विकासनगर भागातल्या पोलीस स्टेशनकडून एक तरूण बेपत्ता असल्याची खबर देण्यात आली. सोलापूरला राहणार्या त्याच्या बहिणीने पुण्यात येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. या तरुणाचं नाव होतं मेघराज दास्ताने. मेघराज काही वर्षांपूर्वी सोलापूर सोडून इथे आला होता. व्यवसायात त्याची प्रगती सुरू होती. त्यानं अजून लग्न केलं नव्हतं, करण्याची इच्छा मात्र होती. सुवर्णा नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात होती. ही सगळी माहिती बहीण मोहिनीने दिल्यावर पोलिसांच्या तपासाला गती आली.
– – –
सकाळी सकाळी बाहेर गोंधळ ऐकू आला, म्हणून इन्स्पेक्टर बारगजेंनी हवालदार सातपुतेंना बोलावून घेतलं.
“काय गडबड आहे, सातपुते?“ त्यांनी विचारलं. आज जुन्या फायलींचा ढीग तपासून बघायचं काम बारगजेंनी हाती घेतलं होतं आणि त्यात त्यांना कुठलाही अडथळा नको होता.
“साहेब, एक टॅक्सीवाला आलाय आणि त्याच्या गाडीच्या डिकीत एक बॅग राहिल्याचं सांगतोय.“
“अहो, मग जमा करून घ्या, मालकाला शोधा आणि परत करून टाका ना!“
“तेच करणार होतो साहेब, पण तो म्हणतोय, की बॅग खूप जड आहे. आणि साहेब…“
“आणि काय?“
“बॅगमधून कसला तरी घाणेरडा वास येतोय, असंही म्हणतोय तो.“
हे वाक्य ऐकल्यावर मात्र बारगजेंचे कान टवकारले गेले.
“कसला वास? त्याला बोलवा आत!“ त्यांनी सूचना केली. मळके, साधेसुधे कपडे घातलेला, चेहर्यावरून बापुडवाणा वाटणारा रामनारायण आत आला.
“काय झालंय रे? सगळं नीट आणि स्पष्ट सांग!“ बारगजेंनी त्याला दरडावलं.
“साहब, आज सुबह गाडी धोने के लिये डिकी खोली, तो उसमें एक बॅग था. शायद किसी कस्टमर का था, साहब. कल देखा ही नहीं था।“
रामनारायण सांगायला लागला. आदल्या दिवशी दिवसभर त्याने शहरात टॅक्सी फिरवली होती. कुठल्यातरी कस्टमरची बॅग डिकीत राहिली होती. रात्री त्याने डिकी उघडली नव्हती. सकाळी गाडी धुतानाच त्याला ही बॅग राहिल्याचं लक्षात आलं. त्यातून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यानं ती बॅग उघडण्याचे काही प्रयत्न न करता, सरळ पोलिस स्टेशन गाठलं होतं.
रामनारायण टॅक्सी घेऊनच आला होता. बारगजे लगेच त्यांच्या टीमला घेऊन बाहेर गेले. रामनारायणने त्यांच्या समोरच डिकी उघडली आणि दुर्गंधी सगळ्यांनाच जाणवली. हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे, हे बारगजेंच्या लगेच लक्षात आलं. पोलिसांनी ती बॅग पंचनामा करून ताब्यात घेतली आणि ती उघडली गेली. दुर्गंधी आता थेट सगळ्यांच्या नाकात गेली आणि समोरचं दृश्य बघून मळमळायला लागलं. इन्स्पेक्टर बारगजेंनी आत्तापर्यंत अनेक निर्घृण खुनांच्या केसेस हाताळल्या असल्या, तरी हे दृश्य त्यांच्याही अंगावर येणारं होतं. एका तरुणाचा मृतदेह होता त्या बॅगमध्ये. तोही तुकड्यातुकड्यांत विखुरलेला. कुणीतरी त्याला निर्दयपणे मारून टाकलं होतं. शिर वेगळं करून बाकीचे तुकडे ह्या बॅगमध्ये भरण्यात आले होते. ह्या केसचा तपास दमछाक करणार आणि गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी बुद्धीचा कस लागणार, हे बारगजेंना तेव्हाच लक्षात आलं.
“काल तुझ्या टॅक्सीत कोण कोण बसलं होतं? ही बॅग नक्की कुणाची आहे, काही आठवतंय का?“ बारगजेंनी विचारलं.
