२२ मार्चचा शुक्रवार. मॉस्कोतला ‘क्रोकस हॉल’. क्षमता ६३००. ‘पिकनिक’ या लोकप्रिय रॉक बँडचा कार्यक्रम होता. कार्यक्रम हाऊसफुल होता.
दहशतवादी टोळी हॉलच्या दारापाशी दिसली. चार किंवा पाच जण असावेत. त्यांच्या पाठीवर बॅकपॅक होते. हॉलशी पोचल्यावर त्यांनी बॅकपॅकमधून ऑटोमॅटिक बंदुका बाहेर काढल्या. गोळीबाराला सुरुवात केली. समोर दिसेल त्याच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडत होते.
माणसं सैरावैरा पळू लागली. दहशतवादी दरवाजातून हॉलमधे घुसले. गोळीबार करतानाच ते बॅकपॅकमधून आग लावणारी रसायनं फेकत होते, आग लावत होते. हॉल पूर्ण भरलेला होता. शेतात औषधं फवारावीत तशा गोळ्या फवारल्या जात होत्या.
गोळीबार करताना दहशतवादी त्वेषानं बरळत होते. त्यांची भाषा लोकांना कळत नव्हती. दहशतवादी रशियन नव्हते, मध्य आशियातल्या देशातून आले होते. नंतर त्यांच्या बरळण्याचं भाषांतर प्रसिद्ध झालं. ते म्हणत होते, ‘अश्रद्धांचा आम्ही नायनाट करत आहोत… आमच्या लोकांना सीरियात मारलंत काय, घ्या त्याची फळं…’
या असल्या घाईगर्दीतही लोक सेलफोन चित्रीकरण करत होते. त्यातलं एक क्लिप दाखवत होतं की एका जमिनीवर पालथ्या पडलेल्या नागरिकाच्या छाताडावर दहशतवादी बसलाय, त्याचा गळा सुर्यानं चिरतोय, गळा चिरताना त्वेषानं काहीतरी बोलतोय.
कार्यक्रमाच्या जागी पोलीस बंदोबस्त फारसा नव्हता. जुजबी चार दोन हवालदार असावेत. काय झालंय ते कळायच्या आतच १३७ माणसं मेली. हॉल आगग्रस्त झाला. पोलिसांच्या कार लकाकत पोचेस्तोवर दहशतवादी पळाले होते.
काही मिनिटांचा काळ. अँब्युलन्सा आल्या,
हॉस्पिटलांकडं रवाना झाल्या. हॉस्पिटलमधेही माणसं मेली.
सेलफोननं केलेलं चित्रिकरण एव्हाना रशियातच नव्हे तर सार्या जगभर पसरलं होतं. अध्यक्ष पुतीन यांच्याकडं ते पोचलं असणारच. पाचच दिवसांपूर्वी ते पुन्हा एकदा रशियाचे अध्यक्ष झाले होते. ८७ टक्के लोकांनी त्यांना मतं दिली होती. १९९९पासून म्हणजे गेली २५ वर्षं ते आलटून पालटून पंतप्रधान, राष्ट्रपतीपदावर आहेत. आता आणखी सहा वर्षं. आपल्याला मतं न दिलेले उरलेले १३ टक्के लोक कोण आहेत आणि त्यांचं काय करायचं या विचारात पुतीन असावेत, त्यावेळी या दुर्घटनेची बातमी त्यांच्या कानावर आली असणार.
घटना घडल्यावर काही मिनिटातच इस्लामिक स्टेट या संघटनेच्या खोरासान या शाखेनं इंटरनेटवर या घटनेची जबाबदारी घेतली, आपणच घडवून आणलं असं जाहीर केलं.
घटनेला अठरा तास झाल्यानंतर पुतीन टीव्हीवर आले. त्यांनी पाच मिनिटांचं भाषण केलं. भाषणात सांगितलं, ‘ही दुर्घटना युक्रेननं घडवून आणली आहे. युक्रेनचे हस्तक यात गुंतलेले असून त्यांना अमेरिका-ब्रिटन या देशांनी प्रशिक्षित केलंय, मदत पुरवलीय. हे रशियावरचं आक्रमण आहे, पश्चिमी देशांनी केलेलं आक्रमण आहे.’ पुतीननी कोणतेही पुरावे दिले नाहीत.
