प्रार्थनेत फार मोठी ताकद असते, असे सश्रद्ध लोक मानतात. प्रार्थना केल्याने आपल्यावरील संकटे टळली, असे अनेक जण सांगतात. असाच एक साक्षात्कारी चमत्कार महाराष्ट्रात नुकताच घडून आला. वासरात लंगडी गाय या न्यायाने का होईना, मिंध्यांमध्ये सात्त्विक विचारवंत भासणार्या एका मंत्रिमहोदयांच्या प्रार्थनेने कोल्हापुरातील पुराचे संकट टळले, ही खरेतर गिनीज बुकात नोंदवण्यासारखी घटना आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांना जोडणारा आणि दैवी कृपेचा पडताळा देणाराच प्रसंग आहे हा… मंत्रिमहोदय कोकणातले, पूर येतो कोल्हापुरात, तो टाळण्यासाठी मंत्रिमहोदयांनी प्रार्थना केली शिर्डीच्या साईबाबांच्या चरणांशी. त्या प्रार्थनेत बळ इतके की कोल्हापुरात एवढा पाऊस होऊनही पूर आला नाही!
या मंत्रिमहोदयांमध्ये इतकी सात्त्विक शक्ती वसते आहे, याची कल्पना आधी असती, तर त्यांना मुख्यमंत्रीपदीच पाहायला आवडले असते महाराष्ट्रातल्या जनतेला. सात्त्विक मूर्ती मुख्यमंत्री महोदय राज्यातल्या सगळ्या देवस्थानांमध्ये फिरले असते, तत्पूर्वी त्यांनी सगळ्या स्थानिक समस्या जाणून घेतल्या असत्या, त्यांची यादी केली असती आणि ती घेऊनच प्रार्थनेला बसले असते. तात्काळ तिथल्या सगळ्या समस्या दूर झाल्या असत्या, मुख्यमंत्री महोदय लगेच पुढच्या गावात पुढच्या देवस्थानाला रवाना झाले असते. पण महाराष्ट्रातील जनतेची पुण्याई कुठेतरी कमी पडत असावी. त्यामुळेच तर आपण अशा दिव्य पुरुषाच्या प्रार्थनाबळाला मुकलो आहोत. सगळ्यात कमी पुण्याई कोकणातील जनतेची असणार. कारण, मंत्रिमहोदयांना दूरच्या कोल्हापुराची इतकी काळजी आहे, पण, त्यांच्या स्वत:च्या कोकणातील चाकरमान्यांची हाडे खिळखिळी करणार्या मुंबई-गोवा चाळणमार्गावरील (हा महामार्ग आहे, अशी अफवा कोणीतरी पसरवली आहे, पण तिच्यात काही तथ्य दिसत नाही) खड्डे साईकृपेने रातोरात भरून निघावेत, अशी प्रार्थना काही त्यांनी केली नाही. ती केली असती तर बरे झाले असते. आता त्यांनी तसे साकडे पुण्यातल्या कसबा गणपतीला घालायला हरकत नाही. पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करावा, हातात कोयता धरताच गुंडाच्या हाताला लकवा मारावा, अशी प्रार्थना त्यांनी मुंबईत सिद्धिविनायकापाशी करावी. मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी छगन भुजबळ यांनी त्यांना नाशिकमधील पाणी साठे भरून वाहावेत, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिरात जाऊन तसे साकडे घालावे, या सगळ्या समस्या तात्काळ दूर होतील.
मंत्रिमहोदयांच्या कदाचित लक्षात आले नसावे की प्रयत्नांति परमेश्वर हाच सश्रद्ध जगाचाही नियम आहे. दे रे हरी खाटल्यावरी असे म्हणून देव पावत नाही. तसे झाले असते तर सगळे जग खाटल्यावर बसून राहिले असते आणि देवाने त्यांना फुकट पोसले असते. हिंमत ए मर्दा, तो मदद ए खुदा… आधी हिंमत करावी लागते, नंतर ईश्वरी मदत मिळते. महाराष्ट्रावरील संकटांचे निवारण करण्यासाठी संतांचे, कुलदैवतांचे आशीर्वाद हवेतच; पण त्यासाठीची जी मेहनत आहे, ती तुम्ही करायची आहे, त्यासाठी तुम्हाला नेमले आहे. तुम्ही प्रार्थना कराच, पण आधी काम करा; लोकसेवेचे काम ही सर्वात मोठी प्रार्थना आहे, ती मनोभावे करा, तिला ईश्वरी पाठबळ मिळेलच.
