संगणकावरची माहिती चोरण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना सायबर चोरटे आखतात, त्यामध्येच बायटिंग या प्रकाराचा समावेश होतो. यामध्ये हे ठग एखादी लिंक, ओपन फाईल पाठवून समोरच्या व्यक्तीची दिशाभूल करून त्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी मोहापोटी काहीजण त्यात अडकतात आणि नुकसान करून घेतात. बर्याचदा नकळत त्यात फसण्याचे प्रकार घडतात. या बायटिंगपासून आपण कायम सावध राहायला हवे.
बायटिंगमध्येही दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार म्हणजे यूएसबी बायटिंग. यात एखादे सॉफ्टवेअर किंवा मालवेअर यूएसबीमध्ये टाकले जाते. त्या माध्यमातून संगणकाच्या यंत्रणेला त्या माध्यमातून धोका निर्माण केला जातो. तुमच्या यंत्रणेमध्ये असणारी माहिती चोरली जाते. त्यामुळे आपल्या कार्यालयातील किंवा घरातील कम्प्यूटरमध्ये व्हायरस रोखणारी यंत्रणा असणे आवश्यक आहे. काहीजणांना त्याचे महत्व समजत नाही, त्यामुळे ते कधी कधी हॅकर्सच्या फसव्या जाळ्यात सहजपणे फसतात.
ही कथा पाहा.
मनोज आणि विशाल हे दोघेजण पुण्यात भागीदारीत व्यवसाय करत होते. इंजिनिअरिंग उद्योगासाठी आवश्यक सुटे भाग बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांना व्यवसायाच्या निमित्ताने पुण्याबरोबरच मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सांगली अशा अनेक भागांमध्ये कायम फिरावे लागत असे. नव्या ऑर्डर मिळवून त्या वेळेत देण्याच्या बाबतीत दोघेजण कायमच वक्तशीर होते, त्यामुळेच त्यांच्या व्यवसायाचा विस्तार वाढत चालला होता. मध्य प्रदेशातल्या इंदोरमधून त्यांना एक ऑर्डर मिळाली होती. तिची पूर्तता त्यांनी वेळेत केली. तशाच प्रकारची एक मोठी ऑर्डर बंगळुरूमधून मिळणार होती. त्यामधून चांगले पैसे मिळणार होते, त्यामुळे मनोज आणि विशाल बंगळुरूला जाण्यासाठी निघाले.
ज्याला ही ऑर्डर द्यायची होती, त्याने एका हॉटेलमध्ये भेटण्याचे नियोजन केले होते. मंगळवारी सकाळी दहा वाजता एका आलिशान हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये ही भेट होणार होती. मनोज आणि विशाल ठरलेल्या वेळापत्रकानुसार तिथे पोहचले. ज्यांच्याबरोबर या ऑर्डरचे डील होणार होते, ते सतीश कुमार दोन सहकार्यांच्या बरोबर तिथे येऊन पोहचले होते. औपचारिक गप्पा झाल्या आणि बैठकीला सुरुवात झाली. आपण आतापर्यंत कोणती उत्पादने तयार केली आहेत, याची माहिती मनोज लॅपटॉपच्या माध्यमातून सतीश कुमार यांना देत होता.
तासाभरात त्यांची बैठक संपली. दोघेजण जाण्यासाठी निघाले, इतक्यात सतीश यांच्याबरोबर असणार्या मनीष नावाच्या व्यक्तीने मनोजला विनंती केली, मी तुमचा लॅपटॉप पाच मिनिटासाठी वापरू शकतो का? मला एक माहिती तपासायची आहे, तुमची काही हरकत नाही ना? त्याच्यावर भरोसा ठेवून मनोजने त्याला लॅपटॉप दिला. लॅपटॉप सुरू झाला आणि त्या व्यक्तीने त्याच्याकडे असणारा पेन ड्राइव्ह त्याला लावला, काही सेकंद तो लॅपटॉप सुरू होता आणि पुढच्या एका क्षणात तो ब्लँक होऊन गेला. सर, मशीन में कुछ गडबड है क्या, ये ऐसा कैसा हुआ, जाने दो, मैं बाद में देखता हूं, असे म्हणत त्याने आपला पेन ड्राइव्ह काढून घेतला आणि तो निघून गेला.
