त्यांची दोन रुपे होती. आल्या गेल्याचे प्रेमळ वडीलधारे, तर दुसरे लेखक, कवी, नाटककार, कादंबरीकार. तेथे लिखाणातील पात्रांशिवाय इतर कुणालाही प्रवेश नसे. या पात्रांची वर्दळ मात्र चोवीस तास त्यांच्याभोवती असे व ती डोक्यात रेंगाळत असत. कधी बेकेट, तर कधी मॅकबेथ, कधी ‘वीज म्हणाली धरतीला’मधील मनू आणि नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर जेव्हा हृदयस्पर्शी स्वगत बोलत, त्याने अस्वस्थता येई. त्यांना निद्रानाशाचा त्रास होता तो या पात्रांमुळे तर नव्हे?
– – –
अनेक शतकांपासून भारत तद्वत महाराष्ट्र हा ऋषीमुनींचा विद्वज्जनांचा, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या लोकोत्तर राजाचा, कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा, विठ्ठलभक्त ज्ञानेश्वर, तुकारामांसारख्या साधुसंतांचा, कलावंतांचा विराट वटवृक्ष म्हणून ओळखला जातो. त्याचा विस्तार वाढत वाढत नाशिकपर्यंत पसरत आला. गेल्या शतकाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर, कवी गोविंद आदी दिग्गज आम्हाला बहाल केले. सावरकरांची शौर्यगाथा जगाला माहीत झाली. साहित्यातला अत्युच्च सन्मान ज्ञानपीठ वि. वा. शिरवाडकरांना मिळाला. फेब्रुवारी सत्तावीस हा त्यांचा जन्मदिवस. जो उभा महाराष्ट्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या सहवासातील क्षणांच्या काही आठवणी…
एका पिढीला ते मराठी पाठ्यपुस्तकांतून भेटले. त्यांच्या कवितांनी मंत्रमुग्ध झालेली पिढी फक्त आणि फक्त त्यांच्या कवितांवर बोलत राहिली. शब्दफुलांचे ते सुगंधित ताटवे अनेक दशके नेहमीच सतेज राहिलेत.माझा विवाह सदुसष्ठ साली झाला. बायको पुण्याकडची, भीमाशंकर रस्त्यावरच्या घोडेगावची. वर्गात नेहमी पहिली येणारी. विवाह आटोपला. तिला घेऊन आम्ही नाशिकला आलो. त्यावेळी रिक्षा नव्हत्या. वर्हाड मागे सोडून टांग्यात बसून आम्ही दोघेच घराकडे निघालो. टांगा गोदावरीच्या पुलावरून पुढे जात होता. लांबलचक पुलावर फक्त घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता. नाशिकचे ते प्रसन्न वातावरण पाहून ती हरखून गेली. मला खेटून बसत म्हणाली, ‘आमच्या गावी टुरिंग टॉकीजमध्ये मी ‘नया दौर’ सिनेमा पाहिला होता. दिलीपकुमार, वैजयंतीमाला असेच टांग्यात बसले होते. त्या घोड्याच्या टापांची मला आठवण झाली. माझी एक इच्छा आहे, पूर्ण कराल?
नववधूच ती… तिला कोण नाही म्हणणार.
ती म्हणाली, कवी कुसुमाग्रज नाशिकलाच राहतात असं ऐकलं आहे. ‘गर्जा जयजयकार’, ‘अनाम वीरा’ या कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात होत्या.गुरुजींनी त्याचं रसग्रहण करताना वर्गातल्या सगळ्यांना भारावून टाकलं होतं. कधीतरी त्यांना मला भेटायला न्याल ना?’
माझ्या संसारातल्या नववधू षोडशीचा हा पहिला हट्ट. तो पूर्ण करायला जवळपास वीस वर्ष लागली.
कशी ते नंतर सांगतो.
