बॅटमबाँग नावाचं एक शहर जगात अस्तित्वात आहे, ही गोष्ट आम्हाला माहितीच नव्हती. कंबोडियाची सहल करायचं ठरवल्यावर प्रथमच हे नाव ऐकलं. तिथं गेल्यावर मात्र या शहराच्या चक्क प्रेमातच पडलो. शहर कसलं एक मोठं गाव असावं इतकाच त्याचा जीव. पण इथं फ्रेंच वसाहतवाद, थायलंडच्या राजाची सत्ता, अकराव्या आणि बाराव्या शतकात निर्माण झालेली देवळं आणि मधल्या काळात होऊन गेलेली पॉट पॉलची जुलमी राजवट या सगळ्याच्या खुणांचा मिलाफ आहे. सोबत आसपास असलेली खेडेगावं, काही नैसर्गिक गोष्टी हेही आहे. त्यामुळं बॅटमबाँगच्या प्रेमात पडणं साहजिकच होतं.
सीएम रेपमधून निघाल्यावर मिनी बसनं तिथं पोचायला साधारण चार साडेचार तास लागतात. रस्ता तसा रूक्ष. आसपास हिरवीगार शेतं हाच काय तो विरंगुळा. सांगायची गोष्ट म्हणजे, रस्त्यात एके ठिकाणी आमची गाडी नैसर्गिक विधीसाठी थांबली. तो एक ढाबा होता. त्या ढाब्यावर फळं होती, इतर अनेक वस्तू विकायला ठेवल्या होत्या. आपल्या कोकणात मालवणच्या आसपास खाजा मिळतो, जाडसर शेवयांना गूळ आलं लगडलेलं असतं त्या पदार्थात, अगदी तसाच खाज्यासारखा पदार्थ त्या ढाब्यावर विकायला ठेवला होता. साधारण पाव किलो वजन असावं एका पाकिटाचं. तो चक्क पाच डॉलरला विकायला ठेवला होता. आपल्या देशात किती स्वस्ताई आहे याची जाणीव झाली. आपल्याकडे त्यांना कोणी शंभर रुपये देखील देणार नाही.
आम्ही बॅटमबाँगला पोचलो तेव्हा चांगलाच अंधार पडला होता. त्यामुळं आम्ही हॉटेल गाठणं पसंत केलं. आमच्या हॉटेलचा मालक फ्रेंच होता आणि मॅनेजर स्थानिक व्यक्ती. हॉटेल संपूर्णपणे जंगलाच्या थीमवर होतं. हा वेगळेपणा चांगला अनुभव देऊन गेला. हॉटेलपर्यंत जायला आम्ही टुकटुक केली. टुकटुकवाल्या मुलाशी आम्ही दुसर्या दिवशी कुठे कुठे फिरायचं याचा सौदा केला, तर त्याने बोनस म्हणून बस स्टँडवरून हॉटेलपर्यंत न्यायचं भाडं घेतलंच नाही. व्यवसाय वाढवायचा एक प्रकार!
पण, दुसर्या दिवशी तो आलाच नाही. त्याच्याऐवजी दुसरीच व्यक्ती आली. ठरलेला सौदा मात्र पक्का होता. सकाळी नऊ वाजताही चांगलंच उकडत होतं. पण फिरायला निघालो आणि हवेची मंद झुळूक मनाला आल्हाद देऊन गेली. सुदैवानं या टुकटुकवाल्या बर्यापैकी इंग्रजी येत होतं. त्याच्यासोबत फिरताना कंबोडिया देशातलं एक वैशिष्ट्य लक्षात आलं. इथल्या गाईड्सना परदेशी भाषा चांगल्या अवगत आहेत.
टुकटुकवाल्यानं पहिल्यांदा आम्हाला एका देवळात न्यायचं ठरवलं. त्या बोलघेवड्या माणसाची बडबड सतत चालू होती. जाताना रस्त्यात येणार्या प्रत्येक गोष्टीची तो आम्हाला माहिती देत होता. स्थानिक बाजाराशेजारून जाताना बाजारात काय काय मिळतं, मासे कुठले आहेत, फळं कुठली, भाज्या कुठल्या, यावर त्याचं भाष्य सुरू होतं. अर्थात आपल्या आणि त्यांच्या भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये फार फरक नव्हता. नावं मात्र खूपच वेगळी होती. मार्केट्स मात्र स्वच्छ होती.
