अनाम सैनिकांचे समाधीस्थळ असलेल्या ठिकाणी पुतळा बसवणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना तरी मान्य झाले असते का? शहीद सैनिकांसाठीची ज्योत विझवणे क्रांतीची मशाल हाती घेतलेल्या नेताजींना पटले असते का? नेताजींना पंतप्रधान मोदींच्या मातृसंस्थेने त्यांच्या हयातीत काडीची देखील मदत केलेली नाही. १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १९४०पर्यंत देशव्यापी संघटन विस्तारले होते. डॉ. हेडगेवारांचा आदेश ऐकणारे हजारो तरूण त्यांच्याकडे होते म्हणे. हिंदू महासभेचे संघटन देखील अस्तित्त्वात होते. गांधीजींप्रमाणे संघ आणि हिंदू महासभा यांना सशस्त्र लढ्याचे वावडे नव्हते, उलट ते आजदेखील त्याचा पुरस्कार करतात. मग, आझाद हिंद सेनेसाठी नेताजी सैन्य उभारत होते त्यावेळी ते नेताजींसोबत का गेले नाहीत?
– – –
ज्यांनी दिल्लीला भेट दिली आहे त्यांनी एकदा तरी राजपथावरच्या इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीसमोर दोन मिनिटे उभे राहून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली असणारच. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सेनादलप्रमुखांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण होण्याआधी वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना अमर जवान ज्योतीसमोर श्रद्धांजली वाहण्याची ५० वर्षे जुनी परंपरा आहे. पण यावेळी तिथे कोणी फिरकले देखील नाही. कारण आता अखंड तेवणारी अमर जवान ज्योतच नव्याने बनवलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामधील एका ज्योतीत विलीन केली गेली आहे. १९७२पासून धगधगणारी अमर जवान ज्योत विझवली गेली. आता त्या जागी राष्ट्रनायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचे ठरले आहे. पुतळा अजून तयार नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र समाधीस्थळावर नेताजींचा हॉलोग्राम (लेसरमधून तयार केलेली पोकळ आभासी प्रतिमा) झळकवला.
मोदींनी एक नवे भव्य युद्धस्मारक बनवण्याचे ठरवले. पण त्याला भरपूर प्रसिद्धी देऊन देखील त्या स्मारकाची लोकांवर म्हणावी तशी छाप पडत नसल्याने त्याचा भाजपाला फारसा राजकीय फायदा होत नव्हता. कारण लोकांच्या मनात अमर जवान ज्योत हे समाधीस्थळ खोलवर रुजलेले आहे आणि त्याची जागा दुसरे कोणतेही स्मारक घेऊ शकणार नाही, हे लक्षात आल्यानेच तिथली ज्योत कायमची विझवली गेली आणि त्या ज्योतीचे पावित्र्य आणि अस्तित्व विलिनीकरणाच्या नावाखाली संपवले गेले. संदर्भ सोडून काहीतरी भव्यदिव्य उभारायचे आणि मोदी सरकारने उभारले आहे म्हणजे लोकांनी लगेच त्याला महत्व द्यायला सुरुवात केलीच पाहिजे, असा अट्टाहास करायचा, हा मोदींचा खाक्या सरदार पटेलांचा भव्य पुतळा बनवल्यापासून दिसतो आहे.
मुळात पटेलांना असे ‘एकटे’ पाडून काय मिळवले? त्यांच्याविषयी मोदी सरकारला आणि त्यांच्या विचारधारेला सोयीचे तेवढेच कसे आठवते?
सरदार पटेलांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील चौपाटीच्या समुद्रकिनारी मोठ्या जागेत अंतिम संस्कार करावा अशी पंडित नेहरूंची व सरकारची इच्छा होती. पण जिथे त्यांच्या पत्नीवर १९०९ साली अंतिम संस्कार झाले होते, त्या ठिकाणीच आपल्यावरही अंत्यसंस्कार व्हावेत, अशी सरदारांची इच्छा असल्याचे त्यांच्या मुलीनेच सांगितले. मग मुंबईच्या सोनापूर (मरीन लाइन्स) इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. सोनापूरला आजही ती स्मशानभूमी आहे आणि सर्वसामान्य जनतेलाही तिथे अंत्यसंस्कार करण्याची मुभा आहे. लोकांसाठी आयुष्य दिलेल्या लोहपुरुषाला शेवटची विश्रांती देखील लोकांपासून अलिप्त आणि दूर, चौपाटीच्या समुद्रकिनारी घ्यावीशी वाटली नाही, हे एकतर्फी मन की बात करणार्या मोदींना कसे उमगणार? सरदार पटेलांचा एकट्याचा कितीही मोठा पुतळा उभा केला, तरी त्यांचे आणि महात्मा गांधीचे गंभीर चर्चा करतानाचे एक छायाचित्र लोकांना जास्त भावते, कारण गांधीशिवाय पटेल ही संकल्पनाच न पटणारी आहे. असो.
