त्या दिवशी मी आणि माझा मानलेला परममित्र पोक्या देशाच्या भवितव्याबद्दल गंभीर चर्चा करत होतो. देशाच्या भवितव्याबद्दल आम्हाला नेहमीच चिंता वाटते. जेवढी विक्रमादित्यांना वाटते तेवढीच नव्हे तर त्याच्या दुप्पट-तिप्पट वाटते. आज आमच्यासारखी देशाची इतकी चिंता करणारी माणसे राहिलीच नाहीत, याचे वाईट वाटते. आम्ही दोघे, विक्रमादित्य, कंगनाताई, सर्किट सोमय्या, शेलारमामा, पाटीलबुवा, अमृताबाई आणखी थोडीफार एवढीच काय ती हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच देशाच्या भवितव्याची चिंता करणारी माणसे आता उरली आहेत. बाकी आहेत पण ते तसे भासू देत नाहीत. कुणी सत्तेसाठी धडपडतो, कुणी मालमत्तेसाठी भ्रष्टाचार करतो, पण आम्ही देशाशी प्रामाणिक आहोत. त्यामुळे जे आहे ते उघड आहे म्हणून आम्हाला लपवाछपवी करावी लागत नाही. अलिकडे माझ्या घरात अब्जावधीची संपत्ती लपवली आहे, म्हणून ईडीची धाड पडणार अशी उगाचच कोणीतरी आवई ठोकली. मी पण ते नाकारले नाही. आमच्याकडे सायंकाळी सातनंतर टोळधाड पडते, पण ईडीबिडी आमच्या कक्षेत येत नाही.
सोमय्या माझा बालमित्र आहे. आम्ही त्याला लहानपणापासून सर्किट म्हणतो. तो कधीच एका जागी स्वस्थ बसत नसे, त्याचे काही ना काही चाळे सुरू असत. झाली याची चाळेगत सुरू, असे मग बाकीचे मित्र म्हणायचे.
त्याला जेव्हा मी देशाच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा तो म्हणाला, मित्रा, मोदींच्या हातात देशाचे भवितव्य सुरक्षित आहे. कंगनाताईने २०१४ साली देश स्वतंत्र झाल्याची हाळी दिली तेव्हापासून आजपर्यंत या देशाकडे कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत झाली नाही. मोदींनी नुसता दाढीवरून हात फिरवत डोळे वटारले की चिनी राष्ट्राध्यक्ष चळचळा कापतात, तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची राजकीय बॅटिंग ढेपाळते. कंगनाताईंच्या बोलण्याला भक्कम पाठिंबा देणारे विक्रमादित्य यांचीसुद्धा मी आणि पोक्याने स्वतंत्र गुप्त भेट घेतली आणि त्यांना त्या पाठिंब्याबद्दल विचारले. तेव्हा ते पुन्हा म्हणाले, मी माझ्या डायलॉगवर आजही ठाम आहे. काही डायलॉग मला नाइलाजाने बोलावे लागतात. त्याची कारणे फक्त मला ठाऊक आहेत. ती तुम्हाला सांगून चालणार नाहीत. कारण प्रश्न माझ्या स्वत:च्या भवितव्याचा आहे. कंगनाबद्दल मला आणि माझ्याबद्दल कंगनाला नितांत आदर आहे. ती फार विचारपूर्वक बोलते यावर ठाम विश्वास आहे. शिवाय ती माझ्यासारखीच निर्भय आहे. कुणालाच घाबरत नाही. तिचा इतिहासाचा अभ्यासही दांडगा आहे. तिने जेव्हा पडद्यावर झाशीच्या राणीची भूमिका केली तेव्हा तिने या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी माझीही मदत घेतली होती. मी तिला त्यावेळी शनिवारवाड्याचा इतिहास समजावून सांगितला होता. डोळ्यासमोर मराठ्यांचा आणि पेशवाईचा इतिहास उभा केला होता. माझ्या नाटकातील डायलॉग म्हणून दाखवले होते. तेव्हा तिने मला गुरू मानले होते. मग माझ्या शिष्येची बाजू मी कशी नाकारू शकतो? ती जे बोलते ते त्रिवार सत्य असते. मोदी हे जसे तिचे दैवत आहे तसेच ते माझेही आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आपण देशाचा इतिहासच काय, पण भूगोलही बदलू शकतो… आता आम्हालाच बदलण्याची वेळ आली आहे, हे समजून आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि मुंबईला आलो.
