कोणताही व्यवसाय यशस्वीपणे करण्यासाठी वेळ साधावी लागते. भोवताल कसा बदलतो आहे, लोकांच्या सवयी, समाजव्यवस्था कशी बदलत आहे, याचा अंदाज घेऊन त्यानुरूप सुरू केलेला व्यवसाय यशस्वी होण्याच्या शक्यता वाढतात.
कल्याण येथे राहणार्या सुनीता देसाई यांनीसुद्धा वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी असाच वेगळा, मात्र सध्याच्या काळात प्रचंड मागणी असू शकत असलेला सेवा व्यवसाय जानेवारी २०१८ मध्ये सुरू केला, तो म्हणजे नवजात बाळांना आणि त्यांच्या मातांना मसाज करणे. चाळिशीनंतर आता नवीन काय करणार, किंवा नवीन करण्याची उमेदच हरवून गेलेल्या व्यक्तींना सुनीता यांची व्यवसायकथा नक्कीच प्रेरणा देऊ शकते. उगाच हातावर हात मारून बसण्यापेक्षा माणसाने `जब नींद खुले तब सवेरा’, असे म्हणत कुठल्याही नवीन कार्याचा प्रारंभ करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, हे सुनीता देसाई यांच्या उदाहरणांतून कळते.
भारतभरातील ग्रामीण भागातून शहरांत स्थलांतरित झालेल्यांची संख्या गेल्या तीसेक वर्षांत प्रचंड वाढली आहे. तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी १९९१ साली आणलेले उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याचे परिणाम समाजावर दिसू लागले होते. एका बाजूला मध्यमवर्ग समृद्ध होऊ लागला, रोजगाराच्या शोधात शहरात येणार्या जनतेची संख्या वाढू लागली. त्यांच्यापैकी अनेक लोक गेल्या तीस वर्षांत मध्यमवर्ग-उच्च मध्यमवर्गात आले. मात्र ग्रामीण भागातून नागरिकांचे शहरांत होणारे स्थलांतर आणि इतरही सामाजिक कारणांमुळे संयुक्त कुटुंबव्यवस्था संपू लागली.
संयुक्त कुटुंबव्यवस्थेच्या अस्तामुळे जन्माला आलेल्या तान्ह्या बाळांना न्हाऊ माखू घालणार्या चुलत्या, आज्ज्या, गल्लीतल्या वयस्कर महिला भोवताली राहिल्या नाहीत. पण बाळांना, बाळंतिणीला मसाज ही आत्यंतिक गरजेची आहे. त्यात जर सुयोग्य प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू केला तर व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो, हे सुनीता देसाई यांनी हेरले.
सुनीता देसाई लग्नानंतर १९९८ सालापासून कल्याणच्या रहिवाशी असून त्यांनी जानेवारी २०१८ साली `सोफ्तो बेबीकेअर प्रायव्हेट लिमिटेड’ ह्या नावाने `बाळ-बाळंतीणीला मसाज देण्याचा व्यवसाय सुरू केला. लहान तान्ह्या बाळांना, त्यांच्या आयांना मसाज देणे, तान्ह्या बाळांना न्हाऊ माखू घालणे असा हा व्यवसाय. एक साधीशी संकल्पना, जी कुणाच्याही डोक्यात सहज येऊ शकते, मात्र त्याला जनतेत घेऊन जाणे आणि लहान बाळांच्या आई-बाबांना ही सेवा समजून सांगणे आणि ती सेवा घेण्यासाठी राजी करणे सुरूवातीला सोपे नव्हतेच.
