फार्सिकल शैलीतली नाटके हा एक स्वतंत्र प्रबंधाचा विषय ठरेल, एवढे त्यात कंगोरे आहेत. हा मूळचा परकीय प्रकार. ‘माईम’ मूकनाट्याचा परिणाम होऊन ‘फार्स’ शैलीचा जन्म झाला असावा. इंग्रजी नाटकांच्या प्रारंभी दिग्गज, निमंत्रित रसिकांना येण्यास विलंब होतो, म्हणून ‘कर्टन रेझर’ असे काही नाटुकले सादर करण्यात येत असे. पुढे या ‘कर्टन रेझर’ने पूर्ण नाटकाचा ताबा घेतला. आपल्याकडेही मूळ कीर्तनात जसें एखादे ‘लळीत’ सादर करण्याची प्रथा होती, तसाच काहीसा हा प्रकार. ‘पूरक नाट्य’ किंवा ‘बहुजनरंजन’ असे या शैलीचे स्वरूप.
मागे वळून बघता… १८७० ते १८८० या दरम्यान डझनभर फार्स आले. बासुंदीचा फार्स, अनारशाचा फार्स. अशी काही नावं. त्यात थट्टा-मस्करीच अधिक. आता त्याला फार्स म्हणायचं की नकला, हा एक स्वतंत्र विषय ठरेल. एक काळ उलटला. १२३ वर्षांपूर्वी म्हणजे १९०२ या वर्षी विनायक त्र्यंबक मोडक या नाटककारांनी ‘प्रणय विवाह नाटक’ लिहिले, जे नंतर कितीतरी फार्स नाटककारांचे प्रेरणास्थान ठरले. शेरिडन यांच्या ‘ड्युएना’ या मूळ फार्सवर आधारित ही संहिता. शाहुनगरवासी नाटक कंपनीने त्याचे प्रयोग त्या काळी केले. १०७ वर्षापूर्वी, १९१८ साठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे ‘संगीत सहचारिणी’ हे फार्स शैलीतील नाट्य मुंबईत गंधर्व नाटक कंपनीने रंगभूमीवर आणले. दोन बायका फजिती ऐका असे त्यातील कथानक. त्याला रहस्याची जोड होती. ७५ वर्षापूर्वी १९५० साली ‘पतीची निवड’ हा साहित्यसम्राट न. चि. केळकर यांचा उत्तम व अस्सल मराठमोळा फार्स म्हणून ओळखला जातो. फसवणूक-गैरसमज यातला एक प्रेमघोटाळा जसा. हा फार्सप्रवाह सुरूच आहे.
पळापळ, वेशांतर, फसवाफसवी, विडंबन याने परिपूर्ण फार्स हसायला हमखास भाग पाडणारा. पण तो निव्वळ विनोदी नाट्यप्रकारात मोडत नाही. १९६०-७०च्या दशकात मराठी रंगभूमीवर खर्या अर्थाने फार्सयुग अवतरले. यानंतर खर्या अर्थाने नव्या पिढीचा शंभर टक्के फार्स ज्याने नाटकांचा तोंडवळा बदलला ते म्हणजे ‘भेंडे-प्रभू’ यांचे फार्स!! हसवणुकीचे असे पर्व, ज्याने मराठी रसिक हसून हसून बेजार झाला. आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू हे दोघे हुकमी एक्के! या जोडगोळीने लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयातून परकीय जाड्या-रड्यालाही विसरायला लावले. झोपी गेलेला जागा झाला, दिनूच्या सासुबाई राधाबाई, झोपा आता गुपचूप, पळापळा कोण पुढे पळे तो, मिठीतून मुठीत, ही त्यातील काही गाजलेली नाटके.
आजवर चक्क १२६ फार्सिकल नाटके रंगभूमीवर आल्याची अभ्यासकांची नोंद आहे. त्यातील बहुतेक रसिकांच्या पसंतीला उतरली आहेत. गाजलेल्या फार्सिकल नाटकांचेही पुनरुज्जीवन नव्या पिढीने वेळोवेळी केलेय. २०१८ साली संतोष पवारने बबन प्रभू यांचे ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हा फार्स नयना आपटे, विनय येडेकर यांना घेऊन रंगभूमीवर आणला होता, तर ‘झोपी गेलेला जागा झाला’ हा एकेकाळी गाजलेला फार्स सुनील बर्वे याने ‘हर्बेरियम’ या संकल्पनेतून पेश केला. विजय केंकरे यांचे दिग्दर्शन आणि भरत जाधव, विजू खोटे यांची त्यात भूमिका होती. नाटककार श्याम फडके यांचा ‘काका किशाचा’ हा गाजलेला फार्स या वाटेवरला. संतोष वेलांडे यांचा ‘मिस्टर ४२०’ हा काका पुतण्यावर बेतलेला फार्स आज व्यावसायिकवर प्रगटलाय.