संध्याकाळी हे दोघेजण पुण्याला येण्यासाठी निघाले, तेव्हा मनोजच्या मोबाइलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता, त्यावरील व्यक्ती त्याच्याशी हिंदीत बोलत होती. सर, आज आप जो ऑर्डर के लिये आये थे, वो आपको मिलनेवाली नहीं है, आप जिस प्रकार के प्रॉडक्ट बनते हो, वैसे हम भी बना सकते हैं, आपकी सब जानकारी हमारे यहाँ आयी है, थँक्स.. असे बोलून त्याने फोन ठेवला. हा सगळा काय प्रकार आहे, यासाठी त्यांनी सतीश कुमारला फोन केला, पण त्याचा फोन बंद होता. त्या व्यक्तीच्या फोनमुळे गोंधळात पडलेले मनोज आणि विशाल दुसर्या दिवशी पुण्यात पोहचले. त्यानंतर पुन्हा त्यांनी सतीश यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो काही केल्या होत नव्हता.
बंगळुरूमध्ये बंद पडलेला लॅपटॉप दुरुस्त करण्यासाठी विशाल एका सेंटरमध्ये गेला, त्यांनी त्याची तपासणी केली तेव्हा, त्यामधला डेटा गायब असल्याचे आढळून आले होते. त्या लॅपटॉपमध्ये त्यांच्या इंजिनिअरिंग उत्पादनांची माहिती, ते तयार करण्याचे तंत्र, याची सगळी माहिती होती. पण त्यामध्ये ते काहीच दिसत नव्हते. लॅपटॉपच्या तपासणीत लक्षात आलं की अँटी व्हायरस यंत्रणेची मुदत दोन दिवसांपूर्वीच संपली होती. विशालकडूनही कामाच्या नादात ती यंत्रणा अपडेट करण्याचे राहून गेले होते. बंगळुरूमध्ये सतीशच्या बरोबर असणार्या त्या व्यक्तींनी मनोज आणि विशाल याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन, त्यांचा लॅपटॉप वापरण्याचा बहाणा करून त्यामध्ये व्हायरस सोडून, त्यामधली माहिती हॅक करून संगणक रिकामा करण्याचा उद्योग केला होता.
या फसवणुकीच्या प्रकाराबाबत विशालने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सतीश कुमारचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले, तेव्हा त्याचे दोन साथीदार आणि तो असे तिघेजण मिळून खोटी आमिषे दाखवून माहिती चोरण्याचा उद्योग करत असत, देशातल्या अनेक भागात त्यांनी असे प्रकार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
अशी घ्या काळजी :
– आपण व्यक्तिगत पातळीवर किंवा कंपनीमध्ये कुठेही काम करताना संगणक/लॅपटॉप पूर्णपणे सुरक्षित कसा ठेवता येईल, यावर सर्वाधिक भर द्या. आपल्या कर्मचारीवर्गाला त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण द्या. सायबर साक्षर व्हा, विशेष म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी अज्ञात यूएसबी ड्राइव्ह प्लग न करण्यावर भर द्या.
– आपला संगणक सुरक्षित ठेवण्यासाठी कुणीही दिलेले डिव्हाइस थेट संगणकाला लावू नका. अनोळखी बाहेरच्या व्यक्तीला संगणक वापरण्याची परवानगी देणे शक्यतो टाळा.
– एंड पॉइंट सिक्युरिटी : कामाच्या ठिकाणी एंडपॉईंट सुरक्षा उपाय लागू करा, जे यूएसबी ड्राइव्हवरून आपोआप चुकीच्या फाइल्स स्कॅन आणि ब्लॉक करू शकतात.
– ऑटोरन/ऑटोप्ले अक्षम करा : जेव्हा यूएसबी ड्राइव्ह घातल्या जातात, तेव्हा फाइल्सची स्वयंचलित अंमलबजावणी टाळण्यासाठी सर्व संगणकांवर ‘ऑटोरन’ किंवा ‘ऑटोप्ले’ वैशिष्ट्ये अक्षम करा.
– सुरक्षा उपाय : अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी संगणकावरील यूएसबी पोर्ट लॉक करा किंवा सुरक्षित करा.
– यूएसबी ड्राइव्ह धोरणे : संस्थेमध्ये यूएसबी ड्राइव्हच्या वापरासंबंधी धोरणे तयार करा आणि त्यांची कडक अंमलबजावणी करा.
– सुरक्षित यूएसबी ड्राइव्हस् : डेटा अॅक्सेस करण्यापूर्वी प्रमाणीकरण आवश्यक असलेल्या एनक्रिप्टेड यूएसबी ड्राइव्ह्सच्या वापरास प्रोत्साहन द्या.