कोणताही व्यवसाय सुरू केला की भोवतालच्या, ओळखीच्या लोकांना नाके मुरडण्याची, नावे ठेवण्याची, कमी लेखण्याची सवय असतेच, ह्या दिव्यातून प्रत्येक नव्याने व्यवसाय सुरू करणार्या व्यावसायिकाला जावेच लागते, त्याला सुनीता देसाई तरी अपवाद कशा असतील, त्यांनाही ह्या दिव्यातून जावे लागलेच. त्यांनी मात्र खंबीरपणे व्यवसायावर विश्वास ठेवत वाटचाल सुरूच ठेवली, त्यामुळे त्या आज शेकडो बालकांना आणि त्यांच्या मातांना ही सेवा देऊ शकत आहेत. त्यांनी तेव्हा टीकाकारांवर लक्ष दिले असते, तर त्या स्वतःसहित आपल्या टीमसाठी उत्पन्नाचे हुकमी साधन उभ्या करू शकल्या नसत्या.
सुनीता देसाई यांच्या मनात `बाळ मसाज’ हा व्यवसाय करण्याचे आले आणि त्यांनी लागलीच हे काम सुरू केले असे येथे झालेले नाही, सुयोग्य प्रशिक्षण असल्याशिवाय कोणतेही काम नीट करता येत नाही असे त्यांचे म्हणणे आहे, म्हणून त्यांनी थायलंड येथे जाऊन इन्फंट मसाज आणि चाइल्ड मसाज थेरपीचे प्रशिक्षण घेतले. त्यासाठी त्या काही काळ तेथे राहिल्या. शिवाय त्यांच्या गाठीशी कल्याण येथील बालक मंदिर शिक्षणसंस्थेमध्ये पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांना शिकवण्याचा वीस वर्षांचा अनुभव होता. त्यामुळे लहान बाळ, त्यांचे वागणे, ते विविध घटनांना देत असलेल्या प्रतिक्रिया यांचे त्यांना ज्ञान होते. हा पूर्व प्राथमिक शाळेचा अनुभव त्यांना हा व्यवसाय करताना कामाला आला.
त्यांच्याकडे आज १५ महिला काम करत असून, त्या मुंबई आणि उपनगरांमध्ये सेवा देत आहेत. यातून त्यांची अनेकानेक महिलांकरिता रोजगार निर्माण करण्याची इच्छा आहे. त्यांच्याकडे काम करत असलेल्या महिला रूढ अर्थाने फारशा शिकलेल्या नसतात, फार तर दहावी-बारावी पास असतात. ज्यांना मार्केटमध्येही हवे तसे काम मिळत नाही, मात्र दोन पैसे कमावून कुटुंबाला हातभार लावण्याची इच्छा मात्र असते. अशा अनेक महिलांना हाताशी घेत सुनीता देसाईंनी उत्तम टीम बांधली आहे. शिवाय ह्या महिला २५ ते ४५ वयोगटातील असतात, त्यांच्या टीममध्ये बहुतेक महिला ह्या विवाहित आणि एक-दोन लेकरांच्या माता आहेत, ज्यांना हे `बाळ मसाज’चे काम करताना स्वतःच्या तान्ह्या मुलाला-मुलीला वाढवताना जो अनुभव घेतला आहे, तोही कामाला येतो. त्यामुळे बाळाला हातात कसे धरावे, मान कशी सांभाळावी, हलक्या हाताने मसाज कशी करावी, बाळाच्या नाजूक मुलायम असलेल्या त्वचेला हाताने स्पर्श करताना तो मृदू कसा राहील, हे शिकवणे सोपे जाते.
तसे असले तरी ह्या महिलांनाही सुनीता देसाई यांच्या `सोफ्तो बेबी केअर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत दाखल झाल्यावर एक महिना बाळ आणि बाळंतीण मसाजचे प्रशिक्षण दिले जाते. बाळाची मसाज कशी करायची, याचे प्रशिक्षण स्वतः सुनीता देसाई देतात. त्यासाठी त्या रबराचा डमी बेबी वापरतात. त्यावर त्या प्रात्यक्षिक देतात. शिवाय जी महिला बाळाची मालिश करत आहे, तिच्यासोबत निरीक्षण करण्यासाठीसुद्धा बाळाच्या घरी पाठवले जाते. जेणेकरून त्यांना काम कसे केले पाहिजे, ते प्रत्यक्ष पाहायला मिळेल. आणि बाळाला मसाज करणार्या महिला स्वच्छ, नीटनेटक्या, आरोग्यसंपन्न व तरुण असतील, याची सुनीता देसाई निवड करताना कटाक्षाने काळजी घेतात.
