अर्धवट जळालेल्या जखमींचे फोटो जवळून घेतले आणि ते प्रसिद्ध केले तर लोकांना ते पाहावत नाही. असे फोटो शक्यतोवर काढू नयेत अशा सूचना संपादकांनी अगोदरच दिल्या होत्या. म्हणून लांबूनच फोटो घेण्याचे ठरवले. दोन पोलीस अधिकारी जखमींची विचारपूस करताना मी फोटो टिपले. इतक्यात डॉक्टर समसी आले आणि त्यांनी माझा रोल काढून घेतला.
– – –
भारतीय कसोटी क्रिकेट संघातील खेळाडूंना फिटनेसचे धडे देणारा प्रसिद्ध डॉक्टर समसी. वैद्यकीय क्षेत्रात यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा. स्वभावाने अतिशय प्रेमळ, देवासारखा डॉक्टर. पण कडक शिस्तीचा माणूस. जरा तरी मनाविरुद्ध खुट्ट झाले की त्याने जागीच डोस दिला समजा.
एक दिवस अचानक डॉक्टरांची सटकली आणि त्यांनी माझ्या गळ्यातील कॅमेरा हिसकावून घेतला आणि त्यातील रोल काढून स्वत:च्या खिशात टाकला. मी माझी ओळख सांगितली. महाराष्ट्र राज्य सरकारचे अधिस्वीकृती पत्रही दाखवले, तर तेही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अजिबात जुमानायला तयार नाही. त्यांची परवानगी घेतली नाही म्हणून संतापले.
केईएम हॉस्पिटल हे काही प्रतिबंधित क्षेत्र नाही. लोक इथे उपचार करून घ्यायला येतात. त्यांच्या काही समस्या असतात. त्यांना काही सांगायचे असते ते आम्ही वृत्तपत्रात मांडले, तर काय हरकत आहे? बरे ज्याचे फोटो घेतले तो काहीच म्हणत नाही, मग डॉक्टरांनी आक्षेप का घ्यावा? माझा हेतू चांगला असेल तर मी सुद्धा कशाला कुणाच्या परवानगीची वाट पाहात बसायची? चांगल्या कामासाठी देव पाठीशी असतोच की…
डॉक्टर रोल घेऊन गेले आणि मला हॉस्पिटलबाहेर निघून जाण्यास फर्मावले. कंपनीमालकाच्या हलगर्जीमुळे आठ गरीब कामगार आगीत होरपळून निघाले, गंभीर जखमी झाले; त्यांच्या वेदनावर कुणी फुंकर घालायला नको का?
वडाळा येथील अल्लारखाँ कंपनीच्या डोअरला अचानक आग लागून तेथे काम करणारे कामगार जबर जखमी झाले. मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून मला माहिती मिळाली होती. मी रोज सकाळ संध्याकाळ त्यांना फोन करून विचारणा करायचो. तेथील केंद्रप्रमुख प्रथम माझे नाव गाव विचारून सविस्तर माहिती द्यायचे. घटनास्थळी किती बंब गेले आणि किती नंबरचा कॉल आला होता तेही त्यांच्या भाषेत सांगायचे. आगीचे स्वरूप लहान असेल तर एक नंबरचा कॉल येतो. मोठी दुर्घटना असेल तर ब्रिगेड कॉल येतो. ही त्यांची सांकेतिक भाषा असते. लहान सहान घटना असेल तर मीही फार दूरवर जायचो नाही. पण घटना मोठी असेल तर कुणाच्याही परवानगीची वाट न पाहता मला तेथे तात्काळ जाऊन इत्यंभूत माहिती आणि फोटो घ्यावेच लागायचे.
