भास्कर सातपुतेंनी शेवटचा कॉल गावातल्याच खानावळीच्या मालकिणीला केला होता. ते त्याच गावात एका खानावळीत जेवायला जायचे किंवा कधीकधी घरी पार्सल मागवायला जायचे. त्या दिवशी त्याच संदर्भात त्यांनी फोन केला असावा, असं घाडगेंनी सांगितलं. त्या दिवसात बाकी कुणाशी त्यांचं फारसं बोलणं झालं नव्हतं. हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होत चाललं होतं.
—-
स्वतःचे वडील बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन नलिनी पोलिस स्टेशनला आली, तेव्हा पोलिसही थोडे चक्रावून गेले. खरं तर एखादा माणूस बेपत्ता होणं, यात पोलिसांसाठी विशेष असण्याचं काही कारण नव्हतं. अधूनमधून अशा केस येतच असतात. अगदी वेगवेगळ्या वयोगटातली माणसं गायब होतात. लहान मुलं-मुली यांच्याबाबतीत अपहरणाची किंवा अपघातात काहीतरी दुर्दैवी घटना घडल्याची शक्यता असू शकते. थोडी मोठी मुलं स्वतःहून काही कारणाने निघून गेलेली असू शकतात. मोठ्या माणसांच्या बाबतीत आत्महत्येसारखं कारण असू शकतं किंवा वयस्कर माणसांच्या बाबतीत विस्मृतीमुळे पत्ता चुकल्याचा प्रकार असू शकतो. पोलिस त्या त्या माणसाच्या वयानुसार, परिस्थितीनुसार आणि वातावरणानुसार निर्णय घेतात आणि त्या दिशेनं तपास सुरू करतात. यावेळी मात्र खरंच चक्रावून जाण्यासारखं घडलं होतं. भास्कर सातपुते हे सहा महिन्यांपूर्वीच गायब झाले होते आणि त्यांची मुलगी आत्ता, त्याबद्दलची तक्रार द्यायला आली होती!
“एवढे दिवस तुम्ही कुठे होतात, नलिनीबाई?’’ इन्स्पेक्टर भालेकरांनी नलिनीला जाब विचारला, त्यावर नलिनी रडायला लागली.
“साहेब, अण्णांचं आणि माझं जोरदार भांडण झालं होतं. पुन्हा माझ्याशी बोलू नकोस, असं त्यांनी मला बजावलं होतं, म्हणूनच आमचा काही संपर्क नव्हता,’’ तिने रडत रडत सांगितलं.
“म्हणजे? साधा फोनसुद्धा केला नव्हता तुम्ही एकमेकांना गेल्या सहा महिन्यांत?’’ भालेकरांनी विचारल्यावर नलिनी आणखी थोडी संकोचली. शेरणेवाडी या तालुक्याच्या ठिकाणी भास्कर सातपुते एकटेच राहत होते. नलिनी पाच वर्षांपूर्वी लग्न होऊन शहरात राहायला गेली होती. त्यानंतर वर्षभरातच तिच्या आईचं निधन झालं.
“मी आईवडिलांची एकुलती एक मुलगी. दोघांनी मला लाडाकोडात वाढवलं. अण्णांचं माझ्यावर विशेष प्रेम. त्यांनी माझं लग्नही एका मोठ्या घराण्यात ठरवलं होतं, पण माझं आदित्यवर प्रेम होतं. मी त्यांना तसं सांगितलं तेव्हा ते भडकले. आदित्यशी लग्न केलं तर संबंध तोडून टाकीन, असं त्यांनी बजावलं. मी आदित्यशिवाय दुसर्या कुणाशी लग्नाचा विचारच करू शकत नव्हते. मी पळून जाऊन लग्न केलं आणि अण्णांनी कायमचे संबंध तोडले.’’ सगळी माहिती देताना नलिनीला अजूनही रडू येत होतं. आत्ता काही कामानिमित्त शेरणेवाडीजवळून प्रवास करत असताना तिला वडिलांची आठवण आली, त्यांना भेटावंसं वाटलं. तेव्हा ते घरीच नसल्याचं तिच्या लक्षात आलं.
भालेकरांनी आता शेरणेवाडीला जाऊन तिथून काही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी संबंध तोडले तरी नलिनीने आईशी फोनवरून संपर्क ठेवला होता. ती गेल्यावर तोही बंद झाला. आदित्यबद्दल भास्कररावांच्या मनात खूप गैरसमज होते. तो नलिनीसाठी अजिबात चांगला मुलगा नाही, असा त्यांचा ठाम समज होता. सहा महिन्यांपूर्वी त्यांना आदित्यबद्दल असंच काहीतरी समजलं, तेव्हा त्यांनी नलिनीला त्याबद्दल फोन करून सावध करायचा प्रयत्न केला. तिनं ते ऐकून घेतलं नाही, त्याचंच समर्थन केलं, तेव्हा मात्र भास्करराव चिडले आणि पुन्हा कधी फोनही करू नकोस, असं त्यांनी नलिनीला बजावलं.
