शहरांमध्ये सतत हीट जाणवते. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, उद्योगाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी केमिकल यामुळे विविध प्रकारचे वायू हवेत तयार होतात. ग्रीन हाऊस गॅसेस वातावरणात राहण्याचा कालावधी देखील १०० वर्षापर्यंत आहे. त्याचा परिमाण इथल्या वातावरणावर होतो आहे. यातून तापमानवाढ होते आहे, असे डॉ. सानप सांगतात. हवामान तज्ज्ञांनी २१०० शतक संपेपर्यंत पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सियसने वाढू शकते, असे भाकीत वर्तवले आहे. तसे जर झाले तर भविष्यात मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते.
– – –
गेले काही दिवस सगळीकडे चर्चा सुरु आहे, ती देशभर आलेल्या उष्णतेच्या लाटेची… जिथे पारा ३० अंशांवर गेल्यावर उकाडा वाटायचा, तिथे आज पारा ४० अंशांच्या पार आहे. याआधीही उष्म्याच्या लाटा आल्या होत्याच की १९७० ते १९८०च्या दशकात. त्याही प्रखरच होत्या. दरवेळी, अगदी दरवर्षी आपल्याला कवी सौमित्र यांच्या शब्दांत ‘ऊन जरा जास्त आहे’ असं वाटतच असतं, पण, यावेळी ही नुसती भावना नाही, वस्तुस्थिती आहे, हे पार्याच्या उच्चांकी आकड्यांनी कळते आहे. अकोटसारख्या गावात सकाळी सात वाजता ४० अंशांच्या वर तापमान असावं? सकाळी सहा वाजता देखील घामाच्या धारा लागत आहेत. भयानक उकाड्याचा सामना करावा लागत आहे. घरात पंखा असून उपयोग नाही, त्यातून गरम झळाच येत आहेत. दुपारच्या उन्हात तर कोपलेला सूर्यदेव आपल्याला भाजूनच काढत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे आणि मानवाकडून होणार्या चुकांमुळे आताची भीषण स्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. जोडीला अर्बन हीट आयलंड, विविध घटकांमुळे होणारे प्रदूषण, ला नीना हा हवामानबदलाचा पॅटर्न असे घटक ही उष्णता वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. सध्याचे वातावरणातील बदल हे भविष्यात नक्कीच धोकादायक ठरू शकतात.
२१वे हे शतक संपेपर्यंत पृथ्वीच्या तापमानात सुमारे १.५ डिग्री सेल्सियसने वाढ होऊ शकते, असा अंदाज या क्षेत्रात काम करणार्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसे जर झाले तर तेव्हाचा उन्हाळा कसा असेल, त्याचे काय परिणाम होती, कमाल तापमानाचा पारा किती अंशापर्यंत जाऊन पोहचेल याचा अंदाज आत्ताच बांधणे खूप कठीण आहे. आता जो सूर्याचा प्रकोप झाला आहे, तो कशामुळे झाला आहे, नागरिकांनी या काळात आपली काळजी कशी घ्यायला हवी, या सार्याचा उहापोह आपण या लेखामधून करणार आहोत.
तुम्हाला आठवते का, २०१५मध्ये आंध्र प्रदेश, ओरिसा या भागात तीव्र उष्णतेची लाट आली होती. तिचा फटका इथल्या नागरिकांना बसला होता. एक ते १५ जून या कालावधीत त्याची तीव्रता अधिक होती. ही हीट वेव्ह एल निनो या हवामानबदल घडवणार्या घटितामुळे आली होती. त्यावर्षी पाऊस देखील सरासरीपेक्षा कमी झाला होता. आता जी उष्णतेची लाट आलेली आहे, त्याला एल निनो कारणीभूत नाही. मागल्या वर्षीच्या उन्हाळ्यात अशा प्रकारची उष्णतेची लाट नव्हती, त्याचे कारण पश्चिमेकडून येणारे वारे अरबी समुद्रापर्यंत येत होते. त्यामुळे उन्हाळी वातावरणात काही ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस झाला होता. यंदाच्या वर्षीची स्थिती तशी नाही. पश्चिमेकडून येणारे वारे हे अफगाणिस्तान, इराण या भागात आहे. त्यामुळे आपल्याकडच्या तापमानात वाढ झाली आहे, असे भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. सखा सानप यांनी सांगितले.
१९७०-८०च्या दशकांच्या तुलनेत उष्णतेच्या लाटा येण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. एकतर ला निना परिणामामुळे उन्हाळ्यात तापमानात वाढ होते. याबरोबरच ‘अर्बन हीट आयलंड’ हा घटक देखील तापमानाची वाढ होण्यास कारणीभूत ठरत आहे. हा झपाट्याने होत चाललेल्या शहरीकरणाचा, काँक्रीटीकरणाचा दुष्परिणाम आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागात काँक्रीटचा वापर करण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. पूर्वी रस्ते डांबराचे असायचे, आता विकासाच्या नावाखाली हे रस्ते काँक्रीटचे होऊ लागले आहेत. त्याच बरोबर शहरीकरणाची व्याख्या नव्या आणि उंच इमारतींमुळे बदलून गेली आहे. औद्योगिकरणामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. काँक्रीटचा पृष्ठभाग वाढल्यामुळे उष्णतेत थेट वाढ होते आहे. कारण, दिवसभर सूर्यप्रकाशातून निर्माण होणारा उष्मा काँक्रीट शोषून ठेवते आणि ही अतिरिक्त उष्णता ते रात्रीच्या वेळी बाहेर टाकते. त्यामुळे वातावरणात थंडावा येतच नाही. शहरांमध्ये सतत हीट जाणवते. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, उद्योगाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी केमिकल यामुळे विविध प्रकारचे वायू हवेत तयार होतात. ग्रीन हाऊस गॅसेस वातावरणात राहण्याचा कालावधी देखील १०० वर्षापर्यंत आहे. त्याचा परिमाण इथल्या वातावरणावर होतो आहे. यातून तापमानवाढ होते आहे, असे डॉ. सानप सांगतात. हवामान तज्ज्ञांनी २१०० शतक संपेपर्यंत पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सियसने वाढू शकते, असे भाकीत वर्तवले आहे. तसे जर झाले तर भविष्यात मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते.
