(मीटिंगसाठी येणार्या जितूला घ्यायला बिट्टू उभाय. मागल्या महिन्यात बांधलेल्या नि गेल्या आठवड्यात पत्रे उडालेल्या स्थानकात. जितूला घ्यायला गेलेल्या मोटरसायकलचं पेट्रोल संपल्यानं पाहुणा जितू या श्रीमंत गावी लेलंड ट्रकमधून येतो. उतरतो. बिट्टू आणि जितू हात मिळवून गावाकडे चालू लागतात.)
बिट्टू : (आपणहून पाव्हण्याला आमंत्रण देऊनही मूर्खासारखा हसत) मग कसे आलात आमच्याच गावात?
जितू : (कुत्सितपणे) हां, फार ऐकलंय तुमच्या गावाबद्दल. मग राहवलं नाही.
बिट्टू : ऐकणारच ना? स्वत: नामुअप्पा आठवड्यात दोनदा बाहेरगावी जाऊन लोकांना इथले विकासाचे किस्से सांगतात. त्यासाठी खास नवी एसयूव्ही घेतलीय.
जितू : तरीच! मी त्यांच्याबद्दल फार ऐकलंय, फार सभ्य, चारित्र्यवान, स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे म्हणून!
बिट्टू : आणि विकासपुरुष देखील!
जितू : असा काय विकास केलाय त्यांनी?
बिट्टू : अहो, इथं आधी काहीच नव्हतं. अख्खं गाव त्यांनीच उभं केलं म्हणा ना? हे गावात घुसताना आधी लोक नाक दाबून आत यायचे…
जितू : मग अप्पांनी संडास बांधलेत का?
बिट्टू : नाही, त्यांनी गटारावरचे लोखंडी झाकणं विकले…
जितू : त्याचा काय संबंध?
बिट्टू : लोकं आता कोपर्या-कोपर्यात गटारावर प्रात:विधीला बसतात.
जितू : (विषय बदलत) अप्पा फार गरीब घरातून आलेत म्हणे?
बिट्टू : गरिबी? भयंकर गरिबी! १९४२च्या दुष्काळात ते नागड्यानं इवल्या इवल्या हातानं बेकरीतून पाव नेतानाचे कलर फोटो नेटवर आहेत.
जितू : बापरे! त्यांनी उदरनिर्वाहासाठी काही कामं केलीत म्हणे?
बिट्टू : हे काय गावाच्या बाहेर जे रेल्वे स्टेशन आहे ना?
जितू : कुठे?
बिट्टू : तुम्हाला कसं ठाऊक असेल म्हणा! अहो मोजणी चालूय बघा तिथं!
जितू : हा, पण त्याचं काय?
बिट्टू : तिथं त्यांची टपरी होती.
जितू : कसली? चहाची?
बिट्टू : नाही हो! एवढे श्रीमंत नव्हते ते! चुना लावायचे ते…
जितू : पान-सुपारी वगैरेची टपरी होती तर…
बिट्टू : नाही! फक्त चुना लावायचे ते तिथं.
जितू : म्हणजे?
बिट्टू : खासियत होती त्यांची! चुना लावण्यात! भिंतीपासून पानापर्यंत नि पानापासून माणसापर्यंत! सगळ्यांना चुना लावलाय त्यांनी! अख्ख्या गावाला म्हणा ना!
जितू : (विषय बदलत) ही कसली चित्रं आहेत भिंतीवर मुलींची? वाचवा की वाचवून दाखवा? धमकी आहे की काय?
बिट्टू : मुलींच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी एक कॅम्पेन सुरू केलेलं त्यांनी!
जितू : मग?
बिट्टू : कुणीही या मुलींवर लाईन मारायला धजावलं नाही!
जितू : एवढ्या मुली सुरक्षित झाल्या?
बिट्टू : हो! या चित्रातल्या मुलींवर कुणी रेघोट्या मारू गेलं नाही!
जितू : पण खर्या?
बिट्टू : त्या होय? असतील की आपापल्या घरांत! त्यांना काय धाड भरलीय?
जितू : नामुअप्पा कठीण प्रकरण दिसतंय तर…
बिट्टू : हो तर!!!
जितू : (कुठंशी बघत) नामुअप्पा म्हणजे निष्कलंक नि चारित्र्यवान माणूस आहे ना?
बिट्टू : हो, हो!!
जितू : (एक दिशेला हात करत) त्या अप्पांच्या सूनबाई आहेत ना?
बिट्टू : हो, पण असं का विचारताय तुम्ही?
जितू : अहो, बघता बघता त्या बाईनं या घरापुढून पितळेचा तांब्या उचलून पदरात लपवून चालवलाय ते? ही चोरीच म्हणायची की!
बिट्टू : हे बघा, तो तांब्या सुनेनं उचलला की नाही?
जितू : तेच म्हणतोय मी! एक सुसंस्कारी घरातील…
बिट्टू : परत तिथंच का? अहो, चार घरच्या चार पोरी! माहेरचे संस्कार घेऊन आलेल्या त्या! त्यात बोंब मारण्यासारखं काय आहे?
जितू : (रस्त्याच्या पलीकडं बघत) अहो, तो माणूस बघा! अडवा त्याला! मुलीला छेडतोय तो!
बिट्टू : ओ! हळू बोला! तो जावई आहे अप्पांचा! मी म्हणतो, या वेळी असल्या तंग कपड्यांत ती मुलगी बाहेर आलीच कश्याला?
जितू : इथं सगळे उलटे सवाल मलाच का विचारताय पण? निदान नामुअप्पा तरी शिकलेले आहेत की तुमच्यासारखे अर्धवट आहेत?
बिट्टू : जुनी बारावी पास आहेत ते! आणि शिक्षणाचं महत्त्व चांगलं ओळखून आहेत! गावच्या पाच वस्त्यांवर बारावीपर्यंत शाळा सुरू केल्यात त्यांनी मागच्या काही दिवसांत!
जितू : म्हणजे इतक्या दिवस बारावीपर्यंतची शाळा नव्हतीच काय?
बिट्टू : गेल्या सत्त्तर वर्षांत काहीच कामं झाली नाहीत. ते आता होतंय!
जितू : गेल्या सत्तर वर्षांत तुम्हाला शिक्षणाची सर्टिफिकेट सुद्धा मिळाली नाहीत ती आता मिळवताय का? अहो, किती थापा ठोकणार? न केलेली कामं केलीत म्हणून मिरवताय. त्यांनी कितीही विकासपुरुष म्हणून पंचक्रोशीत मिरवायचा प्रयत्न केला तरी विक्रमी खोटं बोलणारे विक्रमवीर म्हणूनच त्यांची नोंद होईल.