ज्या आदित्यवरून बापलेकीचे संबंध एवढे ताणले गेले, तो काय चीज आहे, हे आता भालेकरांना बघायचं होतं. शेरणेवाडीत भास्कररावांचं साधंच तीन खोल्यांचं बैठं घर होतं. इतर वस्तीपासून थोडं वेगळं असल्यामुळे आणि भास्कररावांच्या तापट स्वभावामुळे त्यांचे गावात कुणाशी फारसे संबंध नव्हते. म्हणूनच त्यांच्या गायब होण्याविषयी फार लोकांना समजलं नव्हतं. ते कदाचित मुलीकडेच गेले असतील, असाही समज काहीजणांनी करून घेतला होता. एकूणच त्यांच्या असण्या-नसण्याबद्दल दोन्ही पातळ्यांवर भरपूर हलगर्जी झाली होती, हेही उघडच होतं.
“साहेब, अप्पांना मी आवडत नव्हतो, माझ्याबद्दल त्यांच्या मनात राग होता, याची मला आधीपासून कल्पना होती. तरीही मी त्यांना स्वतःहून कधीच उलट बोललो नाही, की त्यांच्याशी भांडण केलं नाही,’’ आदित्य सांगायला लागला.
“मिसेस नलिनींचं भास्कररावांशी सगळ्यात शेवटचं बोलणं सहा महिन्यांपूर्वी झालं, त्यावेळीही तुमच्याच विषयावरून त्यांचे वाद झाले होते, आदित्यभाऊ! त्यांच्या मनातून तुमच्याबद्दलचा राग तेव्हाही गेलेला नव्हता,’’ भालेकर म्हणाले.
“मला माहितेय साहेब, नलिनी मला सगळं सांगते. पण म्हणून मी त्यांच्यावर राग धरून त्यांचं काहीतरी बरंवाईट केलं, असं म्हणायचंय का तुम्हाला?’’ आदित्य अस्वस्थ झाला.
“पुरावे हाताला लागले, की आम्हाला काय म्हणायचंय ते स्पष्ट होईलच,’’ एवढंच भालेकरांनी त्याला सुनावलं.
पोलिसांसमोरचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान होतं, ते म्हणजे भास्कर सातपुतेंना शोधून काढणं. अजूनही त्यांचा पत्ता लागत नव्हता. सहा महिन्यांपूर्वीचे फोन रेकॉर्डस शोधून काढणं, त्यावरून संदर्भ लावणं, इथून सुरुवात करायची होती. भास्कररावांच्या फोनचे रेकॉर्डस दुसर्याच दिवशी पोलिसांच्या हातात आले.
“घाडगे, भास्कर सातपुतेंनी शेवटचा कॉल कुणाला केला होता?’’ रेकॉर्डस चेक करताना भालेकरांनी त्यांच्या सहकार्याला विचारलं.
“गावातल्याच खानावळीच्या मालकिणीचा नंबर आहे तो, साहेब,’’ घाडगे म्हणाले. भास्कर सातपुते त्याच गावात एका खानावळीत जेवायला जायचे किंवा कधीकधी घरी पार्सल मागवायला जायचे. त्या दिवशी त्याच संदर्भात त्यांनी फोन केला असावा, असं घाडगेंनी सांगितलं. त्या दिवसात बाकी कुणाशी त्यांचं फारसं बोलणं झालं नव्हतं. त्या आधीच्या दोन महिन्यांच्या फोन कॉल रेकॉर्डसमध्ये कुणा एकाच व्यक्तीला सतत फोन केलाय किंवा त्यांना रात्री अपरात्री कुणाचा फोन आलाय, असंही काही लक्षात येत नव्हतं. हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होत चाललं होतं.
खानावळ चालवणारी वासंती मलुष्टे ही पन्नाशीकडे झुकलेली, तरीही तरतरीत आणि खणखणीत आवाजाची बाई होती.
“भला माणूस साहेब. आमच्या खानावळीत अधनंमधनं जेवायला यायचे. कधी त्यांच्या घरी पार्सलही पोचवायचो आम्ही,’’ मलुष्टेबाईंनी सांगितलं.
