परवा माझा मानलेला परममित्र पोक्या मला म्हणाला, टोक्या, समजा आता मी मुख्यमंत्री झालो आणि तू माझी मुलाखत घेतलीस तर मी त्या मुलाखतीत तुझ्या प्रश्नांना काय उत्तरं देईन असं तुला वाटतं? म्हणजे, मला एक दिवस जरी कोणी मुख्यमंत्री केलं तरी माझी काही स्वप्नं तर असतील ना? त्यावर मी त्याला म्हणालो, पोक्या एका दिवसात तू काय करणार? त्यापेक्षा मी तुला एक महिना देतो. मुख्यमंत्री झाल्यावर तू कोणते धडाकेबाज निर्णय एक महिन्यात घेशील हे तूच मला आता धडाधड सांग. मी ते टेप करून घेतो. हां, बोल… आणि पोक्या सुरू झाला.
…शाळेत असताना मी ‘मुख्यमंत्री झालो तर’ असा निबंध परीक्षेत लिहिला होता. मास्तरांनी त्याला फक्त दोन मार्क दिले होते व त्याखाली मूर्ख असा शेरा लाल शाईत मारला होता. माझं काय चुकलं होतं तेच मला कळत नव्हतं. तेव्हाच ठरवलं की मोठा झाल्यावर कुठल्या तरी मोठ्या पक्षात जाईन आणि वाटेल ते करून एक दिवस तरी मुख्यमंत्री होईन. नंतर त्या मास्तरांच्या घरी जाऊन पेढ्यांचा बॉक्स त्यांच्या तोंडावर फेकून मारीन. पण अद्याप माझं ते स्वप्न साकार झालं नाही. तरीही मी माघार घेतलेली नाही. तरीही जनतेला त्याआधीच दूरचित्रवाणीवरून लाइव्ह भाषण केल्यासारखं मी सांगतो की मुख्यमंत्री झाल्यावर सर्वप्रथम मी महाराष्ट्राचा चेहरामोहरा पालटून टाकण्याच्या आधी माझा स्वत:चाच चेहरामोहरा पालटून टाकीन. मी शाळा सोडल्यानंतर दाढी करायचा कंटाळा येतो म्हणून कधीच दाढी केली नाही. दाढी न करण्याचे खूप फायदे असतात. त्यामुळे माझे मित्र मला लाडाने बोकड म्हणतात. मला या गोष्टीचा राग येतो. म्हणूनच मुख्यमंत्री झाल्यावर सर्वप्रथम मी माझ्या बंगल्यासमोर भव्य मंडप उभारून त्यात दाढी-कर्तन सोहळा आयोजित करणार आहे. त्यासाठी देशी-विदेशी मीडिया चॅनलवाल्यांना आमंत्रित करणार आहे. त्याचे लाइव्ह प्रक्षेपण ते करतीलच. त्यानंतर पुन्हा माझा दाढीवाला चेहरा कधीच तुम्हाला दिसणार नाही. इतकी सफाचाट, गुळगुळीत दाढी तुम्ही कधीच पाहिली नसेल. त्यानंतर माझा बिनदाढीचा चेहरा प्रसारमाध्यमातून पाहिल्यावर तुम्हाला माझी ओळख कदाचित पटणार नाही. पण त्याला माझा नाईलाज असेल. त्यानंतर माझा पहिला कार्यक्रम असेल तो केशकर्तनकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा मेळावा माझी स्नानसंध्या व पूजाअर्चा झाल्यावर घेण्यात येईल. त्यांनी मागण्यांचे निवेदन दिल्यास त्या सर्व मागण्या एका फटक्यात मान्य करण्यात येतील. मंत्रिमंडळावर खर्च नको म्हणून मी फार तर एका उपमुख्यमंत्र्यांवरच समाधानी राहीन. ते त्यांना हवे ते राज्याच्या हिताचे व पक्षाच्या हिताचे निर्णय घेऊ शकतात. मी त्यांच्या कसल्याही निर्णयावर सही करीन. शेवटी त्यांचा या पदाचा अनुभव मला विचारात घ्यावाच लागेल. राज्यातील कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्या मागण्यांसाठी मला भेटायला आले, तर पाच मिनिटांत मंत्रिमंडळाची म्हणजे माझी आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील.