एका मध्यमवर्गीय टिपिकल सजवलेल्या घरातली ही गोष्ट. नवरा दिना आणि बायको विष्णू. नवरा मराठी तर बायको कानडी! क्षणोक्षणी भांडणे. वादविवाद त्यातून घटस्फोट! दोघांमध्ये भाषेच्या परस्परविरुद्ध टोकांमुळे अर्थाचे अनर्थ अन् अनर्थाचे अर्थ निघताहेत. यांच्या ओळखीचं एक दांपत्य आहे. राजा आणि प्रेमा. राजा या नाटकाचा टायटल हिरो म्हणजे मिस्टर ४२०! नावापुरता हा राजा पण आहे भिकारी. त्याचा खिसा कायमचा रिकामा. उधारी तर प्रचंडच. कुठलाही कामधंदा न करता आराम करण्याची वृत्ती. त्याने केलेली उधारी वसूल करण्यासाठी पत्नी प्रेमाला रोज जाबजवाब द्यावा लागतो. ती पुरती हैराण झालेली. अखेर कंटाळून राजाचा मित्र असलेल्या दिनाकडे येते. ती तक्रारींचा पाढा वाचत असतानाच हे राजे (महाराजे!) पळत पळत येतात. राजाने म्हणे एका ज्योतिषाला हात दाखवला. त्याने ‘राजयोग’ असल्याचं भविष्यकथन केलेय. राजाला तर आनंदाच्या उकळ्या फुटताहेत. त्याला आता फक्त ‘राजयोगा’ची प्रतीक्षा आहे. आणि दुसर्याच प्रसंगात राजाच्या कुणा काकाचं पत्र येतं. संन्यासी बनलेला काका आपली करोडोची मालमत्ता राजाला देणार आहे. पण काकाने एक ‘अट’ घातली आहे. ‘ब्रह्मचारी’ असशील तर आणि तरच कोट्याधीश होशील! राजा प्रॉपर्टीसाठी एक नाटक उभं करण्याचा बेत ठरवितो.
कोट्याधीश काकाच्या भेटीसाठी काही दिवसांसाठी मित्रवर्य दिनाचं घर ताब्यात घेतलं जातं. मैत्रीसाठी हे ‘बलिदान’ दिना देतो. आणि एके दिवशी भगव्या गेटअपमध्ये, भोजपुरी भाषेत बोलणारा काका प्रगटतो. नाटकात नाटक सुरू होतं. आता हा ‘फार्स’ असल्याने फसवाफसवी, वेशांतर, पळवापळवी आणि पळापळ… शेवटी मिस्टर ४२० असलेल्या राजाला काकाची प्रॉपर्टी मिळते काय? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रयोग नाट्यगृहात बघणं उत्तम.
या कथानकात ‘फार्स’ची वैशिष्ट्ये गच्च भरलेली. मात्र सादरीकरणात ती कितपत यशस्वी होतात ते अनुभवणं उत्तम. प्रयाेगागणित मोकळ्या जागा अशा शैलीतल्या नाटकांना मिळत असतात आणि रंगत अधिक वाढते, हेच याचं सामर्थ्य आहे. रसिकांचा वेळ आणि पैसा दोन अडीच तासांच्या अशा मनोरंजनातून वसूल होण्याची दक्षता सर्व घटकांनी घेणे क्रमप्राप्त आहे.
कलाकारांच्या या ‘टीम’मध्ये तिघे कलाकार हे मालिकांसाठी कॅमेरापुढे सज्ज असतात. भूषण घाडी, अक्षय पाटील आणि दक्षता जोईल यांना क्रमश: ‘तू भेटशी नव्याने’, ‘ज्ञानेश्वर माऊली’, ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकांमध्ये यापूर्वी रसिकांनी बघितले आहे. विनोदाची चांगली जाण असलेला भूषण घाडी (दिना) आणि निकिता सावंत (विष्णू) या नवरा-बायकोंची धम्माल रंगत आहे. भूषणला टायमिंगचा सेन्स चांगला असल्याने काही प्रसंग चांगले जमलेत. देहबोली उत्तम. चांगल्या सशक्त भूमिका अभावानेच त्याच्या वाटेला आल्यात, पण ज्या मिळाल्या त्याचे भूषणने सोने केले आहे. कन्नडी भाषेतील विष्णूच्या भूमिकेत निकिता सावंत या शोभून दिसतात. भाषेचा लहेजा त्यांनी चांगला सांभाळला आहे. दोघांचं ट्युनिंग जमलंय.
या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणारी दक्षता जोईल हिची प्रेमाची भूमिका साजेशी. कामवाल्या शांताबाईच्या मुखवट्यात वावर बर्यापैकी आहे. ‘दे हरी खाटल्यावरी’ करणारा नाटकाचा टायटल हिरो मिस्टर ४२० राजा (अक्षय पाटील) नजरेत भरतो. त्याच्या भूमिकेत सहजता आहे. यूपीचे संन्यासी काका बनलेत डॉ. संदीप वंजारी. काका-पुतण्याचा हा खेळ भन्नाट रंगलाय. प्रदीप वेलोंडे यांचा ‘सरसकट’ याचीही महत्त्वाची साथसोबत आहे. पडद्यामागे दिग्दर्शक आणि पडद्यापुढे सरसकट असा दुहेरी वावर दिसतो. या सहाही कलाकारांचा प्रत्येक प्रसंग रंगविण्यासाठीचा प्रयत्न दिसून येतो. प्रसिद्धीच्या वलयात नसणारी ‘टीम’ असूनही सादरीकरणात प्रामाणिकता आहे.
