अशा काही रात्री गेल्या
ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या
होतो तसे उरलो नसतो
वादळ असे भरून आले
तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या
काही सावरणार नव्हते…!
कवी अनिल यांनी आणीबाणीवर केलेली ही समर्पक कविता. २५ जून १९७५ रोजी भारतात लोकशाही स्थगित करून आणीबाणी लागू झाली. राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं आणि प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणण्यात आली. आणीबाणीच्या या अनुशासन पर्वाबद्दल सामान्य जनतेच्या मनात दोन प्रवाह होते. बरं झालं, देशाला शिस्त लागली, असं काहीजणांना वाटत होतं. सगळे सरकारी नोकर वेळेवर कामावर येतात आणि कामाची वेळ संपल्यावरच घरी जातायत. नेहमी उशिरा धावणार्या रेल्वे, एसटी वेळेवर सुटतात, याचा आनंद होता. तर आणीबाणी ही लोकशाहीला मारक आहे, हम करे सो कायदा हे धोरण सामान्य जनतेला मारक ठरेल असं काहींचं म्हणणं होतं. त्या काळात कुटुंब नियोजनासारखी चांगली योजना राबवताना प्रशासनाकडून झालेल्या किंवा मुद्दामहून केलेल्या दडपशाहीमुळे सामान्य जनतेत पुरुष ‘नसबंदी’बद्दल दहशत पसरली होती.
नसबंदी हाच विषय डोळ्यासमोर ठेवून लेखक अरविंद जगताप यांनी हलक्या फुलक्या शैलीत ‘आणीबाणी’ चित्रपटाची कथा गुंफली आहे. एका खेडेगावात अभिमन्यू (उपेंद्र लिमये) आणि विमल (वीणा जामकर) यांचा सुखाचा संसार सुरू आहे, पण लग्नाला अनेक वर्षे उलटली तरी घरात पाळणा हलला नाही, यामुळे सासूची (उषा नाईक) बोलणी खावी लागतात. हे दुःख विमलच्या मनात सलत असतं. घराला वारस हवा यासाठी ती घरात सवत आणू या असा नवर्यामागे लकडा लावते. विमलच्या नात्यातील लग्न मोडलेल्या ज्योतीसोबत (सीमा कुलकर्णी) अभिमन्यूचे दुसरे लग्न ठरतं, पण अभिमन्यूसोबत गैरसमजातून झालेल्या एका घटनेने ज्योतीचा पोलीस इन्स्पेक्टर भाऊ पिंटू शेठ (संजय खापरे) डूख घरून असतो. तो हे लग्न मोडतो. त्याच वेळी गावातील (सयाजी शिंदे) सरपंचाची बायको देवाघरी जाते आणि त्याला ज्योतीसोबत लग्न करायचं असतं. देशात लागलेली आणीबाणी आणि कौटुंबिक आणीबाणी यांच्यामध्ये अभिमन्यू आणि ज्योतीचे पळून जाऊन लग्न, पिंटू शेठने हे लग्न मोडण्यासाठी अभिमन्यूला नसबंदीसाठी पकडणे अशा अनेक घटना घडतात. पुढे हे लग्न टिकतं का? सरपंच आणि पिंटू शेठ त्यांच्या कटकारस्थानात सफल होतात का, हे पाहायला तुम्हाला स्वतःही मनोरंजनाची आणीबाणी अनुभवावी लागेल.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील संवेदनशील पत्रलेखक म्हणून अरविंद जगताप यांची ओळख आहे. त्यांनी या चित्रपटाची कथा लिहिताना त्या काळात झालेल्या अन्यायावर मार्मिक भाष्य केलं आहे. पोलीस पार्टी नसबंदी करायला गावातील लग्न न झालेले किंवा तरुण पुरुष उचलून आणत होते, पण त्याचवेळी बक्षिसाच्या आशेने गावातील एक म्हातारा माणूस (किशोर नांदलस्कर) ‘माझी नसबंदी करा’ असं रोज सांगत असतो, पण त्याला डावललं जातं अशा अनेक विसंगती त्यांनी टिपल्या आहेत. जेव्हा अभिमन्यू आणि सरपंच दोघेही ज्योतीशी लग्न जुळवायचा प्रयत्न करत असतात, तेव्हा ‘एकाच्या बायकोला मुलं नाही म्हणून आणि दुसर्याच्या मुलाला आई नाही म्हणून दोघे खटाटोप करत आहेत’ असे चटकदार संवाद सिनेमात हास्य निर्माण करतात. चित्रपटाचा पूर्वार्ध रंजक आहे, पण कथेचा जीव लहान असल्यामुळे उत्तरार्धात काही प्रसंग वारंवार घडताना दिसतात. दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी हाताशी इतके सक्षम अभिनेते असताना चित्रपट एकसंघ बनविण्यासाठी आणखी काम करायला हवं होतं असं वाटतं.
सर्वच कलाकारांनी नावाला साजेशी कामगिरी केली आहे. सयाजी शिंदे यांनी बाईलवेडा सरपंच त्यांच्या ‘सिग्नेचर स्टाईल’मध्ये साकारला आहे. उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर यांच्यातील प्रेमळ गुजगोष्टी, ‘एक माणूस रागावलाय आमच्यावर’ या जुन्या काळातील संवादाची आठवण करून देतात. संजय खापरे यांचा पोलीस इन्स्पेक्टर दमदार आहे. प्रवीण तरडे, सुनील अभ्यंकर, सीमा कुलकर्णी यांनी आपल्या वाट्याला आलेली भूमिका चोख बजावली आहे. सिनेमाचे पार्श्वसंगीत (पंकज पडघन) विषयाला अनुरूप आहे. प्रेक्षकांना त्यांच्या वेळेची आणीबाणी नसेल तर हा सिनेमा एकदा बघायला हरकत नाही.