सत्तरच्या दशकात नाशिक इटुकलेच होते. शहरातील मध्यवर्ती वस्तीतल्या पटेल कॉलनीतील सरस्वती भवनमध्ये त्यांचे छोटेसे घर होते. पत्नी खूप आधीच वारल्या होत्या. त्या काळी सगळी माणसे सर्वसामान्यांसारखी राहात. नाशिककरांनी प्रेमाने शिरवाडकरांचे नामकरण ‘तात्यासाहेब’ केले होते, त्याकाळी अनेकांकडे फोन नसायचाच. तात्यांनी फोन बहुदा घेतलाच नसावा.कारण सतत चाहत्यांचा ओघ असे. ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक, नाटककार म्हणून त्यांना एवढा मान होता की महाराष्ट्रातले सगळे कवी, लेखक, नाट्यकलावंत, प्रकाशक नाशिकला आले की रामाचे दर्शन घेण्याआधी तात्यासाहेबांकडे जात. अनेक भारावलेले तरुण लेखक, कवी तात्यांच्या कविता त्यांनाच ऐकवत. हळूच स्वत:च्याही ऐकवीत. एखादा भाबडा तात्यांनाच सांगायचा की, या भेटीत मी दोन नाशिकभूषण लेखकांना नक्की भेटणार आहे. एक शिरवाडकर व दुसरे कुसुमाग्रज. त्याने खूपच पिळले असल्याने तात्या म्हणत, आता दुसरे आहेत त्यांना भेटून घ्या.तो लगबगीने जाई.
असाच गमतीदार किस्सा बेचाळीस साली घडला. पुण्याच्या प्रभात दैनिकात ते नोकरीस होते. पारतंत्र्यांचे ते दिवस. ‘गर्जा जयजयकार’ ही कविता सर्वदूर ऐकू येत होती. इंग्रज सरकारने तिच्यावर आक्षेप घेऊन कुसुमाग्रजांना अटक करण्यासाठी पोलिसांना प्रभात कार्यालयात पाठवले. तेथील कर्मचार्यांनी सांगितले, येथे कुणी कुसुमाग्रज नाहीत. ऑफिसचे मस्टर चेक करण्यात आले. इतर नावांबरोबर शिरवाडकर नाव होते, पण कुसुमाग्रज नव्हते. पोलीस हात हलवीत परतले.
तात्यांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर एका तरुण भोळसटाने शुभेच्छा देताना म्हटले, ‘आपली अशीच उत्तरोत्तर भरभराट होवो! ‘तात्यासाहेब नम्रपणाने म्हणाले, हा साहित्यातला उच्चतम बहुमान आहे. त्यामुळे अधिक भरभराट होणे अवघड दिसते?’ ‘मी सांगतो नक्की होईल!’ भाबड्याने आशीर्वाद दिला.
तात्यांना एकटेपण आणखी काही मित्रांमुळे जाणवले नाही. स्वयंपाकाच्या बाई, एक मदतनीस, तसेच दोन तीन थिएटर्सचे मालक असलेले मधुकर चुंबळे व बाळासाहेब चुंबळे हे भाऊ. आर्किटेक्ट शिवाजी पाटील, आणखी काही सावलीसारखे तात्यासाहेबांबरोबर असत. आलेल्या प्रत्येक अभ्यागताला वाटे की आपल्यावर तात्यासाहेबांचे खूप प्रेम आहे. खरे तर सर्वांसाठीच त्यांचे लहान मुलासारखे प्रसन्न हसू, जवळीकीचे वागणे असे.
त्यांची दोन रुपे होती. आल्या गेल्याचे प्रेमळ वडीलधारे, तर दुसरे लेखक, कवी, नाटककार, कादंबरीकार. तेथे लिखाणातील पात्रांशिवाय इतर कुणालाही प्रवेश नसे. या पात्रांची वर्दळ मात्र चोवीस तास त्यांच्याभोवती असे व ती डोक्यात रेंगाळत असत. कधी बेकेट, तर कधी मॅकबेथ, कधी ‘वीज म्हणाली धरतीला’मधील मनू आणि नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर जेव्हा हृदयस्पर्शी स्वगत बोलत, त्याने अस्वस्थता येई ते वेगळंच. त्यांना निद्रानाशाचा त्रास होता तो या पात्रांमुळे तर नव्हे?
रात्री नऊ-दहानंतर ते फिरायला आजूबाजूच्या गरिबांच्या वस्तीत भटकंती करीत. त्यांचा नेहमीचा पेहराव म्हणजे कुर्ता-पायजमा, गळ्याशी मफलर, हातात विजेरी. त्या काळी रस्ते अंधारलेले खाचखळग्यांचे असत (कोट्यवधी रुपये खर्चूनही महापालिकेने त्यातले बरेच तसेच ठेवले आहेत). लेखनही ते उशिराच करीत. त्यावेळी अनेक शब्दभ्रमर भोवताली गुणगुणत असत. तर कवितेतली अक्षरे फुलपाखरासारखी लिखाणात डोकावत. कवितेत त्यांना घेतलं की नाही हे पाहण्यासाठी. यज्ञाला बसलेल्या तपस्व्याप्रमाणे ते प्रतिभेच्या उत्तुंग शब्दसमिधा वाहत राहिले… परिणामी अनेक लोकोत्तर साहित्यकृती प्रसादरूपाने मिळाल्या. ‘वीज म्हणाली धरतीला, ययाती देवयानी, विदूषक, बेकेत ऑथेल्लो, वैजयंतीसारखी अप्रतिम नाटके गाजत असताना नटसम्राट आले आणि त्याने इतिहास घडविला. उतारवयातली फरफट, लाडक्या मुलाबाळांकडून मिळालेली अनास्था आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे जगापुढे आली. माणसं अंत:र्मुख झाली. ‘ताट द्यावं पण पाट देऊ नये’ ही भावना काही अंशी जागृत झाली. श्रीराम लागू, दत्ता भट, नाना पाटेकर, यशवंत दत्त यांना वेगळी ओळख दिली.