आम्ही पहिल्या देवळात पोचलो. परिसर खूपच शांत होता. आतमध्ये बुद्ध धर्माचे पुजारी फिरताना दिसत होते. देऊळ तर होतंच सोबत स्मशान देखील होतं. इथल्या स्मशानांची एक वेगळी रचना आहे, ख्रिस्तीधर्मीयांशी साधर्म्य सांगणारी. प्रत्येक कुटुंबाचं एक स्मशानघर असतं. त्याला एक लहानसा दरवाजा असतो. दरवाजा टाळं लावून बंद केलेला असतो. त्या कुटुंबातली एखादी व्यक्ती मृत झाली की त्या प्रेताची विल्हेवाट कुटुंबाच्या स्मशानघरात केली जाते. कित्येक देवळांमध्ये अशी सोय आहे.
पण मन हेलावून टाकणारी गोष्ट वेगळीच आहे. ते अख्खं देऊळ एके काळी स्मशानघर होतं. पॉट पॉल हा क्रूरकर्मा सत्तेवर असताना त्याने कित्येक माणसांना मारून तिथल्या एका लहानशा तलावात टाकलं होतं. शिवाय देवळाच्या आवारातच अत्याचार खोली होती. तिथं किती माणसांचा जीव घेतला गेला हे समजणं कठीण आहे. तिथं सापडलेल्या मानवी सांगाड्यांचा ढीग करून देवळाच्याच आवारात एका काचेच्या खोलीत रचून ठेवलेला आहे. अमेरिकेत स्थाईक झालेल्या कंबोडियन नागरिकांनी ही खोली बनवलेली आहे. बघून खरंच गलबलायला होतं.
आमच्या प्रवासात पुढे न्होम पेन्ह शहराच्या जवळ अशीच एक शाळा होती. या शाळेला तुरुंग बनवून कित्येक लाख लोकांचा जीव घेण्यात आला. अर्थात सर्वात वाईट म्हणजे न्होम पेन्हमधल्या शाळेच्या जवळ पर्यटकांना एक झाड दाखवतात. त्या झाडावर डोकं आपटून कित्येक लहान मुलांना मारण्यात आलं, अजूनही त्या झाडावर रक्ताचे डाग दिसतात, असं आम्हाला सांगितलं गेलं. ते ऐकूनच इतकी किळस आली की आम्ही ते झाड पाहायला गेलो नाही.
बॅटमबाँगमध्ये फिरताना आणखी एक जागा अशीच होती. तिथल्या एका डोंगरातल्या गुहेवजा कपारीत देखील अशीच अनेक प्रेतं टाकली गेल्याचं कळलं. सुदैवानं ती जागा सहजी दिसू शकेल अशी नाही. त्यामुळं दृष्टीआड सृष्टी अशी परिस्थिती होती. त्या डोंगरावर एका भल्यामोठ्या बुद्धमूर्तीचं अर्धवट राहिलेलं बांधकाम दिसलं. बांधकाम अर्धवट का अशी विचारणा केली तेव्हा कळलं की परिसराचं नैसर्गिक रूप अबाधित राहावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला तरी हा विचार विचित्र वाटला. कारण प्रत्यक्षात त्या बुद्धमूर्तीमुळे अधिकच चांगला वाटत होता. सायंकाळ झाल्यावर गुहेतून कित्येक हजार वटवाघळं एकाच वेळी बाहेर निघतात असं समजलं. पण तिथं इतका घाण वास येत होता की थांबणं शक्य नव्हतं.
बॅटमबाँगमध्ये अनेक देवळं आहेत. देवळं म्हणजे पॅगोडा. आपल्या महादेवांच्या देवळांसारखी काही बर्याच उंचीवर. डोंगरावर आहेत. देवळात पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. वर जाईपर्यंत इथल्या उष्ण वातावरणात आपण घामाने थबथबलेले असतो. पण एकदा देवळापाशी पोचल्यावर दिसणारं दृश्य नक्कीच सुंदर असतं. सोबत पाण्याची बाटली मात्र हवी. कारण वर तशी सोय नसते. नुसती आजूबाजूला नजर टाकली तरी थोड्याच वेळात श्रमपरिहार होतो.