दुसर्या दिवशी रात्री चार संशयित आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. एकाचे हात मागं बांधलेले होते, तो ओणवा वाकलेला होता. एकाचा एक डोळा सुजलेला होता, काळानिळा झाला होता, त्यानं खूप मार खाल्ला होता. एकजण व्हीलचेअरवर होता. एकाच्या कानावर बँडेज होतं, त्याचा कान कापलेला होता. चौघांनीही भरपूर मार खाल्ला होता.
लोकांनी पोलिसांनी केलेल्या मारहाण आणि छळाची दृश्यं चित्रीत केली होती. ती रशियाभर पसरली होती. ती भयानक होती. पोलिसांनी चित्रीकरण कसं होऊ दिलं? मुद्दाम?
पुतीन यांच्या भाषणानंतर अमेरिका आणि युके या देशांच्या इंटेलिजन्स संघटनांनी जाहीर केलं की अशा प्रकारचा हल्ला होणार आहे याची पूर्वसूचना त्यांनी रशियाला दिली होती, मित्रत्वाच्या नात्यानं. सध्या रशिया आणि वरील दोन्ही देश यांच्यात वितुष्ट आहे; रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणात वरील व इतर युरोपीय देशांनी युक्रेनची बाजू घेऊन रशियावर टीका चालवली आहे.
इस्लामिक स्टेट या संघटनेचा राग रशियावर आहे. कारण सीरियात चाललेल्या यादवीमध्ये सीरियन सरकारशी इस्लामिक स्टेट लढत आहे. सीरियन सरकारला रशियाची लष्करी मदत आहे. इस्लामिक स्टेटचे सुमारे ८००० गनीम सीरियाच्या तुरुंगात मार खात पडले आहेत. इस्लामिक स्टेट त्याचा सूड उगवतंय.
इस्लामिक स्टेट ही संघटना म्हणण्यापेक्षा एक सिद्धांत आहे असं म्हणूया. एक केंद्रीय संघटना असणं आणि तिच्या शाखा जगभर असणं असं या संघटनेचं रुप नाही. जगावर इस्लामी राज्य यावं असं मानणारे लोक जगात कुठंही संघटित होतात आणि हाणामार्या करतात. तर अशा या इस्लामिक स्टेटचा एक फुटवा अफगाणिस्तानात आहे. या फुटव्याचंच नाव इस्लामिक स्टेट खोरासान असं आहे. हा फुटवा अफगाणिस्तानातल्या तालिबान सरकारच्या विरोधात आहे. तालिबान सरकार हे खरंखुरं इस्लामी राज्य नाही, ते खराखुरा शरीया अमलात आणत नाहीत असं खोरासान गटाचं म्हणणं आहे. हा खोरासान गट २०१५ साली स्थापन झाला पाकिस्तानात. या गटाचा पाकिस्तानमधल्या सरकारवरही खुन्नस आहे, कारण पाकिस्तानातही खराखुरा शरीया लागू केला जात नाही असं या गटाचं म्हणणं आहे.
खोरासान गट अफगाणिस्तानात घातपाती उद्योग करत असतो. या गटातले गनीम मोठ्या संख्येनं मध्य आशियाई देशांतून भरती करण्यात आले आहेत. ताजिक, किरगिझ इत्यादी. ही मंडळी मध्य आशियाई असल्यानं ना त्यांना अफगाण जनतेबद्दल प्रेम आहे ना पाकिस्तानी जनतेबद्दल. ते उपरे आहेत म्हणा ना.
खोरासान गटाचे ६००० गनीम अफगाणिस्तानात मुक्कामाला आहेत. इस्लामिक स्टेट हे मुळात सुन्नी आहे. ओसामा बिन लादेननं या गटाला प्रेरणा दिली आहे. ते शिया इराणवरही खुन्नस बाळगून असतात. काही दिवसांपूर्वी या मंडळींनी इराणमध्ये केरमान या शहरात घातपात करून ८४ माणसं मारली.