“साहब, कल तो याद नहीं रहा, पर लगता है, दोपहर के टाइम में जुना ब्रिज के पास दो लोगों को छोडा था, उनका ही बॅग होगा ये.“ रामनारायणने घाबरत घाबरत उत्तर दिलं.
त्यानंतरही काही गिर्हाइके त्याने घेतली होती, पण त्यांच्यासाठी डिकी उघडून देण्याची गरज पडली नव्हती. या दोघांनी गर्दीच्या ठिकाणीच त्याला टॅक्सी थांबवायला सांगितली आणि लगेच पैसे देऊन ते निघून गेले, हे बारगजेंच्या लक्षात आलं. रामनारायण भीतीने थरथर कापत होता.
“दस साल से टॅक्सी चला रहा हूं साहब… अपनी जिंदगी में पहली बार ऐसा हुआ है.“ तो रडवेला होत म्हणाला. बारगजेंनी त्याला धीर दिला.
रामनारायणच्या सांगण्यानुसार, टॅक्सीत बॅग ठेवून देणारे ते दोन मध्यमवयीन पुरुष होते. दोघांनी स्वतःच बॅग टॅक्सीपाशी आणली होती. डिकी उघडतानाही जपून ती आत ठेवली होती. रामनारायणला त्यांनी लांबच ठेवलं होतं. दोघांनीही चेहर्याला स्कार्फ गुंडाळले होते, त्यामुळे चेहरे नीट दिसत नव्हते. रामनारायणला अर्थातच, त्यावेळी काही संशय आला नव्हता.
लीलानगर भागात ते दोघं टॅक्सीत बसले होते. त्यांनी बॅग त्यांच्याबरोबर आणली होती, त्या अर्थी तिथेच कुठेतरी ते राहत असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. त्यांनी पेमेंटही कॅशमध्ये केलं होतं. त्यामुळे त्यांचा माग काढणं हे एक अवघड आव्हान होतं, पण बारगजेंनी ते स्वीकारायचं ठरवलं.
ते दोघं टॅक्सीत बसले, तिथे आसपास कुठलेच सीसीटीव्ही पोलिसांना सापडले नाहीत. आता वेगळ्या पद्धतीनं शोध घेण्याची गरज होती. शहरातल्या सगळ्या पोलिस स्टेशन्सना खबर देण्यात आली. मृतदेहाचं आता शिर नसतानाच पोस्ट मार्टेम केलं जाणार होतं. याचा रिपोर्टही हाती आला. टॅक्सीत प्रेत मिळालं, त्याच्या दोन दिवस आधी त्या व्यक्तीचा खून झाला होता. खून झाल्याच्या दुसर्या दिवशी तुकडे केलेलं ते प्रेत बॅगमध्ये रामनारायणच्या टॅक्सीच्या डिकीत ठेवण्यात आलं आणि तिसर्या दिवशी त्याला ते दिसलं होतं.
विकासनगर भागातल्या पोलीस स्टेशनकडून एक तरूण बेपत्ता असल्याची खबर देण्यात आली. सोलाप्ाूरला राहणार्या त्याच्या बहिणीने पुण्यात येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. या तरुणाचं नाव होतं मेघराज दास्ताने. मेघराज काही वर्षांपूर्वी सोलापूर सोडून इथे आला होता. व्यवसायात त्याची प्रगती सुरू होती. त्यानं अजून लग्न केलं नव्हतं, करण्याची इच्छा मात्र होती. सुवर्णा नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात होती. ही सगळी माहिती बहीण मोहिनीने दिल्यावर पोलिसांच्या तपासाला गती आली.
“आमचा मेघराज स्वभावाने मनमिळाऊ होता, साहेब. इथेही त्याचे अनेक मित्र होते. माणसांना जोडून ठेवायचा त्याचा स्वभाव होता. दोन दिवसांपूर्वी त्याच्याशी माझं बोलणं झालं होतं. तेव्हापासून त्याचा काही पत्ता नाही. काळजी वाटली, म्हणून इकडे निघून आले.“ मोहिनी रडवेली झाली होती.
“काळजी करू नका, सापडेल तुमचा भाऊ,“ बारगजेंनी तिला धीर दिला खरा, पण त्यांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली होती. खून झालेली व्यक्ती म्हणजे मेघराजच आहे, हे रिपोर्ट्समध्ये सिद्ध झालं. पोलिसांना आता त्याचं शिर शोधून काढायचं होतं आणि त्याला एवढ्या निर्घृण पद्धतीने मारणारे गुन्हेगारही.