प्रशिक्षण वगैरे घेतलेले नाही, मात्र बाळांची मालिश करण्याचे काम करणार्या अनेक महिला आज सेवा देत आहेत. मात्र मानवी शरीर हा अतिशय नाजूक घटक असतो, शिवाय अब्जावधी पेशींनी बनलेले शरीर, त्यातही लहान बाळाचे शरीर, काळजीपूर्वक हाताळणे फार गरजेचे असते. शिवाय त्यांची हाडं अतिशय नाजूक असतात, त्यामुळे ते कसेही किंवा जोरात वाकवल्यामुळे बाळांना इजाही होऊ शकते. त्यामुळे हे अतिशय जबाबदारीचे आणि आव्हानात्मक काम आहे. बाळांना, त्यांच्या मातांना मसाज करणे, त्यांना आरोग्यदायी राहण्यासाठी फार मदत करत असते, त्यामुळे हे काम करण्यासाठी `किमान प्रशिक्षण’ असणे गरजेचेच आहे. अन्यथा त्या बाळाला, मातेला आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याच्या शक्यता वाढतात.
हीच सुनिता देसाई यांच्या सोफ्तो बेबी केअर प्रा. लि.ची मोठी जमेची बाजू आहे. कारण त्यांच्या महिला प्रशिक्षित आहेत. स्वतः सुनीता देसाई यांनी ह्याआधी योगशिक्षक म्हणून काम केले असल्यामुळे, त्यांना मानवी शरीराची नीट ओळख आहे. त्यांनी असे अनुभवाचे-ज्ञानाचे अनेक बिंदू जोडत जोडत हा व्यवसाय सुरू केला आहे आणि ह्या ज्ञानामुळे त्या उत्तरोत्तर प्रगती करत आहेत.
सार्या व्यवसायात आव्हाने असतातच, तशी ह्या व्यवसायातही आव्हाने आहेत, मात्र त्यांना त्यांच्या कुटुंब सदस्य म्हणजे पती सतीश देसाई, मुलगी, मुलगा यांच्याकडून पाठबळ आणि सहकार्यसुध्दा मिळते. पतींनी सुरुवातीला आर्थिक पाठबळ दिले, त्यामुळे त्या जोमाने व्यवसायाची सुरूवात करू शकल्या आणि आता नोकरी करत असलेली त्यांची कन्या रक्षिता आणि मुंबई विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये डिग्रीचे शिक्षण घेत असलेला मुलगा साकार असे दोघे त्यांना जाहिरातीचे व्हिडिओ, ग्राफिक्स बनवण्यात मदत करतात, शिवाय सोशल मीडियावर प्रमोशन करण्यासाठी हे बहीण-भाऊ आईला मदत करतात. नाटकात काम करण्याचा अनुभव असल्यामुळे सुनीता देसाई कॅमेर्यासमोर उत्तम बोलू शकतात, त्यामुळे त्या त्यांच्या दोन्ही मुलांच्या मदतीने बालसंगोपनाशी सबंधित व्हिडिओ बनवून पालकांमध्ये, संभाव्य पालकांमध्ये जागृती करत असतात, ज्याचा अर्थातच लाभ त्यांचा व्यवसाय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होतो. कुटुंबाचा पाठिंबा असला की महिला आपला व्यवसाय अधिक जोरदारपणे पुढे नेऊ शकते, ज्याचे सुनीता देसाई ह्या एक उत्तम उदाहरण आहेत.
त्यांचे पुढील व्यवसायिक ध्येय असे आहे की त्यांना हजारहून अधिक महिलांना ह्या व्यवसायात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची आहे, शिवाय मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई ह्या शहरांत आणि ह्या शहरांच्या उपनगरांत व्यवसाय वाढवायचा आहे आणि तिथल्या लहान बाळांना आणि त्यांच्या मातांना आरोग्यसंपन्न करण्याकरिता सेवा द्यायची आहे.