दुपारी जेवण झाल्यावर ताबडतोब मी विमानाने आपले राज्य किती मोठं आहे याची हवाई पाहणी करीन. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रत्येक सरपंचाला पंचवीस कोटीचा निधी देण्याची घोषणा करीन. पावसाळ्यात ठाणे शहरासह अनेक शहरांतील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अफाट त्रास सहन करावा लागतो. त्यात अनेकांचा मृत्यूही होतो. हे सर्व टाळण्यासाठी एक दिवस मी रस्त्यावरील सर्व वाहतूक बंद ठेवून अमेरिका, फ्रान्स व इंग्लंड-जपानसह पुण्यातील तज्ज्ञ अभियंत्यांना या शहरांमध्ये रस्तेकामाच्या सामानासह पाचारण करून एका दिवसात सपाट, तुळतुळीत, गुळगुळीत रस्ते तयार करून घेईन. आधीच्या सरकारने घेतलेले विकासकामांचे सर्व निर्णय रद्द करून त्या निर्णयावर दोघांच्या मंत्रिमंडळात फेरविचार करून नव्याने घेण्यात येतील. नव्या पिढीला आधुनिकतेची आवड असल्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्व शहरांची, जिल्ह्यांची, तालुक्यांची नावे बदलण्यात येतील. हा नामांतर समारंभ सर्व ठिकाणी एकाच दिवशी, एकाच वेळी ढोल वाजवून साजरा करण्यात येईल. राज्यातील शिक्षकांच्या शाळा, कॉलेजांच्या, कामगारांच्या, इस्पितळ कर्मचाऱ्यांच्या, डॉक्टरांच्या, प्राण्यांच्या, प्रार्थनास्थळांच्या तसेच सर्व घटकांच्या समस्या चार दिवसांत सोडवण्यात येतील. गरीबांना मोफत प्रवासाची व दोन्ही वेळच्या मोफत जेवणाची सोय पुरवण्यात येईल. राज्यातील वाहतुकीचा ताण कमी व्हावा, म्हणून प्रत्येक शहरात तसेच गावात हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येईल. यासाठी येणार्या खर्चाची जबाबदारी राज्यांतील प्रमुख वित्तीय संस्थांवर राहील. खर्चासाठी पैसे कमी पडल्यास नाशिकमधील टांकसाळीतून नव्याने नोटा छापण्यात येतील व निवडणुकीच्या आधी मतदान कार्डाबरोबर पैशाचे सुयोग्य वाटप करण्यात येईल.
जनता सुखी तर सरकार सुखी हा एकच मंत्र मनी जपून ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असे आमचे धोरण असेल. सर्व झोपडपट्ट्या पाडून त्या रहिवाशांना त्याच जागी उंच टॉवर बांधून देण्यात येतील. त्याशिवाय त्यांना जीवनावश्यक वस्तू मोफत पुरवण्यात येतील. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर निम्म्याहून कमी करण्यासाठी एकाच दिल्लीवारीत हे कार्य तडीस नेण्यात येईल. आग लागून इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना प्रत्येकी एक कोटीची मदत देण्यास सरकार बांधील राहील. जनतेच्या सुखासाठी हे करू की ते करू अशी माझी स्थिती झाली आहे. त्यासाठी आजपर्यंत मला फार काही करता आलं नाही. सगळं लाईफ स्वत: गडगंज संपत्ती आणि जमिनी हडपण्यात गेलं. कुणाच्या जिवावर आपण मोठे झालो यापेक्षा आपल्या नशिबात होतं तेच आपल्याला मिळालं हे मी समजतो आणि इतरांनीही समजावं असं मला वाटतं. स्वत:च्या स्वार्थासाठी कधी गप्प राहावं आणि कधी बंड करून उठावं हे ज्याला समजतं तोच मोठा तरी होतो किंवा मातीमोल तरी होतो. आता मला फक्त लोकप्रियतेचा ध्यास आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री व्हायचं आहे. माझं हे स्वप्न पाहून तुम्ही कौतुक कराल की शिव्याशाप द्याल हे तुम्हीच मनाशी ठरवा.