मेघराजने तिशी ओलांडलेली होती. व्यवसायात त्याचा चांगला जम बसला होता. सुवर्णा ही त्याची मैत्रीण एका खासगी कंपनीत काम करत होती. मेघराज फ्लॅटवर एकटाच राहत असे. सुवर्णाही कधीकधी त्याच्याबरोबर येऊन राहत असे. त्यांना एकत्र बाहेर जाताना, येताना सोसायटीमधल्या अनेकांनी बघितलं होतं. खून झाला त्या रात्री मात्र तो दुपारपासूनच घरी नव्हता, अशी माहिती मिळाली. व्यवसायात प्रशांत कोलते हा त्याचा मित्रच त्याचा पार्टनर होता. दोघांची अनेक वर्षांची मैत्री होती आणि त्यातूनच त्यांनी हा व्यवसायही सुरू करून त्यात प्रगती केली होती. प्रशांतला भेटून पोलिसांनी आवश्यक ती माहिती घेतली.
“साहेब, मेघराज अतिशय चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. कामाला उत्तम होता. धंद्यातही त्याची भरपूर मेहनत होती. त्याची बातमी कळल्यापासून आम्हालाच काय करावं, कळेनासं झालंय,“ प्रशांतलाही मोठा धक्का बसल्याचं जाणवत होतं.
मेघराज दोन दिवस गायब असूनही प्रशांतने त्याबद्दल काहीच हालचाल का केली नाही, असा प्रश्न पोलिसांना साहजिकच पडला. “साहेब, त्यानं पर्सनल कामासाठी बाहेर जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही त्याला डिस्टर्ब केलं नाही!“ प्रशांतनं त्यावर खुलासा केला.
सुवर्णाशी त्याचे अधूनमधून वाद होत असत, एकदा तिच्या आईवडिलांनी मेघराजच्या फ्लॅटवर येऊन मोठं भांडण केलं होतं, असंही पोलिसांना सोसायटीतून समजलं. त्या वादातून काही झालं असावं का, या दृष्टीने शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली. अर्थात, तशी शक्यता धूसर दिसत असली, तरी सगळ्या बाजूंनी तपास करणं महत्त्वाचं होतं.
“आम्ही जुन्या विचारांची माणसं आहोत साहेब, सुवर्णाची त्याच्याशी मैत्री होती इतपत ठीक आहे, पण तिचं त्याच्या घरी जाऊन राहणं, त्याच्याबरोबर कुठे कुठे फिरायला जाणं चांगलं दिसत नव्हतं. लोक आम्हाला विचारायचे, आम्ही त्यांना काय उत्तरं देणार होतो?“ सुवर्णाचे वडील म्हणाले.
“त्याच्यात अडकल्यामुळे ती लग्नालाही तयार नव्हती. आम्ही किती वेळा तिला समजावून बघितलं, पण काही उपयोग झाला नाही,“ आईनं सांगितलं. बारगजे सगळं शांतपणे ऐकून घेत होते, पण आईच्या या वाक्यावर त्यांच्या डोक्यात वेगळीच चक्रं सुरू झाली. तिला त्याच्यापासून दूर करण्यासाठी तर त्यांनी काही खेळी केली नसावी ना? पांढरपेशे दिसणारे लोकही किती क्रूर असू शकतात, हे आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यांनी काही वेळा प्रत्यक्ष अनुभवलं होतं. त्यामुळे इथे कुठलीच शक्यता नजरेआड करायची नव्हती.
अर्थात, त्या दोघांवर संशय घेण्यासारखे कुठलेच पुरावे त्यांच्याकडे नव्हते. याच दरम्यान मेघराजच्या फोनचे रेकॉर्डसही हाती आले. त्याचा खून झाला, त्या दिवशी त्याचं सुवर्णाशी बोलणं झालं नव्हतं. प्रशांत किंवा कुठल्याही ओळखीच्या माणसाशी काही संपर्क झाल्याची नोंदही मिळाली नाही. मात्र, फोन रेकॉर्ड्समध्ये एक निनावी नंबर मिळाला होता. दुपारच्या वेळी मेघराजला त्या नंबरवरून कॉल आला होता. कुण्या निलेश महावीरचा हा नंबर होता. पोलिसांनी त्याला फोन करून चौकशी केली. त्याच्या बोलण्यावरूनच पोलिसांना काहीतरी संशय आला.