ग्रीन एनर्जीचा वापर वाढायला हवा…
मानवनिर्मित उत्सर्जन कमी करण्यासाठी आपण ग्रीन एनर्जीचा वापर अधिक प्रमाणात करण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. वातावरणातील उष्णता कमी करायची असेल तर विविध प्रकारचे वायू कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. विजेची िनर्मिती करण्यासाठी आपल्याला कोळसा वापरावा लागतो, त्यामुळे प्रदूषणाला निमंत्रण मिळते. त्यामुळे ग्रीन एनर्जीचा वापर करण्याचे प्रमाण वाढवायला हवे. आपल्याकडे २०१०मध्ये अति तीव्र स्वरूपाच्या हिट वेव्ह आल्या होत्या. मात्र, त्याच्या नंतरच्या वर्षीच्या उन्हाळ्यात हे प्रमाण कमी झाल्याचे दिसले होते. गेल्या वर्षी म्हणजे २०२१मध्ये आपल्याकडे हीट वेव्हचे प्रमाण कमी होते. उन्हाळयाच्या मोसमात काही भागात वादळी वार्यासह पाऊस झाला होता, आपण या वर्षी आता जो उन्हाळा सहन करतोय तशी स्थिती तेव्हा नव्हती. वातावरणातील बदल देखील अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. आपल्याला ज्या प्रकारच्या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे, तसाच प्रकार सध्या पाकिस्तानापासून आप्रिâकेपर्यंत अनेक ठिकाणी सुरु आहे. आपल्याकडचा उन्हाळा संपण्यासाठी अजून एक ते सव्वा महिन्याचा अवधी बाकी आहे. पुढल्या महिन्यात देखील तापमानाचा पारा हा सरासरीपेक्षा जास्त राहू शकतो, त्यामुळे या उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नका…
उष्माघात ठरतो जीवघेणा…
उष्णतेची लाट किंवा लू आली की उत्तर भारतात अनेकजण मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या येतात. यावेळी आपल्याकडेही अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. नागपुरात एकाच दिवशी पाच माणसे बेशुद्धावस्थेत सापडली. ती सगळी रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित झाली. त्या सगळ्यांना उष्माघाताचा त्रास झाला होता. एकेकाळी अतिगरम म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागांमध्येच उष्माघाताची शक्यता होती. त्यावर काही पारंपरिक स्थानिक उपाय केले जात. आता मात्र उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी जो कडाका आहे, तो पाहता सगळ्यांनीच उष्माघाताचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे.
माणसाच्या शरीरातील तापमान ३७ अंश सेंटीग्रेड असते. ते कायम राहावे म्हणून मेंदूमध्ये एक केंद्र असते, त्याला तापमान नियंत्रक केंद्र असे म्हणतात. मेंदूचा भाग असणार्या हायपोथलॅमसमध्ये हे केंद्र असते. शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्याबरोबरच रक्तवाहिन्या नियंत्रित ठेवण्याचे काम हे केंद्र करते. वातावरणातील बाह्य तापमान वाढते तेव्हा त्याचा शरीरावर घातक परिणाम होऊ नये, म्हणून हे केंद्र काम करते. उन्हाळ्यात तापमान वाढते तेव्हा शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी घर्मरंध्रे प्रसारण पावतात. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढते आणि तो आपल्या त्वचेवर पसरतो. उन्हाळ्यात लघवी होण्याचे प्रमाण देखील कमी असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात भरपूर पाणी असायला हवे. बाहेर तप्त ऊन असताना रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. शरीरात पाणी कमी पडले तर तोंड कोरडे पडते, घामाचे प्रमाण वाढते. त्वचेची, डोळयांची आग होते. शरीरातील रक्तदाब (ब्लडप्रेशर) कमी होते. बर्याचदा मेंदूकडे जाणार्या रक्तप्रवाहावर त्याचा परिणाम होतो, त्यातून उष्माघाताचा झटका येऊन रुग्ण कोमात जाऊ शकतो. क्वचितप्रसंगी मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह थांबल्यामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. उष्माघातामध्ये शरीरातील पाणी आणि क्षार यांचे प्रमाण कमी झालेले असते.त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी
– भर दुपारच्या म्हणजे कडाक्याच्या उन्हात बाहेर जाण्याचे टाळा.
– ऊन डोक्यावर पडत असल्यामुळे त्यापासून रक्षण करण्यासाठी सोबत छत्री, टोपी, पाण्याची बाटली ठेवा.
– घट्ट कपड्यांचा वापर करूच नका. त्या ऐवजी सैलसर पांढरे, सुती कपडे वापरा. काळ्या रंगाचे कपडे वापरू नका.
– दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी प्या. म्हणजे तासाला एक ते दीड ग्लास पाणी पोटात जायला हवे. दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पोटात जाणे आवश्यक आहे.
– कोकम, ताक, सरबत पिताना त्यात मीठ, खाण्याचा सोडा टाका; त्यामुळे शरीरातील क्षाराचे प्रमाण नियंत्रित ठेवता येणे शक्य होईल.
– उष्माघाताचा झटका आला तर ती व्यक्ती बेशुद्ध पडते, त्या व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, असे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.