काही देवळांच्या जवळ जलाशय आहेत. जलाशयांना लागून असलेल्या खाण्याच्या दुकानांमधून छान वास दरवळत असतात. शिवाय वेगवेगळे पदार्थ घेऊन टुकटुक फिरत असतात. फक्त त्यांच्या हॅण्डलला लटकवलेले लाऊडस्पीकर्स इतके बोंबलत असतात की कान किटून जातात. इथं कापलेल्या कैर्या, स्टारफळ, नारळ वगैरे फिरून विकणारी मुलंमुली असतातच.
वटवाघळांवरून बॅटमबाँगच्या आणखी दोन गोष्टी आठवल्या. टुकटुक आम्हाला एका देवळात घेऊन गेली. तेव्हा तिथंही एक झाड दिसलं. झाडावर कित्येकशे वटवाघळं लटकत होती. शिवाय त्या गुहेकडून शहरात परत येताना लागणार्या हायवेवर कित्येक दुकानं दिसली. त्या दुकानात तळलेली वटवाघळं विकायला ठेवलेली दिसली. इथली माणसं चवीनं हे खातात. आम्हाला चीनमधल्या वुहानची आणि कोरोनाची आठवण झाली. अर्थात अंगावर शहारा देखील आला.
बॅटमबाँगमधून एक नदी वाहते. काही ठिकाणी नदीचं खोरं चांगलंच खोल आहे. पूर्वी नदीच्या या तीरावरून त्या तीरावर जायला होडी लागायची. मग एक स्पॅनिश माणूस त्यांच्या मदतीला धावला. त्याने स्वखर्चानं नदीवर पूल बांधून दिला. पूल अगदी लहान, जेमतेम एखादी मोटारसायकल जाईल इतका अरुंद आहे. मोटारसायकल घेऊन दुसर्या बाजूला जाणं सोपं आहे. चालत जाण्यासाठी याचा हमखास उपयोग होतो. दिसायला अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमधल्या गोल्डन गेट ब्रिजसारखा दिसतो. त्यामुळं स्थानिक याला गोल्डन गेट ब्रिज असंच म्हणतात.
या पुलाकडे एक बस थांबा आहे. तिथं एक गंमत घडली. तिथे वाकून नमस्कार करण्याची पद्धत आहे. थोडा आगाऊपणा केला आणि आम्ही तिथे मुलांना असाच नमस्कार केला. मुलं फिदीफिदी हसली. मग टुकटुकवाल्याकडून कळलं की मोठ्या माणसांनी लहानग्यांना असा नमस्कार करायचा नसतो. लहान मंडळीनी मोठ्यांना करायचा असतो. मुलांच्या हसण्याचं कारण ऐकून नक्कीच थोडं खजील व्हायला झालं.
गोल्डन गेट पुलावर टुकटुकवाल्याला एक वयस्कर बाई भेटली. ती बहुदा शेतातून येत असावी. तिच्याकडे पेरू होते. जवळपास नारळाच्या आकाराचे पेरू होते. त्या बाईनं एक पेरू टुकटुकवाल्याला दिला. आम्हाला आपल्याकडच्या शेतकर्यांची आठवण झाली. ही खेडूत मंडळी स्वभावानं एकसारखीच असतात. आदरातिथ्याचा जराही कमी पडत नाहीत.
बाकी बॅटमबाँग खूप देखणं उपशहर आहे. आम्ही होतो तेव्हा लग्नाचे मुहूर्त असावेत, कारण तिथल्या गावांमध्ये अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप घातलेले दिसले. इथलं लग्न कसं असतं ते पाहण्याची इच्छा दाबून ठेवावी लागली, कारण तोपर्यंत दुपार झाली होती. पाहुणे जेवायला गेले किंवा जेवून आराम करीत असतील असं टुकटुकवाल्यानं सांगितलं म्हणून तो विचार बाजूला ठेवावा लागला. नाहीतरी आगंतुकपणा वाईटच दिसला असता.