सध्या युक्रेन युद्धात इराण रशियाला मदत करतंय. इराणमध्ये तयार झालेले ड्रोन रशिया वापरतंय. म्हणजे इराण-रशिया दोस्ती आहे. म्हणूनही इस्लामिक स्टेट गटाचा रशियावर राग आहे. अमेरिका, युके, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या इंटेलिजन्सचं इस्लामिक स्टेटवर लक्ष असतं. त्यामुळंच त्यांनी रशियाला मॉस्को हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती.
हल्ला इस्लामी स्टेटनं केला आहे असं म्हणायला जागा आहे. पश्चिमी संस्कृतीचा प्रभाव असणारे कार्यक्रम हे त्यांचं लक्ष्य असतं. २०१५ साली पॅरिसमध्ये एका स्टेडियमवर याच रितीनं हल्ला झाला होता आणि त्यात १३० माणसं मेली होती. तिथंही एका गाजलेल्या अमेरिकन बँडचा जलसा होता.
मॉस्कोमध्ये हल्ला करून पळणं आयएसच्या गनिमांना जमलं. पळण्याच्या आधीच पोलीस तिथं पोचले असते तर त्यांनी अंगावरची स्फोटकं उडवून स्वत:चा घात केला असता. २०१७ साली इस्लामिक स्टेट रशियातून हद्दपार झाला असं पुतीननं जाहीर केलं असताना हा घातपात कसा झाला? हे दहशतवादी कुठून उपटले? पुतीन यांचं म्हणणं आहे की ते बाहेरून आले होते.
रशियातले नागरिक म्हणतात की मुळात पुतीन यांची सुरक्षाव्यवस्था एकांगी आणि सदोष आहे. पुतीन यांचं लक्ष स्वत:ला वाचवण्यावर, आपल्या विरोधकांना हुडकून निष्प्रभ करण्यावर असतं. एफएसबी एकेकाळच्या केजीबीचा अवतार रशियाभर पुतीन विरोधकांना हुडकत असतो. अॅलेक्सी नेवाल्नी यांची संघटना पुतीननी देशद्रोही म्हणून जाहीर केली आणि त्या संघटनेच्या हज्जारो कार्यकर्त्यांना हुडकून तुरुंगात पाठवण्यात आलंय. किती तरी मारलेतही. पुरावे मागं न ठेवता माणसं मारण्याचं तंत्र पुतीननी विकसित केलंय.
मतलब असा की सुरक्षा यंत्रणा विरोधकांमधेच गुंतलीय, तिला इस्लामिक स्टेट किंवा तत्सम घातपातांकडं लक्ष द्यायला वेळ नाही. कालचा घातपातही पुतीननी घडवून आणलेला नाही ना अशी शंका लोक घेतात. लोक मागचा संदर्भ देतात.
१९९९ साली मॉस्को व इतर शहरांत अनेक अपार्टमेंट घरांत स्फोट झाले, ३०० नागरिक मेले, १७०० जखमी झाले. पुतीन पंतप्रधान होते आणि नुकतीच तयार झालेली एफएसबी ही सुरक्षा यंत्रणा पुतीन यांच्या ताब्यात होती. सरकारनं लगोलग पत्रक काढून जाहीर केलं की चेचन्यातल्या घातपात्यांनी हे स्फोट घडवून आणले. आता पुतीन चेचन्यावर हल्ला करायला मोकळे झाले.
काही पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते वरील स्फोट कसे घडले याचा शोध घेऊ लागले. त्यांना एका इमारतीच्या तळमजल्यावर ३ मोठी पोती सापडली. त्यात स्फोटक पदार्थांची भुकटी होती. पोलिसांनी ती पोती तळमजल्यावर ठेवणार्या माणसांना पकडलं. चौकशीत कळलं की पोती ठेवणारे लोक एफएसबी या सुरक्षा संघटनेशी संबंधित होते. अजून पुतीन यांची पकड रशियावर बसलेली नव्हती. त्यामुळं ही बातमी छापून आली. लगोलग सरकारनं जाहीर केलं की तळ मजल्यावरची ती पोती साखरेची होता आणि एफएसबीच्या माणसांना वस्तू उचलून नेण्याचं वगैरे प्रशिक्षण देण्यासाठी तो उद्योग केला जात होता.
तपास करणारे पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यापैकी काहींचे खून झाले, काहींवर विषप्रयोग झाला. खून कोणी केले आणि विषप्रयोग कोणी केला ते कळलं नाही. असो.