(शाळेचा वर्ग, फळ्यावरील भिंतीवर कुणा बुवाचा फोटो, फोटोला चारेक माळा घातलेल्या, भिंतीला सहासात अगरबत्त्या खोचलेल्या. वर्गात मुलांच्या आणि मुलींच्या मध्ये एक पडदा. मुलांच्या डोक्यावर काळ्या टोप्या, मुलींच्या नाकापर्यंत ओढण्या ओढलेल्या. मुलांच्या कपाळावर मोठाले टिळे, मुलींच्या कपाळावर टिकल्या. मागल्या भिंतीवर ढाल-तलवारी. खाली फरशीऐवजी शेणाने सारवलेली खोली. बाकांऐवजी सतरंज्या अंथरलेल्या. वर्गात कुणीही शिक्षक नसल्याने मुलं मोठमोठ्याने गाताय, ‘डार्विन, डार्विन काय म्हणतो? अहा, डार्विन! ओहो डार्विन…’ आणि त्यावर अचकट-विचकट नाचतायत, हावभाव करतायत. मुली मात्र नाकापर्यंत ओढलेल्या ओढण्या आणखी बोटभर खाली घेऊन कुठलासा मंत्र जपतायत. तितक्यात सदर्यावर जानवं घातलेले एक गुरुजी धोतराचा सोगा सावरत आत येतात, भिंगाच्या काचेतून मुलांकडे बघतात.)
गुरुजी : बाळांनो, इतका दंगा बरा नाही! शांत व्हा!
शिष्य १ : ये मास्तरड्या, गप्प! ही शाळा माझ्या आज्यानं बांधलीय. माझा बाप ट्रस्टी आहे इथं. आणि तो दिल्ली दरबारात मनसबदार आहे. कळलं का?
गुरुजी : हो, युवराज! मी विसरलो नाहीय. मी आपला आणि आपल्या पालकांचा यासाठी ऋणी आहे की तुम्ही मला तासिका तत्त्वावर काम देऊ केलंत! मी केवळ तुमच्या सेवेसाठी इथं आलोय.
शिष्य १ : मूड खराब करू नको रे! मला पुढल्या वर्गात जायचंय, ते कधी होईल?
गुरुजी : म्हणजे हे बघा, मी ह्या सत्राचा सिलॅबस पूर्ण करत आणलाय, आता त्याच्या परीक्षा घेतल्यात की…
शिष्य १ : मला परीक्षेची फार भीती वाटते, तुम्ही दरवेळी दुसर्या केंद्राचे शिक्षक बोलावता. ते फार डेंजर असतात. ते कॉपीसुद्धा करू देत नाहीत. त्यामुळे मी दोन वर्षे इथे आहे. हे बघ, पुढल्या वर्षी मी इथं राहिलो, तर तुझा पगार कट करून घेईन.
गुरुजी : नका हो असं करू! आधीच मी शिवभोजन जेवून जगतोय हो!
शिष्य १ : मग मला पास करायचा प्लॅन कर.
गुरुजी : मी तुमचे जादा तास घेऊ का?
शिष्य १ : घंटा!! घंटा पडेपर्यंत एक पान समजवायला गेलं कुणी तरी डोक्यावरून जातं माझ्या!
गुरुजी : मग तुम्हाला काय अवघड वाटतं ते सांगा, आपण त्याचा अभ्यास घेऊ.
शिष्य १ : म्हणजे इतिहास अवघड वाटतो.
गुरुजी : नेमकं त्यातलं काय?
शिष्य १ : तसं तर तो जफर आहे ना? त्याचा बाप कोण तो? जांगिड…? त्याची बेगम कहबूतरखाँ? ते लै अवघडे!
गुरुजी : बरं, ते नंतर शिकवू! नाहीतर मॅक्रो कॉपी बनवू त्याच्या. लपवून न्यायला सोप्या अशा! हे मी लिष्टच करतो, काय अवघड वाटतं त्याची! बोल पुढे!
शिष्य १ : परत ते शिवाजी महाराजांनी बाबरची शेंडी छाटली ते! आणि गांधीचं काही लिम्लेट गोळ्या…
गुरुजी : लिहिलं बघ मी! मुघल काळ, गांधी हत्या. बाकी आणखी काही अवघड वाटतं का?
शिष्य १ : ह्या पुस्तकातलं बघ जरा.
गुरुजी : हे विज्ञानाचं पुस्तक आहे.
शिष्य १ : हा कोणतं पण राहू दे! लै खतरनाक आहे ते!
गुरुजी : यात काय अवघड आहे नेमकं?
शिष्य १ : माकडाचा माणूस होतो ते!
गुरुजी : ते अवघड आहे?
शिष्य १ : नाही. मला आवडलं नाही ते! काही शिकवित्यात का असं? आधीच माझा बाप मला, दारू ढोसून ‘माकडाची औलाद’ म्हणत चिडवितो, तुझ्यामुळं अख्खा वर्ग मला असंच बोलतो.
गुरुजी : त्याच्यावर मी प्रश्नच काढणार नाही. पुढं बोल!
शिष्य १ : ते गणित पण घे!
गुरुजी : त्यात काय अडतं?
शिष्य १ : मला फक्त बेरीज जमते, त्याच्यात लिहून देयेल असंल तर नक्की जमतं!
गुरुजी : म्हणजे त्यात गुणाकार, भागाकार, पायथागोरस बाजूला ठेवू, चालेल?
शिष्य १ : हे पुस्तकाचे कागदं मला विमान बनवायला घेयचे आहे…
गुरुजी : बरं, नागरिकशास्त्र ऑप्शनमध्ये बघुयात! आपण ह्या सगळ्यांचा जादा तास घेऊ, आणि मॅक्रो कॉपी पण करू.
शिष्य १ : नको, थांब ती लिष्ट मला दे, मी पप्पांना मेसेज करतो.
(आणि दुसर्याच मिनिटाला एक शासन निर्णय गुरुजीच्या मेलमध्ये येतो.)
गुरुजी : अरे, काय आलंय यात? इतिहासातून मुघल काळ वगळला. गांधीहत्या वगळली. विज्ञानातून डार्विन वगळला. आणि… बरंच काही आहे. पण तू केलं काय?
शिष्य १ : मी पप्पांना सांगितलं, गुरुजी आपल्या धर्माच्या बाहेरचं शिकवतात, मी ते शिकलो तर मी धर्मद्रोही व्हईल. ही घ्या लिष्ट. आणि त्यांनी ते लगेच कापलं.
गुरुजी : (हात जोडून) बाळ, आणखी एक मेसेज करतोस का?
शिष्य १ : कुठला?
गुरुजी : ह्या शाळा बंद करायला लाव. म्हणजे तुला पास होण्याबद्दल कुणी विचारणार नाही आणि कुणी पदवी मिळवणार नाही. म्हणजे शिक्षण नाही, आणि शिक्षण नाही म्हणजे रोजगार कुणी मागणार नाही. म्हणजे एक झटक्यात शिक्षण, बेरोजगारी वगैरे बाष्कळ प्रश्न मिटतील.
सर्व शिष्य एकत्र : मग तसं झालं तर आपण काय करायचं?
गुरुजी : आपण तुमच्या ह्याच गाण्यावर नाचूयात की!
(सगळी मुले मिळून पुन्हा ‘डार्विन, डार्विन काय म्हणतो?’ गाण्यावर अचकट-विचकट नाचू लागतात. मुली मात्र नाक झाकत मुलांच्या नजरेपासून वाचत घरी निघतात.)