या देशात सैनिकांचा सन्मान करणारी एक नवीन ज्योत जागवणे हे नक्कीच चांगले पाऊल आहे. पण त्यासाठी ५० वर्षे तेवणारी अमर जवान ज्योत कशाला विझवायची? देवघरात आपण दोन्ही बाजूला समई ठेवतोच ना! दोन अखंड ज्योती असल्या तर काय फरक पडला असता? अमर जवान ज्योतीला खर्च नगण्य होता. लष्करातून निवृत्त झालेले एक देशभक्त आजोबा चंदर सिंग बिश्त हे इंडिया गेटच्या कमानीखाली राहून गेली ४० वर्षे त्या ज्योतीची काळजी घेत होते. जेमतेम १५ चौरस फूट जागा अमर जवान ज्योतीने व्यापली आहे. पंतप्रधानांना काहीही करून अमर जवान ज्योत विझवायची होती, हेच सत्य आहे. मोदींनी अमर जवान ज्योतीला ४० एकर जागेत पसरलेल्या राष्ट्रीय युद्धस्मारकात उदात्त हेतूने प्रस्थापित करून तिचा सन्मानच केला आहे, असे मानणार्या बंदबुद्धी भक्तांनी राम मंदिर अयोध्येतच आणि बाबरी मशीद होती त्याच जागी बनवण्याचा हट्ट आपण का केला, तेही सांगावे. अमर जवान ज्योत आणि इंडिया गेट ही परंपरागत युद्धस्मारके आणि ऐतिहासिक ठेवा आहेत. सैनिकांची समाधिस्थळे आहेत. या स्मारकांना धक्का न पोहोचवता त्यांनाच केंद्रीभूत ठेवून युद्धस्मारक बनवणे शक्य होते. पण तसे का केले गेले नाही? अमर जवान ज्योत काढून नेताजींचा पुतळा उभा करण्यात पंतप्रधानांचा हेतू साफ आहे का? अमर जवान ज्योत १९७१च्या युद्धातील विजयाची आिण त्यामुळेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खंबीर नेतृत्वाची ग्वाही देत उभी असल्याने काँग्रेसविषयी सतत धगधगत्या मत्सरातून तर ही ज्योत विझवण्याचे पातक केले गेले नसेल ना?
त्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने तीन लाखांपेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांची हत्या केली होती. हा आकडा ३० लाखांपेक्षा अधिक असावा असंही म्हणतात. चार लाख स्त्रियांवर बलात्कार केले गेले. एक कोटी लोकांना निर्वासित केले गेले. त्या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी इंदिराजी पुढे सरसावल्या. तीन डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतातील ११ हवाईतळांवर हल्ला केला आणि त्याच रात्री भारताने खणखणीत उत्तर दिले. त्या दिवशी संध्याकाळीच इंदिराजींनी आकाशवाणीवरून देशवासीयांना युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरचे १४ दिवस भारतासाठी भीम-पराक्रमाचे दिवस होते. पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर फक्त १४ दिवसांत सपशेल हार पत्करली. या युद्धात पाकिस्तानचे नऊ हजाराहून अधिक सैनिक मारले गेले, सुमारे २५ हजार जखमी झाले आणि जवळपास ९३ हजार सैनिकांनी शरणागती पत्करली. पंतप्रधान इंदिरा गांधी, परराष्ट्रमंत्री स्वर्ण सिंग, संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम आणि सैन्यप्रमुख फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे गुप्तपणे कित्येक महिने आधीपासून या युद्धाची तयारी करत होते. एक कोटी निर्वासितांमधून एक लाख ८० हजार लोकांची निवड करून त्यांना खडतर लष्करी प्रशिक्षण दिले गेले आणि त्यातूनच काही महिन्यांतच बांगला मुक्ती वाहिनीची उभारणी झाली. भारताचे तीन हजार ८४३ जवान या युद्धात वीरगतीला प्राप्त झाले. भारतीय सैन्याने दुसर्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, यासारखे सर्वोच्च उदाहरण दुसरे नसेल.
‘ढाका आता स्वतंत्र बांगलादेशची स्वतंत्र राजधानी आहे,’ असे इंदिराजींनी संसदेत सांगितले त्या क्षणी जगभरात भारत एक लष्करी महासत्ता म्हणून प्रस्थापित झाला. दूरदृष्टीच्या इंदिराजींनी लगेच आणखी एक महत्त्वाचे काम कमालीच्या गुप्तपणे करायला घेतले, ते होते अण्वस्त्रे बनवण्याचे. १९७४ला पोखरण येथे अणुस्फोट घडवून त्यांनी संपूर्ण जगाला संदेश दिला की भारत हा अहिंसावादी पण तितकाच बलशाली आणि अण्वस्त्रांनी सज्ज असलेला देश आहे. दुश्मन को लाल आँख दिखाऊंगी असे त्या कधी भाषणात म्हटल्याचे ऐकिवात नाही, कृतीतूनच त्यांनी ते सक्षमपणे करून दाखवले.