“त्या दिवशी, म्हणजे १६ मार्चला नेमकं काय झालं होतं? तुमच्या खानावळीत जेवायला आले होते का भास्करराव,’’ भालेकरांनी विचारलं.
“आता येवढं जुनं कुठं लक्षात आहे साहेब?’’ असं म्हणून मलुष्टेबाईंनी थोडी टंगळमंगळ केली, पण भालेकरांनी आवाज चढवल्यावर तिला विचार करावाच लागला.
“आठवलं साहेब. १७ मार्चपासनं आमच्या खानावळीला चार दिवसांची सुट्टी होती. माझ्या भाचीच्या लग्नाला जायचं होतं साहेब गावाला. म्हणून सुटी दिली होती. पण अण्णा काही १५ तारखेपास्नं फिरकलेच नव्हते खानावळीत. काय झालं होतं, कुणास ठाऊक. १६ मार्चला त्यांचा फोन आला, तेव्हा दुसर्या दिवसापास्नं सुटी असल्याचं मी सांगितलं, तेवढंच आमचं बोलणं. आम्ही गावावरनं परत आलो, त्याच्यानंतर ते गायबच असल्याची खबर मिळाली,’’ मलुष्टेबाईंनी खुलासा केला.
“तुमच्याकडे नेहमी येणारं गिर्हाईक गावातून असं बेपत्ता झालं, त्यांचा फोन नाही, काही निरोप नाही, तरी तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच चौकशी करावीशी वाटली नाही? गावातल्या कुणालाच त्यांची काही काळजी नव्हती?’’ भालेकरांनी संतापून विचारलं, तशी मलुष्टेबाई एकदम गप्प झाली. एकूणच भास्कर सातपुतेंच्या असण्या-नसण्याबद्दल गावातल्या लोकांना काही चिंता आहे, असं त्यांना आढळलं नाही. त्याचं मुख्य कारण होतं, भास्कररावांचा भांडखोर स्वभाव. त्यांनी आत्तापर्यंत अनेकांशी भांडण केलं होतं, त्यामुळे कामाशिवाय त्यांच्यापाशी कुणी फिरकतच नसे. त्यातून ते कदाचित शहरात मुलीकडे गेले असतील, असाही समज काही जणांनी करून घेतला होता, त्यातून हा घोळ झाला होता.
गावात चौकशी करून काहीच अंदाज येईना, तेव्हा भालेकरांनी भास्कररावांचे इतर काही व्यवहार आहेत का, त्यांना बाकी कुठल्या कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट होता, याचा शोध घ्यायला सुरुवात केली.
“घाडगे, कुठल्या बाईचं काही लफडं नव्हतं ना? तसले काही छंद नव्हते ना ह्या माणसाला?’’ त्यांनी सहकार्याला विचारलं.
“नाही साहेब, तसं तर कुणाच्या बोलण्यात काही आलं नाही. तसं काही वाटत पण नाही. भांडखोर स्वभावामुळे लोकही त्याच्याशी संबंध ठेवायचे नाहीत, एवढंच,’’ घाटगेंनी अधिक माहिती पुरवली. भास्कररावांच्या घराची तपासणी करताना त्यांनी गेल्याच वर्षी खरेदी केलेल्या एका जमिनीची कागदपत्रं पोलिसांना मिळाली. भालेकरांनी इस्टेट एजंटला बोलावून घेतलं, पण त्याच्याकडेही संशय घेण्यासारखं काही सापडलं नाही. पोलिसांचा तपास पुन्हा जागच्या जागी येऊन थांबला.
“ह्या अण्णांची उत्पन्नाची साधनं काय होती, हे पुन्हा बघायला हवं.’’ भालेकर घाडगेंना म्हणाले. त्यांनी त्या दृष्टीनं आणखी माहिती गोळा करायला सुरुवात केली, तर कधीकाळी अण्णा पैसे उधार देण्याचा धंदाही करत होते, हे पोलिसांना समजलं. त्यातून त्यांच्याकडे अधूनमधून भरपूर रोकड येत असे आणि मग ते एखाद्या व्यवहारात ती गुंतवत. असे त्यांचे बेहिशेबी व्यवहार भरपूर चालत.
गावातल्या अनेकांची त्यांनी चौकशी केली होती, तेव्हा प्रत्येकाच्या घरची परिस्थिती, त्याच्या वागण्याबोलण्यातली विसंगती, त्याच्या चेहर्यावरचे हावभाव, हे सगळं पोलिसी नजरेनं टिपलं गेलं होतंच. शांतपणे ह्या केसचा विचार करत असताना भालेकरांना अचानक एक गोष्ट जाणवली. एका घरासमोर त्यांनी एक नवीन, चकचकीत गाडी बघितली होती. एवढ्या साध्या घरासमोर ही गाडी कशी, याचं त्यांना आश्चर्यही वाटलं होतं. त्यावेळी मिळालेलं उत्तर समाधानकारक नव्हतं. त्यांनी पुन्हा त्या विषयाकडे लक्ष वळवायचं ठरवलं.