गदिमा, पु. ल. देशपांडे, कानेटकर, पु. भा. भावे या समकालीन सुहृदांशी त्याचा निकट स्नेह होता. कानेटकर तर घरोब्यातलेच झाले होते. नव्या नाटकांवर चर्चा, नाटकातले प्रवेशवाचन कानेटकर हिरीरीने करीत असत. किंबहुना ते त्यांचे पॅशन होते. उभ्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाशकात आले की कुसुमाग्रजांना आवर्जून भेटतच. समोरच्या व्यक्तीचे मोठेपण, त्यांचे कर्तृत्व, त्याची गुणवत्ता त्यांना ठाऊक असे. त्या व्यक्तीच्या परिघातीलच गप्पा करताना राजकारणावरचे अवाक्षरही बाळासाहेब काढत नसत. तेथे फक्त मिस्कील, कोटीबाज, स्पष्टवक्ता आणि ब्रशच्या एका फटकार्याने कोणालाही चारीमुंड्या चीत करण्याची धम्मक असणारा कलासक्त कलावंत असे.
तात्यासाहेबांच्या आजारकाळात एकदा ते नाशिकला आले होते. भेटीगाठी, भाषणे, चर्चावजा कार्यक्रम पॅक होता. ते सगळं बाजूला सारुन प्रथम ते तात्यासाहेबांना भेटले. गप्पा मारल्या. वाकून तात्यांना नमस्कार केला. ही मोठी बातमी झाली होती.
यावरून आठवले… कुणीही अभ्यागत तात्यांना भेटायला आला की तो वाकून नमस्कार करीच करी. प्रथम प्रथम तात्यासाहेब संकोचाने मागे सरत, पाया पडू देत नसत. नंतर त्यांच्या लक्षात आले की हा पाया पडण्याचा प्रघात थांबणार नाही. वडीलधार्यांपुढे नतमस्तक होणे ही आपली परंपरा, संस्कृतीच असेल, तर पायांना नमस्कार केल्याशिवाय अभ्यागताला भेटपूर्ततेचा आनंद मिळणार नाही. त्यावर तात्यांना कुणीतरी विचारलेसुद्धा होते. उत्तर देताना ते म्हणाले, हल्ली मी पाया पडू देतो. आपल्या पायांची यत्किंचितता ठाऊक असली की झालं.
पोलीस महासंचालक अरविंद इनामदार ऐंशी-नव्वदच्या दशकात नाशिक पोलीस अकॅडमीत प्राचार्य होते. तात्यांच्या सहवासात ते खूप रमत. इनामदारांना काव्यशास्त्रविनोद आवडे. संस्कृत, इंग्लिशवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे भाषण लोकांना खूप आवडे.विनोदाची पखरण, ज्ञानेश्वरीतील दाखले, चारित्र्याची गरज, अधिकाराचा रयतेसाठी उपयोग यावर ते भाष्य करीत. उत्तम मराठी साहित्य व लेखक याविषयी ते त्यात टिप्पणीही करीत. तात्यांना तर ते पितृतुल्य मानत. तात्यासाहेबही त्यांच्याबरोबर रमत; कारण एकच की, ‘स्वच्छ’ अधिकारी म्हणून इनामदारांचा लौकिक होता. अनेक गुणवंत, कलावंत इनामदारांचे मित्र होते. त्यातल्या अनेकांच्या मैफिली तात्यासाहेबांच्या बैठकीत इनामदार घडवून आणत. त्या कलावंतांना राजदरबारी राजापुढे गायल्याचा आनंद मिळे.