शिवाय, अत्यंत निगर्वी, सालस, गोड व्यक्तिमत्त्वाच्या मंत्रिमहोदयांना ही सुद्धा आठवण करून द्यावी लागेल की ईश्वराचा कृपाप्रसाद आपल्याला(च) मिळाला, आपल्या प्रार्थनेमुळेच संकट टळले, असे ज्या भक्ताला वाटू लागते, त्याला ‘ग’ची म्हणजे गर्वाची बाधा झालेली असते, अहंकाराची बाधा झालेली असते. ‘माझ्या प्रार्थनेची ताकद’ असे जेव्हा भक्त म्हणतो तेव्हा नकळत तो ईश्वरी ताकदीपेक्षा आपली ताकद मोठी मानू लागलेला असतो. अशा भक्तांना देव कसा पावेल?
अर्थात, मंत्रिमहोदयांना या काळात प्रार्थनेच्या बळाची आठवण व्हावी, यात काही नवल नाही. ज्यांनी प्रयत्न करावेत, राज्यकारभार करावा, लोकांचे जीवन सुकर करावे, यासाठी लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे, ते ती कामे करताना दिसत नाहीत. पावसाळा आला की दरडी कोसळतात, पूर येतात, संसार गाडले जातात, माणसं उद्ध्वस्त होतात, पिके नष्ट होतात, शेतकर्यांवर आत्महत्येची पाळी येते, शहरातल्या लोकांचे जीवन विस्कळित होऊन जाते, खड्ड्यांतून, साचलेल्या पाण्यातून वाट चालताना जीव मुठीत धरावा लागतो, अशा वेळी गतिमान, वेगवान जाहिराती करणारे सरकार आपल्या मदतीला धावून येईल, वेळेवर आपल्या समस्यांचे निराकरण करील, अशी कोणतीही खात्री जनतेला राहिलेली नाही. तिला प्रार्थनेच्या बळाशिवाय दुसरा कोणताही आधार राहिलेला नाही.
भाज्या महागल्या, गॅसचे सिलिंडर आधीपासून पगाराच्या पाकिटात स्फोट घडवून आणतायत, टोमॅटोंनी उच्चांकी दर गाठला आहे, अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली आहे, यातून दोन घास अन्न तरी पोटाला मिळेल का, याची शाश्वती लोकांना राहिलेली नाही. त्याबाबतीतही सरकारकडून काही होण्याची खात्री नाही. सगळा भरवसा प्रार्थनेवरच आहे.
देशाच्या बाकीच्या भागांतील जनता भाग्यवान म्हणायची मणिपूरच्या जनतेच्या तुलनेत. या छोट्याशा राज्याचे संसदेतील संख्याबळ नगण्य आहे, त्यामुळे त्याला कोणी वाली नाही. तिथे दोन समाजांमध्ये तेढ पसरवून एका समाजाचे हत्याव्ाâांड घडवून आणले जाते आहे दिवसाढवळ्या. महिलांवर जमावाने बलात्कार केले जात आहेत. गावेच्या गावे ठार मारून खड्ड्यांमध्ये मृतदेह पुरले जात आहेत. त्या जळत्या मणिपूरवर दोन थेंब नक्राश्रू ढाळायलाही पंतप्रधानांना फुरसत नाही, त्यासाठी विरोधकांना त्यांच्या सरकारवर अविश्वास ठराव आणण्याची पाळी येते. त्या पोळलेल्या जनतेपुढे दयाघन, करूणाकर परमेश्वराची प्रार्थना करण्यावाचून कोणता पर्याय उरला आहे?
फक्त एक गोष्ट जनतेनेही लक्षात ठेवायला हवी… आपण प्रयत्न करायचे असतात, तेव्हाच परमेश्वर साथ देतो. निवडणुकांमध्ये योग्य कृती करायला हवी, तेव्हाच प्रार्थनेला ईश्वरी बळ मिळेल आणि देशावरचे हे संकट दूर होईल.