“घाडगे, १६ मार्चला भालेकरांचा मोबाईल त्यांच्या घरातच स्विच ऑफ झाला. त्यानंतर त्याचा काही ट्रेस लागला नाही. त्या दिवशी त्यांच्या घराच्या परिसरात कुणाकुणाचे नंबर्स अॅक्टिव्ह होते, हे शोधायला हवं. त्या आदित्य आणि नलिनीपासून सगळ्यांचे नंबर खणून काढा आणि त्यांच्यातलं कोण इथे होतं, हे शोधून काढा,’’ भालेकरांनी सूचना केल्या आणि यंत्रणा हलवली. दुसर्या दिवशी रिपोर्ट हातात आल्यावर त्यातला एक नंबर बघून भालेकरांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
“वाटलंच!’’ त्यांच्या चेहर्यावर काहीतरी मोठं हाती लागल्याचा आनंद पसरला. त्यांनी ताबडतोब गाडी काढली आणि घाडगेंसह ते मलुष्टेबाईंच्या घरी पोहोचले.
“तुमचे यजमान आहेत का घरी?’’ भालेकरांनी दरडावून विचारलं.
“हायत की. का ओ साहेब?’’ मलुष्टेबाईंनी न समजून विचारलं. तेवढ्यात रवी मलुष्टे बाहेर आला. भालेकरांनी सरळ त्याची कॉलर धरून त्याला दोन थोबाडीत दिल्या तसा तो सटपटला.
“काय झालं साहेब, का मारताय?’’ जरासा गुरगुरत म्हणाला.
“१६ तारखेच्या आधीपासून भास्कर सातपुते तुमच्याकडे जेवायला आले नव्हते, तुमची काही भेटसुद्धा झाली नव्हती ना? मग त्या दिवशी त्यांच्या घरी काय करत होतास रे, साल्या?’’ भालेकरांनी दरडावून विचारलं आणि आणखी दोन ठेवून दिल्या.
“तुझा फोन नंबर त्या दिवशी त्याच भागात अॅक्टिव्ह होता, हे कळलंय आम्हाला. आणि मलुष्टेबाई, तुम्ही पण गेला होतात नंतर तिथे. दोघांनी मिळून भास्कर सातपुतेंना मारलंत आणि त्यांना कुठेतरी फेकून दिलंत ना? खरंय का नाही, बोला!!’’ भालेकरांनी आणखी थोडा प्रसाद दिल्यावर रवी मलुष्टे कोलमडला. त्यानं गुन्ह्याची कबुली देऊन टाकली.
“भास्करभाऊंकडे अधनंमधनं भरपूर पैसे यायचे. पण कधी कुणाला मदत करायचे नाहीत. एकदा मी पण काहीतरी कामासाठी त्यांच्याकडे पैसे मागितलेले, तर मला वाट्टेल ते बोलले, माझी इज्जत काढली. ते डोक्यात गेलं होतं साहेब. त्या दिवशी त्यांनी फोन करून घरी डबा मागवला होता. मी डबा द्यायला गेलो, तर ते घरी पैसेच मोजत बसले होते. ढीगभर पैसे होते. ते बघून माझी नियत फिरली. काहीतरी कारण सांगून त्यांना आत पाठवलं आणि त्यातले थोडे पैसे उचलायचा प्रयत्न केला, तेवढ्यात ते आले आणि शिव्या द्यायला लागले. मग डोकं फिरलं आणि हातात मिळेल ते त्यांच्या डोक्यात घातलं. नंतर घाबरून गेलो, मग हिला बोलावून घेतलं आणि त्यांचं प्रेत उचलून लांब नेऊन पुरून टाकलं,’’ रवी मलुष्टेनं सगळं सांगून टाकलं.
त्यानं सांगितलेल्या जागेवर खणून पोलिसांनी सातपुतेंचा कुजलेला मृतदेह बाहेर काढला. त्यांची ती अवस्था बघताना नलिनी हमसून हमसून रडली. बाबांना एकटं राहू दिल्यामुळे, त्यांच्याशी कुठलाच संपर्क न ठेवल्यामुळेच त्यांची अशी अवस्था झाली, ही खंत तिच्या मनात आता कायमची राहणार होती.
(लेखक चित्रपट आणि मालिका लेखनात कार्यरत आहेत.)