वडाळ्याच्या कंपनीला आग लागली आहे, एवढ्या त्रोटक माहितीच्या आधारे मी घरून निघालो. भायखळा, माझगांव,
कॉटनग्रीन, शिवडी येथील प्रत्येक सिग्नलवरील पोलीसाला मी इथून बंब गेला का अशी विचारणा करत होतो, तेही थोडीफार माहिती देत होते. आग चालूच असेल तर आकाशात धुराचे लोट दिसतात. परंतु आकाश निरभ्र दिसत होते. आग विझली असेल तरी काही तास अगदी दुसर्या दिवसापर्यंत हवेतून उग्र वास येत असतो. परंतु शिवडीजवळ सुकट मासळीचे मार्वेâट असल्यामुळे सर्वत्र मासळीचा सुवास पसरलेला. कितीही नाक हुंगून पाहिले, पण मासळीचा वास जाईना.
मी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग विझली होती. अल्लारखाँ कंपनीचे दिवाळे वाजले होते. दिवाळीत फटाके उडविल्यानंतर राख उरते तशी कंपनीतील राख हवेत वार्याच्या झोतासरशी फिरत होती. नाही म्हणायला कंपनीचे अस्तित्व दर्शविणारे लोखंडी सांगाडे शिल्लक होते. अशावेळी आगीचे फोटो काढतांना सहसा कुणी रोखत नाही. असे फोटो वृत्तपत्रात छापून आले की लोक त्याचा पुरावा म्हणून उपयोग करतात. विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी म्हणून वृत्तपत्राचे कात्रण जपून ठेवतात. पण इथे फक्त वेगळाच अनुभव आला. कॅमेरा घेऊन कंपनीच्या आत शिरलो तर ऊष्ण हवेचे चटके बसायला लागले. त्यापेक्षा कंपनीचा मालक जास्त तापलेला होता. म्हणाला, मघापासून सारखे रिपोर्टर येतात आणि फोटो काढून जातात आम्ही काय चोरी केली आहे काय? आम्ही कपाळावर हात मारून बसलोय आणि तुम्ही आमचे फोटो घेता? चलो निकलो यहाँ से जल्दी! आमचे अगोदर इतके नुकसान झाले आहे आणि अधिक त्रास द्यायला येऊ नका, असे म्हणत त्याने मला कंपनीबाहेर काढले.
अशा तप्त वातावरणात मालकाचे डोके गरम होणे मी समजू शकतो. त्याच्याशी वाद घालत बसलो तर आगीत तेल ओतल्यासारखे होईल, म्हणून मी मुकाट बाहेर पडलो.
आम्ही काय चोरी केली आहे काय! हे मालकाचे वाक्य मला खटकले होते. माझे विचारचक्र गरागरा फिरू लागले. तू चोरी केली नाहीस म्हणतोस तर फोटो काढून द्यायला काय हरकत होती. काही तरी गौडबंगाल असावे. ते कसे शोधावे? त्यासाठी पोलीस दादा आहेतच की.
मी स्थानिक पोलीस ठाण्यात जायला निघालो. वाटेत विचार करू लागलो, ही आग लागली की लावली? मी अनेक आगीचे फोटो काढले आहेत. माझ्या अनुभवाप्रमाणे मी जेथे जेथे आगीचे फोटो काढायला गेलो होतो, त्यापैकी अनेक ठिकाणी काही वर्षातच टोलेजंग लक्झरियस टॉवर झालेले पाहिले ते पाहून असे वाटते की आग लागल्यावर मालकाचे नुकसान होते की फायदा होतो यावर संशोधन करायला हवे.