म्हटले, आता खारला अड्ड्यावर जाऊ आणि जराशी ढोसू, मग डोके शांत होईल. तेवढ्यात रस्त्यात कंगनाबाईच भेटल्या. आम्ही सैनिकाच्या थाटात त्या वीरांगनेला सलाम ठोकला. तशी ती म्हणाली, हाल वैâसा है जनाब का?… मी म्हटले, ठीक आहे. पोक्याही म्हणाला अच्छा है तेव्हा ती म्हणाली, क्या लोग है… समन्स पर समन्स लगाते हैं! इसलिये मुंबई आना पडता है!.. मी म्हटलं ते जाऊ दे खड्ड्यात. मोदी आहेत ना, ते सगळं ठीक करतील. पण ती तुमची देशाच्या स्वातंत्र्याची भूमिका आमच्या दोघांच्याही डोक्यावरून गेली. ती जरा विस्कटून विस्कटून सांगा ना. त्यावर ती म्हणाली, हे बघ. टोक्या आणि पोक्या, तुम्ही गुंड साम्राज्यातून इतक्या उंचावर आला आहात याचाच अर्थ गेल्या सहा-सात वर्षात तुमचा भरपूर उत्कर्ष झाला आहे. याचाच अर्थ काय तो समजा. हे सारे कुणामुळे झाले? अर्थात मोदींनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे. तुम्हाला पोलीस कोठडीतून कोणी सोडवले? आमच्या माणसांनी. तुम्ही एवढी माया कशी जमवली, आमच्या सरकारमुळे. तुमच्याकडे दोन हजाराच्या नोटांची बंडले कशी आली? आमच्या सरकारमुळे. तेव्हा यालाच गुंडांच्या जीवनात झालेली क्रांती म्हणतात. सामान्य माणूसही सुखी झाला. सोशल मीडिया सुखी झाला. सगळीकडे आबादीआबाद झाली. यालाच स्वातंत्र्य म्हणतात. ते मोदींनी २०१४ साली आणले. ती रक्तहीन क्रांती होती. मी सिनेमात लाकडी घोड्यावर बसून लुटूपूटूच्या लढाईचे सीन दिले. पण मोदींनी देशातील छुप्या शत्रुंबरोबर जी लढाई केली तिला तोड नव्हती. त्यांचे बोलणे नुसते ऐकत राहावे असे वाटते. कानात घातलेले कापसाचे बोळेही स्फुरण पावल्याने कानातून बाहेर पडतात. म्हणूनच हे खरे स्वातंत्र्य २०१४ साली आले. आपल्याला ते टिकवायचे आहे. त्यासाठी देशातील कितीही राष्ट्रीय संपत्ती विकायची पाळी आली तरी जनतेने घाबरू नये. शेवटी मोदी जे करतात ते देशहितासाठीच असते. तेव्हा गैरसमज पसरवू नका. आज मोदींना साथ दिलीत तर ते भावी काळात नक्कीच देशाचे भवितव्य आतापेक्षा उज्वल करतील. तुम्ही जा तुमच्या नेहमीच्या कामाला गुत्त्यात…
आम्ही सटकणार एवढ्यात पलीकडच्या रस्त्यावरील रेकॉर्डिंग स्टुडिओतून अमृताबाई गात गातच आल्या. म्हणाल्या, काय टोक्याभाय, पोक्याभाय! इकडे कुठे? आम्ही म्हणालो, सहजच विश्रांतीस्थानांकडे चाललोय. तुमचं कसं चाललंय गाणं?… छान. मुळात माझ्यात टॅलेंट आहे ते स्वस्थ बसू देत नाही. म्हणून गाते. पैशासाठी नाही… न विचारताच या उत्तर कशाला देत आहेत असा मनात विचार करून आम्ही बाय बाय करून रस्ता ओलांडला.