तात्यासाहेबांना संगीताची मनस्वी आवड होतीच. के. एल. सैगल, लता हे त्यांचे आवडते. दुसरी आवड फोटोग्राफीची होती. तात्यासाहेबांना एका गोष्टीचे विलक्षण प्रेम होते. महाराष्ट्रभरातील रेस्ट हाऊस गेस्ट, हाऊस, डाकबंगले पाहण्याचे. कारण या जागा बर्याच ठिकाणी निसर्गरम्य परिसरात असतात. खानसाम्यांनी बनविलेले साधेसुधे चवदार जेवण व पॅसेजमध्ये वेताच्या खुर्चीवर बसून सिगारचे झुरके घेत रमणे त्यांना आवडे. असा आनंद त्यांना इनामदारांनी अनेकदा दिला.पावसाळ्यात डोंगराईत वसलेल्या त्र्यंबकेश्वरला व तेथील डाकबंगल्यात ते अनेकदा जात.
१९८७ला मी नवी फियाट घेतली. फक्त ८६ सहस्रात.त्याचं असं झालं, एक सहकारी बँक प्रथमच कार लोन देणार होती. त्यांचा मी कस्टमर होतो. नाशकात नाव वजनदार होते. मी लोन घ्यावे म्हणून त्यांनी आग्रह केला. मी म्हटले, घेतो पण एका अटीवर…
मॅनेजर म्हणाले, ‘काय?’
‘माझ्याबरोबर तुम्हालाही माझी गाडी शिकावी लागेल!’
‘का बरं?’ त्यांनी विचारलं.
कर्ज फेडू शकलो नाही तर गाडी तुम्हालाच बँकेपुढे आणून उभी करावी लागेल. कर्ज थकलेल्या रिक्षावाल्यांच्या रिक्षा तुम्ही बँकेपुढे आणून उभ्या करताच ना… मी पडलो व्यंगचित्रकार. पैसे मिळतात न म्िाळतात… मीच खो खो हसलो.
नव्वदच्या दशकात भारतीय रस्त्यावर फक्त तीन गाड्या चालत. अम्बेसॅडर, फियाट व नवीन निघालेली मारुती. आताशा अशा शे दोनशे मॉडेल्स व लाखो गाड्या रस्त्यावरून धावत आहेत. रस्ते बिचारे खचून गेलेत. खच्चून खिसे भरलेल्या लोकसेवकांना त्यांचा फार आधार वाटतो. व्यंगचित्रकारांत नवी गाडी घेणारा मी ‘पहिलाच’.
बातमी ऐकताच बरीच खळबळ माजली. संपादकांच्या भुवया वक्र झाल्या (महागडा लेकाचा… गाड्या उडवतो). शेजारी पाजारी, नातेवाईक जमेल तसे विचारू लागले. जुनी स्कूटर विकली की आहे.. बायकोचे दागिने विकलेले दिसतात? किती उधार उसनवारी केल्या? फुकटचा षौक… (लायकी नसताना)… इनामदार साहेबांची आमची चांगली दोस्ती होती. त्यांना गाडी दाखवल्यावर म्हणालो, साहेब, गाडी तुम्ही काय छान चालविता. आपण जरा चक्कर मारून यायची का?
जुलै महिना होता पावसाची झिमझिम चालू होती.दुसर्यी दिवशी बारा वाजता गाडीत इनामदार ड्रायव्हिंग सीटवर, त्यांच्या शेजारी तात्यासाहेब डावा हात खिडकीतून बाहेर काढून (ती सीट व ते बसणं त्यांचं खूप आवडीच.) मागच्या सीटवर मी, पत्नी अनुराधा व मिसेस अंजलीताई इनामदार. त्र्यंबकेश्वरकडे निघालो. डोंगरांची लांबच लांब रांग धुक्यात हरविली होती. काही थेंब गाडीवर टपटपत होते. अबोल बसलेली अनुराधा लहान मुलाप्रमाणे निरागस हसणार्या, प्रतिभाशाली ऋजुतामय सरस्वतीपुत्रास एकटक पाहत होती. शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातल्या आवडत्या, भारावून टाकणार्या कवितांचे जनक पाहायचे स्वप्न आज पूर्ण झाले होते. चक्क वीस वर्षांनी.
गाडी चालवता चालवता इनामदारांनी त्यांना विचारले, देवा, तुमच्याकडे टॅक्सी होती म्हणे?
