्णन वाचल्यावर शिवरायांच्या गौरवाची प्रचिती येते. हे वर्णन वाचण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
शिवराज्यभिषेकाच्या वेळी ‘आज्ञापत्रकार’ रामचंद्र अमात्य म्हणतात, ‘सिंहारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणवले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली,’ तर हेन्री कंपनी सरकारला १६ जानेवारी १६७७ रोजी कळवतो, ‘दख्खनचे स्वामी झाल्यामुळे त्यांनी आपल्या देवाला वचन दिले आहे की दिल्लीला पोहचून औरंगजेबाला शांत केल्याशिवाय ते आपली तलवार म्यान करणार नाहीत्ा!’ शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे नि गुणगौरवाचे वर्णन मांडल्यावर दुसर्या प्रकरणात लेखकाने शिवाजी महाराजांच्या विविध चित्रांचा आढावा घेतला आहे. शिवरायांच्या चित्रांचा सांगोपांग अभ्यास करत शिवरायांच्या काही समकालीन चित्रांवर संशोधन करण्याचे आणि भारतात ही चित्रे आणण्याचे कार्य मालोजीराव जगदाळे आणि अजित पटवर्धन यांनी केले आहे. शिवरायांची बहुतांशी चित्रे ही गोवळकोंडा शैलीतील असून काही चित्रे पहाडी नि मुघल शैलीतील आहेत. लेखकाने पुस्तकात या दोन्ही शैलींची वैशिष्ट्ये यावर विस्तृत लेखन केले आहे. त्याचबरोबर लघुचित्रशैली, दखनी शैली, बुंदी वा बसोली शैली याबद्दलही माहिती दिली आहे.
या सर्व चित्रांवरून शिवरायांचे शिरोभूषण, अंगरखा, उपरणे, गळ्यातील माळा, हातातील अंगठ्या याबाबतची माहिती ग. ह. खरे यांनी ‘शिवाजी महाराजांची चित्रे’ या पुस्तकात दिली असून जयसिंगराव पवार संपादित ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथा’तही शिवरायांच्या चित्राविषयी लेखन आहे. हर्बर्ट डी यागर याचा उल्लेख लेखकाने खूप महत्त्वपूर्ण संदर्भाने केलेला असून त्यास अभय देताना शिवाजी महाराजांनी जो कौलनामा तयार केला, तो डच नि मराठी भाषेत होता हे विशेष! शिवाजी महाराजांनी गुलामांच्या विक्रीबाबत जे मत व्यक्त केले आहे, ते महत्त्वपूर्ण आहे. कारण गुलामांच्या खरेदी व विक्रीस शिवाजी महाराजांनी प्रतिबंध केला होता. यागर हा स्वत: चांगला चित्रकार होता. त्यानेही शिवाजी महाराजांची चित्रे काढली असावीत. पण यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत लेखकाने व्यक्त केले आहे. शिवरायांची अनेक चित्रे जगातील अनेक नामांकित संग्रहालयात असून त्यातून शिवरायांच्या इतिहासावर नव्याने प्रकाश टाकता येऊ शकतो, ही आश्वासक भावनाही लेखकाने व्यक्त केली आहे.
शिवरायांचे वर्णन वाचून नि ऐकून अनेक चित्रकारांनी चित्रे काढली आहेत. निकोलाय मनुची हा मूळचा व्हेनिसचा, तो औरंगजेबाच्या दरबारात वैद्य होता. तो शिवरायांना पुरंदर तहाच्या वेळी प्रत्यक्ष भेटला होता. मनुचीने शिवरायांचे वर्णन तर केले आहेच, शिवाय शिवरायांची अनेक चित्रेही त्याच्या संग्रहात होती. त्यावरून शिवरायांची तलवार, म्यान, जिरेटोप, गळ्यातील माळा, रत्नाभूषणे यांची माहिती मिळते. मनुचीने मुळ चित्रावरून काढलेल्या चित्रात या सर्व गोष्टी दर्शविल्या आहेत.
या पुस्तकात शिवरायांवर विविधतापूर्ण लेखन केलेल्या लेखकांची, त्या वर्णनावरून काढलेल्या चित्रांची आणि अशा चित्रांचा संग्रह करणार्या अनेक संग्राहकांची माहिती मिळते. याच लेखनात मीर महंमद या चित्रकाराने काढलेल्या महाराजांच्या चित्राबद्दलची सत्यता नेमकी काय आहे, याचा शोध घेतला आहे. पॅरिस, बर्लिन आणि लेनिनग्राड येथील संग्रहालयातही शिवरायांची चित्रे आहेत. त्यातून शिवरायांचा पेहराव व प्रतिमा याची कल्पना येते.
शिवराय नेमके कोणती भाषा बोलत असत, हा एक महत्वाचा विषय आहे. ते पत्र कोणत्या भाषेत लिहीत असत, यावर सेतुमाधवराव पगडींनी संशोधन केले आहे. यासाठी लेखकाने राजस्थानातील दस्ताऐवजासोबतच इंग्रज, डच नि पोर्तुगिझ यांच्या पुराव्यावरही संशोधन केले आहे.
मराठी चित्रकारांनी शिवाजी महाराजांवरची काढलेली चित्रे ही त्या चित्रकारांचे महाराजांवरचे अतुलनीय प्रेम नि श्रद्धा दर्शविणारी आहेत. ही बहुतांशी चित्रे अठराव्या शतकातील आहेत. त्यातून एक वेगळीच चित्रशैली विकसित झाली आहे. महाराजांची देशविदेशातील संग्रहात असणारी चित्रे भारतात यावीत व ती पाहण्याचे भाग्य शिवप्रेमींनी मिळावे अशी आशा लेखकाने व्यक्त केली आहे. पंत प्रतिनिधी आप्पासाहेब नि यशवंतरावजी यांची हीच इच्छा होती व ती पूर्ण व्हावी, अशी लेखकाची मनोभावना आहे.
हे पुस्तक म्हणजे अनेक ग्रंथांचे सार आहे, शिवाय शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे. संदर्भग्रंथांची यादी पाहून लेखकाच्या संशोधनाची खोली नि व्यापकता याबरोबरच मांडणीची उंची लक्षात येते. शिवरायांना महाराष्ट्रातच एक चांगला नवीन दृष्टिकोन देणारा इतिहासकार केतन पुरीच्या रूपाने लाभला आहे. ही बाब महाराष्ट्रीय, राष्ट्रीय नि अगदी जागतिक इतिहास संशोधन क्षेत्रातील महत्वाची व अभिमानास्पद बाब आहे.
मर्हाटा पातशाह
लेखक – केतन पुरी
प्रकाशक – न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठसंख्या – १३९, किंमत – रु. ३००
आवृत्ती – पहिली (१४ मे २०१९)
दुसरी (६ जून २०२१)