जो बायकोशी भला, तो खातो दूधकाला असं म्हणतात… एवढं करून दूधकालाच मिळणार असेल, तर काय उपयोग त्या भलेपणाचा?
– विनीत वायंगणकर, कुडाळ
भलेपणा करा… दुधकाला मिळतोय तो गपचूप खा… खरवसाच्या आशेने शहाणपणा कराल तर दुधाचा टोप खरवडून खावा लागेल.
नवीन वर्षात तुम्हाला काय शुभेच्छा देऊ, संतोषजी?
– प्रभाकर सावंत, बागलकोट
१५ लाख माझ्या खात्यात येऊ देत अशा शुभेच्छा द्या? बघू तुमच्या शुभेच्छांची ताकद!
मी दरवर्षी १ जानेवारीला एक संकल्प करते आणि तो पाच जानेवारीपर्यंत संपूर्णपणे बारगळून जातो. हे कसं टाळता येईल?
– शोभा साळस्कर, तुर्भे
एक तारखेचा संकल्प पाच तारखेला संपेल, असा संकल्प करा. बघा, पुरा नाही झाला तर माझं नाव बदलेन मी.
लग्न झाल्यावर २४ तास जोडीदाराची हक्काची सोबत मिळालेली असताना लोक बाहेर शेण का खात असतील?
– तात्या जोशी, कर्हाड
‘ते’ लोक शेण पवित्र मानत असतील जोशी तात्या… (शेणावर गोमूत्र शिंपडून पवित्र करून खात असतील).
अन्न, वस्त्र, निवारा आणि अलीकडच्या काळात फोनचा डेटा या जगातल्या जीवनावश्यक वस्तू आहेत… यात प्रियकर किंवा प्रेयसी किंवा प्रेम असं कोणीही लिहिलेलं नसताना ‘मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही’ असं धडधडीत खोटं कसं हो बोलतात प्रेमात पडलेले लोक?
– राधिका शेपाळ, पोयनाड
तुम्ही खरं बोलून बघा… तुमचा जगू लगेच दुसरी जगनी शोधायला लागेल, तेव्हा कळेल लोक प्रेमात खोटं का बोलतात ते.
उंदरांनी कितीही ठरवलं की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचीच, तरी ते काम होणार कसं? काहीतरी आयडिया द्या.
– रमेश वत्रे, चौफुला
घंटेला मांजर बांधा. (उंदराने मांजराच्या गळ्यात घंटा बांधणं शक्य नाही, म्हणूनच वाक्प्रचार तयार झाला… घंटा काम करणार तो… पुढची वाक्यं तुम्हीच बनवा.)
देव तुम्हाला प्रसन्न झाला आणि काय हवं ते माग म्हणाला, तर तुम्ही काय मागाल?
– रिबेका फर्नांडिस, अहमदनगर
मला मेहनत केल्याशिवाय काहीही देऊ नकोस, असा वर मागेन… देव प्रत्यक्षात पावत नाही हे तुम्हालाही माहीत आहे, मग टाळ्यांचं वाक्य बोलायला आपलं काय जातंय?
शहराच्या कोलाहलातून शांत, निसर्गरम्य जागी जायचं म्हणून लोक रिसॉर्टवर, पिकनिक स्पॉटला जातात आणि तिथे डीजे लावून नाचतात नाहीतरी मोबाइलवर मोठ्याने गाणी ऐकत फिरतात… याला काय म्हणावं?
– रसिका शहाणे, संगमनेर
अशा लोकांना काय म्हणतात ‘तो’ शब्द सगळ्यांना माहीत आहे… पण ‘त्या’ शब्दाचे कॉपीराईट कृषीमंत्र्यांकडेच असावेत… म्हणून कोणी बोलत नसावेत…
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?
– रोहन सागवेकर, वांगणी
ही दोन गाणी असतात… एक प्रशांत दामले यांच्या नाटकात असतं आणि दुसरं टीव्ही मालिकेचं शीर्षकगीत असतं…
शाळेत इंग्लिशमध्ये ज्याला कधी पासापुरते पण मार्क मिळाले नव्हते, असा माणूस दोन घोट पोटात गेल्यावर फाड फाड इंग्लिश कसं काय बोलू शकतो?
– रईस शेख, काशीमिरा, मिरा रोड
मला जे विचारलंत ते दोन घोट घेतलेल्याला विचारू नका… असे लोक मराठीत ‘आय माय’ एक करतात…
संतोषराव, २०२२ या वर्षाने तुम्हाला काय दिलं?
– मिलिंद पावशे, सांगली
शहाणपण दिलं… कोणी काय दिलं, हे कोणालाही सांगायचं नाही, कितीही हवशे, नवशे, पावशे विचारायला आले तरी.
संतोषराव, तुमच्या क्षेत्रातले भले भले लेखक, कलावंत कळीच्या प्रश्नांवर काही भूमिकाच घेताना दिसत नाहीत. कलावंतांचं काम फक्त रंजन करण्याचं असतं का?
– माधव सोपान गवई, नागपूर
कोणी काय भूमिका घ्यावी, हे नागपूरचे लोक ठरवतात का? ‘नागपूरचे’ आहात म्हणून विचारतोय… लेखक, कलावंत भूमिका घेत नसतील तर गवई का घेत नाहीत काही भूमिका?… गवईसुद्धा कलाकाराचं ना? गवई फक्त रंजनच करतात का?