हो वीस पंचवीस वर्षांपूर्वी. तशी सेकंडहॅन्डच होती. त्यावेळी रिक्षा नव्हती. गावात वा आजूबाजूला फिरायला सोपे पडावे म्हणून घेतली होती.मात्र बाहेर जाणे फारसे होत नसे. ड्रायव्हर म्हणाला, ‘साहेब, टॅक्सी स्टॅण्डला गाडी लावायची का? निदान गाडीचा खर्च व माझा पगारही वरचेवर निघेल?’ मी हो म्हटले खरे पण झाले उलटेच. गाडी रोज काम काढू लागली. पगाराव्यतिरिक्त गाडी दुरुस्तीचा खर्चही रोज सुरू झाला. मला त्यातलं काही कळत नाही हे ड्रायव्हरला पक्कं ठाऊक होतं. माझी काही नाटके व ही गाडी चाललीच नाही. तात्या मिस्कील हसत बोलले.
त्र्यंबकेश्वरच्या पुढे आठ दहा मैलावारच्या घाटाकडे आम्ही निघालो. तात्या म्हणाले, त्या घाटात डोंगरावरून कोसळणारे पाणी खाली येत नाही ते उलटे वर फिरते ते दाखवितो, चला. इनामदारांनी घाटातल्या एका रूंद वळणावर गाडी थांबविली. कड्यांवरून कोसळणारे अनेक प्रवाह आम्ही पाहिले. विस्तीर्ण वनराई, दर्याखोर्यात मांडलेल्या लाल कौलारु झोपड्या, त्यातून निघणारा चुलींचा धूर, ठिकठिकाणी सांडलेले झरे, तांदळाची हिरवी कंच शेती. आकाशाच्या कॅनव्हासवर एखाद्या कोपर्यात काळे ढग तर एखाद्या कोपर्यात उन्हाचे कोवळे ,निळ्या काळ्या ढगाच्या आडून निघालेले कवडसे.
थोडं आडबाजूला जाऊन तात्यांनी सिगारेट शिलगावली व झुरके घेत अनिमिष नेत्रांनी ते दृश्य पाहत राहिले.
त्यांच्या जवळ जात इनामदार म्हणाले, देवा एकादी कविता सुचते का?
या कोसळावर केलेली पूर्वीची एक छोटी कविता ऐकवितो. त्यांनी आम्हाला एक म्हणूनही दाखविली. तोवर अनुराधाने सकाळीच घरून तयार करून बरोबर घेतलेले जेवणाचे डबे काढले, दोघींनी मांडामांड सुरू केली. मी गाडीतून आणलेल्या दोन चटया, एक घडीची खुर्ची डिकीतून बाहेर काढली. तात्यांना खुर्ची उघडून दिली. चटया जमिनीवर पसरल्या. अनू व अंजलीताईंनी फराळाचे डबे उघडले. कोरडे पिठले, बाजरीची भाकरी, हिरवा तळलेला मटार, मिरचीचा ठेचा, कांदा, गरमागरम उपमा व गाजराचा हलवा असाच काहीसा सरंजाम होता. थर्मासमधला कडक चहा जेवणं संपायची वाट पाहत होताच. तात्यासाहेबांना पिठले, भाकरी व ठेचा आवडतो हे मला ठाऊक होते. भोवती गारवा, भुकेची वेळ. मस्त बेत जमून आला होता.
‘तात्यासाहेब, यातलं मी काहीही केलेले नाही हं… हे सगळं प्रिपरेशन मिसेस सोनार यांचे आहे, अंजलीताईंनी अनूची पाठ थोपटत तात्यांना सांगितलं.
तात्यांनी मंद स्मित केलं.’मिसेस सोनार भजी अतिशय छान करतात…’ इनामदारांनी माहिती पुरविली. जेवणाचा तो अपूर्व सोहळा अनुभवण्यासारखा होता.
‘मी एक बोलू का.. अनू पुटपुटली.
बोला की मिसेस सोनार, डी.आय.जी. येथे आहेत. घाबरता कशाला? असं इनामदार बोलताच सगळे हसले. अनु सांगू लागली… शाळेत व नंतर एसएनडीटी कॉलेजात असताना ज्यांच्या कविता मी अभ्यासल्या, पान पान रसग्रहण केले, ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज माझ्या हातचं पिठलं भाकरी उघड्यावर रिमझिम पावसात खात आहेत हे सांगून कुणाला पटेल का? लग्न झाल्यापासून मी त्यांना भेटायला उत्सुक होते. ती भेट इतकी विलक्षण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. एका दमात बोलून अनू मोकळी झाली.
‘मुली, अनेकांनी माझ्या कविता वाचल्या, अभिवाचने केली, रसग्रहणेही केली, पीएचडी केल्या; पण तुझ्या हातचा हा पहिलाच चविष्ट मोबदला आज मला मिळालाय बघ… त्यात्यासाहेब मिश्किल हसत बोलले.