आगीची शहानिशा करण्यासाठी मी रफी अहमद किडवार्ई नगर पोलीस ठाण्यात गेलो. तेथील वरिष्ठ पोलीस अधिकार्याकडे मी शंका बोलून दाखवली ते म्हणाले, करेक्ट! तुम्ही बोलता ते शंभर टक्के करेक्ट! अहो तो मालक तुम्हाला फोटो कसे काढू देईल. त्याच्या बुडालाच आग लागली आहे. अहो त्याची शेडच अनधिकृत आहे. कसली कंपनी आणि कसलं काय! त्याच्याकडे कोणतेही अधिकृत परवानापत्र नसताना तो व्यापार करत होता. कामगारांना तो कामगार कायद्याप्रमाणे वागवत नव्हता. त्याच्या निष्काळजीपणाबद्दल आज रात्रीपर्यंत आम्ही त्याला अटक करण्याची तयारी केली आहे. तूर्तास जखमी कामगारांचे स्टेटमेंट घेण्याचे काम चालू आहे.
पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर मी इस्पितळात दाखल झालेल्या कामगारांचे फोटो घेण्यासाठी केईएम रुग्णालयात गेलो. तेथील वातावरण तर आगीपेक्षा तापलेले. इस्पितळातील अनागोंदी, कामगारांच्या बातम्या व फोटो वृत्तपत्रातून छापून येत होते. त्यामुळे तेथील कर्मचारीवर्ग पत्रकारांपासून दोन हात लांबच राहात होत कुणी काही बोलायला तयार नाही. कुणाचे सहकार्य मिळत नाही म्हणून डीन यांना भेटायला गेलो, तर ते शासकीय कामासाठी दिल्लीला गेल्याचे समजले. प्रभारी डीनही कार्यालयात नव्हत्या म्हणून त्यांच्या निवासस्थानी फोन केला तर त्या घरी नसल्याचे सांगण्यात आले. मग आरएमओ म्हणजे निवासी डॉक्टरना भेटण्याचा प्रयत्न केला, तर तेही जागा सोडून क्वार्टर्समध्ये गेल्याचे कळले. सगळाच आनंदी आनंद होता. इस्पितळाभोवती गोल प्रदक्षिणा मारून पाहिले कोठेही फोटो काढण्यास मनाई असलेला फलक दिसला नाही.
जखमी कामगारांच्या वॉर्डमध्ये जाऊन त्यांना पाहिले. गरीब बिच्चारे आगीत होरपळून निघाले होते. वेदना सहन होत नसल्यामुळे ते कण्हत होते. त्यांच्या सर्वांगावर औषधी मलम लावले होते. त्यांच्यावर तातडीचे सर्व उपचार व्यवस्थित चालले होते. त्यांचे कुणी नातेवाईक जवळपास दिसत नव्हते. अर्धवट जळालेल्या जखमींचे फोटो जवळून घेतले आणि ते प्रसिद्ध केले तर लोकांना ते पाहावत नाही. असे फोटो शक्यतोवर काढू नयेत अशा सूचना संपादकांनी अगोदरच दिल्या होत्या. म्हणून लांबूनच फोटो घेण्याचे ठरवले.
दोन पोलीस अधिकारी जखमींची विचारपूस करताना मी फोटो टिपले. पोलिसांनी काहीही हरकत घेतली नाही. ज्यांना कायदा कळतो, जे कायद्याची अंमलबजावणी करतात त्या पोलिसांनी मला हटकले नाही म्हणून अजून दोन चार फोटो घेतले.
इतक्यात डॉक्टर समसी आले आणि त्यांनी माझा रोल काढून घेतला. खरं पाहाता समसी त्या दिवशी रजेवर होते. शेजारच्या स्पेशल रूममध्ये त्यांच्या वडिलांना अॅडमिट केले होते. त्यांची विचारपूस करण्यासाठी ते आले होते आणि नको त्यांची विचारपूस करायला लागले. ते पोलीसांनाही बडबडले. हे इस्पितळ आहे पोलीस ठाणे नव्हे, असे म्हणाले त्यांचा असा समज झाला की पोलीस अधिकारी फोटोसेशन करण्यासाठी फोटोग्राफर घेऊन आले असावेत. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. समसी मोठे डॉक्टर, त्यांना समजवणार कोण?