दरम्यान, इकडे सीसीटीव्हीवरून काही शोध लागतो का, याचा तपास सुरूच होता. तपासाचा एखादा धागा हाती लागायला हवा होता आणि दुसर्याच दिवशी तो लागला. ज्या ठिकाणी ते दोघं संशयित रामनारायणच्या टॅक्सीत बसले, त्याच्या अलीकडच्या चौकात नुकत्याच सुरू झालेल्या एका मेडिकल विक्रेत्याच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये त्याला काहीतरी सापडलं होतं. पेपरमध्ये आलेल्या बातम्या तो वाचत होता. त्यावरूनच आपल्याकडची माहिती पोलिसांना द्यावी, हे त्याला जाणवलं.
खुनाची घटना उघड झाल्याच्या दोन दिवस आधी एक जण त्याच्या दुकानात डोकेदुखीवरच्या गोळ्या घ्यायला आला होता आणि त्याच्याबरोबर असलेल्या माणसाच्या हातात एक अवजड बॅग होती. त्या विक्रेत्याने ते फुटेज दाखवलं आणि त्याच क्षणी ती
बॅग पोलिसांनी ओळखली. रामनारायणच्या टॅक्सीत हीच बॅग सापडली होती! फक्त अडचण अशी होती, की त्या दोघांच्या चेहर्यावर स्कार्फ गुंडाळलेला होता, त्यामुळे चेहरे नीट दिसत नव्हते. रामनारायणलाही त्यांचे चेहरे ओझरतेच दिसले होते. मात्र, त्यांच्यापैकी एकाला कान खाजवाजची सवय होती, हे त्यानं पोलिसांना अचूक सांगितलं होतं.
बारगजेंनी आता रामनारायणच्या निरीक्षणावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे असलेल्या मेघराजशी संबंधित सगळ्यांचे फोटो दाखवायचं ठरवलं. त्यातला एक फोटो रामनारायणनं बरोबर ओळखला आणि ह्याच माणसाला कान खाजवायची सवय असल्याचंही सांगितलं.
निनावी फोन नंबरचा मालक निलेश, मेघराज यांच्या फोन नंबर्सचं लोकेशन एकच दाखवत होतं. त्याच दिवशी आणखी एक फोनही तिथे अॅक्टिव्ह होता. त्या माणसाचं नाव पोलिसांना कळलं आणि त्यांनी आत्तापर्यंत बांधलेला तर्क खरा ठरला. बारगजेंनी लगेच त्यांची टीम तयार करून दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यातला एक होता निलेश आणि दुसरा होता, मेघराजचाच पार्टनर, प्रशांत! मेघराजचा ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास होता, तो त्याचा मित्र, पार्टनर प्रशांत यानेच मेघराजला दारूतून विष पाजून त्याचा काटा काढला होता. पोलिसांना आता फक्त त्याच्याकडून या गुन्ह्यामागचं कारण समजून घ्यायचं होतं.
“साहेब, प्रशांत हुशार होता, मेहनती होता. धंद्यातही हुशार होता. त्यानं माझ्यासाठीही खूपच केलं. फक्त एकच गोष्ट वाईट केली, माझी मैत्रीण सुवर्णा हिला माझ्यापासून दूर केलं आणि स्वतःकडे ओढलं. त्याला पहिल्यापासून माहीत होतं, की माझं सुवर्णावर प्रेम आहे. त्याला स्वतःच्या स्मार्ट असण्याचा एवढा गर्व होता की ती माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठीच योग्य आहे, असं त्याला वाटत होतं आणि तिला पटवण्यात त्याला काही गैर वाटत नव्हतं. तीसुद्धा मला सोडून त्याच्याकडे गेली आणि माझा संताप झाला. म्हणूनच त्याचा एक ना एक दिवस मला काटा काढायचा होता. त्याला कायमची अद्दल घडवायची होती. म्हणून त्याला विष पाजलं आणि ह्या निलेशच्या मदतीनं त्याचे तुकडे तुकडे करून टाकले!“
केवळ प्रेमातल्या चढाओढीतून एका मित्राने दुसर्या मित्राचा जीव घेतला होता. क्रौर्याची परिसीमा गाठली होती. साध्या दिसणार्या माणसांच्या गुन्हे करण्याच्या या मनोवृत्तीने पोलिसही क्षणभर हबकून गेले.