या युद्धाच्या खर्चाचा आणि एक कोटी निर्वासितांना सुखरूप परत पाठवण्याचा मोठा ताण देशाच्या तिजोरीवर होता. त्यामुळेच लगेच अतिभव्य युद्धस्मारक करणे शक्य नव्हते. विजयाच्या आनंदाला, उत्साहाला गमावलेल्या सैनिकांच्या दुःखाची किनार होती. त्यामुळे युद्धात शहीद झालेल्या अज्ञात सैनिकांचे एक समाधीस्थळ इंडिया गेट येथेच ताबडतोब बनवले जावे, असा सूचनावजा आदेश त्यांनी दिला. काही दिवसांतच घाईघाईने अमर जवान ज्योत हे समाधीस्थळ अस्तित्त्वात आले. ते फार भव्य नाही, पण त्याचा साधेपणा, चार कोपर्यांत धगधगणारी ती अग्निकुण्डे, उलटी रोवलेली सेमीऑटोमॅटिक रायफल आणि तिच्यावरचे युद्धात वापरले गेलेले सैनिकाचे शिरस्त्राण हे चित्र भारतीयांच्या मनावर खोलवर कोरले गेलेले आहे. २६ जानेवारी १९७२ रोजी पहिल्यांदाच इंदिराजींनी या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित केली आणि मग त्याचे एका परंपरेत रूपांतर झाले. ती परंपरा आजवर सर्वांनी अभिमानाने पाळली. जगभरचे राष्ट्रप्रमुख भारतात आले की इथे शहीदांना श्रद्धांजली वाहतात. या छोट्याशा भासणार्या अमर जवान ज्योतीमागची भव्यता समजायला या देशावरच नव्हे तर मानवतेवर आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांवर उत्कट प्रेम असावे लागते. तिथे उभा राहून नतमस्तक झाला नाही, रोमांचित झाला नाही तो भारतीयच नव्हे. अमर ज्योतीतून अजून हजारो स्मारके उजळवली तरी त्या ज्योतीला विझवण्याच्या महापातकाचे कधीच समर्थन होऊ शकत नाही. गंगा नदी काशीक्षेत्री अतिभव्य आहे म्हणून गंगोत्रीला बुजवणे योग्य ठरेल काय?
अनाम सैनिकांचे समाधीस्थळ असलेल्या ठिकाणी पुतळा बसवणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना तरी मान्य झाले असते का? शहीद सैनिकांसाठीची ज्योत विझवणे क्रांतीची मशाल हाती घेतलेल्या नेताजींना पटले असते का? नेताजींना पंतप्रधान मोदींच्या मातृसंस्थेने त्यांच्या हयातीत काडीची देखील मदत केलेली नाही. १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १९४०पर्यंत देशव्यापी संघटन विस्तारले होते. डॉ. हेडगेवारांचा आदेश ऐकणारे हजारो तरूण त्यांच्याकडे होते म्हणे. हिंदू महासभेचे संघटन देखील अस्तित्त्वात होते. गांधीजींप्रमाणे संघ आणि हिंदू महासभा यांना सशस्त्र लढ्याचे वावडे नव्हते, उलट ते आजदेखील त्याचा पुरस्कार करतात. मग, आझाद हिंद सेनेसाठी नेताजी सैन्य उभारत होते त्यावेळी ते नेताजींसोबत का गेले नाहीत? नेताजी या दोन्ही संघटनांच्या नेत्यांना भेटून एकत्र येण्यासाठी समजावायचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण तेव्हा नेताजींसोबत जाणार्या प्रत्येकाचा ब्रिटीश सरकार अतोनात छळ करत असे. ब्रिटीशांची नाराजी ओढवून हे अग्नीदिव्य करायची हिंमत नसल्याने या संघटनांच्या नेत्यांनी नेताजींच्या आरपारच्या लढाईला मदत केली नाही, असा आरोप केला जातो. आझाद हिंद सेनेवरच्या खटल्यांमध्ये वकिली करायला धावलेले बॅरिस्टरही पंडित नेहरूच होते. तेव्हाच्या आपल्या विचारधारेच्या नेत्यांच्या महापातकाचे प्रायश्चित्त आता मोदी घेत आहेत काय?
नेताजी असोत की सरदार पटेल असोत- बनावट इतिहास रचून, सोयीचे तुकडे सोयीच्या पद्धतीने सांगून त्यांच्यात आणि महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्यात मनभेद होते, या दोघांवर ‘गांधी घराण्या’ने अन्याय केला, असा भ्रम पसरवून त्यांना आपलेसे करणे इतके सोपे नाही. हे दोघे आणि इतर नेते जेव्हा ब्रिटिशांशी लढत होते, तेव्हा विद्यमान सत्ताधीशांचे पूर्वसुरी कशी ब्रिटिशांची चाकरी आणि त्यांच्यासाठी हेरगिरी करत होते आणि त्यांच्याविषयी नेताजी आणि सरदार पटेल यांची काय मते होती, ते सर्वज्ञात आहे. नेताजींचे पुतळे उभारण्यापेक्षा देशात सर्व धर्मांना शांततामय सहजीवन उपभोगण्यासारखे वातावरण निर्माण करा, अशी चपराक खुद्द त्यांच्या कन्येनेच दिलेली आहे. अर्थात तिने इव्हेंटजीवींच्या वर्तनात फरक पडले, अशी सुतराम शक्यता नाही.