मी इस्पितळातील टेलिफोन ऑपरेटरकडे जाऊन महापालिका आयुक्त तिनईकर यांना फोन लावण्यास सांगितले. तो फोन लावत असतानाच डॉ. समसी आणि त्यांचे सहकारी डॉक्टर तेथे आले आणि त्यांनी फोन लावू देण्यास मनाई केली. फोन इस्पितळाचा आहे, खाजगी कामासाठी त्याचा वापर करता येणार नाही असे म्हणाले. आयुक्तांना फोन लावण्यास काय हरकत आहे? मीही हट्टास पेटलो. तू लावतोस की नाही फोन, नाहीतर तुझीसुद्धा तक्रार करतो तिनईकारांकडे, असे म्हटल्यावर घाबरून त्याने फोन लावला. त्यावेळी आयुक्तपदावरून नुकतेच कांगा गेले होते आणि तिनईकरांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतला होता ते निवासस्थान बदलण्याच्या गडबडीत होते.
डॉक्टरांनी रोल काढून घेतल्याची तक्रार पोलीसांकडे करणार होते. पण म्हटले, अखेर ते डॉक्टर आहेत, कधीकाळी मी इथे अॅडमिट झालो तर मला जिवंत ठेवायचे नाहीत.
दुसर्या दिवशी महापौर दत्ताजी नलावडे, अतिरिक्त आयुक्त अजित वर्टी आणि आयुक्त तिनईकरांना भेटून लेखी तक्रार केली. तिनईकर म्हणाले, तुम्हा लोकांना कुठेही केव्हाही जाऊन फोटो घेण्याची सवयच असते. आमचे समसी चांगले डॉक्टर आहेत. तेही असे का वागले विचारायला हवं. त्यांनी तुमचा रोल काढून घेतला, हे योग्य नाही. मी त्यांना विचारतो, असे म्हणून त्यांनी मालशे नावाच्या पीएना बोलावून घेतले व समसींना फोन करून रोल परत देण्याची सूचना केली. तो रोल हाती पडताच आगीची बातमी आणि समसींनी मला दिलेली ट्रीटमेंट फोटोसह नवशक्तीमध्ये छापून आणली. काही दिवसांनी इस्पितळाच्या डीनचा तीनचार पानांचा खुलासा आमच्या ऑफिसात आला, पण संपादकांनी तो छापला नाही. आपल्या खुलाशाला दाद मिळत नाही म्हणून काही डॉक्टरांचे शिष्टमंडळ संपादकांच्या घरी गेले. त्याचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावर संपादक पु. रा. बेहरे म्हणाले, तुम्ही आमच्या फोटोग्राफरचा रोल दादागिरी करून काढून घेता. खरे तर तुम्ही राजीनामाच द्यायला हवा. बेहरे साहेबांनी त्यांना खडे बोल सुनावले. तसे सर्व डॉक्टर खजील होऊन माघारी गेले. पुन्हा अनेक मित्रांना मध्यस्थी करून त्यांनी खुलासा छापण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी इतर वृत्तपत्रामधून केईएम इस्पितळाच्या अनेक सुरस कथा छापून येत होत्या. गरीब कामगारांना न्याय मिळावा म्हणून मी त्यांचा फोटो काढला, तर डॉक्टरांनी इतके आकांडतांडव कशासाठी करावे. फोटो काढण्यामागचा माझा हेतू त्यांना समजून घ्यायला नको का? जे पोलिसांना कळले ते डॉक्टरांना कसे उमगले नाही.
माझ्या प्रयत्नांना खरोखरच यश आले. काही दिवसानंतर किडवाई नगर पोलीस ठाण्यातून मला फोन आला. नवशक्तीमधील बातमीमुळे अलारखाँ कंपनीच्या मालकाला आठही कामगारांना नुकसान भरपाई द्यावी लागली, असे ते म्हणाले. तो काढून घेतलेला रोल शेवटी सार्थकी लागलाच.