व्यावसायिक रंगभूमीवर २०२२ साली ‘लपवाछपवी’ हे नाटक आले होते. त्यात नाटककार संतोष जगताप आणि दिग्दर्शक प्रदीप वेलोंडे यांची जोडी होती. ती याही ‘मिस्टर ४२०’मध्ये कायम आहे. नाटक वेगवान घटनांनी भरलेले असल्यास ‘फार्स’ची गंमत अधिक रंगते. तसा प्रयत्न जरूर आहे, पण तो अधिक अपेक्षित आहे. प्रत्येक प्रयोगाला दिग्दर्शक सोबत असल्याने त्याचा सकारात्मक परिणामही होणं शक्य आहे. महेश देशमाने याचे संगीत आणि गीते चांगली. राम सगरे यांचे घराचे नेपथ्य भव्यता वाढविणारे. भडक रंगसंगती आहे. अन्य तांत्रिक बाजू जमल्या आहेत.
नव्या रंगकर्मींना व्यावसायिकाची बंद दारे सताड उघडी करून देणारे नाट्यनिर्माते अरविंद घोसाळकर आणि त्यांची दत्तविजय
प्रॉडक्शन ही नाट्यसंस्था. त्यांचे ‘यदाकदाचित’ हे नाटक म्हणजे ‘इतिहास’ ठरलाय. ‘हम पाँच’, ‘लाली लीला’ अशाही नाटकांना त्यांनी साथसोबत केलीय. गेली अनेक वर्षे नाट्यनिर्मिती आणि व्यवस्थापन याचा अनुभव पदरी असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम निर्मितीमागे दिसतो. धडपड्या, एकांकिका स्पर्धेतील कलाकार दिग्दर्शक यांना हा हक्काचा आधारच ठरलाय. ‘बिझी स्टार्स’च्या मागे न लागता नव्या रंगकर्मींना त्यातून संधी आजवर मिळालीय. पंधराएक नाटकांची निर्मिती केलीय. या प्रवाहातले हे नाटक. निर्मितीमूल्यांत कुठेही कसूर केलेली नाही किंवा तडजोडही नाही. हे नाटक दौर्यावरील अर्थगणितंही यशस्वी ठरवेल यात शंकाच नाही. निर्माते दत्ता घोसाळकर यांच्यानंतर त्यांच्या बंधूंनी हा रंगवसा पुढे सुरू ठेवलाय हे महत्त्वाचे.
४२० म्हणजे विश्वासघात, फसवणूक याखाली गुन्हा दाखल करण्याचे कलम. यातूनच नाटकाचं नाव क्लिक करण्याचा प्रयत्न दिसतोय. कन्नड भाषेत ‘मिस्टर ४२०’ हा रोमँटिक चित्रपट आला होता, तसाच ‘श्री ४२०’ हा राज कपूरचा गाजलेला राज-नर्गिसचा चित्रपटही. ‘नावात काय आहे?’ असं म्हणतात, पण बरेचदा नावातच आकर्षित करण्याची ताकद असते. रसिकांची उत्कंठा त्यातून वाढते. प्रयोगांचे सातत्य मात्र गरजेचे आहे.
मराठी शैलीदार फार्स परंपरा खंडीत होऊ नये, त्याचे नव्या दमात सादरीकरण झाले पाहिजे. या आकृतिबंधाची शैली केवळ अभ्यासकांपुरती शिल्लक उरू नये, ही या नाटकाच्या निमित्ताने अपेक्षा आहे.
‘फार्स’चे ‘मार्मिक’ वर्णन एका मुलाखतीत आत्माराम भेंडे यांनी केले होते ते असे… ‘मांजराने उंदराला खेळता खेळवता मारण्याऐवजी एकदम घशाखाली घालण्याचा प्रकार म्हणजे फार्स!’ हे निरिक्षण बोलके आहे. मांजराचा मूळ खोडकर स्वभाव तुम्ही पूर्णपणे आवरू शकत नाही, हेच खरे! सगळ्यांना ४२० बनविणार्याला कुणीतरी कुठेतरी, कधीतरी ४२० करतोच. तेव्हा अशा ४२० मंडळींनो सावधान!!
मिस्टर ४२०
लेखक – संतोष जगताप
दिग्दर्शक – प्रदीप वेलोंडे
संगीत – महेश देशमाने
नेपथ्य – राम सगरे
प्रकाश – साई सिर्सेकर
गीते – महेश देशमाने
सूत्रधार – अरविंद घोसाळकर
निर्मिती संस्था – श्री दत्तविजय प्रॉडक्शन